Home | Magazine | Rasik | Dr. G. B. Deglurkar article in rasik

पार्वती : खेळकर आणि खोडकर

डॉ. जी. बी. देगलूरकर | Update - Jul 29, 2018, 10:06 AM IST

शिवपत्नी पार्वती हे म्हटले तर एक गूढ आहे, म्हटले तर उघड गुपितही.

 • Dr. G. B. Deglurkar article in rasik

  शिवपत्नी पार्वती हे म्हटले तर एक गूढ आहे, म्हटले तर उघड गुपितही. तिचा मानी स्वभाव, या स्वभावाचे मोहक विभ्रम, शिवासोबतचे तिचे बहुपदरी नाते हे पुराणातले एक विलोभनीय पर्व आहे. त्याचेच प्रतिबिंब शिल्पकलेत उमटणे ही मोठीच अविस्मरणीय सृजनघटिका आहे...


  पार्वती ही शिवपत्नी, शिवाशी असलेले गतजन्मीचे नाते म्हणजे, पार्वतीचा स्वाभिमानी स्वभाव दर्शविणारे नाते होय! ती गतजन्मात दक्षकन्या सती होती. दक्षाने यज्ञप्रसंगी शिवाला आमंत्रिले नव्हते, कारण तो स्मशानात राहाणारा सर्वांगाला भस्म फासणारा, नागांचे अलंकार ल्यायलेला असा असल्यामुळे यज्ञासाठी जमलेल्या मोठ्या लोकांत त्याची उपस्थिती दक्षाला अवमानित करणारी ठरणार होती. माहेरचेच कार्य, त्यासाठी आमंत्रण कशाला हवे असे मानून सती यज्ञभूमीवर उपस्थित झाली. दक्षाने तिच्या पतीला म्हणजे शिवाला न बोलावण्याचा तिला अपमान वाटला. दक्षाशी तिची तिखट, झोंबणारी प्रश्नोत्तरे झाली. स्वाभिमानी पतिव्रतेला तो जीवघेणा अपमान वाटल्यामुळे तिने यज्ञकुंडात स्वत:ला झोकून दिले. पुराणांतरी आलेली स्वाभिमानी सतीची ही कथा तिचे शिवावरचे अलोट प्रेम सांगून जाते.
  त्या प्रेमापोटीच ती हिमवानाची म्हणजे पर्वताची कन्या होऊन जन्माला आल्यावर - शिवाच्या प्राप्तीसाठी घोर तपश्चर्या आरंभिते. शिव प्रसन्न होतो. त्यांचा विवाह होतो. त्याप्रसंगी ब्रह्मदेव, विष्णुलक्ष्मी, इंद्र इत्यादी देव-देवता उपस्थित असतात.

  थाटामाटात विवाह संपन्न झाल्यावर शिव-पार्वतीचे वैवाहिक जीवनास प्रारंभ होतो. पुराणकारांनी, संस्कृत कवींनी या जीवनातील अनेक प्रसंग आपल्यापुढे असे ठेवले आहेत, की ते जणू मानवी आयुष्यापेक्षा वेगळे नाहीत. त्यामुळे या उभयतांबद्दल आपणास अमाप आपुलकी वाटते.
  एकदा यांना अक्षक्रीडा म्हणजे सारीपाट खेळण्याची लहर आली. (आपल्याकडे विशेषत: मराठवाड्यात दिवाळीच्या दिवसात स्त्री-पुरुष हमखास सारीपाट खेळत असत) स्कंदपुराणातल्या माहितीप्रमाणे द्यूतक्रीडेचा शोध शिवानेच लावलेला होता. सहाजिकच पार्वतीशी खेळताना डाव तर आपण सहज जिंकू, असा विश्वास त्याला असणार.
  पार्वती जन्मत:च सावळी होती. एकदा पार्वतीने खेळकरपणे शिवाला आलिंगन दिले, तेव्हा गमतीने, तिची चेष्टा करण्यासाठी शिव म्हणाले, असे वाटते की काळ्या नागीनीने गोऱ्या (श्वेत) चंदनवृक्षालाच आलिंगीत केले आहे.

  शरीरे मम तन्वंगी सिते भास्यासित द्युति:।
  भुजङ्गीवासिता शुद्धा संश्लिष्टा चन्दनेतरौ।।(मत्स्यपुराण १५४.१)
  शिवाने अशी केलेली चेष्टा पार्वतीला फार झोंबली. त्या तिरिमिरीतच ती शिवाला नाही नाही ते बोलली, टाकून बोलली. शिवाने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण गोष्ट बिघडतच गेली. शिवही थोडे अस्वस्थ झाले. शेवटी तू तुझ्या बापासारखीच आहे, त्याची (म्हणजे पर्वताचे) शिखरं टोकदार आहेत, त्याचे हृदय कठोर आहे. त्यामुळे हृदयात प्रवेश करणे कठीण असते, त्याकडे जाण्याचा मार्ग दुर्गम असतो, सगळीकडेच कठोरता जाणवते, तशीच तू आहेस, असे शिवाचे उद््गार पार्वतीला असह्य झाले. एकीकडे, पित्याची निंदा आणि दुसरीकडे तिच्या स्वभावाबद्दल अनुचित टिप्पणी तिला अपमानास्पद वाटली. तिने आपला पुत्र वीरक याला शिवावर लक्ष ठेवण्यास सांगितले. मला काळी म्हणून, कुटिल म्हणून, सविण म्हणून शिवाने माझा घोर अपमान केला आहे, खरे तर तोच तसा आहे, असे म्हणून
  ती तेथून बाहेर पडली. हे सर्व तिच्या सावळेपणामुळे घडले तेव्हा आपण गोरे व्हायला हवे, त्यासाठी घोर तप करण्यासाठी ती दूरवर निघून गेली. तिने ब्रह्माच्या आराधनेसाठी तप सुरू केले. सरतेशेवटी ब्रह्म प्रसन्न झाला. तिने ‘गोरे’ होण्याची तिची इच्छा असल्याचे सांगून तसा वर त्यांच्याकडे मागितला. ‘तथास्तु’ असे ब्रह्माने म्हणल्याबरोबर पार्वतीच्या देहकोशातून एक सावळी, त्रिनेत्राची स्त्री बाहेर पडली. ती सालंकृत होती. तिचे हाती घंटी व आरती-पात्र होते. कशातून बाहेर पडली म्हणून ती कौशिकी आणि सावळी अशी ती बाहेर पडल्यामुळे पार्वती झाली गौरी. पार्वतीच्या म्हणजे आता गौरीच्या पायाजवळ असलेल्या कौशिकीच्या मूर्ती मध्य प्रदेशात आढळतात.

  या कथा पाहता पार्वतीला विवाहाच्या आधी एकदा आणि नंतर दोन वेळा त्या अभिनिवेशात त्याने पहिल्यांदा नंदीलाच पणाला लावले. पार्वती जिद्दीनेच खेळायला बसली होती. घोर तपश्चर्येने शिवाला जिंकणाऱ्या पार्वतीला डाव जिंकणे बहुधा अवघड वाटले नसणार! झालेही तसेच. पहिलाच डाव पार्वतीने जिंकला आणि जिंकलेल्या नंदीला तिच्याकडे घेऊन जाण्यास तिच्या सख्यांना तिने सांगितले. या एकूणच प्रसंगाचे फार सुरेख शिल्पांकन वेरूळ येथील क्र. २१च्या लेणीत व अन्यत्रही केलेल आढळते. एका भव्य शिल्पपटात वरच्या बाजूस शिव-पार्वती अमोरासमोर बसले आहेत. त्यांच्या पुढ्यात सारीपाट आहे. शिल्पपटाच्या खालच्या अर्ध्याभागात नंदीला पार्वतीच्या सख्या ओढून घेऊन जात असल्याचे आणि त्या वेळी शिवाचे गण माकडचेष्टा करून अडथळा आणीत आहेत असे फार प्रत्ययकारी दृश्य शिल्पित केले आहे.
  शिवाचे तिला कोण कौतुक! तो एखाद्या प्रकारचे तांडव नृत्य तल्लीन होऊन, ‘सारे करूनि आजला, साऱ्यातही नाहीच मी’ अशा अविर्भावात करण्यात मग्न असला की पार्वती तेथे उपस्थित असणारच. काही वेळा तिच्या कडेवर छोटा स्कंदही असणार. (वेरूळ लेणे क्र.१४) तीही काही नृत्यात कमी नव्हती; झाले एकदा दोघांत पैजच लागली. चढाओढीने दोघे नाचत होते. पार्वतीने अखेरचे म्हणून उमा-तांडव केले तर शिवाचे उर्ध्वतांडव.

  एक प्रसंग उभयतांच्या वैवाहिक जीवनातला आहे. मनोरम आहे. हा स्कंदपुराणातला आहे. सहज खेळता खेळता पार्वतीने शिवाचे तिन्हीही डोळे झाकून टाकले. त्यामुळे सूर्य, चंद्र आणि अग्नी अकस्मात लुप्त झाल्यामुळे संबंध पृथ्वीवर हाहाकार माजला, गोंधळ उडाला. हे जाणताच आपली खेळी चुकल्याचा पार्वतीला पश्चात्ताप झाला. तिने चटकन हात बाजूला घेतले. सहाजिकच स्थितगती झालेले विश्वचक्र पुन्हा गतिशील झाले. मात्र पार्वतीचा हा खोडकरपणा शिवाला मात्र रुचला नाही, हा भाग वेगळा. मानिनी पार्वतीसंबंधी एक फार गमतीचा प्रसंग उभयतांच्या जीवनातला आहे, या कथेतली पार्वती पित्याबद्दल भलते सलते बोलणाऱ्या शिवावर रुसणारी, ते मनाला फार लावून घेणारी आणि विनोदी स्वभावाचा शिव याची ओळख आपणास होते. हिमवानाची म्हणजेच हिमालयची कन्या पार्वती (पर्वत कन्या म्हणून पार्वती) ही तपश्चर्या करावी लागली होती असे दिसते. आपल्या दृष्टीने त्यांच्या दांपत्य जीवनातले प्रसंग कसे गमतीचे होते हे महत्त्वाचे ठरते.
  पार्वतीचा स्वभाव, तिचा मानी आणि मनस्वीपणा लक्षात येतो. आणि आपल्यातली ती आहे असे वाटून तिच्याबद्दलच आपुलकी वाटते. खरे तर एवढ्यावर पार्वती-गौरी-उमा आपल्याला पूर्णत: रुळली, असे मानणे योग्य होणार नाही. ती दुर्गा आहे, महालक्ष्मी आहे, क्षेमंकारी आहे, झालंच तर महिषासुरमर्दिनीही आहे, पण ही तिची रूपे थोड्याफार प्रमाणात सर्वांना माहीत आहेत म्हणून हे ‘पार्वती पुराण’ येथे थांबवणे योग्य होईल असे वाटते.

  udeglurkar@hotmail.com

Trending