आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मन:स्वास्थ्य सांभाळायला हवं

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आभासी जगात हजारो फ्रेंड्स आणि मनातलं बोलायला कुणीच नाही अशी अनेकांची अवस्था आहे. परिणामी सामना करावा लागतो ते भयंकर नैराश्याचा. त्यात ग्रामीण भागांत तर मानसिक व मनोकायिक आजारांबद्दल प्रचंड अज्ञान असतं. यातून काय होतं?

 

एवढ्यातच झालेल्या काही प्रसिद्ध व्यक्तींच्या आत्महत्येनं काही गोष्टींवर अजूनही विचार केला जात नाही हे लक्षात येतंय. संवेदनशील मनांना वेळोवेळी त्रास होत असतो. कुणाचा लवकर लक्षात येतो तर कुणाचा लक्षात येईपर्यंत खूप उशीर होऊन जातो. सुरुवातीला जर या हळव्या मनाच्या तक्रारींकडे लक्ष दिलं गेलं तर त्यांचं मोठ्या दुर्धर आजारांमध्ये रूपांतर होत नाही. मन मोकळं करता येईल अशी नाती मिळाली नाहीत तर विध्वंसक प्रवृत्ती वाढत जाते. आभासी जगात हजारो फ्रेंड्स आणि मनातलं बोलायला कुणीच नाही असं असल्यावर काय उपयोग?
असो!
डॉक्टरकी शिकत असताना मानसिक आरोग्याकडे झालेल्या अक्षम्य दुर्लक्षातून घडलेल्या दोन वाईट केसेस मला ठळक आठवतात. एका रुग्णानं मुलगी झाली म्हणून स्वतःला जाळून घेतलं होतं (तिच्या रूममध्ये चेकअप करण्यासाठी जाताना मला शब्दशः काटा फुटत असे) आणि दुसरी केस म्हणजे दुसरीही मुलगीच झाली म्हणून एकीनं आपल्या अवघ्या सतरा दिवसांच्या बाळाला विहिरीत फेकून दिलं होतं. नंतर पोलिसांसमोर बाळ कुणीतरी उचलून नेल्याचा बेमालूम कांगावा केला होता.


कुठून येतं हे असं वागण्याचं बळ?
काही अंशी मूळचा हळवा स्वभाव, कदाचित भूतकाळात दडपले गेलेले काही सल, आणि बाळंतपण, प्रसुतीनंतरची प्रचंड शारीरिक, मानसिक उलथापालथ या सगळ्याचं पर्यवसान अतिशय क्रूर अमानुष गुन्ह्यात झालं होतं. त्या वेळी खूप तिरस्कार, भीती वाटली होती पण वैद्यकीय सेवा सुरू केल्यानंतर कित्येक रुग्णांच्या अनुभवांती, या सगळ्या घटनाक्रमांची कारणमीमांसा लक्षात आल्यावर त्या टोकाच्या भावनांची जागा सहानुभूती व सहवेदनेनं घेतली. आमच्या ग्रामीण भागात एक मोठा गैरसमज आहे की, मूल झाल्यावर सुनेची घरातील जागा बळकट होते, “आन् मग आता हिचा खुट्टा बळकट झालाय प्वॉर झाल्यावर. आता ही अशीच चराचरा बोलंल.’
पण या चिडचिडेपणाचं मुख्य कारण म्हणजे त्या काळात होणारे प्रचंड मोठे हार्मोनल बदल आणि बाळ सांभाळताना येणारा मानसिक, शारीरिक थकवा, होणारी जागरणं. याला पोस्टनेटल डिप्रेशन अशी संज्ञा आहे. पण शारीरिक आजारांकडेच इतकं दुर्लक्ष केलं जातं की, मानसिक आरोग्याकडे कोण लक्ष देणार? आणि मग असे गुन्हे घडतात.


ठरवलं तर फार अवघड नाहीत या गोष्टी.
मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या स्त्री काही विशिष्ट कालखंडात कमकुवत होते, जसे की वयात येताना, पाळी यायच्या आधी, गर्भारपण, प्रसुतीनंतर, आणि रजोनिवृत्तीचा काळ. या काळात तिच्याकडून काही चुका झाल्या तरी सांभाळून घ्या. या काळात ती जे सहन करते त्या तुलनेत तुमचे कष्ट काहीच नाहीत.
हे झालं स्त्रियांच्या बाबतीत.
पुरुषांच्या बाबतीत त्यांच्या वयात येण्याच्या काळात विशेष लक्ष द्यायला हवं. पण हे तर अजिबातच होत नाही. एक वेळ स्त्रियांना खाजगीत विषय बोलायला आई, बहीण, मैत्रीण तरी असते. त्या रडून, बोलून मोकळ्या होतात पण पुरुषांना ही मुभाही नसते. खरं तर त्यांनाही त्या वयात होणारे काही विशिष्ट त्रास होतातच, वेगवेगळे प्रश्न पडतात पण त्यांचं निरसन करायला कुणीच नसतं. पुरुषांच्या मन:स्वास्थ्याची अजूनच हेळसांड आहे. त्यांनी रडणं किंवा हळवं असणं हा थट्टामस्करीचा विषय असतो. त्यांच्या त्रासाबद्दल ना त्यांना मार्गदर्शन मिळतं ना सहानुभूती. मग वाढत्या कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी, वाढती व्यसनाधीनता, तब्येतीच्या तक्रारी सगळ्याचं प्रमाण वाढत जातं.


या सगळ्या गोष्टींची मुळं बऱ्याच वेळा चुकीच्या किंवा अति नाजूक मानसिक जडणघडणीत असते किंवा काही दुर्मिळ मानसिक आजारांच्या अनुवंशामुळे असते, हे कोणी लक्षातच घेत नाही. कारण बऱ्याच वेळा जाणवणारी लक्षणे ही निव्वळ शारीरिक असतात. पण मनोकायिक आजार हा आजाराचा अख्खाच्या अख्खा एक स्वतंत्र प्रकार आहे हे माहीत नसतं. ग्रामीण भागात शारीरिक गोष्टींकडेच इतकं दुर्लक्ष असतं की, मानसिक, मनोकायिक आजार अशीही काही संज्ञा असते हेच त्यांना माहीत नसतं.


या विषयावर खूप लिहिण्यासारखं आहे. पण आता एवढंच सांगू इच्छिते की, घरातील माणसांचे मनाच्या दृष्टीने नाजूक कालखंड समजून, सांभाळून, सावरून घ्या. त्यांच्या छोट्या छोट्या तक्रारी हसण्यावारी न नेता गांभीर्याने किमान ऐकून तरी घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर घरातल्या घरात हे सांभाळता येत नसेल, तर “तिचाच स्वभाव कुरकुरा/त्याचाच स्वभाव तिरसट” अशी सरसकट विधान न करता, न लाजता त्या व्यक्तीला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जा. कारण त्या आपल्या प्रिय व्यक्तीला हसरं पाहण्यात जास्त आनंद आहे हार घातलेल्या हसऱ्या फोटोपेक्षा.

 

- डाॅ. क्षमा शेलार, बेल्हा, पुणे
shelarkshama88@gmail.com

बातम्या आणखी आहेत...