आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सजीव जन्‍माचा रंजक सोहळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादेत जानेवारी महिन्यात झालेल्या अखिल भारतीय वैदिक परिषदेत केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी चार्ल्स डार्विनच्या उत्क्रांतीवाद सिद्धांतावर आक्षेप घेतला होता. सत्यपाल यांनी  निर्माण केलेल्या वादाला ४० वर्षांपासून सूक्ष्मजीवशास्त्राचे अध्यापन करणारे डॉ. रंजन गर्गे यांचे  "पृथ्वीवर पहिल्या जीवाचा अवतार' हे पुस्तक नेमके उत्तर ठरले आहे...


मी कोण आहे? मी आलो तरी कुठून? माझा इतिहास काय? माझे पूर्वज कोण? हाडामासांचा, धट्टाकट्टा, बुद्धिमान मानव आज पृथ्वीवर अधिराज्य गाजवतोय, पण माझे अस्तित्व काय आहे? मी मूळ पृथ्वीचाच की उपरा? दुसऱ्या ग्रहावरून तर आलेलाे नाही ना? या आणि अशाच अनेक रहस्यमयी प्रश्नांनी माणसाला कायम भांडावून सोडले आहे. काहींनी याची उत्तरे देताना धर्माचा आधार घेतला आहे. सूक्ष्मजीवशास्त्राचे अभ्यासक आणि विज्ञान साहित्य लेखक डॉ.रंजन गर्गे यांनी अर्थातच विज्ञानाचा आधार घेत "पृथ्वीवरील पहिल्या जीवाचा अवतार' या नव्या कोऱ्या पुस्तकात पृथ्वी जीवजन्माचा रंजक मागोवा घेतला आहे.
औरंगाबादेत जानेवारी महिन्यात झालेल्या आखिल भारतीय वैैदिक परिषदेत केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री सत्यपाल सिंग यांनी चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीवाद सिद्धांतावर आक्षेप घेतला होता. ‘आपल्या पूर्वजापासून ते आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये किंवा पुस्तकात वानरापासून मानवाची निर्मिती झाली असल्याचे कोणीच म्हटलेले नाही. यामुळे डार्विनचा सिद्धांत चुकीचा असून, तो अभ्यासक्रमातून काढून टाकला पाहिजे’, असे आग्रही आणि वादग्रस्त मत सत्यपाल सिंग यांनी मांडले होते.  सत्यपाल यांनी  निर्माण केलेल्या वादावर ४० वर्षांपासून सूक्ष्मजीवशास्त्राचे अध्यापन करणारे डॉ.रंजन गर्गे यांचे  "पृथ्वीवर पहिल्या जीवाचा अवतार' हे पुस्तक योग्य उत्तर ठरणार आहे. प्रस्तुत पुस्तकात १४ प्रकरणे असून, एक एक करत ते पहिल्या जीवाचे रहस्य उलगडत गेले आहेत.

 

पृथ्वीवर पहिला जीव कसा निर्माण झाला, हे जाणून घेण्यासाठी थोडाफार नव्हे तर तब्बल ४.५ अब्ज वर्षांपूर्वीपासूनचा इतिहास धुंडाळणे क्रमप्राप्त ठरते. मात्र, यातील अत्यंत तोकडा इतिहासच मानवाला ज्ञात आहे. सुुपरनाेव्हाच्या स्फोटातून सूर्यमाला अस्तित्वात आली. याचा एक घटक म्हणजे पृथ्वी. पृथ्वीचे थंड होणे, पृथ्वीवर पहिल्या पावसाचे आगमन, अवकाशात सेंद्रिय रसायनांची निर्मिती आणि पावसाच्या पाण्याच्या एका डबक्यात प्रजननक्षम अशा पहिल्या जीवाचे अवतरण, असे एक एक टप्पे घडत गेले. पुढे अनुकूलन प्रक्रियेद्वारे सरपटणाऱ्या जीवांनी पाण्यातून पृथ्वीवर पदार्पण करण्याचे धाडस केले. काहींनी अवकाशात भरारी घेतली. त्यातूनच जल, पृथ्वी आणि आकाश व्यापून टाकणारी जीवसृष्टी तयार झाली. हे सगळे ४.५ ते २.५ अब्ज वर्षात घडले.

 

पृथ्वीवरील पहिल्या जीवाची माहिती घेण्यासाठी महान शास्त्रज्ञ लुईस पाश्चर यांचा ‘बायोजेनेसिस’चा सिद्धांत  महत्वाचा ठरतो. या सिद्धांतानुसार जीवापासूनच जीवाची निर्मिती होते. अजैविक घटकांपासून किंवा दैवी चमत्कारातून जीवाची निर्मिती कदापीही शक्य नाही. पाश्चर हा सिद्धांत मांडत असतानाच "Life comes from life is true, within the known History of Earth' हे त्यांचे विधान काळाच्या पुढे नेणारे होते. या विधानाप्रमाणे बायोजेनेसिसचा सिद्धांत मानवाला पृथ्वीच्या ज्ञात असलेल्या इतिहासापर्यंतच लागू पडतो. यामुळे त्या पूर्वी काय झाले असावे? पृथ्वीवर पहिला जीव कसा निर्माण झाला, याबाबत अगदी २१ व्या शतकापर्यंत गूढ कायम आहे. त्यातूनच मग धर्ममार्तंडांनी ईश्वरी संकल्पनेचा आधार घेऊन विश्वनिर्मिती व जीवनिर्मितीच्या सिद्धांताला अगदीच सोपे करून टाकले. कोणी प्रेषित तर कोणी देवदेवतांचा घाट घातला. त्यातून पुराणकथा जन्माला आल्या. आताच्या विज्ञानयुगातही या संकल्पनांचे जाळे एवढे घट्ट आहे की, त्यातूनच अंधश्रद्धांना खतपाणी मिळतेय.

 

मग पृथ्वीवरील पहिला जीव कोणता? याचे उत्तर शोधताना आतापर्यंत दोनच गोष्टींवरती शास्त्रज्ञांचे मतैक्य झालेले आहे. एक म्हणजे कार्बन. कार्बन हा पृथ्वीवरील जीवाचा मूलाधार आहे. तर दुसरी बाब म्हणजे, स्वत:चीच प्रत (Self Replication) निमार्ण करण्याची क्षमता असलेला रेणू हा एका १०० ते १५० अॅमिनो अॅसिड्सच्या श्रृंखलेच्या रूपातील पॉलिमर असावा. तिसरा आणखी एक सशक्त मतप्रवाह वर्षानवर्षे शास्त्रज्ञांना विचार करण्यास भाग पाडतो. तो म्हणजे, माणूस पृथ्वीवर उपरा असणे. परग्रहावरून आलेल्या जीवाचे बीजारोपण झाले आणि त्यातून आजच्या मानवाची निर्मिती झाली. अंटार्क्टिकावर सापडलेल्या मंगळावरील अश्नीमुळे मानव हा मंगळाचा निवासी असावा आणि नंतर पृथ्वीच्या मातीत रूजला, असा सिद्धांतही मांडला जातो. याबाबत अनेक पुस्तके लिहिली गेली आहे आणि हॉलिवूडपटही प्रदर्शित झाले आहेत. आता मानव मंगळावर कायमची वस्ती करण्यास सज्ज झाला आहे. तरी हे गूढ पूर्णपणे उलगडलेले नाही. यापूर्वी डॉ.सुरेशचंद्र  नाडकर्णी यांनी ‘पृथ्वीवर माणूस उपराच!’ आणि ‘अज्ञाताचे विज्ञान’ तर बाळ भागवत यांनी ‘देव? छे! परग्रहावरील अंतराळवीर!’ अशा पुस्तकातून पृथ्वीवरील जीवाचे रहस्य  उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ.रंजन गर्गे यांचे पुस्तक पहिल्या जीवाच्या उत्पत्तीचे विज्ञान रंजक पद्धतीने सांगत जाते.

 

विज्ञानातील इंग्रजीतल्या टर्मिनॉलॉजीला मराठीत अचूक शब्द सापडत नाही. यामुळे विज्ञान विषयावरील लिखाण  बऱ्याचदा शैक्षणिक अंगाने जाण्याची भीती असते. प्रादेशिक भाषेत ही शक्यता अधिक असते. मात्र, डॉ.गर्गे हे राज्य मराठी विकास संस्थेचे विज्ञान सदस्य आहेत. शिवाय ते राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळात सूक्ष्मजीवशास्त्र ज्ञान मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. यामुळे पुस्तक अधिकाधिक सोप्या आणि सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत लिहिण्यात त्यांना यश आले आहे. अखेरीस त्यांनी स्पष्टीकरण कोष दिला असून यात इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ, व्याख्या मांडल्या आहेत, हे या पुस्तकाचे वैशिष्ट म्हणावे.


- पुस्तकाचे नाव : पृथ्वीवर पहिल्या जीवाचा अवतार
- लेखक : डॉ.रंजन गर्गे
- प्रकाशक : परम मित्र प्रकाशन, ठाणे
- पृष्ठ : १४८, मूल्य : २०० रुपये

 

mahitri@gmail.com

 

बातम्या आणखी आहेत...