आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रियांना व पुरूषांना वेगवेगळा न्‍याय का?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख.


स्त्रीप्रश्न म्हणजे काय आणि समाजातील नेमक्या कोणत्या प्रश्नांना स्त्रीप्रश्न मानले जाते आणि या मान्यतेखेरीज अजून कोणते प्रश्न हे स्त्रीप्रश्न आहेत, याचा विचार केला आहे. हे प्रश्न नेमक्या कोणत्या काळापासून आणि कोणत्या चुकीच्या विचारांमधून आणि कोणत्या कारणांनी उगम पावले असावेत याचा विचार करूया.


स्त्री-प्रश्न या संकल्पनेचा विचार पाश्चिमात्य जगात सुरू झाला तो १९६० सालानंतर. अर्थात असे विचार ही काही झपकन उगवणारी गोष्ट नसते; त्यांची बीजे काही वर्षं आधीपासून रोवली गेलेली असतात. १९६० ते १९८० या वीस वर्षांच्या कालखंडात आधुनिक स्त्रीवादी  विचारप्रवाह निर्माण झाला, रुजला, आणि वाढलादेखील. स्त्रियांच्या प्रश्नांचा या काळात विविध पद्धतींनी विचार होऊ लागला. विकसित होणारे हे विचार काही वेळा एकमेकांना छेदणारे देखील होते. या मते-मतांतरांनीच भूमिका अधिकाधिक स्पष्ट आणि टोकदार करण्याचे काम केले. चळवळ त्यातूनच वाढत गेली. अर्थात आज २०१८ साली, यातील अनेक संकल्पनांचे अर्थ बदलत गेले. अनुभवांची जोड मिळाल्यानंतर विचारांचे असे बदलणे हे काळसुसंगत तर असतेच, खेरीज विचारांचे व तत्त्वज्ञानाचे स्थान केवळ कागदावर न ठेवता, प्रत्यक्ष जीवनात त्यांचे उपयोजन घडवणारे ठरते.


कोणतेही स्त्री-प्रश्न कोणत्याच काळात व कुठल्याही देशाप्रदेशात कधीच एकरेषीय नव्हते. त्यांवर काळ, देशप्रदेश, धर्म, पंथ, जात, वर्ग अशा अनेक गोष्टी प्रभाव टाकत होत्या. ते फक्त व्यक्तीचे, घरातले असे प्रश्न नव्हते; तर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, पर्यावरण, आरोग्य आणि राजकीय संदर्भांनीही त्यांना वेढलेलं होतं. प्रत्येक बाबतीत बाई म्हणून वेगळे काढले जाणे न्याहाळले तरी या गोष्टींचा सहज उलगडा होऊ शकेल.


‘स्त्री-प्रश्नाची पहिल्या टप्प्यात जी चर्चा झाली, तिचा रोख मुख्यत्वे कुटुंबसंस्थेच्या चौकटीतील स्त्रीचा दर्जा सुधारण्याकडे होता. काही कुप्रथांचा प्रभाव कमी केला, तर स्त्रीचे जगणे सुसह्य होऊ शकेल, असा सूर या चर्चांमागे होता. स्त्री-शिक्षण असावे की नसावे, त्या शिक्षणाचा आशय कोणता असावा, हा एक चर्चेचा मोठा प्रवाह होता. दुसरीकडे संमतिवयाविषयीच्या चर्चेत स्त्रियांच्या लैंगिकतेच्या विषयीची चर्चा अनेक पातळ्यांवर होऊ शकली असती, पण तशी ती झाली नाही. तिसरा प्रमुख विषय स्त्रीचे माणूसपण हिरावणाऱ्या प्रथा संपवणे हा होता. एका पातळीवर हे सारे बदल कृषिसमाजाकडून आधुनिक भांडवली समाजाकडे होऊ लागलेल्या स्थित्यंतराचे निदर्शक होते. दुसऱ्या पातळीवर पाहिले, तर आधुनिक पाश्चिमात्य विचारसरणीला अनुसरून स्त्रियांच्या व्यक्तित्वाचा, माणूसपणाचा आग्रही आविष्कार कुटुंबकेंद्री समष्टविचाराऐवजी व्हावा, असे हे प्रयत्न होते. अर्थात आधीच नोंदवल्याप्रमाणे पुनर्व्याख्येचे हे प्रयत्न उच्चजातीय, उच्चवर्गीय वर्तुळापुरते सीमित होते.’ (तांबे, श्रुती; संदर्भांसहित स्त्रीवाद : स्त्रीवादाचे समकालीन चर्चाविश्व) 


स्त्रियांचे समाजातील विभाजन हे अविवाहित, विवाहित, परित्यक्ता, घटस्फोटिता, विधवा, पुनर्विवाहिता, रखेल आणि वेश्या या प्रकारांमध्ये सर्वसाधारणपणे केले जाते. यातल्या पहिल्या सात ओळखी विवाह या एकमात्र मुद्द्याशी निगडित आहेत आणि शेवटचा आठवा प्रकार लैंगिकतेशी निगडित आहे. विवाह हा मुद्दा लैंगिकता आणि वंशवृद्धी या दोन गोष्टींशी प्रामुख्याने निगडित आहे. स्त्रियांसाठी नातेदर्शक असे जे शब्द मराठीत आहेत, त्यांवरून हे स्पष्ट होईल. या आठ ओळखींपलीकडे एक व्यक्ती वा माणूस म्हणून स्त्रीची ओळख पुन्हा होऊ लागली, ती विसाव्या शतकात. त्याआधीचे स्त्रीप्रश्न हे म्हणूनच विवाह व लैंगिकता या दोनच संदर्भांतले आहेत, असं सर्वसामान्यपणे म्हणता येईल. पुढील काळात हे प्रश्न अल्प प्रमाणात का होईना, पण कमी होऊ लागले आणि स्त्रिया घराबाहेर पडून नोकरी-व्यवसाय करू लागल्यानंतर त्यात अजून काही प्रश्नांची भर पडली. 


ताराबाई शिंदेच्या स्त्री-पुरुषतुलना या ग्रंथातून स्त्रियांचे प्रश्न कोणते होते, याची एक यादी बनवली, ती अशी -
१. स्त्रियांना गृहतुरुंगात बंदीवास, २. स्त्रीला बटकीप्रमाणे गुलामीची वागणूक, ३. स्त्रियांना बेदम मारहाण, ४. स्त्रीचा वस्तुवत विचार, ५. स्त्रियांना भुलविणे-गैरमार्गाला लावणे व अखेर फसविणे आणि स्वतःची जबाबदारी टाळणे, ६. स्त्रीविरोधी शास्त्रकर्ते, ७. पुरुषाचे वैषयिक वासनेने भरलेले वागणे (मरेपर्यंत विषयवासना, रांडांकडे जाणे, स्वतःची नजर गेलेल्या स्त्रीला नादी लावून तिचा उपभोग घेणे, मित्रपत्नीचेही अपहरण आणि बुवाबाजी), ८. विधवांना पुनर्विवाहास परवानगी नाही, ९. मुलींची लग्ने घरातील कर्ता पुरुष ठरवील त्याप्रमाणे, ठरविताना अर्थविचाराला प्राधान्य, १०. केशवपन,  ११. अप्रामाणिक वर्तन, पत्नीनिष्ठ नसणे, १२. एकाहून अधिक लग्नं करणे, १३. वृद्धापकाळातही अल्पवयीन मुलीशी पुनर्विवाह करणे, १४. अपत्यसंभवामुळे स्त्री अडचणीत आली की हात झटकून मोकळे होणे, १५. स्त्रीला अज्ञानात ठेवून ती सतत आपली अंकित राहील अशाप्रकारे वर्तन, आणि १६. घमेंडखोर विचार करणे.


ताराबाईंच्या ग्रंथाचा यासाठी आधार का घ्यावा वाटला याचं उत्तर डॉ. विलास खोले यांच्या ‘ताराबाई शिंदे लिखित स्त्रीपुरुषतुलना’ या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेतील खालील उताऱ्यातून स्पष्ट होईल -
‘ताराबाई शिंदे यांचे स्त्रीपुरुषतुलना हे मराठीतील असे पहिले लेखन आहे की, ज्यात एक स्त्री केवळ धीटपणेच नव्हे, तर सुसंगतपणे, तर्कशुद्ध रीतीने, परखड शब्दांत, स्त्रीपुरुषनात्यासंबंधी व तिच्या अखंड शोषणासंबंधी पुरुषांना सरळसरळ प्रश्न विचारते आहे. या प्रश्नांतील काही प्रश्न ऐतिहासिक तर काही राजकीय स्वरूपाचे आहेत. स्त्री दीर्घकाळ सत्तेपासून दूर ठेवली गेली आणि ब्रिटिश राजवटीत तर ती सत्तास्थानापासून आणखीच दूर फेकली गेली. ताराबाईंनी स्त्रीच्या संदर्भात अगदी व्यावहारिक स्वरूपाचे प्राथमिक पातळीवरचे वाटतील असे, परंतु मूलभूत असणारे प्रश्न उपस्थित केले आहेत.वाङ्मयातून होत असणाऱ्या स्त्रीचित्रणाबाबतचे त्यांचे तीव्र असमाधान, अभिजात साहित्य व वृत्तपत्रे यांमधून उभी राहणारी स्त्रीप्रतिमा, स्त्रीच्या वर्तनाबाबत केले गेलेले नियम, त्यांना साहाय्यभूत ठरणारा शास्त्राधार या सगळ्यांमुळे ताराबाईंना स्त्रियांना व पुरुषांना वेगवेगळा न्याय का, असा प्रश्न पडतो.’


-  कविता महाजन, वसई
kavita.mahajan2008@gmail.com

बातम्या आणखी आहेत...