आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातात बुकं, मास्तरणी जशा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख.


जु न्या ओव्यांची संकलनं वाचताना त्या-त्या काळाचा एक सामाजिक पटदेखील डोळ्यांपुढे उभा राहतो. स्त्रीशिक्षण सुरू झालं, त्या सुरुवातीच्या काळात शिकणाऱ्या मुलींना नावं ठेवली जात; त्याची झलक या ओवीतून मिळाली -
साठ्यांच्या मुली तुम्ही अशा गं कशा ।
हातांत बुकं, मास्तरणी जशा ।।

स्वातंत्र्यलढ्याच्या काळात मेळे भरत, तशा एका मेळ्यांतलं हे पदही शिकलेल्या मुलींना टोमणे मारणारं आहे –
घालितां न ये रांगोळी
वाढिते मीठ खिरीच्या खाली
खालील बाजूची जळुनी गेली पोळी
पोळी न ये परी वदे इंग्रजी बोली
बोलते तिची संसारदक्षता गेली
शिक्षण झाले फाजील, झाले वाटोळे
हा उलट कलीचा काळ, ओळखा मोहजाल सगळें

स्त्रियांचं शिक्षण म्हणजे फाजीलपणा, संसाराचे वाटोळे करणारी गोष्ट हे या काळात स्त्री-पुरुषांच्या मनावर अशा काव्यांमधून इतकं ठसवलं गेलं की, आजही अनेक ठिकाणी स्त्री शिक्षणाला विरोध होताना दिसतोच आणि त्याची जी कारणं सांगितली जातात, ती गेल्या शतकात सांगितल्या गेलेल्या कारणांहून अजिबात वेगळी दिसत नाहीत. शिकलेल्या मुलीला स्वयंपाक येत नाही; तिला खास बायकी कौशल्याची मानली गेलेली अशी रांगोळी, भरतकाम, विणकाम, मण्यांच्या वस्तू बनवणे, कपडे शिवणे वगैरे कला जमत नाहीत; मुलांचं संगोपन ती पुस्तकं वाचून कसंबसं करते आणि तिला मुलांवर चांगले संस्कार करता येत नाहीत; शिकलेल्या स्त्रीला नोकरीच्या व इतर आनुषंगिक कामांच्या निमित्ताने बाहेर पडावं वाटतं, त्यामुळे तिची ‘संसारदक्षता’ जाते; थोडक्यात घरातली कामं ती पूर्णपणे लक्ष केंद्रित करून सजगपणे करत नाही... वगैरे कारणांची यादी कितीही लांबलचक – अगदी अंतहीन होऊ शकते. 
ओव्या, पदं यांखेरीज या काळात पुरुष कवींनी जे काही काव्यलेखन केलेलं आहे, त्यातही अशाच मतांचं प्राबल्य प्रामुख्याने दिसून येतं. स्त्री शिक्षणाची केवढी धास्ती त्या काळी समाजमानसात होती, हे वाचून चकित व्हायला होतं. एकोणिसाव्या शतकातील स्त्री शिक्षणाला विरोध करणाऱ्या मृगेंद्र या कवीच्या कवितेत शिक्षणाने स्त्रिया कशा बिघडतील, याची भीती व्यक्त केलेली आहे. त्यातले मुद्दे असे : १. हिंदू धर्म बुडेल, २. स्त्रिया पतीला ठार मातील, ३. घरोघरी व्यभिचार सुरू होईल, ४. नवऱ्याला चाकर म्हणतील व केवळ कामवासना पूर्ण करण्याच्या कामासाठी तुला नेमले आहे असे सांगतील, ५. त्या घाबरणार नाहीत, ६. त्यांच्यातला विनय नष्ट होईल, ७. त्यांच्यातली नीती नष्ट होईल, ८. त्या झगे-टोप्या घालू लागतील, ९. दारू पिऊ लागतील, १०. धर्मांतर करतील. 
तर यातले आता काळाच्या कसोटीवर नेमके काय-काय खरे ठरले आहे? आणि जे घडले आहे ते केवळ शिक्षणामुळे झाले असे म्हणता येईल का?   
शिक्षणाने स्त्रियांमध्ये झालेला बदल एका लोकगीतातून दिसतो. हे गीत भोंडल्याच्या वा हादग्याच्या गाण्यांपैकी एका गाण्याच्या चालीवर बेतलेले दिसते. लोकगीतांच्या नवनव्या आवृत्त्या प्रत्येक काळात येत असतातच आणि त्यात नवे सामाजिक संदर्भ स्त्रियांनी पेरलेले दिसतात, तसंच या गाण्याचंही झालेलं आहे...
झाडझबका फूल दबका 
दौत लेखणी, त्यात मी देखणी ग
सभेला दोघी
झाडझबका फूल दबका 
दारी चौकट, त्यात मी बळकट ग
सभेला दोघी
झाडझबका फूल दबका 
दारी डबा, त्यात मी उभी ग
सभेला दोघी
झाडझबका फूल दबका 
जहाज झंजाळ, त्यात मी वंगाळ ग
सभेला दोघी
झाडझबका फूल दबका 
धू धू गाडगी, त्यात मी आडगी ग
सभेला दोघी

दोन सुशिक्षित स्त्रिया एका राजकीय सभेला जातात, त्याचं हे वर्णन आहेत. त्या स्वत:ला बळकट आणि देखणी समजतात हे त्यात स्पष्टपणे येतंच; खेरीज लोक मात्र त्यांना वंगाळ (वाईट / घाणेरडी) आणि आडगी (हट्टी / हेकट / आपलं तेच खरं करणारी / आपल्या मुद्द्यावर अडून राहणारी) समजतात, हेही येतं. मात्र जनमताची पर्वा न करता त्या खमकेपणाने आपल्या जे योग्य वाटतं तसंच वागतात-बोलतात हे महत्त्वाचं. 


स्त्री शिक्षणाचा इतिहास पाहताना जाणवतं की, पुढील काळात अनेक चांगले बदल झाले आहेत, अजून होताहेत आणि होतील; पण म्हणून हा इतिहास नाकारता येणार नाही. स्त्री शिक्षणाची सुरुवात झाली तेव्हाचे संदर्भ पाहूनच आजचा विचार करावा लागेल. शिक्षणासाठी स्त्रियांनी दीर्घकाळ जो संघर्ष केला आणि शिक्षणाच्या काही शाखांमध्ये आजही त्या संघर्ष करतच आहेत; त्या संघर्षाचा आणि एकूणच स्त्री शिक्षणाच्या वस्तुस्थितीचा आढावा यापुढील लेखांमधून घेऊ या.

- कविता महाजन, वसई 
kavita.mahajan2008@gmail.com

बातम्या आणखी आहेत...