आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथसखी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोव्यातल्या अनेक ग्रंथालयांच्या उभारणीत आणि देखभालीत मोलाचा हातभार लावणाऱ्या, अभ्यासक्रमापुरतं मर्यादित न राहता ग्रंथालयशास्त्रातील ताज्या घडामोडींचा मागोवा घेत राहणाऱ्या डाॅ. अर्चना काकोडकर यांच्याविषयीची आजची कव्हर स्टोरी.


उत्तम शैक्षणिक कारकीर्द, कुटुंबीयांचे पुरोगामी विचार आणि प्रोत्साहन, स्वत:ची जिद्द, परिश्रम, प्रतिकूलतेशी झगडण्याची तयारी, प्रसंगी संघर्ष करण्याची मानसिकता, यांतून आकाराला आलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. अर्चना काकोडकर. गोवा मुक्कामी काही कारणासाठी गोवा विधानसभेच्या ग्रंथालयात जाण्याचा योग आला. हवे असलेले काही दुर्मिळ संदर्भ तिथे अल्पावधीत मिळाले, तेव्हा ही सारी शिस्त, प्रक्रिया, पद्धती कुणी घालून दिली, असा प्रश्न पडला. या प्रश्नाचे उत्तर होते, डॉ. अर्चना काकोडकर. मग कुतूहलापोटी गोव्यातल्या इतरही काही महत्त्वाच्या ग्रंथालयांना आवर्जून भेटी दिल्या. तिथेही जी उत्तम कार्यपद्धती जाणवली, त्याचे श्रेय डॉ. अर्चना यांचेच होते. पुढचा टप्पा अर्थातच त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा. त्या भेटीचे हे इतिवृत्त.


पणजीमधले मोक्याच्या जागेवरचे जुन्या पद्धतीचे घर. सोबत गोव्यामधला संगीताचा विद्यार्थी, उद्योजक, कार्यकर्ता अशा विविध भूमिका एकाच वेळी जगणारा आमचा स्नेही सूर्या नाईक. त्यांची एकमेकांशी छान मैत्री. संध्याकाळी चारची वेळ असेल. सोफ्यावर विसावलेल्या अर्चनाताई (त्यांच्या वयाला न शोभणाऱ्या चपळतेनं) स्वागतासाठी पुढे आल्या. मला हात धरून अगत्यानं स्वत:शेजारी बसवून घेतलं. जिव्हाळ्यानं विचारपूस केली. अस्खलित इंग्रजी संभाषण. वय ७८ फक्त, पण ग्रंथालयाचा विषय निघाला तरी उत्साहानं जुन्या काळात शिरतात. ‘मूळची मी विज्ञानाची विद्यार्थिनी. विज्ञान विषय घेऊनच पदवीधर झाले. मग भाषा विषय घेऊन पदव्युत्तर पदवी मिळवली. वाचनाची आवड बालपणापासून मुरलेली. पुस्तक वाचनाचा छंद, आवड लहानपणापासून, पण नुसते वाचन नव्हे. पुस्तकाची निगा राखणेही तितकेच महत्त्वाचे, हे पण शिकवले गेले. त्यामुळे कुठलेही पुस्तक वाचायचे, पण त्याला कव्हर घालणे, त्याची नोंद करणे, पुस्तकावर काहीही न लिहिणे, पाने-कोपरे न दुमडणे, पुस्तक पालथे न ठेवणे, घेतलेल्या जागीच ते परत व्यवस्थित ठेवणे, याची सवय मुरलेली होती. ती आजही कायम आहे. पुढे लग्न होऊन गोव्याला आले आणि ग्रंथप्रेमाला नव्यानं अंकुर फुटले. मग एका क्षणी ‘ग्रंथालयशास्त्र’ हा विषय घेऊन काम करण्याचा निर्णय घेतला आणि बीलिब, एमलिब आणि पीएचडी असा ग्रंथालयशास्त्राचा औपचारिक अभ्यास पूर्ण केला. हा प्रवास आता सांगताना वाटतो, तेवढा सोपा आणि सरळ नव्हता. अनेक अडचणी आल्या. काही मुद्दाम निर्माण केल्या गेल्या. मला कोकणी भाषा येत नव्हती म्हणून नोकरी नाकारली गेली. पण मी माघार घेतली नाही. मध्यंतरी माझ्या प्रकृतीनंही असहकार पुकारला होता. पण लढत राहिले आणि कामही करत राहिले. त्याचं फळ गोव्यातल्या उत्तम ग्रंथालयांच्या रूपानं समोर दिसतं, तेव्हा फार समाधान वाटतं. एखादं रोप आपण लावावं, त्याला खतपाणी घालावं. निगा राखावी, जपावं आणि ते वाढू लागलं, फुलू लागलं की, अनिर्वचनीय आनंदाचा धनी बनून समाधान मिळवावं, असा हा प्रवास होता.’ अर्चनाताईंचा स्वर ग्रंथ आणि ग्रंथालयांविषयी बोलताना ओलावलेला जाणवतो. 


त्या बोलत असताना त्यांना मध्येच अडवण्याची इच्छाही होत नाही. एखादी मैफल जमावी, तानपुरे छान जुळलेले असावेत, साथीदारांशी उत्तम ट्युनिंग असावे, जाणकार रसिकांची हवीहवीशी उपस्थिती असावी आणि अशा जमून आलेल्या वातावरणात कलाकाराच्या प्रतिभेलाही नवोन्मेष फुटावेत, तशी ऐकताना आपली अवस्था होते. गोवा विद्यापीठाचे -ग्रंथालय, गोवा विधानसभेचे ग्रंथालय, राजभवन ग्रंथालय, कला अकादमीचे ग्रंथालय, इंटरनॅशनल सेंटरचे ग्रंथालय आणि काही खासगी ग्रंथालये, असा अर्चनाताईंचा ‘ग्रंथोपजीवि’ प्रवास आहे. वेगळ्या वाटेवरचा. हट के. ज्या काळात अर्चनाताईंनी ग्रंथालयशास्त्र हा विषय उच्च शिक्षणासाठी आणि नंतर करियर म्हणून निवडला, तेव्हा हे क्षेत्र महिलांचे नव्हेच, असाही एक सूर होता. शिवाय या क्षेत्रातील उच्च पदे त्यांना मिळू नयेत, असेही प्रयत्न जाणीवपूर्वक केले गेले. पण अर्चनाताईंनी झगडा थांबवला नाही. मुख्य म्हणजे त्या अभ्यासक्रमापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. ग्रंथालयशास्त्रात जगभरात काय घडामोडी सुरू आहेत, कुठली नवी तंत्रे, यंत्रे वापरली जात आहेत, पुस्तके जतनाच्या कोणत्या नव्या पद्धती आहेत, याविषयी त्या नेहमीच स्वत:ला आणि ग्रंथालयांना अपडेट ठेवत राहिल्या. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्याने जुन्या काळात त्यांनी विविध देशीविदेशी ग्रंथालयांशी याविषयी पत्रव्यवहार केला आणि आपले ज्ञान ताजे ठेवले. 


पुस्तकांविषयी आणि ग्रंथालयाविषयी नुसता जिव्हाळा कामी येत नाही. एक शास्त्र म्हणून हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. त्यासाठी परिश्रम तर हवेतच, पण सततचा पाठपुरावा लागतो. शास्त्रोक्त व्यवस्था प्रत्यक्षात आणावी लागते. त्यासाठी त्या त्या विषयातली गुणी माणसे निवडून त्यांच्यावर विश्वासाने जबाबदाऱ्या सोपवाव्या लागतात. मुख्य म्हणजे सतत ‘ट्रॅक’ ठेवणे अनिवार्य असते. मी निवृत्त झाल्यावरही काही काळाने ग्रंथालयातला संदर्भ विभाग पुन्हा लावला होता. तिथला कुठलाही संदर्भ आजही माझ्या ओठांवर आहे, असं त्या आत्मविश्वासानं म्हणतात.  
   

ग्रंथालयांचे आधुनिकीकरण हवे   
ग्रंथालयांमध्ये केवळ पुस्तके नसतात. खूप जुनी, दुर्मिळ हस्तलिखिते, वर्तमानपत्रांची कात्रणे, दुर्मिळ छायाचित्रे, नियतकालिकांचे अंक, हेही असते. त्यांचे जतन करून ठेवणे तितकेच महत्त्वाचे असते. त्यासाठी अनेक रासायनिक प्रक्रिया करून घ्याव्या लागतात. परदेशात हे शास्त्र खूप पुढारले आहे. आपल्याकडेही आता नव्या जतनपद्धती आल्या आहेत. त्या स्वीकारणे, त्यासाठी बजेट मंजूर करणे, कुशल मनुष्यबळ मिळवणे, त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देणे, या गोष्टीही ग्रंथालयशास्त्रात समाविष्ट असतात. कुठल्याही नव्या संशोधनाची पायाभरणी ग्रंथालयेच करत असतात. एकच नव्हे तर संशोधकांच्या, अभ्यासकांच्या पिढ्या ग्रंथालये जोपासतात. त्यामुळे जुन्यात जुनी पुस्तके, संदर्भ हे नव्या पिढीसाठी उत्तम अवस्थेत जतन करणे, तितकेच महत्त्वाचे असते, असे डॉ. अर्चना काकोडकरांचे सांगणे आहे.


- जयश्री बोकील, पुणे
jayubokil@gmail.com

बातम्या आणखी आहेत...