Home | Magazine | Rasik | heena kausar kahan write on jawwad patel

हुकूम मेरे आका !

हिनाकौसर खान-पिंजार | Update - May 06, 2018, 07:24 AM IST

जो स्वप्न पाहतो, त्या दिशेचा विचार करतो आणि प्रयत्नांती ते स्वप्न प्रत्यक्षात आणतो, तो खरा आविष्कारी.‘थिंक महाराष्ट्र’ला

  • heena kausar kahan write on jawwad patel

    जो स्वप्न पाहतो, त्या दिशेचा विचार करतो आणि प्रयत्नांती ते स्वप्न प्रत्यक्षात आणतो, तो खरा आविष्कारी.‘थिंक महाराष्ट्र’ला शोध अाहे तो अशा कर्तृत्ववान माणसांचा. ते कर्तृत्व प्रत्येक वेळी मोठ्या गोष्टींमध्ये सापडते असे नाही. अनेकदा माणसे छोट्या, मात्र अत्यंत कल्पक गोष्टींच्या निर्मितीमधून स्वत:चे वेगळेपण सिद्ध करतात. जव्वाद पटेल हा तरुण त्या गटात मोडतो. तो जसा आदेश देतो, यंत्र त्यानुसार कार्य करते...

    त्याला रोज सकाळी लवकर उठायचा जाम कंटाळा येई. पण नियमित क्लासला जाणे तर भाग असे. मग हा पठ्ठ्या पहाटे अलार्म वाजला, की बिछान्यातूनच गिझरला अादेश देई. ‘चल पाणी तापवायला घे!’ तो बिछान्यात असेपर्यंत त्याचा गिझर पाणी तापवे. तो अंघोळ करायला गेला, की टोस्टरला हुकूम देई- ‘अंघोळ होत आली आहे. ब्रेड टोस्ट करून घे.’ टोस्टर त्याचे म्हणणे गपगुमान ऐके.


    तो तेव्हा केवळ अाठवीत होता!
    पुढे तो उच्च शिक्षणासाठी हैदराबादला गेला. तिथे हॉस्टेलवर घरगुती जेवण कोठून मिळणार? तो तिथेही यंत्रांना हुकूम देऊन, फर्माईशी पूर्ण करून घेई. तो कॉलेजमधून हॉस्टेलसाठी निघाला की, फोनवरून घरातील कुकरला सूचना देई. ‘दोन माणसांचं भात-वरण लाव.’ कधी कधी तर मसालेभात किंवा लेमन-राईचीसुद्धा फर्माईश असे. तो हॉस्टेलवर पोचेपर्यंत त्याच्या कुकरने गरमागरम जेवण तयार ठेवलेले असे.


    शाळेत फटाके फोडून शिक्षकांना त्रास द्यायचा असो किंवा लोकांची पाण्यासाठीची तगमग पाहून निर्माण केलेले हवेतून पाणी काढायचे यंत्र असो! तो त्याला हव्या, त्या गोष्टी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साध्य करत राहिला. तो म्हणजेच, तेवीस वर्षांचा जव्वाद पटेल! जव्वाद हा जिज्ञासू तरूण अाहे. तो स्वत:ची कुतूहल शमवण्यासाठी तंत्रज्ञानाचा मुक्त वापर करतो. इतका, की अातापर्यंत त्याने तब्बल दोन हजारांहून अधिक ‘इनोव्हेशन्स’ केली आहेत. त्याच्या हवेतून पाणी काढणाऱ्या ‘ड्यू ड्रॉप’ यंत्राला आणि ‘स्मार्ट हेल्मेट’ला संशोधनांचे पेटंट मिळाले आहेत. त्याचे चाळीसपेक्षा अधिक शोधनिबंध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विज्ञान नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहेत.


    जव्वाद मूळचा अकोल्याचा. त्याचे वडील निवृत्त मुख्याध्यापक, तर आई गृहिणी. मोठी बहीण डॉक्टर. जव्वाद शालेय अभ्यासात तसा साधारण विद्यार्थी होता. मात्र त्याला हत्यारे-साधने फार प्रिय होती. तो मित्रांत फारसा रमायचा नाही, पण वस्तूंची तोडफोड करून काहीतरी नवं करून पाहण्यात त्याला मजा यायची. त्याची पहिली मैत्री झाली. ती वडिलांच्या ‘टुलबॉक्स’मधील स्क्रू-ड्रायव्हरशी! त्याने त्याचे ‘टोनी’ असे नामकरण करून टाकले. तो टोनीसोबत विविध मशीन्स उघडून पाहू लागला. इतर मुले खेळण्यांची मागणी करत असताना, जव्वादला स्क्रू-ड्रायव्हरचे सेट, विविध उपकरणं, मल्टिमीटर, टेस्टर अशा गोष्टी हव्या असत. त्याने त्याच्या त्या ‘उद्योगी’ वृत्तीमुळे आठवीत असताना चक्क ‘इन्फ्रारेड रेडियशन’वर शोधनिबंध लिहिला होता.


    जव्वादचे या सगळ्या खटाटोपामागील तत्व खूप साधे आहे. तो म्हणतो, ‘मी ‘थिंक बियाँड नॉर्मल’ या सूत्राने काम करतो. मी माझ्यापुढं असणाऱ्या समस्यांचा, प्रश्नांचा विचार करताना सर्वसाधारण विचारापलिकडे कसं जायचं, साधारण उत्तरांच्या पुढची काय पायरी असेल, असा विचार करतो आणि तिथंच मला उत्तरं सापडतात. म्हणून तर मी लहानपणी ‘डीटीएमएफ - ड्वेल टोन मल्टि फ्रिक्वेन्सी’ हे तंत्र वापरून ऑटोमॅटिक गिझर, टोस्टर, राइस कुकर बनवू शकलो.’


    जव्वादचा एकटेपणा तंत्राच्या सान्निध्यात दूर होई. त्याच्या तंत्र अाणि यंत्र या दोस्त मंडळींसोबत त्याची चौकसबुद्धी वाढीस लागली. जव्वादमध्ये संवेदनशीलता होतीच. म्हणूनच त्याला स्वत:च्या जीवनशैलीपलिकडील एखादी समस्या दिसली, की तो ती सोडवण्याच्या मागे लागे. जव्वाद बारावीत असताना, त्याचे एक नातेवाईक रस्ता अपघाताने कायमचे बिछान्याला खिळले. त्यांना वेळीच उपचार मिळाला असता, तर ते कदाचित बरे होऊ शकले असते, हे कळल्यावर जव्वाद कमालीचा अस्वस्थ झाला. त्याने थेट ‘स्मार्ट हेल्मेट’ तयार केले. ते हेल्मेट घातल्यानंतर चालकाने मद्य प्यायले असेल, तर गाडी सुरू होत नाही. शिवाय चालक चालत्या गाडीवर फोनवर बोलत असेल, तर गाडी तीन सूचना देऊन आपोआप थांबते. गाडीचा वेग मर्यादेबाहेर वाढवला तरीदेखील गाडी थांबते. तसेच, गाडीला अपघात झाला, तर हेल्मेटमधील जीपीएस यंत्रणेद्वारे जवळच्या हॉस्पिटल, पोलिस व चालकाचा एक नातेवाईक यांना तत्काळ सूचना दिली जाते. जव्वादने त्या तऱ्हेचे हेल्मेट केवळ अतिरिक्त दोन हजार रूपयांत तयार केले.


    जव्वादने हैदराबाद येथे बी. टेकसाठी प्रवेश घेतला. तो एकदा हैदराबादहून अकोल्यास जात होता. त्याच्या हातातील पाण्याच्या बाटलीकडे एक बाई व तिचा मुलगा आशाळभूतपणे पाहत होते. त्याला वाटले त्यांना पैसे हवेत. त्याने त्यांना काही पैसे देऊ केले, पण ते पैसे नाकारून त्याच्या हातातील पाण्याच्या बाटलीकडे पाहत राहिले. त्या प्रसंगाने त्याचे मन हेलावून गेले. पाण्यासाठी इतकी तगमग? त्याच्या डोक्यात हा विचार घोळत राहिला आणि त्याने एका तासात कमी दाबाच्या हवेतून दोन बाटली पाणी तयार करण्याचे ‘ड्यू ड्रॉप’ हे उपकरण तयार केले. साधारणपणे अशा प्रकारच्या उपकरणांसाठी लिक्विड नायट्रोजन, अमोनिया अशा वायूंचा वापर केला जातो. परंतु त्या वायूंचा ओझोनच्या थराला धोका असतो.


    जव्वादला ते टाळायचे होते. त्याने त्यासाठी ‘इलेक्ट्रॉनिक कन्डेशन’ या तंत्राचा वापर केला आणि त्याला यश मिळाले. या पलीकडे जाऊन जव्वादने सुरूवातीच्या टप्प्यातील स्तनाचा कर्करोग शोधू शकेल, अशा यंत्राचा शोध लावला आहे. त्याला त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले अाहे. जव्वादला शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना कळू लागल्या. तेव्हा त्याला प्रश्न पडला, की शेतकऱ्याला सोयाबीनसारख्या फायद्याच्या उत्पादनातही घट का होत असेल? प्रत्येक पीकाला ‘बॅलन्स डायट’ आवश्यक असतो. मातीची विशिष्ट प्रत, पाण्याचे प्रमाण, आद्रतेचे प्रमाण, योग्य बियाणे, पूरक वातावरण.


    जव्वादने सोयाबीनला आवश्यक असणाऱ्या माती, वातावरणाचा अभ्यास करून बॅलन्स डायटप्रमाणे एका जागेत सोयाबीन लावला. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या नेहमीच्या पद्धतीने सोयाबीनची लागवड केली. त्याला उत्पादनात दहा टक्क्यांनी फरक दिसला. योग्यरित्या वाढवलेल्या सोयाबीनचे उत्पादन नेहमीपेक्षा दहा टक्के अधिक मिळाले. आता जव्वाद शरिरातून रक्त बाहेर न काढता, रक्तातील साखर शोधणारे उपकरण बनवण्याच्या प्रयत्नात आहे. आरोग्य, उर्जादी क्षेत्रांत केलेल्या संशोधनासाठी जव्वादला केंद्र शासनाच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने ‘युवा पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. जव्वादने बी.टेकची पदवी मिळवली आहे. त्याने स्वत:ची एक लॅब हैदराबाद येथे सुरू केली आहे. जव्वादला ‘सोशल इनोव्हेटर’ बनायचे आहे. जव्वादच्या विचारांत सच्चेपणा आहे. त्याला त्याची दिशा सापडली अाहे. जव्वादमधील संशोधकवृत्ती अाणि त्याचे लोकाभिमुख विचार त्याच्या यशाचा पर्यायाने समाजाच्या सुख आणि समृद्धीचा मार्ग सुकर करणारे अाहेत.

    greenheena@gmail.com

    जव्वाद पटेल- ७३८५०४८३५८, www.jawwadpatel.com
    लेखिकेचा संपर्क : ९८५०३०८२००

Trending