Home | Magazine | Madhurima | Dr Kshama Shelar writes about patients in rural areas

शाहणं कोण?

डॉ. क्षमा शेलार, बेल्हा | Update - Jul 31, 2018, 06:05 AM IST

रुग्णांशी संवाद साधणं, त्यांना बोलतं करणं आणि त्याचं दुखणं जाणून घेणं हे तर खरं डॉक्टरांचं कौशल्य.

 • Dr Kshama Shelar writes about patients in rural areas

  रुग्णांशी संवाद साधणं, त्यांना बोलतं करणं आणि त्याचं दुखणं जाणून घेणं हे तर खरं डॉक्टरांचं कौशल्य. पण कधीकधी काही रुग्णांशी बोलल्यानंतर डॉक्टर नि:शब्द होतात. रुग्णांना कुठल्या पद्धतीनं प्रतिसाद द्यावा हे सुचत नाही.


  पावसाळ्यातला एक रिपरिपता दिवस.
  माझ्या नेहमीच्या पेशंट असणाऱ्या सोनवणेआजी कशाबशा छत्री, पिशवी सांभाळत वेटिंग रूममध्ये आल्या. आजी आल्यात हे त्यांच्या जोडव्यांच्या ठकठक होणाऱ्या आवाजाने आणि त्यांना लागणाऱ्या धापेच्या आवाजाने मला न बघताही लक्षात यायचं. त्या वेळी समोर असणारा पेशंट तपासून मग मी आजींना आत बोलावलं. आजी सोबत आणलेल्या कधीकाळच्या, सतरा ठिकाणी चेपलेल्या बाटलीनं पाणी पिऊन जराशा शांत झाल्या (हीसुद्धा त्यांची नेहमीची सवय).
  नंतर मग सावकाश पदरानं घाम पुसणं.
  मी त्यांच्या हळुवार चाललेल्या हालचालींकडे बघत मनात विचार करते आहे. गोऱ्यापान आजी. उंचबिंच.वयानुसार सुरकुतल्या असल्या तरी, ‘एके काळी ही बाई किती रूपगर्विता असेल’ हा विचार त्यांना बघितल्यावर माझ्या नेहमीच मनात यायचा.
  “म्याडम! आज लै पाठ दुखती. काय तरी करा.”
  त्यांच्या बोलण्यानं मी वर्तमानात आले.
  हसून “हो आजी” म्हणत मी त्यांना तपासलं.
  मधून मधून “बिलेड प्रेसर तपास बरं का,” अशा सूचना सुरू होत्या. तपासणी करून मी त्यांना काही औषधं आणि पाठीला चोळण्यासाठी मलम दिलं.
  “आजी, हे मलम घरातल्या कुणाला तरी सांगा पाठीला चोळून द्यायला.”
  त्यापुढे आजी जे बोलल्या ते विचार करण्याजोगं होतं.
  “अगं बाई! आता काय सांगती. सुनांना त्या मलमाचा वास येतो. शेवट सुना काय आपल्या असत्यात का?”
  “अहो मग मुलांना सांगायचं आजी,” मी हसून म्हटलं.
  “अगं बाई तिथंबी तेच. सुना काय आन ल्योक क्काय. समदे सारखेच.’
  मला पुढे बोलण्यासाठीचे शब्द जुळवायला वेळ लागत होता. पण आजीच बोलत्या झाल्या.
  “बाकीच्यांचं जावं दे, मरू दे. माझी ती येडी पोर बाकी माजं ऐकती (आजींची एक मुलगी मतिमंद आहे.) मलाच कळंना कोन येडं आन कोन शानं?”
  आणि थरथरत उठत, हात झटकत जमेल तेवढ्या त्वरेनं आजी निघून गेल्या. त्यांच्या डोळ्यातलं पाणी त्यांना लपवायचं असावं.
  आणि मग तथाकथित शहाण्यांच्या जगातली मी, डोळ्यात आलेलं वेडं पाणी सावरत बसले.


  - डॉ. क्षमा शेलार, बेल्हा
  shelarkshama88@gmail.com

Trending