आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक-विद्यार्थी मित्रा अॅप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंजूषा स्वामी पदवीधर असून त्यांनी तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण घेतलेले आहे. जिल्हा स्तरावर तंत्रज्ञानाविषयी  प्रशिक्षण दिलेले आहे. त्यांचा ब्लाॅग आहे, शिक्षणाविषयीचं यूट्यूब चॅनलही आहे. त्यांनी गणित, पाढे शिकण्यासाठी ३० अॅप्स विकसित केली आहेत. त्या काही शैक्षणिक अॅप्सविषयी माहिती देणार आहेत.


जागतिक स्तरावर तंत्रज्ञानाचा वाढता उपयोग पाहता आता  शिक्षण क्षेत्रातही तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ लागला आहे. बदलत्या  काळानुसार शिक्षण पद्धतीत बदल होत गेलेले आहेत. महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग सुरू आहेत. प्रधान शिक्षण सचिव नंदकुमार व शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व एक स्टेप कम्युनिटी टीम, विद्या प्राधिकरण, पुणे व राज्यभरातील उत्कृष्ट तंत्रस्नेही शिक्षकांच्या सहकार्याने तयार झालेल्या मित्रा अॅपविषयी माहिती घेऊ. या अॅपमध्ये पहिली ते पाचवी वर्गांचा शालेय पाठ्यपुस्तकातील प्रत्येक वर्ग, विषय, पाठनिहाय दर्जेदार अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. हा मोफत उपलब्ध आहे. इयत्ता सहावी ते आठवी याही वर्गांच्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम लवकरच अॅपवर येणार आहे.


अॅप डाउनलोड कसे करावे?
https://play.google.com/store/apps/details?id=net.mavericklabs.mitra या लिंकवरून मित्रा अॅप डाउनलोड करू शकतो किंवा प्ले स्टोवर MITRA –MAA Teacher App [beta] या नावाने ते उपलब्ध आहे. डाउनलोड केल्यानंतर भाषा निवडून रजिस्ट्रेशन करावे लागते. रजिस्ट्रेशन केल्यानंतर दिलेल्या मोबाइल नंबरवर OTP येतो. आलेला OTP टाकल्यावर अॅप आपल्यासाठी सुरू होते.


मित्रा अॅपची गरज
राज्यातील अनेक शाळा डिजिटल झालेल्या आहेत. काही दिवसांत जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजिटल होतील यात शंका नाही. पण विद्यर्थ्यांना ई-लर्निंगचा नेमका कोणता अभ्यासक्रम दाखवावा या संभ्रमात काही शिक्षक आहेत. बाजारात काही महागडी साॅफ्टवेअर आहेत, परंतु ती न परवडणारी आहेत. अनेक तंत्रस्नेही शिक्षक बंधुभगिनी खूप छान शैक्षणिक साहित्य तयार करतात; पण यांना एक मंच मिळावा, यासाठी मित्रा अॅपचा उपयोग होईल. 


मित्रा अॅपमधल्या महत्त्वाच्या बाबी
शैक्षणिक साहित्य शोधा
नवीन काही शिकूया
उपलब्ध प्रशिक्षणे पाहा
शिक्षकप्रिय शैक्षणिक साहित्य
शिक्षक प्रिय स्वयं अध्ययन व्हिडीओ
बातम्या आणि परिपत्रके


शैक्षणिक साहित्यामध्ये वर्ग विषय टाकून आपणास ज्या वर्गाचा विषयाचा अभ्यासक्रम हवा तो आपण विद्यार्थ्यापर्यंत पोहचवू शकतो. नवीन काही शिकूया यात इंग्रजी मराठी संवाद दिलेले आहेत, यामुळे विद्यार्थी स्वयं अध्ययन करू शकतो. ज्या त्या महिन्यानुसार उपलब्ध असलेल्या प्रशिक्षणाबाबत माहिती पाहू शकतो. अनेक शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे. त्याचबरोबर बातम्या व परिपत्रके याचाही समावेश आहे. अशा प्रकारे हे अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षक, अधिकारीवर्ग व शिक्षण विभागास निश्चितच दिशा देणारे ठरेल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


- मंजूषा स्वामी, उस्मानाबाद
manjushaswami1975@gmail.com