आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्वती: कुमारिका आणि विवाहिता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कल्याण सुंदर. शिव-पार्वतीच्या विवाहप्रसंगांचे विविध क्षण टिपणारे शिल्पपट. हे दिसतात, वेरुळ येथील कैलास लेण्यात आणि घारापुरी येथील एलिफंटा लेण्यात. दोन्ही शिल्पांना कलाप्रांतात तोड नाही की जोड नाही....


सामान्यत: शिवाची पत्नी म्हणून पार्वतीची ओळख आपणा सर्वांस असते. पण ितच्या विविध अाविष्कारांची, अन्य रूपांची काही थोड्याच जणांना कल्पना असते, असे आढळते. ती कुमारी म्हणून आपल्यासमोर येते, तेव्हा तिच्या जिद्दी स्वभावाची ओळख होते. तिला त्या काळात गौरी म्हणून संबोधावे लागते. त्याचे कारण विचारात घेण्यासारखे आहे. ितला शिवाशी विवाह करायचा असतो. ते तसे अवघड काम असते. पण ही ते करायचेच असा निश्चय करून बसते. त्यासाठी घोर तपश्चर्या करायची तिची तयारी असते. या तपश्चर्येला ‘पंचाग्नी साधन’ असे म्हणतात. तिच्या पायाशी मागे-पुढे चार दिशांना चार धगधगती अग्निकुंडे असतात आणि सूर्य माथ्यावरती आग ओतत असतो. हिच्या पायाखाली गोधा (घोरपड) असते. तिचा चिवटपणा आपणास तानाजी मालुसरेच्या सिंहगड विजयाच्या एेतिहासिक घटनेमुळे परिचित झालेला अाहेच. मोठ्या चिवटपणे, जिद्दीने ती तपाचरण करते आणि परीक्षेनंतर शिवाशी तिचा विवाह होतो. ‘गोधासनाभवेद् गौरी’ असे तिचे वर्णन पुराणे करतात. अशी शिल्पेही आढळतात.


तिच्या विवाहसमयाची फार प्रत्ययकारी शिल्पे उपलब्ध आहेत. अशा प्रसंगातील शिल्पांना ‘कल्याण सुंदर’ असे म्हणतात. अशा दोनच शिल्पांची ओळख येथे करून दिली आहे. एक आहे वेरुळ येथील कैलास लेणीतील आणि दुसरे आहे घारापुरी (एलिफंटा) लेणीतील. कैलास लेणीतील उत्तरेकडील ओवरीच्या पूर्व टोकास एका शिल्पपटातील कल्याणसुंदर - प्रसंग फार मार्मिक पुन:प्रत्ययाचा आनंद प्रेक्षकांना देऊन जाणारा आहे. पौरुषयुक्त शिव उभा आहे, त्याचा हात पार्वतीच्या हातात आहे. नववधू पार्वती या प्रसंगाला शोभेल अशाच साजेशा अवस्थेत उभी आहे. म्हणजे असे, की ती मान खाली घालून अधोवदना आहे, डाव्या गुडघ्यात किंचित वाकलेली म्हणजेच सविनया आहे आणि डाव्या पायाच्या अंगठ्याने उजवा पाय टोकरते आहे, म्हणजेच सलज्जिता आहे. एक काळ असा होता,की निदान विवाहाच्या वेळी तरी स्त्रिया लाजत असत. अशा वेळी त्या अंगठीशी वा पदराशी चाळा करीत, किंवा अधोवदनावस्थेत जमीन टोकरत. येथे पार्वती अशी ‘सलज्जिता’ दिसते आहे. कविकुलगुरू कालिदासाने ‘कुमारसंभव’मध्ये ‘तस्याकरंशैल गुरूपनीतं जग्राहताम्राहुलीम् अष्टमूर्ति:’ असे केले आहे. म्हणजे, विवाहप्रसंगी ‘लाजाहोम’ करण्यासाठी पुरोहित म्हणून खाली बसलेल्या ब्रह्मदेवाने अष्टमूर्ती शिवाच्या हातात तिचा हात दिला. येथे प्रतिभावान कलाकाराचे कौशल्य दिसते, ते त्याने पार्वतीने शिवाचा हात हातात घेतला आहे,असे दाखविण्यात. काही प्रेक्षकांना हे वस्तुस्थितिनिदर्शक वाटत नाही; हे चुकीचे शिल्पांकन वाटते. पण खरे तर हेच वस्तुस्थितिनिदर्शक आहे. कलाकाराला येथे अभिप्रेत आहे ते असे की शिवाच्या प्राप्तीसाठी पार्वतीने पुढाकार घेतला होता, त्यासाठी जीवघेणी घोर तपश्चर्या केली होती, हे दाखविणे. ते त्याने फार मार्मिकपणे प्रत्ययास आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे, असे वाटते.’ 


कल्याणसुंदराची आणखी एक लोभसवाणी प्रतिमा, वर नोंदविल्याप्रमाणे, घारापुरी येथील लेणीत आहे. कलाप्रांतात हिला तोड नाही की जोड नाही. एका मोठ्या शिल्पपटात चंद्र, हिमवान व मेना (पार्वतीचे माता-पिता), शिव-पार्वती, विष्णू, ब्रह्मा इत्यादींच्या प्रतिमा आहेत. यांची मांडणी लक्षवेधी आहे. पटाच्या मधोमध उभे आहेत, शिव-पार्वती हे वधू आणि वर या भूमिकेत. पार्वतीच्या बाजूकडे आहेत,हिमवान आणि मेना तर शिवाच्या बाजूस आहे. स्थानकावस्थेत विष्णू आणि होम करण्यास तत्पर आहे, आसनस्थ ब्रह्मा. पुराणकारांनी पार्वतीचा चित्ताकर्षक देह, आकर्षक सौंदर्य पाहून प्रत्यक्ष ब्रह्मदेवही चळला होता, असे जे वर्णन केले आहे, ते पार्वतीचे विलक्षण सौंदर्य, चारूगात्रीत्व प्रकर्षाने प्रतीत व्हावे त्यासाठी, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. शिव विरोचितावस्थेत उभा आहे, रुंद खांद्यांचा, पुष्ट मांड्यांचा, माथ्याभोवती प्रभावलय असलेला, नववधू पार्वतीचा ‘कर हा करी’ घेऊन, असा (हात भग्न आहेत). पार्वती अधोवदना तर आहेच, ती तिच्या वयाला साजेशा देहावस्थेत आहे. 


मृगस्तनी, सद्सत्संशयगोचरोदरी आणि कदलीदलवत मांड्यांची. पण विशेष म्हणजे, ती शिवासारखी समोर तोंड करून उभी नाही तर तिरकस म्हणजे थोडी वळलेली आहे; शिवाला सामोरी जाते आहे. म्हणजेच माहेर सोडून सासरच्या वळणावर आहे. ‘वळणावरूनी वळली गाडी, आज सोडला गाव । तुझ्याच आई अश्रूसंगे पुसले पहिले नांव ।।’ अशा भावावस्थेत ती उभी आहे. आता ती उमा झाली आहे. येथून पुढे या जोडीची नोंद शिल्पशास्त्रात उमामहेश्वर अशी केली जाते. माहेर सोडून प्रतिगृही जात असलेल्या व्याकूळ झालेल्या कन्येला धीर देण्यासाठी, दिलासा देण्यासाठी तिच्या पाठीशी उभ्या असलेल्या हिमवानाने तिच्या दंडावर हात ठेवलेला दिसतो आहे. (पाठीवर ठेवलेला असता, तर आपणास तो दिसला नसता हे चतुर कलाकाराने जाणले होते. ही शिल्पे पोर्तुगीज सैनिकांनी बंदुकीच्या गोळ्यांनी फोडली असल्याचा इतिहास, आवाज कसा घुमतो हे पाहण्यासाठी.  या दोन्ही शिल्पपटातून पार्वती आपल्याला दिसते,अशी की आपल्यासारखीच ती एक कन्या आहे, नववधू आहे, लाजरीबुजरी आहे. मानवी भावभावनाच येथे आढळतात शिल्पित झाल्याच्या, त्यामुळे शिव-पार्वती वा उमामहेश्वर वेगळे वाटतच नाहीत. याचाच अर्थ की रचनेच्या दृष्टीने योग्य अशा या शिल्पपटात स्वाभाविकताही (नॅचरलनेस) साधली गेली आहे. त्यामुळे तिच्यात आपल्याला पाहतात सासुरवाशिणी आणि सासरी निघालेल्या कन्येला पाहतात ते वडील. पुढील भागात पाहूया, पार्वतीचे वैवाहिक जीवन, शिल्पांकित झालेले. 


- डॉ. जी. बी. देगलूरकर
udeglurkar@hotmail.com

बातम्या आणखी आहेत...