आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साई दर्शनाचा सांगावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी येथील द्वारकामाईच्या मंदिरात साईबाबांची छबी भिंतीवर दिसल्याची बातमी सर्वदूर पसरली. परिणामी, शिर्डीत भाविकांची एकच गर्दी उसळली. स्वदेशी बनावटीचे मंगळयान तयार करणाऱ्या देशात चमत्कारांचे दावे केले जातात आणि जनता चिकित्सा न करता त्याला सहजपणे भूलून जाते हे चिंताजनक विरोधाभासी चित्र पुन्हा एकदा त्यातून पुढे आले...


मागील आठवड्यात शिर्डी येथील द्वारकामाईच्या मंदिरात साईबाबांची छबी भिंतीवर दिसून आल्याची बातमी महाराष्ट्रात पसरली. सोशल मीडियावरून ही बातमी देश-विदेशातल्या साई भक्तांपर्यंत देखील तातडीने पोहोचली. साईबाबांनी आपल्या भक्तांना दर्शन दिल्याच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. केवळ शिर्डी येथे नाही, तर महाराष्ट्राबाहेरील अन्य राज्यांमध्ये तसेच अगदी कॅनडासारख्या प्रगत देशांमधील साई मंदिरातदेखील असे प्रकार घडल्याचे दावे केले जातात. स्वाभाविकपणे असा चमत्काराचा दावा करणाऱ्या गोष्टी समाजात वेगाने पसरतात. त्यामधूनच शिर्डी येथे भक्तांची मोठी गर्दी उसळली. अनेकांना आठवत असेल की गणपतीने दूध प्यायल्याची अफवा युतीच्या शासनकाळात महाराष्ट्रात पसरली होती. त्याचीच पुनरावृत्ती म्हणून भिंतीवर साईंनी दर्शन दिले, येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेच्या डोळ्यातून पाणी आले किंवा दर्ग्यावरची चादर हलते आहे, अशा स्वरूपाच्या गोष्टी अधून मधून समाजात पसरत असतात. एका बाजूला स्वदेशी बनावटीचे मंगळयान तयार करणारा आपला देश आणि दुसऱ्या बाजूला चमत्कारांच्या दाव्यांच्यामागे कोणतीही चिकित्सा न करता धावणारे जनसमुदाय अशी, एक टोकाची विरोधाभासी परिस्थिती आपल्या देशात दिसून येते. हे कशामुळे घडते व ते थांबवण्यासाठी काय करायला हवे, हे समजून घेणे नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे.


साईबाबांची प्रतिमा भिंतीवर दिसण्याच्या प्रसंगाच्या पासून सुरु करूया. अशी प्रतिमा दिसण्याची कारणमीमांसा अनेक प्रकारे करता येते. पहिली बाब म्हणजे, हा दृष्टीभ्रम असू शकतो. मेंदू विज्ञान याला ऑप्टिकल इलुजन(OPTICAL ILLUSION) असे म्हणते. जसे अंधारातून जाताना रस्त्यात पडलेली दोरी ही साप असल्याचा आभास होणे. अशा स्वरूपाचा हा प्रकार असू शकतो. कुठल्याही प्रकारची भक्ती करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या मनातील देवस्वरूप प्रतिमेच्या भेटीची असोशी असते. अशा भक्ती स्थानावरचे वातावरणदेखील याच विषयाने भारावून टाकलेले असते. सगळीकडे साई बाबांच्या प्रतिमा, आजूबाजूला वाजणारे त्या विषयीचे संगीत, या संमोहित वातावरणाचा मनावर परिणाम होऊन, अशा स्वरूपाचा आभास होण्यासाठी वातावरण निर्मिती होते. चिकित्सेची कोणतीच सवय मनाला लागली नसेल, तर त्या मधून असे अनुभव येवू शकतात. 


याचे दुसरे कारण, हे अधिक गंभीर असू शकते. आपल्या मनातील भावूकता बाजूला ठेवून जरा कठोर चिकित्सा करायची ठरवली, तर आपल्याला असे लक्षात येते की, भक्तांच्या भावनेचा गैरफायदा घेण्यासाठी मुद्दामदेखील असे प्रकार घडवले गेल्याची शक्यता असते. मागील महिन्यात अंबाजोगाईमध्ये खोदकाम चालू असताना अशीच मूर्ती सापडली म्हणून बातमी सगळीकडे पसरली होती. त्या ठिकाणी एक नाग दिसून आल्याने तेथील गर्दी एकदम वाढली होती. पण नंतर काही लोकांनी केलेला हा बनाव असल्याचा व्हिडियो समोर आला आणि भक्तांची मोठीच फसवणूक झाल्याचे समोर आले. याविषयी देखील भक्तांनी जागरूक असले पाहिजे. पण यामधील कोणत्याही शक्यतेचा विचार या वेळी केला जात नाही. खरे पाहता, अशाविषयी शंका उपस्थित करणारे हे खरे, तर भक्तांचे मित्र असतात. ते या भक्तांना संभाव्य फसवणुकीपासून वाचवू पाहत असतात. पण या निमित्ताने जे उन्मादी वातावरण तयार होते, त्यामध्ये अशा स्वरुपाची चिकित्सा समाजाला नको वाटते किंवा नको वाटावी, असे वातावरण तयार केले जाते. अशा परिस्थितीचे एकच विश्लेषण केले जाते, ते असे की, प्रत्यक्ष साईबाबांनी भक्तांना या ठिकाणी दर्शन दिले. देव अवतार घेतो, आणि त्याच्या दर्शनाने आपले सगळे प्रश्न सुटू शकतात, या मानसिकतेतून हे घडते.


या पार्श्वभूमीवर एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. ती म्हणजे, भारतीय राज्य घटनेने आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीला त्याचा देव आणि धर्म मानण्याची मुभा दिली आहे. पण त्याच वेळाला त्याचा वापर करून कोणी आपली फसवणूक करत नाही ना, याची चिकित्सा करण्याची जबादारीदेखील या राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीवर टाकलेली आहे. "अंनिस'सारख्या संघटना याच भूमिकेतून आपले काम करीत असतात. केवळ एवढेच नाही, तर देवाचे स्वरूप रंजल्या गांजल्या जनतेच्या सेवेत पाहावे, असे सांगणारी एक मोठी संत आणि समाज सुधारकांची परंपरा आपल्या समाजात आहे. त्यांनी ठोस शब्दात चमत्कार आणि दैवी अवतार यांच्यावर टीका केली आहे, आपण जेव्हा आपल्या धर्म भावनेचा वापर हा अशा चमत्कारी दाव्यांना पाठबळ देण्यासाठी करतो, तेव्हा आपण आपल्याच समाजाचे संचित असलेल्या संत आणि सुधारकांच्या परंपरेची चाके उलटी फिरवत असतो, हे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे.


कायद्याच्या पातळीवर विचार करायचा झाला, तर महाराष्ट्र हे जादूटोणाविरोधी कायदा संमत करणारे पहिले राज्य राहिले आहे. जादूटोणाविरोधी कायद्यानुसार दैवी चमत्काराचा दावा करणे आणि त्यामधून लोकांची फसवणूक आणि ठकवणूक करणे, हा गुन्हा आहे. शिर्डीचे साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अहमदनगरचे जिल्हाधिकारी काम पाहत असतात. त्यामुळे त्यांनी या प्रकारांविषयी शासनाची भूमिका स्पष्टपणे जाहीर करणे आवश्यक होते. एका बाजूला मुख्यमंत्री अफवा पसरवली जावू नये म्हणून लोकांनी सावध राहण्याचे आवाहन करतात मात्र दुसऱ्या बाजूला शासनाचे प्रतिनिधी मात्र मूग गिळून गप्प बसतात, असे विरोधाभासाचे चित्र त्यामधून निर्माण होते. 


अर्थात, साईभक्तांच्या एका समूहाने मात्र कठोर शब्दांमध्ये या चमत्कारांच्या दाव्याला विरोध व्यक्त केला, ही खूप महत्वाची घटना आहे. आपले भक्तीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून देखील चमत्काराच्या नावाखाली होणाऱ्या शोषणाला त्यांनी केलेला विरोध अनुकरणीय आहे. शांती, गोर-गरिबांना मदत, हिंदू-मुस्लीम ऐक्य, रुग्ण सेवा या गोष्टीची साई बाबांची परंपरा हा भक्तांचा वर्ग चालवू इच्छितो, आणि तसे स्पष्टपणे बोलतोदेखील. ईश्वरकेन्द्री धर्म, मानवकेन्द्री करण्याची जी संत आणि समाज सुधारकांची भूमिका आहे, त्या भूमिकेला पुढे नेणारा हा वर्ग आहे आणि म्हणून त्यांचे हार्दिक स्वागत व्हायला हवे.


चमत्काराला नमस्कार करणारी एक खोल वर रुजलेली मानसिकता आपल्या समाजात आहे. कुठलाही तथाकातीत चमत्कार हा एकतर नजरेचा खेळ असतो, पटकन समजून न येणारी भौतिक अथवा रासायनिक अभिक्रिया असते, अथवा थेट फसवणूक असते या विषयीचे जोरकस प्रबोधन समाजात करण्याची गरज शिर्डी येथील साईबाबांची प्रतिमा दिसल्याच्या प्रसंगातील गर्दीने अधोरेखित केली आहे.

- हमीद दाभोळकर

बातम्या आणखी आहेत...