आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्‍यक्‍तकेशांची पांढरी दु:खे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सभारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख.


धर्मशास्त्राच्या इतिहासात एक नोंद सापडली, ती अशी आहे :
‘ सन १९३१च्या खानेसुमारीवरून असे आढळून येते की, सर्व भारतात १ वर्षाच्या आतील वयाचे ७९६ विधुर आणि १५१५ विधवा होत्या; ५ ते १० वर्षांच्या दरम्यानच्या वयाच्या हिंदू विधवांची संख्या ८३,९२॰ होती. आर्थिक परिस्थितीमुळे, सामान्य लोकांत शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे आणि इ. स. १९२९च्या बालविवाह प्रतिबंधक कायद्यामुळे मुलींच्या लग्नाचे वय झपाट्याने वाढत आहे आणि अशी आशा करण्यास जागा आहे की, बालविधवांची संख्या नजीकच्या भविष्यकाळात बरीच कमी होईल. परंतु हिंदू समाजात पाश्चिमात्य देशातल्याप्रमाणे वृद्ध कुमारिकांची समस्या उत्पन्न होईल अशी चिन्हे दिसू लागली आहेत. विवाहाचा प्रश्न हल्लीच मोठा बिकट झाला आहे आणि विवाहेच्छू कुमारिकांची त्यात गर्दी झालेली आहे. तेव्हा अशा स्थितीत कुमारिकांच्या बरोबर विधवांना विवाहाच्या कामात स्पर्धा करू देऊ नये, असे पुष्कळ हिंदूंना वाटते. (धर्मशास्त्राचा इतिहास; पूर्वार्ध; पृ. २४३)

 

आता आजची स्थिती पाहूया
२०११च्या जनगणनेनुसार भारतात २ कोटी ९२ लाख विधवा स्त्रिया आहेत. त्यांपैकी महाराष्ट्रातील विधवा स्त्रियांची संख्या १,३२,७०५ इतकी आहे. त्यांच्या वयाचे तपशील आत्ता माझ्या हाती नाहीत, पण बालविवाहांचं प्रमाण पाहता, बालविधवांच्या संख्येची कल्पना करण्यासदेखील हरकत नाहीच. जर पुनर्विवाह सोपे व स्वीकारार्ह असते, तर ही संख्या दिसली असती का? नक्कीच दिसली नसती. आजही या स्त्रियांच्या अवस्थेत आणि प्रश्नांमध्ये फारसा फरक पडलेला आहे की नाही, हे पाहण्यासाठी आधी त्यांची अवस्था जुन्या काळात कशी होती, हा इतिहास पाहिला पाहिजे.
विधवाधर्म - विधवा हा शब्द ऋग्वेदामध्ये पुष्कळ ठिकाणी आला आहे. परंतु अशा स्त्रियांचा सामाजिक दर्जा काय होता याचा त्या उल्लेखांवरून फारसा बोध होत नाही. पतीहीन स्त्रिया दुःखामुळे आणि दुसऱ्या कोणाकडून पीडा होईल आणि वाईट वागणूक मिळेल या भीतीने कापत असत, असं ऋग्वेदातल्या एका वर्णनावरून दिसतं. (ऋ. १.८७.३)
विधवेने आमरण पालन करावयाचे अनेक नियम बहुतेक सर्व स्मृतींनी सांगितले आहेत. या नियमांचा उद्देश विधवेचे आचरण शुद्ध राहावे, तिने व्यभिचार करण्यास प्रवृत्त होऊ नये हेच सांगण्याचा असे. हे नियम पुढील प्रमाणे होते :
विधवेने परपुरुषाशी संबंध ठेवू नयेत. बालवयात वैधव्य आले, तरी तिने अखंड ब्रह्मचर्य पाळावे. वर्षभर जास्तीत जास्त उपासतापास करून देह कष्टवावा. एखाद्या संन्याशाप्रमाणे अपुरा आहार आणि अपुरी वस्त्रे ठेवावीत. शक्यतो दिवसातून एक वेळच जेवावे. उत्तम आहार घेणे, गोडधोड खाणे, पोटभर जेवणे टाळावे. चांगली आणि रंगीत वस्त्रे, अलंकार, फुले, कुंकू, काजळ इत्यादी सौंदर्यप्रसाधने वापरू नयेत; जेणेकरून पुरुष तिच्याकडे आकर्षित होतील. थोडक्यात कोणत्याही स्वरूपाचे शारीरिक सुखोपभोग घेण्याचा अधिकार विधवेला नाही. तिने  देवाची उपासना करावी आणि सद्गुणी लोकांच्या संगतीत राहण्याचा नेहमी प्रयत्न करावा.

 

ब्राह्मणांतील आणि इतर काही जातींतील विधवांच्या केसांचे वपन करण्याची रूढीही बरीच प्रचारात होती; आता ती मात्र पूर्णत: नामशेष झालेली आहे. तिचं स्वरूप फार भयानक आणि अत्यंत बीभत्स होतं. लाल आलवण घातलेल्या आणि केशवपन केलेल्या स्त्रिया माझ्या लहानपणी मी आमच्या कुटुंबातदेखील पाहिलेल्या आहेत. विधवांच्या केशवपनाला वेदांचा आधार नाही आणि गृह्य आणि धर्मसूत्रात, तसेच मनुस्मृती, याज्ञवाल्क्य स्मृती यांच्यातही केशवपनाचा  निर्देश केलेला आढळत नाही. वेदव्यासस्मृती (२.५३) आणि स्कंदपुराण (काशीखंड) यांच्यात मात्र स्पष्ट उल्लेख सापडतात.
विधवाकबरी बन्धो भर्तृबन्धाय जायते।
शिरसो वपनं तस्मात् कार्य विधवया सदा।। (स्कंदपुराण)
आणि
मृतं भर्तारमादाय ब्राह्मणी वह्मिमाविशेत्।
जीवन्ती चेत् त्यक्तकेशा तपसा शोषयेद् वपुः।। (वेदव्यास)
अशा वपनाचा निर्देश केला असला तरी वृद्धहारीतासारख्या (११.२॰५। २१॰) दुसऱ्या काही स्मृती या गोष्टीच्या विरुद्ध मताच्या आहेत. विधवांनी वारंवार वपन करावे, असे स्पष्टपणे एकाही स्मृतिवचनात सांगितलेले नाही, पूर्वीच्या काळी केवळ एकदा केशदान करणे पुरेसे असावे; नंतर विधवेने विद्रूप दिसणेच सोयीचे ठरल्याने तिने कायम केशवपन करत राहणे सुरू झाले असावे. मिताक्षरा आणि अपरार्क ह्यांनी ह्याविषयी काहीही सांगितलेले नाही.

 

धर्मशास्त्राच्या इतिहासात नोंदवले आहे की, ‘इ. स. च्या १४ व्या शतकात झालेल्या मदनपारिजात ह्या निबंधग्रंथात स्कंद पुराणातील ‘विधवा कबरी वंधो...’ श्लोकाचा उल्लेख आला आहे, त्यावरून ही रूढी त्या काळाच्या पूर्वी निदान काही शतके प्रचारात आली असावी. पुष्कळशा नियमांत विधवांना यती (संन्याशी) सारख्या मानीत आणि यती आपल्या केसांचे मुंडण करीत त्यावरून विधवांनीही वपन केले पाहिजे असे क्रमाक्रमाने धरले गेले. त्यांना कुरूप करण्यात त्या सदाचरणी राहाव्या असाही हेतू असावा. बुद्धधर्मातील आणि जैन धर्मातील भिक्षुणींवरूनही ही क्रूर रूढी सुचली असावी.” (धर्मशास्त्राचा इतिहास; पूर्वार्ध; पृ. २३६.२३७ )
रंगीत कपडे परिधान न करण्याच्या अटीचे स्वरूप आता थोडे सौम्य झाले असून विधवा स्त्रियांनी फिकट रंगाचे कपडे घालण्याची सवलत दिली जात असते; मात्र लाल-हिरव्या रंगाचे सौभाग्यालंकार अर्थातच त्यांच्यासाठी आजही वर्ज्य आहेत. साधी फुले वा फुलांचा एखादा गजरा केसांत माळलेली विधवा स्त्री दिसणेही आजही दुरापास्तच आहे. आपल्याला अजून पुष्कळ सुधारायचं आहे, हाच याचा अर्थ.

 

kavita.mahajan2008@gmail.com

 

बातम्या आणखी आहेत...