आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉर्पोरेट क्षेत्रातील सामर्थ्यशाली स्त्रियांची संघर्षगाथा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्तृत्ववान स्त्रियांना भेटून त्यांची माहिती मिळवणे आणि नंतर ती वाचकांना रंजक आणि मननीय वाटेल अशी मांडणे हे अवघड काम आहे. ते मूळ लेखिकेने समर्थपणे केले असून मराठी अनुवादही तितकाच उत्तम, साध्या-सोप्या, ओघवत्या मराठीत झाला आहे. अनुवाद औत्सुक्य वाढवणाऱ्या भाषेत केल्याने वाचताना कंटाळा येत नाही, उलट त्या त्या व्यक्तीच जणू डोळ्यापुढे उभ्या राहतात.


‘एकाच वेळी अनेक प्रकारच्या भूमिका निभावणं स्त्रियांसाठी असंभव नाही; कारण त्यांच्यात हे गुण जन्मजात असतात. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया मानसिकदृष्ट्या किती तरी अधिक मजबूत असतात.’ रंजना कुमार, माजी अध्यक्ष, इंडियन बँक.
जगभर महिलांना विविध हक्क आणि अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत झगडावे लागले हे आज कुणाला खरेही वाटणार नाही; पण शिक्षण, राजकारण, उद्योगव्यवसाय, समाजकार्य, वृत्तपत्रे आणि अन्य क्षेत्रांत आतापर्यंत हे घडत होते. अगदी अलीकडे सौदी अरेबियात स्त्रियांना मोटारगाडी चालवण्याची परवानगी मिळाल्याची बातमी आली आहे. भारतात अद्याप लोकसभेत स्त्रियांकरिता आरक्षण असावे हा ठराव संमत होत नाही. रोटरी, लायन्ससारख्या सेवाभावी संस्थांत सदस्य म्हणून त्यांना प्रवेश १९८६नंतर मिळाला. असे असले तरी अनेक स्त्रियांनी गेल्या काही दशकांत सर्व क्षेत्रांत प्रचंड भरारी घेतली आहे व काही आपल्या देशाच्या सर्वोच्च स्थानी आरूढ झाल्या आहेत. आजही वैद्यक, यांत्रिकी, व्यापार, उद्योग आणि अन्य क्षेत्रांत त्यांनी उच्च स्थाने भूषवली आहेत. भारतीय स्त्रिया आता अन्य देशांतही आघाडीवर आहेत. विशेषत: यांत्रिकी, वाणिज्य, व्यवस्थापकीय आणि माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रांत हे घडते आहे. शासनही त्यांना उत्तेजन देत आहे. अशांपैकी काही यशस्वी स्त्रियांची माहिती जर समाजात पसरली तर त्यांच्या कार्याची माहिती मिळेलच; पण त्याचबरोबर आपणही असे काही करावे वा करू शकतो अशी स्फूर्तीही तरुणींना मिळेल. साकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या ‘भारतीय उद्योजिका’ या पुस्तकात अशा ३० महिलांची माहिती थोडक्यात, परंतु प्रभावीपणे दिली आहे. सुमन वाजपेयी लिखित मूळ हिंदी पुस्तकाचा मराठी अनुवाद ज्योती नांदेडकर यांनी केला आहे.


या स्त्रिया यांत्रिकी उत्पादन, वैद्यकीय, संशोधन आणि सेवा, बँकिंग, सल्लामसलत, टेलिव्हिजन निर्माता, सौंदर्यप्रसाधने, हॉटेल्स, फॅशन, बांधकाम, शीतपेये आणि अशाच अन्य क्षेत्रांत अगदी अत्युच्च पदावर पोहोचल्या आहेत. त्यांनी स्वकर्तृत्वाने आपल्या व्यवसायाला अधिक उंचीवर नेऊन ठेवले आहे आणि असे करताना त्याबरोबर आपले संसारही सांभाळले आहेत. एकीकडे अत्युच्च कारकीर्द, तर दुसरीकडे समाधानी कौटुंबिक जीवन, एक प्रकारे अशी तारेवरची कसरत त्यांनी यशस्वीरीत्या केली आहे.


यापैकी काहींना उद्योजकतेचे बाळकडू त्यांच्या वडील वा सासरच्या घराण्याकडून मिळाले, तर काहींचे शिक्षण आणि अनुभव एका क्षेत्रात पण प्रत्यक्ष काम दुसऱ्याच क्षेत्रात असेही झाले आहे. काहींना शिक्षण भारतातील चांगल्या संस्थांतून मिळाले, तर काहींना परदेशी जाऊनही ते घेतले. काहींना त्यांच्या पिता वा पतीच्या आकस्मिक निधनानंतर उद्योगाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागली आहे, तर काहींनी ते करून उद्योग परत रुळावर आणून, ते पुढच्या पिढीच्या स्वाधीन केले आहेत. काहींनी आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अत्युच्च स्थान आपल्या कर्तृत्वाने प्राप्त करून घेतले आहे. पेप्सिको कंपनीच्या इंद्रा नूयी, हेवलेट पॅकर्डसच्या नीलम धवन, जे.पी.मॉर्गनच्या कल्पना मोरपारिया ही अशीच काही उदाहरणे. तर थरमॅक्सच्या अनु आगा आणि मेहेर पदमसी, टाफे (इंडिया) ट्रॅक्टरच्या मलिका श्रीनिवासन, राजश्री शुगरच्या राजश्री पॅथी, बायोटेक कंपनीच्या किरण शॉ मुजुमदार, लिज्जत पापडच्या ज्योती नाईक,डी.एल.एफ. रिटेल डेव्हलपर्स लि. च्या पिया सिंह यांनी यांत्रिकी वा अन्य उत्पादन क्षेत्रात भरारी घेतली आहे. बँकिंगच्या क्षेत्रात चंदा कोचर (आयसीआयसीआय), तर्जनी वकील ( माजी अध्यक्ष, अॅक्सिस बँक) नैना लाल किडवाई (एच.एस.बी.सी.), मीना सन्याल (आरबीएस बँक), फाल्गुनी नायर (कोटक महिंद्रा), रंजना कुमार (इंडियन बँक) अशा दिग्गज महिला आहेत. बालाजी फिल्मच्या एकता कपूर, ळऊन्न् च्या जरीना मेहता, टाइम्स ग्रुपच्या इंदू जैन, पॉर्क हॉटेल ग्रुपच्या प्रिया पॉल, अपोलो हॉस्पिटलच्या प्रिथा रेड्डी यांनी चाकोरीबाहेरच्या क्षेत्रात देदीप्यमान यश प्राप्त केले आहे.


या सर्वांचा परिचय करून घेताना हे लक्षात येईल की, त्यांना कष्टातून-स्पर्धेतून मार्ग काढावा लागलेला आहे. प्रसंगी ऐषाराम-कौटुंबिक जबाबदाऱ्या काही काळ बाजूला ठेवून काम करावे लागले आहे.


आज आपल्या वाचनात आणि पाहण्यात वारंवार येणाऱ्या अनेक उद्योगांची धुरा कर्तृत्ववान महिला संभाळत आहेत हे एरवी आपल्याला कदाचित कळलेही नसते. अशांचा हा परिचय करून घेताना त्यांची कौटुंबीक पार्श्वभूमी, जबाबदाऱ्या अंगावर घेत विविध आव्हानांना दिलेले तोंड, तशातही जोपासलेले छंद, पुढच्या पिढीकडेही दिलेले लक्ष अशा अनेक पैलूंवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यावरून सर्वसामान्यांना येणाऱ्या अडचणी त्यांनाही असतात हे वाचकांच्या लक्षात येते. सुधा मूर्तींनी पतीच्या कर्तृत्वाला वाव देण्यासाठी आपले क्षेत्र सोडून संसार सांभाळला आणि त्याबरोबरच लेखन आणि समाजकार्य यात कर्तृत्व गाजवले. यापैकी बहुतेक जणींचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या कर्तृत्वाने ‘आकांक्षांपुढती जिथे गगन ठेंगणे’ही उक्ती सार्थ ठरेल.


अशा कर्तृत्ववान स्त्रियांना भेटून त्यांची माहिती मिळवणे आणि नंतर ती वाचकांना रंजक आणि मननीय वाटेल अशी मांडणे हे अवघड काम आहे. ते मूळ लेखिकेने समर्थपणे केले असून मराठी अनुवादही तितकाच उत्तम, साध्या-सोप्या, ओघवत्या मराठीत झाला आहे. अनुवाद औत्सुक्य वाढवणाऱ्या भाषेत केल्याने वाचताना कंटाळा येत नाही, उलट त्या त्या व्यक्तीच जणू डोळ्यापुढे उभ्या राहतात. पुस्तकातील लेखांची मांडणी व रचना विशेष वाखाणण्याजोगी आहे. प्रसंगानुसार छायाचित्रांमुळेही पुस्तकाच्या सौंदर्यात भर पडली आहे. अशा उपयुक्त साहित्यकृतीबद्दल अनुवादक आणि प्रकाशक यांचे अभिनंदन.

-डॉ. सुधीर राशिंगकर, पुणे

बातम्या आणखी आहेत...