आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लबाड लांडगं ढ्वांग करतंय...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरज सरो वैद्य मरो, अशा स्वभावाच्या व्यक्ती या ‘मॅनिप्युलेटिव्ह’ व्यक्तिमत्त्वाचा उत्तम नमुना असतात. अशा माणसांशी वागताना  आपली मतं स्पष्टपणे आणि ठामपणे मांडणं, त्यांच्यात भावनिक गुंतवणूक होऊ न देणं, आपले कच्चे दुवे उघड न करणं, सावधपणे आणि हुशारीनं राहणं या तंत्रानंच वागायला हवं.    


हे मंत खूप प्रयत्न करूनही त्याचा फोन सुरू करू शकला नाही. सारखाच बिघडायचा. शेवटी कंटाळून त्याने नवा फोन घेतला. तो फोन त्याच्या सहकाऱ्यांना तो दाखवत होता. मात्र, सुदीप आल्याबरोबर सगळे गप्प झाले. सुदीपने तो फोन पाहिला आणि उपहासात्मक स्वरात म्हणाला, ‘असा फोन तर माझ्या ड्रायव्हरकडेपण आहे.’ ते ऐकून हेमंतचा चेहरा साफ उतरला. हेमंत काही म्हणायच्या आतच सुदीप पुन्हा म्हणाला, ‘अरे, निदान कपडे तरी नीट घालत जा तू. प्रवीण ट्रेडिंगसारख्या नामांकित कंपनीत काम करतोस. लोक काय समजतील तुझ्याकडे पाहून?’ हेमंतला जितकी कमीपणाची भावना देता येईल तितकी सुदीपने दिली. हेमंतसारख्या संकोची, अबोल, गरीब स्वभावाच्या माणसांना हेरणं, त्यांना तिरकस बोलणं, कधीकधी तर आवाज चढवून बोलताना देहबोली आक्रमक करणं हे सारं सुदीप करायचा. त्याच्या या अशा स्वभावाला सगळेच घाबरायचे. कोणी त्याच्याशी वाद घालण्याचा किंवा त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला तर ‘आय अॅम जस्ट जोकिंग,’ असं हसत तो म्हणायचा आणि त्या गोष्टीतून तो बाहेर पडायचा. अतिशय हुशारीने त्याने ताकद, नियंत्रण, सगळे फायदे आपल्या हाती ठेवले होते. सुदीप हा ‘मॅनिप्युलेटिव्ह’ अर्थात स्वार्थी लबाड व्यक्तिमत्त्वाचा नमुना आहे.


एकत्र कुटुंबात राहणाऱ्या विधवा उषाआत्या त्यांच्या वहिनीला सतत म्हणायच्या, ‘मी कमनशिबी आहे. देवानं माझ्या नशिबात ना नवऱ्याचं सुख दिलं ना मुलांचं. मी एकटी, कोण माझी काळजी घेणार? माझं हे संधिवाताचं दुखणं. माझ्याच्याने कामच होत नाही.’ चाळीस वर्षांच्या उषाआत्या, नुकतंच लग्न करून आलेल्या अस्मिताला त्यांचं प्रत्येक काम सांगायच्या. पलंगावर बसून चहा, नाष्टा, जेवण, चष्मा, औषधं सगळं हातात द्यावं लागायचं. कांगावा करणं, लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी खोटी नाटकं करणं हे सारं चालू असायचं. रोग वीतभर आणि बोभाटा हातभर असा हा प्रकार. सारखं दुसऱ्याविषयी नकारात्मक बोलायचं. त्यांचे दोष काढायचे. स्वत:चं कौतुक करून घ्यायचं. नवीन सून असलेल्या अस्मिताला त्यांना काही उत्तरही देता यायचं नाही. पण त्यांच्याशी कसं वागावं, हेही समजायचं नाही. कारण घरातल्या सगळ्यांना त्या आपल्या बोटावर नाचवायच्या. कोणी काही बोलत नसल्यानं त्यांचा अहंकार पोसला जात होता. उषाआत्याही मॅनिप्युलेटिव्ह व्यक्तिमत्त्वाचा नमुना आहेत. फक्त लबाड ढोंगीपणा ही या व्यक्तिमत्त्वाची दुसरी बाजू  आहे.


रोजच्या जीवनात आपल्याला अशा मॅनिप्युलेटिव्ह माणसांबरोबर काम करावं लागतं. तर कधी अशी उदाहरणं पाहायला, ऐकायला मिळतात. अशी माणसं इतरांचं भावनिक शोषण करण्यात पटाईत असतात. कधी ती समोरच्याला खोटी गोष्ट खरी मानायला लावतात. एक प्रकारे तुमचा मानसिक गोंधळ घडवून आणतात. स्वत:च्या फायद्यासाठी दुसऱ्याचा उपयोग करतात. लोकांना वापरून घेण्यासाठी काही विशेष युक्त्या वापरतात. त्या समजून घेतल्या तर अशा ढोंगी, लबाड माणसांना कसं हाताळायचं ते आपण ठरवू शकतो. ते तुम्हाला अशा जागी भेटायला किंवा बैठकीसाठी बोलावतात जिथे ते स्वत: आरामात असतात. आणि ते शारीरिकदृष्ट्यासुद्धा आक्रमक होऊ शकतात. या ठिकाणी ते मुद्दाम तुम्हाला आधी बोलायला लावतात. तुमची कमजोर क्षेत्रं, उणिवा बरोबर शोधून घेतात आणि आपला हेतू साध्य करून घेतात. अशा व्यक्ती बुद्धीचा अचूक वापर करून रॅगिंगही करू शकतात. कारण सामान्य व्यक्तीला तांत्रिक आणि कायदेशीर गोष्टी माहीत नसल्यानं तथ्यं, सांख्यिकी कागदपत्रे, नियम-उपनियम, समिती वगैरे सांगून घाबरवून सोडतात. त्यांची सत्ता, शक्ती, यांच्या साह्याने ती व्यक्ती तुमचं जगणं कठीण करत असते. त्यांच्या दृष्टीने जे निर्णय व्हायला नको असतात ते लांबवता येतात. अशी माणसं आवाज चढवून बोलणं, नकारात्मक भावना पसरवणं, ‘निगेटिव्ह सरप्राइजेस’ देण्यात आनंद मानतात. या साधनांद्वारे समोरच्याला नामोहरम करण्यात त्यांना समाधान मिळतं. ते अशा काही वेगानं बोलतात की, तुम्हाला एखादी गोष्टी ठरवायला किंवा निर्णय घ्यायला फार थोडा वेळ मिळतो किंवा अजिबातच वेळ मिळत नाही. व्यंगात्मक बोलून, शेरेबाजी करून, तर कधी तशा प्रकारचे विनोद करून समोरच्यामध्ये कमीपणाची भावना निर्माण करण्यातही ते यशस्वी होतात. तुमच्यात अशी कमीपणाची भावना आणून ते स्वत:ला श्रेष्ठ म्हणून सिद्ध करतात.


जणू समोरच्याला सतत दुय्यमत्व देऊन, उपहासात्मक बघून किंवा बोलून, बाद करून ते स्वत:ला सगळ्यात महान समजायला लावतात. काही मॅनिप्युलेटिव्ह  व्यक्तिमत्त्वं आपल्या स्वभावाचा वेगळाच पैलू दाखवतात. ते ‘सायलेंट ट्रीटमेंटचा’ वापर करतात. तुमच्या फोनला, मेसेजेस, ई-मेलना किंवा काही अन्य गोष्टींची विचारणा यांना अजिबात प्रतिसाद देत नाहीत. त्या व्यक्तींच्या अशा स्वभावाने, वागण्याने तुमच्या मनात संशय, अनिश्चितता निर्माण होते. अशी वागणूक देणं म्हणजे मेंदूचा खेळ असतो. ज्यात असं वागणं हा डावपेच वापरला जातो. काम करायचंच नसलं की ही ढोंगी माणसं अशी वागतात. ही लबाड माणसं त्यांच्या चुकांना, अपयशाला कमजोर व्यक्तिमत्त्वाच्या माणसांना जबाबदार धरतात.
या स्वभावाच्या व्यक्ती त्यांच्या आयुष्यात, ऐंशी ते नव्वद टक्के मुखवटा वापरतात. त्यांच्या मनात दडलेलं आणि त्यांचा खरा चेहरा ते इतरांमसोर कधीच येऊ देत नाहीत. मॅनिप्युलेटिव्ह व्यक्तिमत्त्वामागे दुसऱ्यावर वर्चस्व गाजवणं ही मूळ भावना असते. सोशिक, भिडस्त, संवेदनशील व्यक्तीची ते निवड करतात. खोटं बोलून, स्तुती करून, शपथा घालून, रडून, नाटकी वागून, खोटी आस्था-आधार देऊन ते कमजोर माणसाच्या आयुष्याचा ताबा घेतात. ते तुमच्याच अजिबात गुंतत नाहीत. गरज सरो वैद्य मरो असे ते वागतात. उत्तम संवाद कौशल्य, आकर्षक राहणी, नम्र, नाटकी भाषा, परिस्थितीनुरूप बदल यामुळे आपण चटकन त्यांच्याकडे आकर्षित होतो. कमकुवत व्यक्ती त्यांच्या जाळ्यात अलगद अडकतात. 


म्हणून अशा व्यक्तींशी वागताना आपल्यातल्या कमकुवत बाबी कधीही त्यांच्यासमोर आणू नयेत. आपल्या आयुष्यातल्या गुप्त गोष्टी, अपयश त्यांना सांगू नये. त्यांच्या नाटकीपणाला, ढोंगीपणाला बळी पडू नये. त्यांनी आपल्याला आपल्या मनाविरुद्ध वागायला सांगितलं तर नाही म्हणावं. आपली मतं स्पष्टपणे आणि ठामपणे मांडावी. त्यांच्याबरोबर कुठलीही भावनिक गुंतवणूक होऊ देऊ नये. या व्यक्तीचं का फावतं, तर त्याला कारण आपले कच्चे दुवे. यासाठीच अशा वेळी आपली बलस्थाने आठवायची. कोणत्याही परिस्थितीत आपली स्वप्रतिष्ठा कमी होऊ द्यायची नाही. म्हणजेच तुम्ही सावधपणे आणि हुशारीनं वागल्यास अशा व्यक्तींना शेरास सव्वाशेर भेटेल.

- डॉ. स्वाती गानू, पुणे
ganooswati@gmail.com

बातम्या आणखी आहेत...