आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरवलेली किल्‍ली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुलपाची किल्ली ही म्हटलं तर क्षुल्लक वस्तू. पण रस्त्यात सापडलेल्या किल्लीमुळे नायकाचं विचारचक्र कसं सुरू होतं आणि वळणावळणानं ते कुठं येऊन थांबतं याचं वर्णन करणाऱ्या मूळ कन्नड लेखक के गणेश कोडुरू यांच्या कथेचा हा अनुवाद...


ऑफिसातून निघालेला अनंता घराजवळच्या बस स्टॉपवर उतरून नेहमीप्रमाणे चालत चालत घरी निघाला. तंद्रीत चालत असताना अचानक त्याला रस्त्यात धुळीत पडलेली एक किल्ली दिसली. ही किल्ली कोणाची असावी? ती अशी कशी पडली असेल? तो विचार करू लागला.
पण या किल्लीची काय कथा? या शहरातल्या घाईगर्दीतल्या आयुष्यात लोक काय काय घालवून बसत असतील. शेवटी आयुष्याची किल्लीच हरवून बसतील की काय ही भीती. अशा वेळी डुप्लिकेट किल्ली बनवता येणेही शक्य नाही. या असहाय जाणिवेमुळे किती दुःखी होत असतील? अशा वेळी कोणीच आसरा दिला नाही तर? असा विचार करणाऱ्या अनंतच्या मनात एक क्षणभर ती किल्ली उचलावी असा विचार आला. पण दुसऱ्या क्षणीच ही किल्ली घेऊन मी त्याचं काय करणार, असं वाटून किल्ली उचलण्यासाठी वाकलेला तो पुन्हा सरळ उभा राहिला.

 

आपल्याप्रमाणेच किती तरी लोक या रस्त्यावरून ये-जा करत असतील. त्यातल्या कोणी नको असलेली ही किल्ली फेकून दिली असेल का? ऑफिसात जाण्यायेण्याच्या या रस्त्यावर लोकांची वर्दळ असते. मी उचलली नाही तर दुसरा कोणी भंगारवाला येऊन उचलणार नाही कशावरून? असा विचार करताना त्याच्या डोळ्यासमोर अनावश्यक सामानाने भरलेलं आपलं घर उभं राहिलं. त्या सामानामुळे घरात फिरायलाही जागा राहिलेली नव्हती. शेवटी अन्य पर्याय न दिसून त्यानं सगळं सामान पोत्यात भरून भंगारवाल्याकडे नेऊन विकलं होतं. सगळ्या सामानाचं वजन करून भंगारवाल्याने हातावर टेकवलेले पैसे घेऊन तो घरी आला असता, रिकामी खोली पाहून तो भयंकर अस्वस्थ झाला होता व ही आपलीच खोली आहे का, नाही, मी इथे राहू शकणार नाही, असं त्याला वाटू लागलं होतं. त्या वेळी रडावं की हसावं ते न कळून तो रस्त्यातल्या चौकातल्या पुतळ्यासारखा निर्विकार चेहरा करून निश्चल उभा राहिला होता घरात.
पडली आहे त्या जागीच तशीच राहू दे ही किल्ली. ज्याची हरवली असेल तो शोधत आला आणि त्याला ती दिसली तर किती खुश होईल तो, असं मनात म्हणून किल्लीवरची माती पायाने जरा बाजूला सारून तो दोन पावलं पुढे गेला असतानाच त्याच्या डोळ्यांसमोर एक स्वप्न दिसू लागलं. ‘ती रस्त्यावर पडलेली किल्ली एका सुंदर मुलीची आहे. किल्ली आता आपल्या हातात आहे, ती मुलगी किल्ली शोधत इकडेच येत आहे. किल्ली तिची आहे असं कळल्यावर आपण तिला किल्ली दिली आहे. किल्ली मिळाल्याचा तिला खूप आनंद झाला आहे व ती आपले आभार मानत आहे, हसत आहे, नंतर आम्ही एकमेकांचे मोबाइल नंबर घेतले आहेत. प्रेम कुठे, कधी, कसं निर्माण होईल हे काही कोणी लिहून ठेवलंय का?’

 

दोन पावलं पुढे गेलेला अनंत आता मागे आला व जास्त वेळ न घालवता ती अनाथ किल्ली त्याने उचलली. हाताने तिच्यावरची माती झटकून टाकली. आपल्याजवळच ठेवावी ही आता. कदाचित हिच्यामुळे आपलं भाग्य उजळणार असेल. काय सांगावं? असा विचार करत त्याने ती किल्ली काळजीपूर्वक आपल्या पँटच्या खिशात टाकली.
हरवलेली किल्ली त्या मुलीला परत द्यावी या हेतूने मी ती माझ्याकडे ठेवली आहे हे खरं असलं तरी किल्ली आपल्याला सापडली आहे हे तिला कसं कळणार? अरे देवा, मी हा विचारच केला नव्हता. थोडी वाट पाहूया असा विचार करून अनंता रस्त्याच्या कडेला सावलीत उभा राहिला. पण अशी किती वेळ वाट पाहणार? गावाला असलेले आईवडील आपल्या लग्नाचं पाहत आहेत; पण दोन वर्षं झाली तरी आपल्याला योग्य अशी मुलगी काही त्यांना सापडलेली नाही. या किल्लीमुळे आपल्या जीवनाचं कुलूप उघडलं जाऊन आपला विवाहयोग जुळून येणार असेल का? तसं असेल तर संध्याकाळपर्यंत वाट पाहण्याची तयारी आहे आपली. अशा प्रकारे जर मुलगी भेटणार असेल आईवडलांचे आपल्याकरता मुलगी शोधण्याचे कष्ट तरी वाचतील व आपलं हे एकटेपणही संपुष्टात येईल. असे विचार करत तो रस्त्याच्या दोन्ही दिशांना पाहत पाहत तिथेच उभा राहिला.
अरेरे, किल्ली शोधायला न कोणी मुलगी आली ना म्हातारी.
किती वेळ वाट पाहत असं उभं राहणार; किल्ली बरोबर घेऊन जावं तर शोधायला येणाऱ्याला ती कशी मिळेल, असा विचार करत अनंता किल्ली पडली होती त्या जागीच, पण चटकन दिसेल अशी ठेवून घरी जायला निघाला.
जिना चढून, पहिल्या मजल्यावरच्या आपल्या खोलीसमोर उभं राहून, अनंताने किल्ली काढण्याकरिता आपल्या पँटच्या डाव्या खिशात हात घातला. अरेच्चा, किल्ली कुठे गेली? तो क्षणभर गोंधळून गेला. बॅगेत तर ठेवली नाही ना, असं म्हणून बॅग उघडून त्याने आतल्या सगळ्या वस्तू बाहेर काढल्या. बॅग उलटीपालटी केली पण किल्ली सापडली नाही.
बाप रे, रस्त्यात सापडलेली ती किल्ली माझ्या किल्लीसारखीच होती की काय? होय, नक्कीच ती माझीच किल्ली होती. पण मला कसं कळलं नाही? गडबडीत ऑफिसला जाताना रस्त्यात पडली असणार. त्याच्यावरून गाड्या, बाइक गेल्या असणार, त्याची कीचेन तुटून गेली असणार म्हणून मला ती ओळखता आली नाही. स्वतःलाच शिव्या घालत, घाईघाईने अनंता किल्ली पडली होती त्या जागी जाऊन पाहू लागला. पण हाय, तेथे आता ती किल्ली नव्हतीच.
आपण वाट पाहत होतो तसं कोणी, हरवलेली आपली किल्ली शोधायला येणाऱ्या माणसाची वाट पाहत उभा असेल का? अनंता इकडेतिकडे पाहू लागला. पण सगळं शहर अंधाराच्या पोटात गुडूप झालेलं होतं. आता मात्र अनंता निराश होऊन मटकन खाली बसला.

 

aparna.s@rediffmail.com

 

बातम्या आणखी आहेत...