आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदलतं मनोरंजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या काळात आपण बाल्यावस्थेतून कुमारावस्थेत जातो, आणि नंतर तारुण्याकडे प्रवास करतो, त्या काळातल्या आठवणी मनात फार खोलवर रुजलेल्या असतात. या काळातील आपले आदर्श, आपले आवडते नावडते शिक्षक, आवडणाऱ्या कविता, धडे, लेखक, शाळा, शेजारी, सिनेमे, नटनट्या, गाणी आपल्या संवेदनक्षम मनावर इतकी वैविध्यपूर्ण कलाकारी करतात की, कदाचित त्यामुळेच आपण कसे घडलो आहोत याचा साक्षात्कार आपल्याला होतो.


सांगायचं काय की, एसएससी ते लग्न हा आमच्या आयुष्यातील तथाकथित तारुण्याचा काळ. त्या काळात पाहिलेल्या सिनेमांनी आमची मती चक्क गुंग केली होती. त्या काळातील फॅशनप्रमाणे आम्हालाही फक्त जुने सिनेमे आवडत होते. ‘आजकाल काय तो धांगडधिंगा असतो नुसता,’ हे त्रिकालाबाधित वाक्य मनावर कोरलं गेलं होतं. आमचं हिंदी जेव्हा ‘मैं हँू, हम हैं’ ची कवायत करत होतं, तेव्हा आईनं आम्हाला ‘सती सावित्री’ नामक हिंदी सिनेमा दाखवला होता. आईने सावधपणाने आधीच वटसावित्रीची गोष्ट सांगून सिनेमाच्या मधे मधे होणारे वेल्हाळ आणि अमीट संवाद थांबवण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात न बोलण्याचा दमही भरला होता. त्यामुळे कल्पनेने चित्रावरून डायलाॅग्ज रचत सिनेमा पाहिला होता. आईच्या रडण्यानं जीव कातावला होता. पण तरीही त्या वयातसुद्धा लताबाईंच्या आवाजातल्या ‘तुम गगन के चंद्रमा हो,’ ‘जीवन डोर तुम्ही संग बांधी’सारखी गाणी त्यावेळी जी डोक्यात बसली ती आजतागायत डोक्यात आहेत.


मीनाकुमारी, नूतन, वैजयंतीमाला, नर्गिस, मधुबाला, वहिदा, यांचा कृष्णधवल जमाना अख्खा काळजावर कोरला गेलाय. हलकेफुलके विनोदी सिनेमे असोत, डिटेक्टिव्ह सिनेमे असोत की, दर्दभऱ्या कथा; त्या सिनेमांनी आमचा कब्जा घेतलेला असायचा. थिएटरमधुन बाहेर पडल्यानंतरही बराच वेळ एक एक सीन डोळ्यांसमोरून जात असायचे. सुंदर चालींतील गाणी सहज मुखोद्गत व्हायची. 


मग लग्न, मुलं, घर, आणि घरासोबत येणारी व्यवधानं, यात आमचा सिनेमा मागे पडला. नंतर सहकुटुंब पाहता यावेत, आणि मुलांवरही  संस्कार (?) घडावेत, अशा अनेक हेतूंनी अनेक सिनेमे पाहिले. यात मुख्यत: निखळ मनोरंजन करणाऱ्या सई परांजपेंचे चित्रपट, सौंदर्यापेक्षा अभिनयाचा दिमाख मिरवणारे काही आशयघन समांतर सिनेमे तसेच अमोल पालेकर अभिनित सामान्य तरुणांशी नाळ जुळलेले असे अनेक सिनेमे येतात. या साऱ्या उलाढालीत विनोद न करता घडणारे विनोद आमच्या मुलांना कळायला लागले. सिनेमा मनोरंजन या विषयातली आमच्या मुलांची समज वाढली, विचार वाढले आणि चांगल्या अभिरुचीकडे जाणारी मुले पाहून आम्ही तृप्त झालो. 


आता आमचीही वयं झाली. अाजकालही उत्तम सिनेमे निघतात म्हणे, पण इतकं जुनं आवडणाऱ्या आमच्या ते पचनी पडत नाहीत. ‘कट अँड पेस्ट’च्या जमान्यात आठआठ तास रिहर्सल करून गाणी म्हणणं होत नाही. पाश्चिमात्त्य चालीत आणि बीट्सच्या गोंधळात शब्द हरवतात. भावना शोधाव्या लागतात. काळाबरोबर बदलायला हवंच. यात काम करणाऱ्या पिढीचा दोष नाही. दोष आमच्या मनाचा आहे. आम्हाला प्रेमाला प्रेम, विरहालाच विरह, सुखाला सुख आणि दु:खालाच दु:ख म्हणून पाहायची सवय आहे. आता वेगामुळे प्रसंग एकावर एक आपटल्यासारखे वाटतात. भावनांची मिसळ झाल्यासारखी वाटते. असो. आता टीव्हीचे चॅनल फिरवत बसून आपल्या योग्य काही हाती लागतंय का, हे शोधणे एवढीच गोष्ट हातात आहे.


- लता कुलकर्णी, सोलापूर

बातम्या आणखी आहेत...