आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पँथर’चा अभूतपूर्व ठोसा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुपरहिरो कृष्णवर्णीयसुद्धा असतात आणि ते अभूतपूर्व यशसुद्धा मिळवू शकतात, हे सिद्ध करणाऱ्या‘ब्लॅक पँथर’ नावाच्या  हॉलिवूडपटाने सांस्कृतिक उलथापालथ घडवून आणणारी कलाकृती असा एव्हाना सार्थ नावलौकिक मिळवला आहे. “पँथर’चे हे यश गोऱ्यांच्या मक्तेदारीला मारलेला जोरकस ठोसा आहेच, पण भारतीय सिने जगतातल्या जातिव्यवस्थेला विचारलेला अप्रत्यक्ष असा खडा सवालही आहे...


‘आ ऊट अँड आऊट’ कृष्णवर्णीय कलावंतांचा सहभाग असलेल्या ‘ब्लॅक पँथर’ची घोडदौड पाहता येत्या काही दिवसातच मार्वल स्टुडिओजच्या याआधीच्या सिनेमांसोबतच, पूर्वी प्रदर्शित झालेल्या सगळ्या सुपरहिरो सिनेमांचे कमाईचे उच्चांक त्याने मोडीत काढले, तर आश्चर्य वाटू नये. पण केवळ कमाईच्या अनुषंगाने नाही तर, सांस्कृतिक उलथापालथ करणारी अद्भुत कलाकृती म्हणून या सिनेमाकडे जगभर पाहिले जात आहे. बॉक्स ऑफिस कमाई अन् परीक्षण यापलीकडे जाऊन मनोरंजन क्षेत्रात गरजेची असलेली विविधता जपूनसुद्धा सर्वसमावेशक प्रगतीचा महत्वाचा टप्पा पार करणारी अशी ही घटना ठरू पाहत आहे. कृष्णवर्णीय सुपरहिरोने केलेली ही उलथापालथ मला स्वतःला  बराक ओबामा यांच्या राष्ट्रपतीपदापर्यंत पोचण्याच्या ऐतिहासिक घटनेइतकीच महत्वाची वाटते. हॉलिवूडमध्ये कृष्णवर्णीय कलाकारांची मोठी फळी जगभर पसरलेल्या असंख्य चाहत्यांमध्ये आपलं अढळ स्थान पटकावून आहेत. असं असलं तरी सुपरहिरो प्रकारात सातत्याने त्यांना डावलून गोऱ्याचं वर्चस्व राहिलेलं आहे. ‘ब्लॅक पँथर’चे अभूतपूर्व यश म्हणजे, महम्मद अलीपासून माइक टायसनपर्यंतच्या असंख्य मुक्क्याने सुपरहिरो चित्रपट प्रकारात इथल्या गोऱ्यांच्या मक्तेदारीला लगावलेला ठोसा आहे.

 

शांततामय मार्गाने वर्णद्वेषाशी लढा दिल्याबद्दल मार्टिन ल्युथर किंगला १९६४ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालं, तेव्हा अमेरिकेत समान नागरी हक्काचा कायदा कागदावर मंजूर झालेला होता. त्याच दरम्यान १९६५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अ पॅच ऑफ ब्लू’ सिनेमात एका अंध गोऱ्या मुलीची कृष्णवर्णीय मुलासोबत प्रेमकहाणी दाखवलेली आहे. मात्र साठच्या दशकात वर्णद्वेष आणि वर्णभेद एवढा शिगेला पोचलेला होता की, सिनेमात त्या दोघांमध्ये असलेलं चुंबनाचं दृश्य थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याअगोदर सेन्सॉर करण्यात आलं. वर्णभेदाने आलेल्या कृष्णवर्णीयांच्या समस्या मांडण्यापासून त्यांचा लढा अधोरेखित करण्याचे काम सिनेमाच्या माध्यमातून हॉलीवूडने वेळोवेळी केले आहे. मात्र काळ्या माणसाचं चुंबनदृश्य आहे म्हणून त्याला कात्री लावणे इथपासून ते ‘ब्लॅक पँथर’चं म्हणजेच आफ्रो-अमेरिकन संस्कृती अन् त्यांच्या शक्तिप्रदर्शनाचं गोऱ्या लोकांकडून मुक्तहस्ते स्वागत होणे, हा प्रवास भारतीय सिनेजगताने आपल्या जातिव्यवस्थेच्या अनुषंगाने अभासण्यासारखा आहे.

 

असे म्हटले जाते, की १८५७च्या राष्ट्रीय उठावाच्या काही कारणांमध्ये एक कारण, इंग्रजांनी देशात आणलेली ‘रेल्वे’ हेही होते. सगळ्या जाती धर्मांना शेजारी बसवून घेऊन जाणारी रेल्वे ही अनेक तथाकथित उच्चजातीयांच्या अहंकाराला धक्का पोचवणारी होती. सिनेमा आणि सिनेमागृह यांची सुरुवात झाली तेव्हाही, आपल्या शेजारी तिकीट काढून दलित व्यक्तीदेखील बसू शकतो, ही भावना दुर्दैवाने अनेक उच्चवर्णीय प्रेक्षकांच्या मनातून निघण्यास तयार नव्हती. शिवाय मनुस्मृतीत सवर्णांसाठी गीत, वाद्य, नृत्याच्या साहाय्याने उपजीविका चालवणे निषिद्ध मानले होते. त्यामुळे संगीत, नृत्यापासून रंगमंचीय कलांमध्ये दलितांना कुठलेही वावडे नसल्याने मूकपटांपासून सिनेमातदेखील कार्यरत होते. मात्र दलितांच्या सिनेमातील कामगिरीचे परिपूर्ण दस्तऐवजीकरण न झाल्याने, बऱ्याच गोष्टी काळाच्या पडद्याआड गेल्या. (या बाबतीत हॉलीवूड चे अनुकरण करण्यासारखे आहे. कृष्णवर्णीय कलाकार आणि पात्रे असणाऱ्या सिनेमाचे ‘A separate cinema’ हे पुस्तक शंभर वर्षांच्या ब्लॅक पोस्टर आर्टचे उत्तम संकलन आहे.)

 

अमेरिकेत जशी समांतर ब्लॅक चित्रपटसृष्टी कार्यरत राहिली, तशी भारतात मात्र होऊ शकली नाही. आपली हिंदी चित्रपटसृष्टी निधर्मी असल्याचा गर्व बाळगणाऱ्यांनी आपण एकही दलित सुपरस्टार का निर्माण करू शकलो नाही, हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. "अछूत कन्या’(१९३६) पासून तर नुकत्याच आलेल्या ‘मुक्काबाज़’पर्यंत अनेक सिनेमातून दलित पात्रे पडद्यावर सशक्तपणे पडद्यावर दाखवली गेली.


दलित समस्याकेंद्रित आणि सुधारणावादी असण्याचा आग्रह असलेल्या आर्टहाऊस फिल्म्स वगळता, इतर मुख्य प्रवाहातील व्यावसायिक चित्रपटात स्वाभाविक चित्रणाचा अभाव चिंताजनक आहे. पडद्यावर उच्च मध्यमवर्गीय संस्कृती कुरवाळत बसल्याने रोमँटिसिजममध्ये अडकलेल्या नायकाची प्रतिमा तोडणे आपल्याकडे सुपरस्टार्सना सहजाहजी शक्य होत नाही. मात्र, ‘कबाली’चा नायक रजनीकांत डॉनच्या भूमिकेत असूनसुद्धा ज्या प्रकारे पारंपरिक नायकाच्या प्रतिमेला छेद देतो, तेव्हा तो नकळत आफ्रो अमेरिकन संस्कृतीतील ‘ब्लॅक पँथर’ सोबत नाते जोडतो.

 

गोऱ्यांची मक्तेदारी असलेल्या चित्रपट प्रकारात सुपरहिरो नायक आणि दिग्दर्शकासोबत अनेक पडद्यामागील कलाकार कृष्णवर्णीय असणे (ब्लॅक पँथर) आणि पडद्यावर उच्चवर्णीयांची वरचढ असलेल्या भारतीय व्यावसायिक सिनेमातील सुपरस्टार प्रत्यक्षात सुपरहिरोची प्रतिमा असतानादेखील पडद्यावर दलित नायक साकारतो (कबाली) तेव्हा या दोन्ही घटना प्रचंड सांस्कृतिक उलथापालथ करू पाहणाऱ्या असतात. ‘कबाली’चा नायक आंबेडकरांच्या विचारांशी नाते सांगणारा आहे. ‘कबाली’च्या सुरुवातीच्या दृश्यामध्ये नायक दलित साहित्याचं वाचन करताना दाखवला आहे. शिवाय सिनेमात प्रत्येक दृश्यामध्ये ‘कबाली’ थ्री पीस सूटमध्ये दाखवला आहे. पंचा नेसणे, हे गांधींचं जसं सामाजिक-राजकीय विधान  होते, तर सूट घालणे हे बाबासाहेबांचे व्यवस्थेविरुद्ध भक्कम स्टेटमेंट असल्याचे तो मानतो. वर्णद्वेषापासून संरक्षण देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या ‘ब्लॅक पँथर’ चळवळीचा अन् ‘ब्लॅक पँथर’ कॉमिक्स वा सिनेमाचा प्रत्यक्ष संबंध नसला, तरी डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर असताना होणाऱ्या पद्धतशीर वर्णद्वेषाविरुद्ध ‘Black Lives Matters’ (BLM) चळवळ खंबीरपणे लढा देत असताना, ‘ब्लॅक पँथर’ सिनेमाचे आगमन हे एकूण वातावरण आशादायक करणारे आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे भाजपाच्या सत्ताकाळात हिंदुत्ववादी संघटना जोर धरू पाहत असताना ‘कबाली’चा नायक आंबेडकरवादी भूमिका घेऊन मलेशियात स्थलांतरित कामगारांच्या हक्कासाठी आवाज उठवतो, तेव्हा हे दोन्ही सिनेमे एका विशिष्ट काळाची अपत्ये असल्याचे ध्यानात येते. दोन्ही सिनेमात स्त्रियांच्या भूमिका खूप महत्वाच्या आहेत. आफ्रो अमेरिकन  रायन कुगलर आणि दलित पी. रंजीथ दोन्ही एका विशिष्ट वर्गातून आले असल्याने, दोन्ही सिनेमात स्त्रियांच्या भूमिकेला असाधारण महत्व आहे हे उल्लेखनीय.

 

अर्थात ‘कबाली’मध्ये नायकाचं दलित असणं, हे ठळकपणे अधोरेखित होणारं असलं तरी कुठलेही स्पष्टीकरण न देता निसंकोचपणे पडद्यावर दलित पात्रं उभी करणं, हे गेम चेंजर ठरू शकते. अमित मसुरकर दिग्दर्शित ‘न्यूटन’ हे याचे महत्वाचे उदाहरण आहे. पार्श्वभूमीवर येणाऱ्या निव्वळ काही सामाजिक संकेताच्या आधारे त्याचं दलित असणे, हे समोर येते. न्यूटनकुमारच्या घरात असलेला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, मुलीला लग्नासाठी नकार दिल्यानंतर - तुला ब्राह्मण-ठाकूर तर काय कधीच मिळू शकणार नाही - हा टोमणा, या आणि अशाच काही सूचक प्रसंगातून त्याचे जातवास्तव समोर येते. ‘न्यूटन’ एक कर्तव्यदक्ष अधिकारी असून त्याची निर्भयता आणि तत्वाच्या आड पक्षपाती आणि शोषक व्यवस्था कधीच आलेली नाही. वर्षानुवर्षे वर्णद्वेषाविरुद्ध देत आलेला लढा दाखवायचे टाळून निःसंकोचपणे इतर समाजाइतकाच किंबहुना त्याहून अधिक पुढारलेला कृष्णवर्णीय समाज ‘ब्लॅक पँथर’मध्ये पाहायला मिळतो. ‘न्यूटन’मध्येही तितकाच स्वाभाविक वावर दलित पात्राचा पाहायला मिळतो. नुकताच प्रदर्शित अनुराग कश्यपच्या ‘मुक्काबाज’मध्येही रवीकिशनचं पात्र दलित अशी ठसठशीत ओळख घेऊन वावरताना दिसतं.

 

असं म्हणतात, की सिनेमा हा समाजाचा आरसा असतो. तसं असेल तर समाजाचा एक मोठा मोठा आणि अविभाज्य घटक पडद्यावर स्वतःला कुठल्या पात्रांमध्ये पाहत असेल याची कल्पना करता येत नाही. अमेरिकेत आणि जगभर अनेक लोकांकडून ‘ब्लॅक पँथर’ची तिकिटे वंचित आणि उपेक्षितांसाठी मोफत भेट दिली जात आहे. काही लोकं संपूर्ण थिएटर बुक करून मोफत शो अरेंज करत आहेत. ‘आफ्रोफ्युचरीजम’ (कृष्णवर्णीय इतिहास आणि संस्कृती यांचे कला आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत केलेल्या कलाकृती) सिनेमाचा अत्युच्च कळस यानिमित्ताने गाठला जात आहे. भारतीय सिनेमात कबाली आणि ‘न्यूटन’च्या नायकांचं चित्रण हे असेच आशादायी आहे. गेल्या काही वर्षात ‘ट्वेल्व्ह इअर्स अ स्लेव’, ‘मूनलाइट’ यांना मिळणारे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे ऑस्कर हा प्रस्थपित अमेरिकन समाजाने स्वीकारलेला ‘डॅमेज कंट्रोल’ चा भाग होता. हॉरर चित्रपट असूनही त्यातल्या वर्णद्वेष संदर्भांत असलेल्या ठळक टिप्पणी मुळे ‘गेट आऊट’ या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट फिल्मच्या यादीत आघाडीवर आहे. #Oscar_so_white हा ठसा दूर करण्यासाठी हॉलिवूडने पुढाकार घेतला आहे. सगळ्यांना सोबत घेऊन आपण कधी पुढे जाणार हा प्रश्न आहे.

 

ब्लॅक सिनेमाच्या प्रगतीचा इतिहास हा त्या देशाच्या प्रगतीच्या सोबत समांतर आहे. भारतात दलित सिनेमाची आगेकूच अन् पडद्यावर दलित पात्रांचा सहज वावर हा किती खुल्या मनाने आपण स्वीकारतोय, यावरून आपण उत्क्रांतीच्या कुठल्या टप्प्यावर आहोत हे त्याचं त्याने ओळखावं. आगामी ‘कबाली २’ हा त्या अर्थाने लिटमस टेस्टचं काम करू शकतो, याची जाणीवही ठेवावी.

 

लेखकाचा संपर्क : ९८६९९४०११८

jitendraghatge54@gmail.com

 

बातम्या आणखी आहेत...