Home | Magazine | Madhurima | Kavita Mahajan writes about history of women

हेंच स्त्रियांचें तीर्थाटण विधि ||

कविता महाजन, वसई | Update - Jul 31, 2018, 05:34 AM IST

स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात...

 • Kavita Mahajan writes about history of women

  भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख.


  आ दर्श स्त्रीविषयीच्या कवींच्या जुन्या कल्पना पाहता स्त्रियांचं शिक्षण ही किती दुष्कर गोष्ट होती, हे ध्यानात येतं. होनाजी बाळा यांना कोणती स्त्री चांगली वाटते हे पाहू.


  दास्य सासु सासऱ्यांचें मग पतिसेवा त्यावरी।

  मर्जी माफक विनोद, एकांतीं केवळ रंभेपरी।
  सुरतानंदीं मन रिझवुन पतिचे पाय स्वकरें चुरी।
  यथानुकूल धर्मवासना, संतोष सदा अंतरीं।
  ज्या गोष्टी प्रिय स्वामिस त्याच गोष्टि साक्षेपें करीं।

  ( चाल )
  भोजनसमयीं पंचप्राण अति पतिचें भोजनीं।
  याच परी स्नेहमंडित अशि हे शुभसूचक कामिनी।
  पतिसहित निर्दोष वास वैकुठीं याच साधनीं।
  देह स्वामीकारणीं झिजावा हेत हृदयामधीं।
  होनाजी बाळ म्हणे हेंच स्त्रियांचें तीर्थाटण विधि।।

  हा लेख वाचणाऱ्या विवाहित - विवाहेच्छू पुरुषमित्रांना अशी पत्नी हवी, असा मोह ही कविता वाचून झाला असेल तर त्यांनी ती पुन्हा एकदा नीट वाचावी. अशी सेवा करून घेतल्यावर तीच पत्नी वैकुंठात देखील तुमच्यासोबत ‘निर्दोष वास’ करण्यासाठी येते आणि ‘कुठल्या मेल्या अप्सरेकडे बघताय १३ सेकंद?’ याचा जाब विचारू शकते. विरोधाभास दर्शवणाऱ्या अशा कैक गमती आपल्याला थोडा विचार केला तरी ध्यानात येऊ शकतात. आणि ‘योग्य विचार’ केला की, या गमती आहेत, असं न वाटता त्यातलं गांभीर्यदेखील ध्यानात येऊ शकतं.


  ‘बायकांचा मेंदू पुरुषांच्या मेंदूहून लहान असतो, त्यामुळे त्यांना कमी व केवळ गृहोपयोगी शिक्षण दिलं जावं,’ असं म्हणणाऱ्या लोकमान्यांचे स्त्रीविषयक विचार आणि पुढील काळात अनेक क्षेत्रांमधील नेत्यांनी मांडलेले स्त्रीवादी विचार हा दोलक लांबलचक दोला देणारा आहे. “बायका पुरुषांपेक्षा जास्त गुणवंत असतात!” अशी विधानं आज काही लोक थेट दुसऱ्या टोकाला जाऊन करताना दिसतात. फुका वाद बाजूला सारून तटस्थपणे विचार करता, ‘काही’ बायका ‘काही’ पुरुषांपेक्षा किंवा ‘काही’ पुरुष ‘काही’ बायकांपेक्षा अधिक गुणवंत असतात, हे विधान अगदी अचूक ठरेल.


  फरक एकच आहे : पुरुषांना कैक गोष्टी सहजपणे मिळतात, कैक चिजा त्यांच्याकडे असतातच असं परंपरेने गृहीत धरलं जातं, काही बाबी रूढीनुसार त्यांच्यासाठी ‘राखीव’ असल्यागतच असतात. त्यामुळे त्या गोष्टी हव्या असतील, ते शिक्षण घ्यायचं असेल, ती कामं करायची असतील, तर स्वत:ला ‘सिद्ध’ करण्यासाठी बायकांना पुरुषांच्या शंभरपट अधिक कष्ट करावे लागतात. त्यासाठी जिद्द, चिकाटी हे उपजत गुण वाढवत - विस्तारत न्यावे लागतात. जोखीम स्वीकारण्याची क्षमता स्वत:त निर्माण करणे, कुठंही भावव्याकूळ होण्याची गचाळ पारंपरिक सवय मोडून तर्कबुद्धी वाढवणे, सुपरवुमन म्हणवून घेण्याचा मूर्ख मोह टाळणे, कुठेही स्वत:ला ‘आई - माई - अक्का’ म्हणायला लावत उदो उदो करवून घेण्याची हलकट पळवाट नाकारणे, टाइम मॅनेजमेंट आणि आत्मविश्वास या गोष्टी जाणीवपूर्वक विकसित करणे... इत्यादी गोष्टी ‘जमवत’ न्याव्या लागतात. त्यांचा हा ‘संघर्ष’ नजरेत भरणारा असतो; कारण तो अजून मोजक्याच बायका करतात. त्यामुळे त्या अधिक गुणवंत आहेत असे भासते. जसजशी अशा खमक्या बायकांची संख्या वाढेल, तसतशी अशी स्त्री-पुरुष तुलना कालबाह्य होत जाईल.


  पितृप्रधान संस्कृतीही देशात सर्वत्र सारखी नाही. प्रांत, संस्कृती, धर्म, जात, व्यवसाय, भाषा अशा विभागांमधून तीही विभिन्न बनलेली आहे. परिणामी भारतीय स्त्री जीवनाकडेही या विभागांमधून पाहावं लागेल; तेही अपुऱ्या साधनांनिशी. इतिहास सर्व भारतीय स्त्रियांचा एकच असू शकत नाही; ते अनेक इतिहास आहेत. खेरीज सर्व स्त्रिया फक्त पितृसत्तेचा बळी नक्कीच नाहीत; काही विशिष्ट जातींच्या स्त्रिया या दुसऱ्या विशिष्ट जातींच्या स्त्रियांच्याही बळी आहेत. धर्माचं, रूढींचं, कर्मकांडांचं रक्षण व पुढच्या पिढ्यांकडे हस्तांतरण हे सतत काही ना काही कारणाने घराबाहेर असणाऱ्या पुरुषांना करणं अवघड होतं; ते एके जागी स्थिर असलेल्या स्त्रियांच्या अखत्यारीत आलं. पिढ्यानुपिढ्या करत राहिल्यानं ही कर्मकांडं, व्रतवैकल्यं वगैरे त्यांची सवय बनली. ती सवय मोडण्यासाठी स्त्रियांचं केवळ रूढ शिक्षण, अर्थार्जन, नोकरी-व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणं या गोष्टी अजूनही पुरेशा ठरलेल्या नाहीत.


  एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस स्त्रीशिक्षण निश्चित हेतूने सुरू झालं होतं. सुशिक्षित, आधुनिक स्त्रीने सुयोग्य सहचारिणी आणि आदर्श माता बनावं याच दृष्टीने त्यांच्यासाठीच्या अभ्यासक्रमांची आखणी झाली होती. हे शिक्षण ज्या उच्चजातीय स्त्रियांना मिळालं, त्या शिक्षणामुळे तत्काळ स्वावलंबी, निर्णयक्षम बनल्या नाहीत. त्यांची अक्षरओळख वाणसामानाच्या याद्या आणि मुलांचा प्राथमिक शाळेत असेतो गृहपाठ करून घेणे इतपतच उपयुक्त ठरली. त्यांच्या निरर्थक पदव्या फक्त लग्न जमण्यासाठी गरजेच्या होत्या; बाकी त्यांनी मठ्ठ बांडगुळं असणंच घरादाराच्या सोयीचं होतं. या काळातील स्त्रीशिक्षण विकासाच्या वाटेने नेणारं नव्हतं, तर शोषणालाच वेगळं स्वरूप देणारं होतं. पातिव्रत्याची, सहचरिणीची व्याख्या थोडी बदलली होती, इतकंच. कुलीन व अकुलीन स्त्रियांमधले ‘आम्ही’ आणि ‘त्या’ असे भेद या काळात अधिक तीव्र होत गेले आणि स्त्रियांमधली दरी वाढली. त्यात जात या मुद्द्याने तीव्र काम केलं.

  - कविता महाजन, वसई
  kavita.mahajan2008@gmail.com

Trending