आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..हाती उरले राजघराणे!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्यांच्या राजवटीवरून कधी सूर्य मावळत नव्हता, त्या एकेकाळच्या महासत्ता असलेल्या इंग्लंडपुढे सध्या अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे. ब्रेक्झिटच्या आततायी निर्णयामुळे आर्थिक संकटे या देशापुढे आ वासून उभी आहेत. अशात फुटबॉल संघाची घोडदौड उपांत्य फेरीतच संपुष्टात आल्याने बाजारपेठेची पार निराशा झालेली आहे. म्हणजेच, ब्रेक्झिटही घडले, विश्वचषकही गेला... हाती उरले फक्त ब्रिटिश राजघराणे अशी इंग्लंडची सध्याची अवस्था आहे. श्रीमंतीत मागे पडत चाललेले हेच राजघराणे इंग्लंडचा सगळ्यात मोठा ब्रँड आहे, त्याच्याच बळावर पूर्वीचे वैभव प्राप्त करण्याचे स्वप्न पाहिले जात आहे...


खेळ म्हणजे निव्वळ करमणूक किंवा वेळ घालवण्याचे उत्तम साधन असा विचार करणारे कोट्यवधी आहेत. मात्र, खेळ हे एक माध्यम आहे की ज्यामुळे संपूर्ण देश एक होऊ शकतो - सगळे भेद आणि द्वंद्वे विसरून, असा विचार करणारा एक महान नेता होऊन गेला. त्याचं नाव आहे नेल्सन मंडेला. रॉबिन आयलंडवर कैदेत असताना खेळ ही माणसांना एकत्र आणणारी प्रचंड पण अदृश्य शक्ती आहे हे त्यांच्या लक्षात आले.
दक्षिण आफ्रिकेत रग्बी हा खेळ गोऱ्या लोकांचे वर्चस्व असणारा खेळ. तेथील वर्णभेद सगळ्यात तीव्र होता. या खेळाद्वारे त्यांनी वंशीय वादाने भग्न झालेला देश जोडला, स्पृश्यापृश्यतेच्या भेदाला समूळ नष्ट केले आणि देश नव्याने उभा केला. Invictus या गाजलेल्या चित्रपटात हे सगळं फार सुरेख पद्धतीने दाखवलं आहे.  उण्यापुऱ्या २५ वर्षांत या देशाने नेत्रदीपक प्रगती केली.


एके काळी याच दक्षिण आफ्रिकेवर राज्य करणारे इंग्लंड हे राष्ट्र मात्र आता  महासत्ता राहिले नसून जागतिक राजकारणाच्या दृष्टीने आता बिनमहत्वाचे बनले आहे. त्याचे राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व फार वेगाने कमी झालेले आहे. "ब्रेक्झिट'मुळे (युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय) तर ते आता चांगलेच एकटे पडले आहे.  ब्रेक्झिटची प्रक्रिया अपेक्षेनुसार होत नसल्याच्या कारणावरून दोन मंत्र्यांनी राजीनामे दिल्यामुळे थेेरेसा मे सरकारपुढे पेचप्रसंग उभा आहे. अशा वेळी या राष्ट्राला पुन्हा एकदा कात टाकून नव्याने उभे राहायचे आहे. मात्र, विश्वचषक स्पर्धेतल्या उपांत्य फेरीत क्रोएशियाकडून इंग्लंड संघाला हार पत्करावी लागल्याने मोठीच निराशा जनतेच्या आणि बाजारपेठेच्या वाट्याला आलेली आहे. कारण, इंग्लंडने जर अंतिम फेरीत धडक मारली असती, तर अर्थव्यवस्थेला २७ अब्ज पौंड इतका फायदा झाला असता, असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज होता. हा अंदाज केवळ मृगजळ ठरला आहे.  


हे खरे की, इंग्लंडच्या फुटबॉल संघाने विश्व चषक स्पर्धेत थोडीफार चमकदार कामगिरी केल्यामुळे देशाच्या कासवगतीने चालणाऱ्या अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात नवसंजीवनी मिळण्याची एक संधी देशाला मिळाली आहे. पण त्याआधी लोकप्रियता टिकवून असणारे ब्रिटिश राजघराणे, त्यांच्या घरातील लग्ने, अपत्यजन्म इत्यादी ‘इव्हेंटफुल’ समारंभाच्या निमित्ताने पर्यटन व्यवसायात खूप मोठी वाढ करण्याची युक्ती ब्रिटनने केली आहे. फुटबॉल आणि राजघराणे या दोन्हीद्वारे एका नव्या देशाची उभारणी करू पाहण्याचा इंग्लंडचा प्रयत्न जाहीर आहे. याला अर्थातच अनेक ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि चक्क व्यावसायिक कारणे आहेत.  जवळजवळ तीनशेहून अधिक वर्षे राजकारण, अर्थकारण, व्यापार, साहित्य, इतर कला, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि खेळ क्षेत्रात जगावर अधिराज्य असणारा हा एक ‘महान’ देश मात्र आता केवळ ऐतिहासिक वारसा, समृद्ध लोकशाही आणि राजघराण्याचा अजूनही थोडाफार असणारा दबदबा यावरच तग धरून आहे. कधीकाळी तब्बल ५३ देशांवर राज्य करणाऱ्या ग्रेट ब्रिटनकडे आता फक्त इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड इत्यादी भाग शिल्लक आहेत. जिथे कधीही सूर्यास्त होत नाही, ही ब्रिटनची ख्याती पुसली गेली आहे. 

 

खरं तर औद्योगिक क्रांतीची जिथे सुरुवात झाली तो हा देश. १७८० पासून औद्योगिक तंत्रज्ञान, विज्ञान यात अग्रेसर. विसाव्या शतकात मात्र इंग्लंडची व्यापार-उद्योग, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील मक्तेदारी कमी होऊ लागली, ती मुख्यत्वे करून अमेरिकेतील व्यापारीकरणामुळे, औद्योगिक उलाढालींमुळे त्याचबरोबर त्यांच्या आर्थिक आणि राजकीय धोरणांमुळे. त्यात चाळीसच्या दशकातच ब्रिटिशांच्या जगभर पसरलेल्या साम्राज्याला ओहोटी लागायला सुरुवात झाली. एकएक करून अनेक देश हातचे जाऊ लागले. एकेकाळी जगभरातील उलाढालींचे केंद्र असणाऱ्या या देशाची, त्यांच्या आणि परदेशातील बाजारपेठांवरील पकड ढिली होऊ लागली. युरोपातील फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी सारखी राष्ट्रे व्यापारात पुढे येऊ लागली. आर्थिक, व्यावसायिक, न्याय, लोकशाहीची मूल्ये, सामाजिक आणि सांस्कृतिक मानदंड इत्यादी बाबतीत गेली काही दशके युरोपियन युनियन हा खरा ब्रिटनचा  साथीदार होता. आता मात्र हा देश युरोपीयन युनियनमधील सगळ्यात कमी आर्थिक वाढ असणारा हा देश आहे.  ब्रिटनने राष्ट्रवादी नेत्यांच्या भूलथापांना बळी पडून युनियनशी काडीमोड घेत स्वत:ची अधिकच कोंडी करून घेतली आहे. ब्रेक्झिटनंतर जगातील अर्थकारणात आता इंग्लंडचा वाटा केवळ  ३ टक्के असेल तर त्यांची  लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येत फक्त एक टक्का असेल. 


एकेकाळी अनेक नोबेल पुरस्कार विजेते लेखक, कवी, नाटककार, कलाकार आणि शास्त्रज्ञ देणारा हा देश सकस साहित्य-संगीतादी कला तसेच  विज्ञान, तंत्रज्ञान, खेळ  यातील कामगिरीत खूप आघाडीवर होता. आता मात्र याबाबतीत खडखडाट आहे. ब्रिटनची पडझड फक्त वरील क्षेत्रांतच नसून जमीन-जुमल्याच्या बाबतीत देखील आहे. त्यांच्या कडील अनेक मोक्याच्या वास्तू, इमारती आणि जागा या अरेबियन, अमेरिकन, रशियन, भारतीय आणि अनेक देशातील नागरिकांच्या मालकीच्या आहेत किंवा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्याच्या मालकीच्या आहेत.  एक काळ असा होता, की ब्रिटिश राजघराणे जगातील सगळ्यात श्रीमंत होते. परंतु जसजशी माहिती, तंत्रज्ञान, टेलिकम्युनिकेशन या  क्षेत्रात क्रांती घडून येऊ लागली, अमेरिकेत आणि इतर काही देशात मोठ्या प्रमाणावर अतिश्रीमंतांच्या संख्येत वाढ होऊ लागली. तसेच खनिज तेल निर्यात करणारे आखातातले शेख हेही फोर्ब्सच्या यादीत झळकू लागले. याच कारणास्तव १९५२ पासून हळूहळू करत राणीच्या श्रीमंतीत घट होऊ लागली. आज ही स्थिती आहे की, बिल गेट्स, वॉरेन बफे, मार्क झुकेरबर्ग, जेफ बेझोज यांच्या तुलनेने राणीची श्रीमंती नगण्य म्हणावी अशी आहे.  


एका बाजूला सांपत्तिक स्थिती ढासळत असली तरीही, ब्रिटिश राजघराणे, त्यांची क्राऊन इस्टेट, त्यांचे कुटुंबीय हा एक प्रचंड मोठा ब्रँडही मधल्या काळात अस्तित्वात आला आहे. तो आकारात आणण्यात ब्रिटिश सरकारचा हात  तर आहेच. तसेच तेथील पर्यटन  व्यवसाय, शोभेच्या कलात्मक वस्तू आणि स्मृतीचिन्हे तयार करणारे व्यावसायिक, त्याच बरोबर फॅशन इंडस्ट्री आणि अगदी पाप्पराझी यांनीही ब्रिटिश राजघराण्याच्या ब्रॅण्डचे मूल्य वाढवले आहे. त्यामुळेच, राजघराण्यातील लग्न किंवा अपत्यजन्म हा त्यांच्या दृष्टीने सुगीचा काळ असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर अलीकडेच पार पडलेल्या प्रिन्स हॅरीच्या लग्नाला प्रसिद्धी देण्याचे आणि तो एक मोठा जागतिक सोहळा म्हणून त्याचे मार्केटिंग करण्याचे  महत्व लक्षात येईल. याचे मार्केटिंग अजूनही थांबलेले नाही. कारण लग्न होऊन दोन महिने उलटून गेले तरीही, प्रिन्स हॅरीने चाहते आणि हितचिंतकांना लिहिलेल्या आभारपत्राचीही बातमी जगभरच्या मीडियाने चवीने प्रसारित केली आहे.  एरवी, हे राजघराणे फारच परंपरावादी. मात्र काळानुरूप तेही बदलत असल्याचा हा संकेत आहे. राणीची नवी अमेरिकन नातसून मिश्र वंशीय आहे. 


पश्चिमेकडे राणी किंवा राजकन्या ही गोरी (white), सोनेरी केसांची, निळ्या डोळ्यांची असावी असाच अलिखित नियम  होता. मेगन मार्कलच्या आगमनाने हा पायंडा मोडीत निघाला आहे, ही गोष्ट फार महत्वाची आहे. काही वर्षांपूर्वी डिस्ने पिक्चर्सने कृष्णवर्णीय राजकन्या दाखवली होती. तेव्हा अनेकांनी नाके मुरडली होती. पण जगभरातील लोकांनी तिचे स्वागत केले. मार्कलच्या स्वीकारामुळे ब्रिटिश राजघराण्यातील पुढची पिढी विचारांनी आणि कृतीनेही पुरोगामी आहे, वांशिक भेद न मानणारी आहे, नवतेला स्वीकारणारी आहे, हे अधोरेखित झाले. आताच्या इंग्लंडच्या फुटबॉल टीममधे  तब्बल तेरा खेळाडू मिश्र वंशीय आहेत. लंडनचे महापौर मुस्लिमधर्मीय आहेत. यामुळे ब्रिटनची एकंदरीत उदारमतवादी, सहिष्णू आणि आधुनिक भूमिका लख्ख उजळून निघते आहे. ब्रिटनचा सगळ्यात मोठा ब्रँड आता अनेक जुनाट, बुरसटलेल्या परंपरांना तिलांजली देऊन आधुनिक जगाशी जुळवून घेतो आहे. त्यांचे सरकार हा ब्रँड अधिकाधिक पर्यटक आणि परकीय चलन मिळवून देईल यासाठी सदैव प्रयत्न करत राहणार आहे. कारण सध्या तरी त्यांच्याकडे तोच एक सर्वात मोठा आणि चलनी ब्रँड आहे. 


महान ऐतिहासिक वारशाचा फायदा घेत संसदीय लोकशाही आणि संवैधानिक राजसत्ता असलेला हा देश एक आधुनिक, पुरोगामी, आर्थिक दृष्ट्या सशक्त राष्ट्र म्हणून पुन्हा फिनिक्स पक्षासारखा उभा राहू पाहतो आहे.  इंग्रजीत ज्याला ‘ब्लेसिंग इन डिसगाइज्’ म्हणजेच संकटात शुभसंकेत म्हणता येतील, असे याचेे या घटकेला महत्त्व आहे.


- गायत्री चंदावरकर
gayatri0110@gmail.com

 

बातम्या आणखी आहेत...