आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'काला' रं हल्ला बोल ना...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परिवर्तन लढ्याचे अनेक निर्णायक टप्पे यापूर्वी प्रत्यक्षात येऊन गेले. मात्र, प्रस्थापित-सवर्ण चेहरा असलेल्या सिनेमात आत्ता कुठे परिवर्तनाचे प्रतिबिंब उमटू लागले आहे. अर्थातच, हिंदी सिनेमा अजूनही सावधपणे पावले टाकतोय, तर दाक्षिणात्य सिनेमांत हा बदल ठळकपणे दिसतोय. त्याच रांगेतला अलीकडेच प्रदर्शित झालेला पा. रंजिथ दिग्दर्शित आणि रजनीकांत अभिनीत ‘काला’ हा निव्वळ गल्लाभरू सिनेमा नाही, तर ते थेट एक राजकीय विधान आहे. एका बाजूला दलित चळवळीला बदनाम करण्याचे डाव खेळले जात असताना पडद्यावर नायकाने आपली दलित आयडेंटिटी आग्रहाने सांगावी, राजकीय-सामाजिक भूमिका बेधडकपणे मांडावी, ही या घटकेची मोठी घटना आहे. त्याचीच ही समयोचित दखल...

 

शियन साहित्यातला पितामह गणल्या जाणाऱ्या लिओ टॉलस्टॉयने त्याच्या ‘व्हॉट इज आर्ट’ या पुस्तकात एक कलाविषयक सिद्धांत मांडलेला आहे. टॉलस्टॉयच्या मते, कला हा मानवी देवाणघेवाणीचा एक मार्ग आहे. त्यामुळे माणसं जसे शब्दांद्वारे आपले विचार एकमेकांपर्यंत पोहोचवतात, अगदी तसेच भावना दुसऱ्यापर्यंत पोचवण्याचे काम कला करत असते. त्यांच्या मते, एखादी कलाकृती तिची भावना संक्रमित करण्यात कितपत यशस्वी होते, यावर तिची गुणवत्ता अवलंबून असते. मानवी प्रगतीला केवढा हातभार लागतो, त्यावरून कलेतील आशयाचा अस्सलपणा ठरतो. 


अर्थात, हे सगळं सापेक्ष असल्याने मुळात भावनेच्या प्रदर्शनाला कला मानावे की नाही, असा प्रश्न विचारणारा वर्ग जगभरातच अस्तित्वात आहे. पा. रंजिथ दिग्दर्शित  ‘काला’ सिनेमाला समीक्षक, सुजाण प्रेक्षक यांचा संमिश्र प्रतिसाद आहे. पण, राजकारणात प्रोपागंडा करण्यात माहीर असलेल्या एका वर्गाने  दलितकेंद्री आशय- विषयाच्या चर्चेला वाव मि‌ळू नये, या हेतूने त्यावर ‘फ्लॉप’ असा शिक्का मारून टाकला आहे. अर्थात निव्वळ कलेच्या अंगाने या सिनेमाकडे बघायचं ठरवल्यास त्याला मोडीत काढलं जाण्याचीच शक्यता जास्त आहे. इथेच ही गोष्टही स्पष्ट आहे की, प्रस्थापित आणि शोषित वर्गाचा कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. नव्हे तो आहेच. त्यामुळेच दलित सिनेमाचे अन् शोषितांचे सौंदर्यशास्त्र नव्याने लिहिण्याची गरज  ‘काला’च्या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आली आहे.


एखाद्या समाजगटावर ऐतिहासिक किंवा राजकीय धागेदोरे असलेल्या पूर्वनियोजित घटना परिणाम करतात, तेव्हा त्यातून होणारे सामाजिक बदल हे अपरिहार्य असतात. दक्षिण भारतीयांचे मुंबईतील वर्चस्व(?) मोडीत काढण्यासाठी चार दशकांपूर्वी धारावी आणि मुंबईतील इतर भागात कष्टकरी आणि स्थलांतरित लोकांविरुद्ध राजकीय आंदोलन झाले होते. त्या घटनेची थेट झळ ज्यांना पोचली, त्यांच्या कलाकृतीतून त्याचे पडसाद आणि जखमा न दिसल्या तरच नवल.  अशा वेळी टोकाचे धार्मिक-जातीय ध्रुवीकरण, सेन्सॉर बोर्डाचा अवाजवी हस्तक्षेप यामुळे वर्षानुवर्षे दबलेला आवाज व्यावसायिक सिनेमाच्या निमित्ताने वर यावा हीसुद्धा इथे महत्वाची घटना ठरते. त्याचमुळे  पा. रंजिथ जिथून वर आलाय, त्या तळागाळातल्या समाजाची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक स्थिती समजल्याशिवाय कलेच्या पारंपरिक कसोट्या लावून ‘काला’ सारख्या सिनेमाचे मूल्यमापन करणे योग्य ठरणार नाही. 


‘काला’  सिनेमातील सामाजिक प्रेरणा जिवंत आणि सच्चा आहेत. दिग्दर्शक पा. रंजिथ आणि सिनेमातील नायकाला आर्थिक, सामाजिक विषमता आणि अन्यायाबद्दल चीड आहे. ही चीड व्यक्त करण्यासाठी दिग्दर्शकाने सर्वदूर लोकप्रिय असलेल्या सुपरस्टार,थलैवा रजनीकांतला घेऊन तद्दन व्यावसायिक कलाकृती सादर करणे, हे तसे कौशल्याचे काम. अर्थात,  पा. रंजिथचे मागील ‘मद्रास’ आणि ‘कबाली’ ज्यांनी पाहिले असतील त्या प्रेक्षकांना त्याच्या सिनेमात निःसंकोचपणे येणाऱ्या ‘सबटेक्स्ट’ची सवय असली, तरी ‘काला’ या दोन्ही सिनेमांपेक्षा चार पाऊलं अजून पुढे आलाय. आलाय कसला, सरळसरळ भिडलाय. त्यामुळेच प्रस्थापितांविरुद्ध बंड पुकारणारं  ‘काला’चं हे सामर्थ्य कुठून आलं, याचा शोध घेताना काही गोष्टींचं ऑडिट अपरिहार्य आहे. सिनेमात येणारे बरेचसे ‘सबटेक्स्ट’ हे उघड तर, काही वेळा एकाच फ्रेममध्ये अनेक ठिकाणी सुचकपणे पेरलेले आहे. त्यामुळे ‘काला’ पूर्णपणे अनुभवायचा असेल, डोळे ‘अक्रॉस दि स्क्रीन’ फिरवणे अपरिहार्य आहे.  


भारतीय सिनेमात नायकाची दलित ओळख उघडउघड न दाखवता सूचकपणे दाखवणे, हा अलिखित नियम होऊन बसला आहे. ‘न्यूटन’चा नायक दलित तर असतो, पण ते कळण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमात दाखवलेले बारीक संदर्भ लक्ष देऊन बघावे लागतात. आमिर खान-आशुतोष गोवारीकरच्या ‘लगान’मध्ये ‘कचरा’ हे पात्र नावाने ओळखलं जातं, तर नायक बॉलीवूडच्या गुडीगुडी परंपरेला साजेसा सवर्ण असतो. खरं तर प्रस्थापितांच्या समस्या, त्यांची दुःख, त्यांच्या प्रेमकथा हे सगळं गोंजारताना समाजाचा आरसा समजल्या जाणाऱ्या सिनेमात दुसऱ्या वर्गाला कुठेच स्थान द्यायचं नाही, हा दुटप्पीपणा बॉलीवूड आणि बॉलिवूडची या ना त्या निमित्ताने भलामण करणारे सेलेब्रिटी वर्षानुवर्षे पाळत आलेत.

 

सचिन तेंडुलकरसारखे महान खेळाडू कागदावर का असेना, सक्रिय राजकारणात सहभाग होऊन देखील राजकीय-सामाजिक मुद्यांवर कुठलीही ठाम बाजू घेणं टाळतात. त्याच वेळी मोहम्मद अली हा मुष्टियोद्धा याच माध्यमांचा उपयोग स्वतःवर आणि आपल्या समाजावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी करतो.

 

 परंतु ज्यांच्या एका शब्दावर मोठा जनसागर मागे उभा राहू शकतो, असा बॉलीवूडचा ‘शहेनशहा’ ‘महानायक’ कुणाविरुद्ध मत देणं टाळून डिप्लोमॅटिक राहणं पसंत करतो. पण त्याच देशात प्रकाश राजसारखे निधड्या छातीचे अभिनेते संपूर्ण करियर पणाला लावून बेधडकपणे आपलं मत मांडताना दिसतात. इतर वेळी राजकीय विचारसरणीने प्रेरित कलाकार जर सिनेमाच्या माध्यमाद्वारे काही भूमिका मांडू पाहत असेल, तर त्याला मोठ्या वर्गाच्या रोषाला सामोर जावं लागतं. पण सिनेमा म्हणजे केवळ पडद्यावर तरलपणे मांडलेली कविता नसते, आणि दोन घटका मनोरंजनही नसतं. सिनेमा असा- तसा- कसाही असू शकतो, हे ज्यांना उमगलं आहे, ते या माध्यमाचा उपयोग आपली बाजू मांडण्यासाठी प्रभावीपणे करू शकतात, भले तो सोयीस्कर प्रोपागंडा असेल तरीही!
 
 
{ ‘काला’मध्ये दिग्दर्शकाने स्वतःचं असं समाजशास्त्र आणि रचनाशास्त्र ठळकपणे दाखवलंय. सिनेमात रजनीकांतची एन्ट्री होते, त्या पहिल्याच सीनमध्ये धारावीत ‘भीमवाडा’ स्पष्टपणे दिसतो. गौतम बुद्धनगरमध्ये डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांची पेंटिंग वारंवार नजरेस पडतात. तर सिनेमाची सुरुवात थेट बुद्धविहार समोर रजनीच्या लहान मुलांसोबत क्रिकेट खेळण्याच्या आणि ‘आऊट’ होण्याच्या दृश्याने होते. त्या अर्थाने दिग्दर्शक रंजिथ "सुपरह्युमन' रजनीकांतला सामान्य  माणसाच्या पातळीवर आणतो. कोळीवाडा, कुंभारवाडा, धोबीघाटाचे संदर्भ सिनेमात वारंवार येत राहतात. कार्ल मार्क्स, लेनिन त्यांचे पुतळे चौकात दिसत राहतात. एके ठिकाणी ‘पेरियार चौक’ ही नजरेस पडतो. याच ‘काला’मध्ये दर्गा दिसतो आहे, शनी मंदिर दिसते आहे आणि कालाच्या घरासमोर ‘ ए-वन बीफ शॉप’ही आहे. सिनेमाच्या एका पोस्टरमध्ये धारावी येथील वस्तीच्या पार्श्वभूमीवर जीप वर बसलेला रजनीकांत दिसतो, त्या गाडीचा नंबर  BR 1956 आहे. (१९५६ मध्ये बाबासाहेबांनी लाखो अनुयायांना सोबत घेऊन धर्मांतर केलं होतं. त्याचीच ही प्रतिकात्मक नोंद.) सिनेमात ‘काला’ स्वतःचं आणि कष्टकरी जनतेचं शरीर हेच आपलं हत्यार मानतो आहे. याच सिनेमात संस्कृती-परंपरा आणि त्या प्रभावातून रुजलेल्या संस्कारावरही "पैर छुना सनातन संस्कार है, हाथ मिलाना बराबरीका और लोकतांत्रिक संस्कार है' अशा अर्थाचं थेट भाष्य आलं आहे. या सगळ्यावर विचारसरणीचा थेट प्रभाव आहे. आणि विचारांची स्पष्टतासुद्धा...


{आपल्याला शेवटचा असा कुठला सिनेमा आठवतोय, ज्यात नायक  बीफ  आवडीने खाताना दाखवलाय. मुळात, अशा व्यक्तीला  हिरो  म्हणून प्रेक्षक मान्यताच देणार नाहीत, असं वातावरण सध्या जाणीवपूर्वक तयार करण्यात येतंय. मात्र, पा. रंजिथ दिग्दर्शित पहिल्याच सिनेमात  ‘अत्तकथी’मध्ये नायक दिनेश हा बीफप्रेमी आहे. तर; ‘काला’मध्ये नायक रजनीकांतला आवडतं म्हणून ‘बडे का मांस’ आणि ‘पुछ का सूप’ त्याची पत्नी नेहमी खाऊ घालते, असा उल्लेख आहे. सिनेमात नायकाला चार मुलं आहेत. त्यातला शरीरयष्टी कमावलेला एकमेव मुलगा सेल्वम मात्र व्हेजिटेरियन आहे!


{पा. रंजिथच्या यापूर्वीच्या सगळ्याच सिनेमात स्त्रियांचं पात्र, हे पारंपरिक कधीच नव्हतं. या स्त्रिया परंपरेला न जुमानता नायकाला उलट प्रश्न विचारणाऱ्या आहेत. (‘कबाली’मध्ये राधिका आपटे, ‘काला’मध्ये ईश्वरी राव), प्रसंगी नायकाला संकटातून  वाचवणाऱ्याही आहेत. (कबालीमध्ये साई धनसिका). ‘काला’ची होणारी सून पुयाल (अंजली पाटील, अशीच कणखर स्त्री म्हणून दाखवली आहे. आपल्या हक्क-अधिकारांसाठी आंदोलन करणारी सुशिक्षित पुयाल वेळप्रसंगी हात उचलायला कचरत नाही. हरिदादाने (नाना पाटेकर) घडवून आणलेल्या पूर्वनियोजित दंगलीत पोलीस तिचा सलवार काढून फेकून देतात. तेव्हा एका बाजूला पडलेले कपडे उचलून अब्रू वाचवावी, की दुसऱ्या बाजूला पडलेली काठी पकडून उलटवार, करावा याबद्दल तिच्या मनात जराही संभ्रम नाही. पुयाल काठी उचलून आपल्यावर अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध त्वेषाने लढू लागते. ‘स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली, असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मी मोजीत असतो.’ हे बाबासाहेबांचं विधान जगून दाखवणाऱ्या स्त्रिया पा. रंजिथच्या प्रत्येक सिनेमात दिसतात. 

 
{सिनेमाच्या सुरुवातीच्या काही शॉट्समध्ये ‘डिजिटल, क्लीन अँड प्युअर इंडिया’ करण्यासाठी मोबाइल अँप डाउनलोड करावं, हे सांगणारे पोस्टर वस्तीत ठिकठिकाणी लावलेले दिसतात. नंतर संपूर्ण सिनेमात एअरपोर्ट पासून धारावीपर्यंत भगव्या रंगाच्या पोस्टरवर  हरिदादा अभ्यंकर  झळकताना दिसतो. मी तुला ओळखलं नाही, असं हरिदादा जेव्हा  कालाला म्हणतो, तेव्हा ‘मी तर तुला चांगलेच ओळखतो. सगळीकडे पोस्टर, जाहिरातीत तूच तर झळकत असतो’ असं तो सडेतोड उत्तर देतो. हा रोख नेमका कुणाला उल्लेखून आहे, हे समजण्यासाठी तुम्हाला राजकीय तज्ज्ञ असण्याची आ‌वश्यकता नसते. सदैव पांढरी वस्त्र परिधान करणाऱ्या हरिदादाला काळ्या रंगाबद्दल प्रचंड घृणा आहे. जो ‘काला’च्या घरचं साधं पाणीदेखील पीत नाही. एका वर्गासाठी काळा रंग हा गुलामी, बदनामी, हिनता, कमीपणाचं लक्षण असेल, तर तोच रंग दुसऱ्या वर्गासाठी कष्ट, आत्मसन्मान, दडपशाहीविरुद्ध आवाज याचं प्रतीक आहे. ‘काला’ हे सर्व निःसंकोचपणे समोर आणतोय, ही एकूणच भारतीय सिनेसृष्टीत महत्वाची घटना आहे.


{मी पहिल्यांदा हिंदीमध्ये  ‘काला’ बघितला, तेव्हा अध्येमध्ये झळकणारे  रॅपर्स प्रेक्षकांसाठी हसण्याचा विषय ठरत होते. एखादी व्यक्तीचे निधन झाल्यानंतर येणारं रॅप साँग अनेकांना अप्रस्तुत वाटत असलं, तरी प्रत्यक्षात धारावीमध्ये उदयोन्मुख तामिळ रॅपर्स हा अभ्यासाचा विषय आहे. कुठल्याही व्यसनाच्या आहारी न जाता, दहशतवाद, बाल कामगार, स्त्री भ्रूण हत्या, प्लास्टिक रिसायकल, वर्णभेद, जातीअंत याबाबत वॉल ग्राफिटी आणि रॅप साँगने घडवून आणलेला बदल उल्लेखनीय आहे. भीमा कोरेगावच्या घटनेत अडकवले गेलेले कवी आणि दलित कार्यकर्ता सुधीर धवळे स्वतः ऐंशीच्या दशकात धारावीत असलेल्या रॅप गाण्यात सहभागी होते. तर नुकतेच निधन पावलेले  लोकशाहीर शंतनु कांबळे यांनी उभी हयात  विद्रोहाला वाट मोकळी करून देण्यासाठी घालवली होती. विशिष्ट वर्गासाठी केवळ मनोरंजनाची गोष्ट असलेले संगीतसुद्धा दुसऱ्या वर्गासाठी सांस्कृतिक घुसळण करण्यास कसे महत्त्वाचे ठरू शकते, याचीच ही उत्तम उदाहरणे.


{पा.रंजिथने प्रत्येक सिनेमात सूचकपणे पेरलेले साहित्यिक संदर्भही उल्लेखनीय असतात.  ‘मद्रास’मध्ये जी.कल्याण राव यांचे ‘अनटचेबल स्प्रिंग’ आणि ‘कबाली’मध्ये वाय.बी. सत्यनारायण यांच्या My Father Baliah या दलित साहित्यिकांचे ग्रंथांचे नेमकं चित्रण करण्यात आलं आहे. ‘काला’मध्ये हे फक्त चित्रणापुरते मर्यादित नाही.  हरिदादा अभ्यंकरच्या घरात परशुराम, श्रीराम आणि महाभारतातल्या प्रसंगावर पेंटिंग आणि मूर्ती आहेत. त्याच वेळी ‘काला’च्या टेबलावर मात्र असुर (रावण आणि राक्षसाचा राजा) हा ग्रंथ दिसून येतो आहे. सिनेमात हरिदादाला रामाचा आणि ‘काला’ ला रावणाचं प्रतीक दाखवलंय. पौराणिक पात्रांचं असं रूपक योजून दिग्दर्शकाने कमालीचा समतोल साधलाय. 


{‘पॉलिटिकल सिनेमा’ कशाला म्हणावे, याबाबत अनेकांमध्ये मतभेद आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रभाव नसलेल्या प्रख्यात दिग्दर्शक गोविंद निहलानींच्या मतानुसार असा  प्रत्येक सिनेमा पॉलिटिकल आहे, जो दिग्दर्शकाची विचारधारा प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोचवतो. प्रतिकात्मक आणि थेट दोन्ही प्रकारे सिनेमाद्वारे राजकीय भाष्य करणारे दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता मात्र असे मानतात की, भारतात अजूनपर्यंत एकही अस्सल ‘पॉलिटिकल’ सिनेमा तयार झालेला नाही. त्यांच्या मते, आपण फक्त राजकीय पदर असणारे मानवी निरीक्षणे मांडू शकतो. ते एका अर्थी खरेही आहे.  इकडे ‘काला’च शूटिंग अर्ध्यावर असताना रजनीकांतने राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले तेव्हा त्याची पडद्यावर आणि पडद्यामागे काय भूमिका असणार यावर सगळ्यांचे लक्ष होते. ‘काला’च्या भूमिकेतून आपली ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन प्रतिमा यातील अंतर कमी होत जाईल, हीच काळजी तो घेतोय हेही इथे जाणवत होते. प्रादेशिक तामिळ राष्ट्रवादाचा चेहरा म्हणून उदयास येणे हा रजनीकांतचा प्रोपागंडा असेलही. पण या निमित्ताने का होईना, कला आणि विचारधारा एकत्रपणे पडद्यावर नांदत आहेत हे महत्त्वाचे! त्यामुळे ‘काला’चं मूल्यांकन जेव्हा कधी केलं जाईल,तेव्हा पारंपरिक निकष टाळून बाबासाहेबांचं  "शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा'  हे ब्रीदवाक्य एका सिनेमात बसवण्याचा कुणीतरी धाडसी नि जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे, हे आधी अभ्यासकांना लक्षात ठेवावं लागेल!

 

- जितेंद्र घाटगे
jitendraghatge54@gmail.com
लेखकाचा संपर्क - ९६८९९४०११८

बातम्या आणखी आहेत...