Home | Magazine | Rasik | Edited piece of speeches of Chapalgaonkar and Maajgaonkar

आचार विचारांचे स्वातंत्र्य रुजावे...

रसिक | Update - Jul 22, 2018, 12:26 AM IST

चपळगावकर आणि माजगावकर यांनी केलेल्या मर्मग्राही भाषणांचे हे संपादित अंश...

 • Edited piece of speeches of Chapalgaonkar and Maajgaonkar

  प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने माजी न्यायमूर्ती, ज्येष्ठ लेखक नरेंद्र चपळगावकर यांना राजहंस प्रकाशनाचे संचालक दिलीप माजगावकर यांच्या हस्ते नुकतान स्मृती सन्मान प्रदान करण्यात आला. श्रवणसंस्कृतीचे संवर्धन या उद्देशाने दिल्या गेलेल्या या पुरस्काराप्रसंगी चपळगावकर आणि माजगावकर यांनी केलेल्या मर्मग्राही भाषणांचे हे संपादित अंश...


  > न्या. नरेंद्र चपळगावकर, उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश
  समाजाच्या प्रबोधनाची गरज आणि त्यासाठी एक सुलभ आणि परिणामकारक साधन म्हणून वक्तृत्व हे माध्यम विकसित झाले. लिखित शब्द वाचला जात असताना लेखक आणि वाचक यांचा साक्षात संबंध बहुधा नसतो, एखाद्या वक्त्याचे भाषण एेकत वक्ता आणि श्रोता हे दोघेही समोरासमोर असतात. वक्ता आणि श्रोता यांचे हे नाते खूप जवळचे असते.


  वक्त्याचे भाषण करमणूक करणारे किंवा आलंकारिक भाषेने दिपवणारे असू शकते,पण त्या भाषणामागे जर त्या वक्त्याची तळमळ असेल तर ती त‌ळमळच श्रोत्यांच्या मनाला भिडते, त्याला वेगळ्या अलंकरणाची गरज पडत नाही. म.गांधी, पं.नेहरू, वल्लभभाई पटेल असे स्वातंत्र्यसंग्रामातील थोर नेते आणि नंतरच्या काळातील एस. एम. जोशांसारखे निरलस मार्गदर्शक यांच्यात रूढ अर्थाने वक्तृत्व कला नव्हती, पण लोकांविषयीची त्यांच्या मनातील तळम‌ळ त्यांच्या शब्दांना वेगळेच सामर्थ्य देत होती.


  देशाच्या इतिहासात काही महत्त्वाचे क्षण येतात, जे त्या वेळी झालेल्या भाषणांना एक एेतिहासिक महत्त्व प्राप्त करून देतात. पुढच्या पिढ्यांना त्यातून मार्गदर्शन होते. १४ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या घटना समितीमध्ये नेहरूंचे एक भाषण झाले. मध्यरात्री भारत स्वतंत्र होणार होता, तो क्षण थोड्याच वेळात येणार होता. नेहरूंसमोर आजवरचा संग्राम आणि भविष्याची स्वप्ने तरळत होती.


  ते म्हणाले; ‘अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी करार केला होता. आता आपण केलेल्या प्रतिज्ञा आणि निश्चय प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. इतिहासात असे क्षण येतात, अर्थात ते फार क्वचित येतात. मध्यरात्री जेव्हा जग झोपलेले असेल, त्या वेळी स्वतंत्र भारताचा जन्म होणार आहे. आजवर मनातले जे दाबून ठेवले होते, ते प्रकट होणार आहे आणि भारत व त्याची जनता यांच्या सेवेसाठी एवढेच नव्हे, तर अखिल मानव जातीसाठी सेवेला वाहून घेण्याचा संकल्प आपण करणार आहोत.’


  अशा भाषणांना देशाच्या इतिहासात एक चिरस्थायी स्थान मिळते. त्यात काही सुखाचे प्रसंग असतात. काही दु:खाचे, काही उत्सवाचे, तर काही कठीण परीक्षेचे प्रसंग असतात. अशा वेळी निर्भयपणे श्रोत्यांना आणि त्यांच्याद्वारे देशबांधवांना कटू, पण सत्य एेकवण्याची हिंमत त्या काळातले नेते करू शकत होते.


  आॅक्टोबर १९४७. दिल्लीच्या जामा मशिदीत हजारो मुस्लिम जमा झाले होते. नमाज झाल्यावर एखाद्या मान्यवर नेत्याने लोकांना मार्गदर्शन करण्याची जुनीच प्रथा होती. फाळणीनंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या जखमा ताज्या होत्या, मने भ्यालेली होती. अशांततेचे वातावरण होते. अशा वेळी मौलाना आझाद भाषण करत होते. ते म्हणाले, ‘शहजहानने बांधलेल्या या मशिदीत मी तुम्हाला अनेक वेळा संबोधित केले आहे, पण त्या वेळेस तुमचे चेहरे आजच्यासारखे दु:खाने काळवंडलेले नव्हते. पण या स्थितीला तुम्हीच जबाबदार आहात. मी तुम्हाला तुमच्या हिताचे सांगत होतो, तर तुम्ही माझी जीभच छाटून टाकली. मी तुम्हाला आवरब पाहत होतो, तर तुम्ही माझे हात तोडून टाकले. मी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही मोझे पायच हिरावून घेतले.’ मौलाना अतिशय स्पष्ट भाषेत लीगच्या कुशीत गेलेल्यांचे माप त्यांच्या पदरात टाकत होते. बोलताना त्यांचे वक्तृत्व अधिक धारदार झाले होते. पण असे बोलण्याचे धैर्य आझादांसारखेच राष्ट्रनेतेच करू शकत होते.


  स्वतंत्रपणे विचार करण्याचे वातावरण आणि सवय असेल तर वक्तृत्व अर्थपूर्ण बनते. शेवटी भाषणाचा किंवा वक्तृत्वाचा उद्देश समुदायाला आपले मन एकाच वेळी उघडे करून सांगता यावे, हाच असतो. परंतु जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने येतात तेव्हा शब्दांना वेगळे मार्ग शोधावे लागतात. त्यात सूचकता येते. श्रोतेही सजग बनतात. वक्त्याच्या शब्दांतले ध्वनित होणारे अर्थ शाेधू पाहतात. आणीबाणीच्या काळात नरहर कुरुंदकर इसापनीतीतल्या गोष्टी सांगत होते. गोष्टी जुन्या होत्या, अर्थ मात्र नवे होते.


  काही वक्त्यांना एखादा विषय समजावून सांगण्याची इच्छा असते, तर एखाद्या व्यक्तीचे जीवन चरित्र त्याचा उपदेश किंवा इतिहासाचा त्याने घडवलेला भाग आपण शक्य तितक्या अधिक लोकांना सांगावा, असेही व्रत काहींनी घेतलेले असते. महाराष्ट्रभर शिवचरित्र सांगण्यासाठीच शेकडो व्याख्याने देणारे बाबासाहेब पुरंदरे आणि विवेकानंदांचे किंवा श्री श्री अरविंदांचे जीवन चरित्र आणि तत्त्वज्ञान सांगण्यासाठी व्याख्याने देणारेे शिवाजीराव भोेसले हे असे व्रतधारी

  वक्ते होते. जेव्हा श्रोते वक्त्याच्या भूमिकेविरुद्ध असतात, तेव्हा वक्त्याच्या वक्तृत्वाचा कस लागतो. अतिशय शांतपणे विरोध सहन करत करत आपले म्हणणे लोकांना समजावून सांगावे लागते. १९५७ मध्ये औरंगाबादला अ.भा. मराठी साहित्य संमेलन भरले होते. संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबा असलेला जनसमुदाय समोर होता. द्विभाषिकाची तरफदारी करणाऱ्या काँग्रेस नेत्यांबद्दल तात्कालिक राग होता. तो राग व्यक्तीबद्दल नव्हता, तर त्यांच्या भूमिकेबद्दल होता. अशा वातावरणात काकासाहेब गाडगीळांचे भाषण झाले. पक्षशिस्त म्हणून मी द्विभाषिकाला विरोध करू शकलो नसलो तरी मनाने मी संयुक्त महाराष्ट्रवादीच आहे, हे समोरच्या श्रोत्यांना पटवण्याची अवघड जबाबदारी काकांना पार पाडावयाची होती. अशा वेळी त्यांनी जे भाषण केले मी एेकलेल्या सर्वोत्कृष्ट भाषणांपैकी एक आहे. आपल्या भाषणाच्या शेवटी आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देण्यासाठी काकांनी दोन उर्दू काव्यपंक्ती उद्धृत केल्या ..


  हम आहे भी भरते है, तो होते है बदनाम,
  वो कत्ल भी करते है, तो चर्चा नही होती।


  स्वातंत्र्याच्या प्रेरणेने तरुण पेटून उठतील, अशी बाबासाहेब परांजपेंची भाषणे एेकण्याची संधी पश्चिम महाराष्ट्रातील व विदर्भातील लोकांना मिळाली नाही. पण स्वातंत्र्याच्या च‌ळवळीत हजारो तरुण सामील झाले, याचे श्रेय बाबासाहेब किंवा साने गुरुजी यांच्या वक्तृत्वाला आहे. भारताची घटना मताला टाकण्यापूर्वी समारोपाच्या सत्रात डॉ. आंबेडकरांनी केलेेले भाषण उत्कट देशभक्तीने जसे भरलेले आहे तसेच ते भविष्याच्या काळजीनेसुद्धा चिंतित आहे. आपले प्रजासत्ताक अस्तित्वात येत आहे, त्याचे भवितव्य काय असेल? आजवरच्या इतिहासात जसे आपसातील दुहीमुळे आणि अंतर्गत हेव्यादाव्यामुळे आपण स्वातंत्र्य गमावले, तर आपण पुन्हा संघर्ष करणार आहोत का? की इतिहासापासून धडा शिकून आपण एेक्याचा मार्ग चोखळणार आहोत? असा बाबासाहेबांचा सवाल आहे. याच भाषणात त्यांनी राजकारणात भक्तिमार्ग उपयाेगाचा नसतो, तर आपले विचाराचे स्वातंत्र्य महत्त्वाचे असते, असाही सल्ला दिला आहे.


  सर्व नागरिकांना स्वतंत्र विचार करण्याची सवय लागावी, ते विचार निर्भयपणे मांडता येईल, असे वातावरण लाभावे आणि न पटणारे विचारसुद्धा एेकून घेण्याची सहिष्णुता कायम असावी, ही या घटकेला आपल्या सर्वांची प्रार्थना असली पाहिजे.

  > दिलीप माजगावकर, संचालक, राजहंस प्रकाशन
  व्याख्यान आणि वैचारिक लेखन या दोन्हींचा हेतू समाजाचं वैचारिक भरण-पोषण करणं, त्याला विचारप्रवृत्त करणं हा असतो. आज ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय, त्या प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी उभा-आडवा महाराष्ट्र पिंजून काढला आणि हजारो व्याख्यानांतून आपले विचार समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवले आणि ज्यांना हा पुरस्कार दिला जातोय, त्यांनीही हेच काम पण प्रामुख्यानं लेखनातून केलं. या अर्थानं या दोघांचंही महाराष्ट्राच्या विचारविश्वात फार मोठं योगदान आहे.


  मला या दोघांच्या साहित्यात काही समान सूत्रं दिसतात. सखोल चिंतन, विचाराची बैठक, संयमी मांडणी आणि अनाग्रही भूमिका. फरक आहे तो माध्यमांचा. लेखन ही एकांतात चालणारी प्रक्रिया आहे, तर वक्तृत्त्व ही श्रोत्यांशी थेट संवाद साधणारी कला आहे. लेखकाप्रमाणे उत्तम वक्त्याजवळ विचारांचं आणि शब्दांचं सामर्थ्य असावं लागतं. त्याचप्रमाणे हजार श्रोत्यांशी संवाद साधताना त्याला सतत सजग राहावं लागतं. गायकाप्रमाणे रियाज करावा लागतो. शब्दांची फेक प्रभावी ठेवावी लागते. शैली विकसित करावी लागते. या कलेत फार थोड्या अवधीत मोठ्या समूहाला प्रेरित करण्याचं सामर्थ्य आहे याची जाणीव उत्तम वक्त्याजवळ असते.


  शिवाजीरावांनी हजाराहून अधिक व्याख्यानं दिली. तीन-चार हजार श्रोते दोन-दोन तास त्यांच्या व्याख्यानात रंगून जात. अशी जादू होती त्यांच्या व्याख्यानात. त्यांचे व्याख्यानविषय, त्यांची मांडणी, त्यांची शब्दसंपदा, त्यांची फेक या गोष्टी तर होत्याच; पण त्याही पलीकडे त्यात काही होतं, असणार. त्याचा अभ्यास, त्याची समीक्षा व्हायला हवी. ही सगळी मंडळी कोणत्या ना कोणत्या व्याख्यानातून आत्मपर बोलली आहेत. त्यातून त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणेही शक्य होईल. तर असं हे शिवाजीरावांचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या नावानं दिला जाणारा हा पुरस्कार आज आमच्या चपळगावकरांना मिळतोय. शिवाजीरावांना लेखणी थोडी उशिरा भेटली, पण नानासाहेबांना तिची सोबत सुरुवातीपासून होती. मला चपळगावकर केव्हा भेटले? आमची प्रत्यक्ष भेट खूप उशिरा झाली, पण बारा-पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी लिहिलेलं स्वामी रामानंदांचं चरित्र माझ्या वाचनात आलं. मला ते आवडलं चांगल्या चरित्रलेखनाचे सारे वाङ््मयीन निकष त्यात पाळलेले आहेत. चपळगावकरांचा स्वामींविषयीचा आदर, प्रेम हे सगळं त्यात डोकावतो; पण तरीही त्यांनी त्याचा आरती संग्रह केला नाही. एखाद्या व्यक्तीकडे पूर्वग्रहदूषित कोनात ते पाहत नाहीत, उलट त्या व्यक्तीला अनेक अंगांनी जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतात. त्यांना शेरेबाजी मान्य नाही; तसंच व्यक्ती केवळ काळ्या आणि पांढऱ्या रंगात असते, असंही ते मानत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या लेखनात तुम्हाला औषधालाही अभिनिवेश सापडणार नाही.


  मी जे म्हणतोय त्याचा प्रत्यय तुम्हाला दोन दिवसांपूर्वी प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘त्यांना समजून घेताना’ या पुस्तकातून येईल. टिळक, गांधी, नेहरू, पटेल, सुभाषचंद्र, राजाजी अशा स्वातंत्र्यलढ्यातील बिनीच्या नेतृत्वाची ही व्यक्तिचित्रं आहेत. पुस्तकाचं नावच त्यांची लेखन प्रकृती सांगणारं आहे. मी वेळेच्या मर्यादेत चपळगावकरांच्या लेखनाची मला जाणवलेली दोन-तीन वैशिष्ट्ये फक्त सांगितली. पण आपण हे त्यांचं नवं पुस्तक किंवा त्यांची एकूण ग्रंथसंपदा वाचली, तर त्यांच्या लेखनाची सारी वैशिष्ट्ये आपल्याला अनुभवता येतील.शेवटी मी इतकंच म्हणेन की, आजच्या काळात चपळगावकर आणि त्यांच्याप्रमाणेच सर्वसाधारणपणे उदार दृष्टिकोन ठेवून लेखन करणारी जी मंडळी आहेत, अशांचं लेखन आवर्जून वाचायला हवं. आज तुमच्या-माझ्या भोवतीचं राजकीय-सामाजिक वातावरण अस्वस्थ करणारं आहे. म्हणून नेमक्या याच वेळी समाजाला विचारप्रवृत्त करण्यासाठी, त्याच्या विधायक भरणपोषणासाठी चपळगावकरांच्या आणि प्रा. शिवाजीरावांच्या लेखणी-वाणीची नितांत गरज आहे.

Trending