Home | Magazine | Rasik | jitendra ghatge writes about web series

अभिव्‍यक्‍तीचे स्‍फोटक सुरूंग

जितेंद्र घाटगे | Update - Jul 29, 2018, 10:03 AM IST


‘सेक्रेड गेम्स’वर दिवंगत नेत्याचा अश्लील भाषेत अपमान केल्याबद्दल मुंबई व कोलकाता येथे तक्रारी दाखल करण्‍यात आल्‍या.

 • jitendra ghatge writes about web series

  सिनेमा असो वा वेब सिरीज या माध्यमातल्या दृश्य-भाषेचा केवळ पोतच बदलेला नाही, तर सादरीकरणाच्या पातळीवर ही माध्यमं बंधनमुक्तही होऊ पाहत आहेत. विशेषत: लस्ट स्टोरीज, ट्विस्टेड, माया, गंदी बात, गन्स अँड थाइज, इनसाइड एज्ड आदी प्रसारित झालेल्या ऑनलाइन सिरीजमध्ये ‘निषिद्ध’हा शब्दच निषिद्ध ठरला आहे. सामाजिक-सांस्कृतिक चौकटींची मोडतोड करणाऱ्या या बहुसंख्य कलाकृती स्फोटक सुरुंगांसारख्या आहेत. या कलाकृतींच्या माध्यमातून साठलेल्या भावभावनांचे जणू स्फोट होऊ लागले आहेत. त्यातली ‘नेटफ्लिक्स’वरून प्रसारित होणारी ‘सेक्रेड गेम्स’ ही बड्या कलावंतांचा समावेश असलेली, वर्तमान राजकारण-समाजकारणावर थेट भाष्य करणारी सिरीजही त्याला अपवाद नाही. हा बदल जितका धक्कादायक आहे तितकाच अपरिहार्यसुद्धा...


  इया सव्हिन्ना ही रशियन कलाकार म्हणते, ‘Art is cry of the heart, overwhelming with love, suffering, joy and fullness of one's perception of the world. If you're an artist, take up what's move you, something you want to tell people, so much that, you will die, if you don't!'
  अशी गोष्ट, जी जगाला सांगितली नाही, तर आपला स्वतःचा स्फोट तर नक्की आहे, अशा कहाण्या प्रत्येक कलाकार सोबत घेऊन जगत असतो. जगभरातील कलाकार कलेच्या माध्यमातून ही घुसमट बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. सध्या आपल्याकडे प्रसारित होणाऱ्या वेब सिरीजमधून घुसमटीतून निर्माण झालेला तुंबारा जगापुढे येताना दिसतोय. यातली भाषा रांगडी आहे. दृश्य चौकट उघडीवाघडी आहे. यात रामगोपाल वर्मा, विक्रम भट्ट, एकता कपूर, दिबांकर बॅनर्जी आदी बड्या निर्माता-दिग्दर्शकांनी जम बसवला आहे. त्यात बंडखोरांचा म्होरक्या अशी सार्थ ओळख बनलेला बॉलीवू़डचा लेखक-दिग्दर्शक अनुराग कश्यप याला मुंबई आणि तेथील व्यक्ती-समूह, तत्कालीन घटनांचे माणसांवर होणारे परिणाम, लोकसमूहांचा इतिहास, संस्कृती परंपरा, पारंपरिक मिथके, धार्मिक वर्गीकरण, बदलती सामाजिक-राजकीय मूल्ये आणि त्याची चिकित्सा यात विशेष रस आहे. दुर्दैवाने, धार्मिक आणि राजकीय चिकित्सा सिनेमांतून करता यावी, असे पोषक वातावरण भारतीय सिनेसृष्टीत नाही. यापूर्वी कधीच नव्हतं.

  अर्थात, अनुरागला अभिप्रेत असलेलं मुंबईच्या बाह्य आणि आंतरिक वास्तवाचे दर्शन त्याने वेळोवेळी सिनेमांतून घडवण्याचा प्रयत्न केला, पण सेन्सॉरच्या आडमुठेपणामुळे दरवेळी कात्री लावली गेली. पण कहाणी बाहेर आली नाही तर कलाकाराच्या मनाची अखंड घालमेल अन् कधी न संपणारी घुसमट डोक्यात चालूच राहिली, तर त्याचा शेवट कुठे? आपली बौद्धिक-मानसिक शक्ती एकवटून ज्या कलाकृतींचा आस्वाद घ्यावा लागेल, अशा कलाकृती देण्याइतकी सध्याची टेलिव्हिजन इंडस्ट्री समृद्ध नाही, हे तर खरंच. मात्र, ‘सेक्रेड गेम्स'च्या निमित्ताने अनुराग या वेळी वर्षानुवर्षे दाबत ठेवलेली खदखद बाहेर काढत आहे.
  मुंबईबद्दल असणारं बहुढंगी प्रेम त्याच्या अनेक सिनेमातून दिसून येतं. हे प्रेम इथलं पारंपरिक सौंदर्य दाखवणार नाही, तर मानवी-राजकीय-सामाजिक स्थित्यंतरे दाखवणारं असतं. ‘सत्या’, ‘ब्लॅक फ्रायडे’, अग्ली, ‘बॉम्बे वेलवेट’, ‘रामन राघव’ आदी सिनेमांत दिसणारी चिंचोळ्या गल्लीची बंदिस्त मुंबई ही प्रेक्षकाला क्लोस्ट्रोफोबिया देणारी अर्थात घुसमटून टाकणारी असू शकते. ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने दिग्दर्शित ‘सेक्रेड गेम्स'मध्ये त्याची मुंबईचा शोध घेण्याची अपार ओढ तर दिसून येतेच, पण तत्कालीन राजकीय आणि धार्मिक घटनांचा आजच्या मुंबईच्या जडणघडणीत कसा सहभाग आहे, याचं ४० वर्षांचं हादरवून टाकणारं दस्तऐवजीकरणही बघायला मिळतं. धर्म ही संकल्पना नकळत आपला कसा ताबा घेऊ शकते आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात याबद्दल असंख्य शक्यता ‘सेक्रेड गेम्स' प्रेक्षकांच्या मनात सोडतो. या शक्यता वा त्यातून निर्माण होणारे प्रश्न जितके तत्कालीन आहे तितकेच शाश्वत! कुठल्याही भाबड्या आशावादाला इथे निर्णायक स्थान नाही. १९७० पासून देशात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. आणीबाणीमुळे शहरातील बुद्धिजीवी वर्ग अस्वस्थ झाला होता. तर जे काही चालले आहे ते योग्यच आहे, असा विचार करणाराही एक वर्ग तेव्हा अस्तित्वात होता. पण आणीबाणी आणि त्याविषयी उदासीन असणारा तिसरा वर्गसुद्धा पुढच्या दोन दशकात राजकीय आणि सांस्कृतिक घुसळण होताना, कसा नकळतपणे स्वतःच्या चुकांचं मिथ्या समर्थन कसं करत गेला हे पाहणं उद््बोधक ठरावं. ‘सेक्रेड गेम्स'चा नायक गणेश गायतोंडे हा ८०च्या दशकात उदयास आलेला मुंबईचा डॉन आहे. अर्थात गणेश गायतोंडे आणि इतर पात्रं ही फिक्शनल असली, या पात्रांवरचा तत्कालीन राजकीय परिणाम नाकारता येत नाही. आणीबाणीच्या काळात नसबंदीचा अतिरेकी आग्रह, वीस कलमी कार्यक्रम, मंडल आयोग या घटना एकीकडे देशाला घुसळून टाकत असताना ‘गायतोंडे' सर्व घटनांकडे उदासीनपणे पाहतो तर आहे, पण त्याच वेळी मुंबईचा बादशहा बनण्याच्या नादात त्याने घेतलेले अनेक निर्णय तेव्हाच्या राजकारणाचा परिपाक असतात. तत्कालीन पंतप्रधान आणि बोफोर्स घोटाळा याच्या बातम्या पाहून साधा गुंड असलेला गायतोंडे विचार करतो की, ‘अपुन सोचा की, देश में जब पीएम का ईमान नहीं है, तो अपुन सीधे रास्ते चलकर क्या करेगा!' ‘शाहबानो' पोटगी प्रकरणात न्यायालयाचा निकाल तत्कालिक सरकारने फिरवल्यामुळे हिंदू धर्मात पसरलेल्या रोषाला शांत करण्यासाठी आणि अर्थातच हिंदू समाजाचे एकत्रीकरण घडवून आणण्यासाठी टीव्हीवर तेव्हा ‘रामायण' सुरू झाल्याची राजकीय समज त्याला आहे.


  छोटा गुंड असल्यापासून गोपालमठ आणि नंतर मुंबई काबीज करू पाहणाऱ्या डॉन गायतोंडेचा प्रवास हा देशाच्या राजकीय घटनावळीसोबत समांतर चालू असतो. त्यामुळे एका टप्प्यावर देशाच्या परिस्थितीची तुलना गायतोंडेच्या अधोगतीसोबतही होऊ शकते. ‘कभी कभी लगता है कि अपुन ही भगवान है' हे त्याचं तत्त्वज्ञान देशाच्या बलदंड विद्यमान राजकीय स्थितीसोबत नाते सांगणारे आहे. एकीकडे काश्मीरमध्ये गृहमंत्र्यांची मुलगी किडनॅप होते, दिल्लीमध्ये मंडल आयोगाच्या नावाखाली मुलं आपल्या अंगावर केरोसीन ओतून घेत होती, तर दुसरीकडे कपडे बदलावे, तसे आपले पंतप्रधान बदलले जात आहे, असं गायतोडेंचं काहीसं छद्मी म्हणता येईल असं मत आहे. सत्ताकांक्षी प्रवृत्तीची दोन समांतर, टोकं इथे पाहायला मिळताहेत.

  लेखक विक्रम चंद्रा यांच्या ‘सेक्रेड गेम्स' या कादंबरीवर आधारित सिरीजमध्ये प्रत्येक एपिसोडच्या क्रेडिटची सुरुवात रथयात्रा, ‘जय श्रीराम’चा जयघोष आणि ‘बाबरी मशिदीवर त्वेषाने चढलेल्या कारसेवकांच्या दृश्याने होते. त्याच क्रेडिट रोलमध्ये काही मायक्रोसेकंदासाठी अणुस्फोटाचे ग्राफिक्स दिसतात. प्रत्येक एपिसोडचं टायटल हे हिंदू पुराणकथा आणि त्यासंदर्भात सद्य:स्थिती यांची सांगड घालणारं आहे. अमरत्वाचा शाप लाभलेला ‘अश्वत्थामा', समुद्रमंथनातून बाहेर आलेलं ‘हलाहल', धर्माचे आमिष दाखवून आपल्या आत्म्याला काबीज करणारे ‘अतापी-वतापी', ब्राह्मणी मूल्यांना धुडकावून लावणाऱ्या गायतोंडेचं रूप ‘ब्रह्महत्या', आपण सर्व जण कुणाच्या तरी मोठ्या खेळात पट्टा बांधलेली कुत्री आहोत, हे सांगणारा ‘सरामा', हिंदू अंत्यविधीला एका वेगळ्या दृष्टिकोनातून दाखवणारा ‘प्रेतकल्प', सुभद्राच्या मृत्यूनंतर मुस्लिम हत्येचं तांडव दाखवणारा ‘रुद्र', प्रलयंकारी महत्त्वाकांक्षा आपण गेल्यानंतर ही चालू ठेवण्यासाठी मुलाचा सुनियोजित वापर करणारा ‘ययाती'. ही सगळी टायटल्स आजच्या ८०-९० च्या परिस्थितीतून जितक्या सहजपणे आजच्या काळात येऊन पोचली आहे, हे पाहणे भयावह आहे. गुरमीत सिंग आणि इतरही अनेक तथाकथित धार्मिक प्रवचन देणाऱ्या बाबांच्या निमित्ताने जनक्षोभ, क्रौर्य, सामूहिक हिंसाचार याचं टोकाचं रूप सगळ्यांनी पाहिलं आहे. ‘सेक्रेड गेम्स'मध्ये राजकारणी, व्यावसायिक यांना सोबत घेऊन टीव्हीवर प्रवचन देणारा गुरुजी, हा तर मोठ्या षडयंत्राचा एक बिंदू दाखवला आहे, हे लक्षात घेतलं की आपण सध्या कुठे उभे आहोत, हे तपासण्याची गरज पडते.

  अतापी आणि वतापी नावाचे पुराणातल्या गोष्टीतले दोन दैत्य असतात. हे दोघे वाटसरूंना आधी आदराने घरी बोलवून जेवूखाऊ घालायचे. नंतर त्यांच्या आत्म्यावर ताबा मिळवून, सगळं उद्ध्वस्त करून टाकायचे. यहुदी-मुसलमान, मुसलमान- इसाई, हिंदू-मुसलमान... सगळे अतापी-वतापी! हिंदू-मुस्लिमच्या भांडणापासून स्वतःला दूर ठेवणारा गायतोंडे, जेव्हा ‘सुभद्रा'च्या मृत्यूनंतर शेकडो निरपराध लोकांना मारत सुटतो, तेव्हा खरं तर तो स्वतःच अतापी-वतापीची गोष्ट विसरलेला असतो. सिनेमा किंवा लघुपट हे केवळ घटनेचं दस्तऐवजीकरण नसते. ‘सेक्रेड गेम्स' हा देखील फक्त नैतिक ऱ्हासाचं किंवा समाजाच्या अधःपतनाची कहाणी नाहीये, वेळीच सावध करणारा, तो सुस्पष्ट इशारा आहे. कठड्यावर बसून संभ्रमात असणाऱ्या प्रवृत्तींना मागे खेचणारा तो हात आहे. तेंडुलकरांनी सांगितलेली घाशीराम अन् कोतवाल यांची प्रतीकं बदलली आहेत, वृत्ती नाही. गायतोंडेला माहीत असलेलं ‘अतापी-वतापी’चं रूपही आता बदललेलं आहे. ‘सेक्रेड गेम्स' मध्ये गायतोंडे ज्याला आपला तिसरा बाप मानतो, तो ययाती बनून आपली जबाबदारी अन् ओझं आपला स्वार्थ साधण्यासाठी गायतोंडेवर लादून गेलाय. स्वादिष्ट भोजनाऐवजी सत्तापिपासू लालूच दाखवून ज्यातून कधीच बाहेर येऊ शकणार नाही, असे उपकार थोपवून गेलाय. वतापीचं राक्षसी रूप माहीत असूनसुद्धा गायतोंडे त्यात ओढला गेला आहे. ही विध्वंसक जबाबदारी आपण कुठवर पुढे न्यायची, हे आता आपल्या हातात आहे. १९७५ नंतरच्या घटनांच्या परिणामांचे कलेच्या माध्यमातून पडसाद आजवर उमटत राहिले आहेत. भ्रष्ट राज्यकर्त्यांच्या राजवटीत शासकीय -प्रशासकीय यंत्रणा क्रूर बनते, असा आशय असलेलं ‘घाशीराम कोतवाल' हे नाटक आणिबाणीच्या आधी रंगभूमीवर आलेलं आहे. मात्र, त्याचा प्रत्यय सगळ्या राज्यकर्त्यांच्या बाबतीत जनतेने वेळोवेळी घेतलाय. धर्म-पाखंडाने वेढलेलं सत्तांतर आणि त्यातून होणारे न्यूक्लियर बॉम्बपेक्षा भयंकर परिणाम आपल्यावर कुठला तरी ‘ययाती’ चाणाक्षपणे लादत नाहीये ना, हे ‘सेक्रेड गेम्स'च्या निमित्ताने आपल्याला तपासावे लागणार आहे. ‘माणसाच्या वाट्याला जेव्हा वाईट दिवस येतात, तेव्हा कादंबऱ्याना चांगले दिवस येत असतात’, असे मत ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांनी एका ठिकाणी मांडले आहे. तुरळक अपवाद वगळता ‘सेक्रेड गेम्स'ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे, त्यामुळे कधी नव्हे ते राजकीय-धार्मिक सिनेमाला ऑनलाइन का होईना, चांगले दिवस आले, असं म्हणायला हरकत नाही. डहाके यांनी बोलून दाखवलेली भविष्यवाणी वर्तमानातल्या सिनेमाच्या बाबतीतसुद्धा खरी नसेल हे कशावरून?

  jitendraghatge54@gmail.com

  लेखकाचा संपर्क : ९६८९९४०११८

 • jitendra ghatge writes about web series
 • jitendra ghatge writes about web series
 • jitendra ghatge writes about web series

Trending