आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवेदनशील म्‍हणा, वेडी नव्‍हे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉक्टर फक्त शरीरावरच उपचार करतात असं नाही. मनाच्या दुखण्यावरही डॉक्टरांची मात्रा लागू पडते. पण जेव्हा रुग्णाच्या मनावर उपचार करता करता डॉक्टरच बुचकळ्यात पडतात तेव्हा?

 

हल्लीच्या संवेदनाहीन समाजात डॉक्टर म्हणून संवेदनशील असणं त्रासदायक ठरतं. कारण डॉक्टर म्हणजे फक्त शरीराच्या तक्रारींसाठी असतो असं नाही. ग्रामीण भागात काम करताना अगदी नवराबायकोची भांडणं सोडवण्यापासून सासूसुनेची दिलजमाई करेपर्यंत सगळ्या गोष्टी घरचा सदस्य असल्याप्रमाणे पार पाडाव्या लागतात. पण जेव्हा खरोखर काही प्रॉब्लेम नसतो, फक्त आपलं मन आपलं वैरी होऊन जातं, अशा वेळी काय समजावायचं, काय बोलायचं, यावर डॉक्टरांची कसोटी लागते.


हल्ली नैराश्याने घेरलेले खूप रुग्ण येतात.
अंजना ही त्यातलीच एक रुग्ण.
सगळं छान! माहेरी आणि सासरीही. नवरा व ती स्वतःही सर्वसामान्य मुंबईकर नोकरदार. नवरा जीव लावणारा.गुणी आणि गोंडस छोटासा मुलगा. ती स्वतः उच्चशिक्षित, सुंदर, बहुश्रुत अशी. किरकोळ पोटदुखीची तक्रार घेऊन आली होती. नवरा काळजीनं सांगत होता.
“मॅडम, कितीही पैसे लागले तरी चालतील पण हिची पोटदुखी तेवढी बरी करा. मुंबईत बड्या बड्या डॉक्टरांनी तपासलंय. सोनोग्राफी, रक्त वगैरे चेकअप सगळं झालंय. काही कळतच नाही काय झालंय हिला. एखाददोन दिवस नीट राहते आणि तिसऱ्या दिवशी पांघरूण घेऊन झोपूनच राहते.”
‘मुंबईच्या डॉक्टरांचं काय म्हणणं होतं?”
“काही नाही. ते म्हणाले, शारीरिक काही बिघाड नाहीये. थोडासा मानसिक त्रास वाटतोय. आणि त्यांनी नुसत्याच झोपेच्या गोळ्या दिल्यात. त्याच्यामुळे ती अजूनच झोपून राहते. आता ही काय वेडी आहे का तिला टेन्शनच्या गोळ्या द्यायला? म्हाताऱ्या माणसासारखं काहीतरी विचार करत बसते आपली.”
“घरी काही ताणतणाव आहे का? तुमच्या दोघांचं नातं कसंय?”
“आमचा प्रेमविवाह आहे, मॅडम. फुलासारखं जपतो मी तिला. तिच्या घरी, माझ्या घरी सगळ्यांची लाडकी आहे ती. कशाचाच त्रास असा नाही. ऑफिसचे टेन्शन्स असतात पण तेवढं तर चालतंच. तरी तिला म्हणालो मी, तुला नसेल दगदग सहन होत तर नोकरीपण सोडून दे. जाऊ दे.’
“मग त्यावर काय म्हणणं आहे तिचं?”
“काही बोलतच नाही. घाबरल्यासारखं करते आणि पोट दुखतंय म्हणून झोपून घेते.’
“कधीपासून चाललंय असं?”
“चार महिने झालेत, मॅडम. सगळं घर डिस्टर्ब झालंय तेव्हापासून.”
व्यथित आवाजात तो बोलला.
त्याला खरोखरच तिची खूप काळजी वाटत होती हे सहज ताडता येत होतं.
नंतर तिलाही केबिनमध्ये बोलावलं.
मूळची सुंदर पण निस्तेज वाटत होती. डोळ्याखाली काळी वर्तुळं आलेली.
तिच्याशी बोलणं झालं. तिची पोटदुखी नंतर पूर्णपणे नाहीशी झालीही. तो माझ्या उपचार पद्धतीचा भाग होता.समुपदेशन आणि काही औषधं. तो विषय वेगळा आहे. पण या केसने खूप सारी प्रश्नचिन्हं मनात पेरली गेली. खरंच आत्ताचं युग हळव्या, संवेदनशील माणसाच्या जगण्याच्या लायकीचं नाहीय की काय?
जो माणूस संवेदनशील असतो त्याला सरसकट वेडं ठरवलं जातंय. हे भीषण आहे. आपण सगळे हृदय असलेले यंत्रमानव बनण्याकडे वाटचाल करत आहोत का?

 

shelarkshama88@gmail.com

 

बातम्या आणखी आहेत...