आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेरोजगारीच्‍या विळख्‍यात अडकलेली 'ती'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमपीएससी, यूपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सध्या प्रचंड असंतोष धुमसतोय, कारण जागा कमी आणि परीक्षार्थी प्रचंड. या परीक्षा देणाऱ्या मुलींची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. मुली या परिस्थितीला कसं तोंड देतात, घरच्यांना काय वाटतं, याचा हा अस्वस्थ करणारा लेखाजोखा.


स रकारी नोकरी म्हणजे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचा मार्ग, तसेच प्रशासनात काम म्हणजे सत्तेत स्थान. स्पर्धा परीक्षा पद्धती आणि शासकीय नोकरी या व्यवस्थेचा संबंध सत्ता व्यवहाराशी आहे आणि सत्ता व्यवहार पुरुषांशी जोडलेले असतात. त्यामुळे अशा व्यवस्थेत स्थान मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर संघर्ष अटळ असतो. मुलींना उच्च शिक्षणासाठी मिळालेला दोनतीन वर्षांचा काळ आज लायब्ररीच्या बाकड्यांवर पुस्तकांची पानं झिजवण्यात जात आहे. या वेळात जिथं प्रवेश घेतला आहे तेही शिक्षण नीटसं पूर्ण करता येत नाही आणि इतका घासून अभ्यास केला तरी दोनतीन वर्षांत कोणतीच पोस्ट निघत नाही, हाती काहीच लागत नाही. घरापासून दूर, लग्न टाळत राहणं फार दिवस शक्य नसतं. खूप कमी मुलींना लग्नानंतर पुन्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याची संधी मिळते.

 

या प्रश्नामागची दाहकता समजून घेण्यासाठी उच्च शिक्षण घेणाऱ्या व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या काही तरुणींशी संवाद साधला असता समोर आलेलं वास्तव मांडतेय.
सांगलीची आरती म्हेत्रे, बीटेक आहे. इंजिनिअरिंगमध्ये नोकऱ्या नाहीत आणि असल्या तरी सुरक्षित वातावरण आणि शाश्वती नाही, त्यामुळे तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. पुण्यातले क्लासेस केले तर दोन वर्षांत पोस्ट निघेल, या आशेने आली होती. पाच वर्षं अभ्यास करून २०१६मध्ये पीएसआय परीक्षा पास झाली, पण अजून कामावर रुजू करून घेतलं नाहीये. सध्याचं वातावरण बघून ती पुन्हा परीक्षा देतेय. म्हणाली, ‘घरच्यांनी एक वर्षाची मुदत दिली आहे.  स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यात पाच वर्षं गेलीत, आता इंजिनिअरिंगचा अभ्यास विसरून गेलेय. इतक्या गॅपनंतर खासगी कंपनीतही नोकरी मिळणं अवघड आहे. पाच वर्षांत खूप खर्चही झालाय. यंदा जागा निघणार असं म्हणतात सगळे, पण नाही निघाल्या तर यंदा रिकाम्या हाताने गावी परत कसं जायचं, याचं दडपण आलंय.’


प्राजक्ता कराडजवळच्या माण गावातली आहे. तिचं लग्न होऊन दोन महिने झालेत. विज्ञान  शाखेत गणित विषय घेऊन ७० टक्के गुण मिळाल्याने सासरच्यांनी एका नामवंत क्लासमध्ये बँकिंगचा अभ्यास करण्यासाठी एक लाख रुपये फी भरून तिचा प्रवेश निश्चित केला आहे. तिला आणि तिच्या घरच्या लोकांना बँकिग क्षेत्रातील अभ्यासाचा आणि नोकरीच्या स्पर्धेचा काहीच अंदाज नव्हता, त्यामुळे तिला येणारा ताण वेगळाच होता. एवढी फी भरल्याचा ताण, त्यात वैवाहिक जबाबदाऱ्या. गावातील लोक मोठ्या आशेने बघतात. सुनेला पुण्याला पाठवल्याचं कौतुक करतात. पण या दीड वर्षांत तिने एकदाच खाजगी बँकेची परीक्षा दिली आहे. तिला वाटतंय, हा अभ्यास तिला झेपणारा नाही. सासरचे सतत निकालाबद्दल विचारतात. ती अस्वस्थ होऊन जाते, खरी परिस्थिती सांगण्याचं धाडस तिच्यात नाही.
‘तुझी मोठी परीक्षा कधी आहे? अजून कशी आली नाही? अजून किती दिवस राहणार? असं घरातले फोनवर विचारतात, काय उत्तर देऊ तेच कळत नाही,’ सुनीता कांबळे सांगत होती. ती मूळची बीडची, पण १५ वर्षांपूर्वी रोजगारासाठी तिचं कुटुंब मुंबईत विस्थापित झालं. आईवडील गवंडीकाम करतात. पदवीला प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. आतापर्यंतचं शिक्षण खूप कष्ट करून मिळवलंय, त्यामुळे स्पर्धा परीक्षा पण पास होईल, असा विश्वास तिला होता. पुण्यात आल्यावर इथल्या मुलामुलींची परिस्थिती बघून तिला अस्वस्थ व्हायला होतं. दोन वर्षं झाली, अभ्यास करतेय. हुशार असल्यामुळे शिक्षक, मित्र, घरचे पैसे पाठवतात. पण आता वडील सतत म्हणतात ‘परत ये. वय झालंय, लग्न ठरवू या. सासरी जाऊन काय ते कर.’ पण सुनीताला नोकरी करायचीच आहे. स्पर्धा परीक्षा नाही तर मग दुसरा पर्याय नाही, असं तिला वाटतंय, त्यामुळे ती अजून अठरा तास अभ्यास करते.

 

मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांशी संवाद साधला, तर अनेक मुलांचं म्हणणं होतं की, ‘मुलींचं काय, तीनचार वर्षं प्रयत्न करतात, नाही नोकरी मिळाली तर लग्न करून मोकळ्या होतात. आमच्याकडे तो पर्याय नाही, उलट आम्हाला नोकरी नाही लागली तर लग्नासाठी मुली देत नाहीत.’
‘मला चांगल्या पगाराची नोकरी करायची आहे. आज पदवीच्या पुढं शिकणारी माझ्या गावातली मी पहिली मुलगी आहे. एमए करून मला काय नोकरी लागेल? आमच्या गावात सेट, नेट झालेले बरेच जण घरी बसून आहेत. अभ्यास करून मला क्लार्कची तर नोकरी लागेल ना!’ प्रियांका सांगत होती. प्रियांका झिने अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव माळवी या छोट्या गावातून आली आहे. शिक्षकांनीच सुचवलं त्यामुळे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी तिला पुण्याला पाठवायला घरचे तयार झाले. इथं आल्यावर ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू लागली. पण सतत पुस्तकं, मासिकं यांचा खर्च परवडत नाही. ‘सारखं पुस्तकांना किती पैसे द्यायचे, तुझं शिक्षण परवडत नाहीये, आता बस कर,’ असं कधीकधी वडील म्हणतात.

 

प्रियांकाला पुण्यात येऊन दीड वर्ष झालं, पण होस्टेल ते लायब्ररी याच्या व्यतिरिक्त पुण्यात काय आहे याचा गंधदेखील तिला नाही. ‘चार वेळा राज्य सेवेची मुख्य परीक्षा दिली आहे. वय आणि वेळ निघून गेलीय असं वाटतंय. घरी लग्नाची बोलणी सुरू आहेत. काय केलंस पुण्यात, असं विचारतात सगळेजण. डोक्यात मुंग्या येतात, अभ्यास करून डोळे कोरडे पडले आहेत. सगळ्यांना रिजल्ट हवा आहे. माझ्या अभ्यासाला, मेहनतीला शून्य किंमत आहे.’
‘अजून किती दिवस लागतील माहीत नाही पण नोकरी नाही आणि लग्न कसं करू? करिअरचा नवीन पर्याय शोधायचा ठरवलं तर आधी पदवीपर्यंत शिक्षण त्यानंतर चार वर्ष शिक्षणाचा खर्च घरचे करत आहेत. आता पुन्हा शिक्षणाची नव्याने सुरुवात करावी लागेल. चारपाच वर्षं पालकांनी केलेली इन्व्हेस्टमेंट वाया घालवून नव्याने पुन्हा सुरुवात कशी करायची?’ प्रगती नाजरेकर सांगते, ती सातारा जिल्ह्यातून आली आहे.

 

‘स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि शालेय अभ्यासक्रम दोन्ही पूर्णपणे वेगळे आहेत. पदवीपर्यंत शिक्षण झाल्यावर पुन्हा स्पर्धा परीक्षेचा नव्याने अभ्यास करून स्वतःला तयार करण्यातच एकदोन वर्षं निघून जातात. शैक्षणिक व्यवस्थेने आमची मोठी फसवणूक केली आहे. त्यात मुलींना आर्थिक भार जास्त सोसावा लागतो. मुलींची जबाबदारी, सुरक्षिततेचा प्रश्न असतो म्हणून राहण्यापासून सगळं महाग. त्यात आम्ही स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी चांगलं मार्गदर्शन मिळेल म्हणून मोठ्या शहरात येतो. पण इथेही अभ्यासिकांच्या वेळा, उपलब्ध सुविधा मुलींना कमी आहेत. पण गावी मुलीचं लग्नाचं वय झालं म्हणून समाजाकडून अपमान आणि आमचा आर्थिक खर्च आई-वडिलांना सहन करावा लागतो याचाही मानसिक ताण असतोच,’ बुलढाण्याहून आलेली भाग्यश्री सांगत होती. ती तीन वर्षांपासून अभ्यास करतेय.

 

‘ज्यांच्याकडे पैसे आणि वेळ आहे त्यांनीच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा, आता हे क्षेत्रही मध्यमवर्गीयांसाठी उरलेले नाही आणि त्यातल्या त्यात मुलींनी तर या फंदात पडूच नये, असं नेहा आंबिले निराशेने सांगते. तिनं यात पाच वर्षं घातलीत. तीन वेळा राज्य सेवेची मुख्य परीक्षा दिली होती. आता लग्न झालंय, गृहिणी आहे. आता अभ्यासही होत नाही आणि इतकी मेहनत करून हाती काहीच न लागल्यामुळे दुसरं काही करण्याची इच्छा नाही होत.
‘आमच्यात मुलींना शिकवलंच जात नाही. मुलीचं अठराव्या वर्षी लग्न लावून देतात, अशा समाजातून मी आलेय. दहावीला बोर्डात आले त्यामुळं मला पुढचं शिक्षण दिलं गेलं. गावात बारावीपर्यंत कॉलेज होतं, पुन्हा मी बारावीत बोर्डात आले. त्यानंतर परगावी शिक्षणासाठी मुलींना पाठवण्याची आर्थिक आणि सामाजिक क्षमता माझ्या घरच्यांकडे नव्हती त्यामुळे मी पदवीपर्यंतचे शिक्षण मुक्त विद्यापीठातून पूर्ण केलं. डीएड केलं. घरच्यांना विश्वास वाटतो मी अधिकारी होईन, मलाही वाटत होतं. दिवसातले अठरा तास अभ्यास केला, पीएसआयची मुख्य परीक्षा पास झाले. शारीरिक चाचणीमध्ये दोन गुण कमी मिळाले. आता घरच्यांना वाटतं, मी पास होईन. ते सतत विचारत असतात. आता घरी जाणंही टाळते मी. मला आता एक वर्षाचा वेळ आहे पण भरतीच निघत नाही. सरकारी नोकरी लागली नाही तर लग्न करून घरीच राहावे लागेल. नोकरी लागणं खूप महत्त्वाचं आहे. माझी नोकरी फक्त माझ्यासाठी नाही, तर माझ्या समाजातील मुलींसाठी शिकण्याची, नोकरी करण्याची एक उमेद आहे,’ समिना मणेर सांगते, ती नगर जिल्ह्यातल्या सलाबतपूर तालुक्यातून आली आहे.


बेटी बचाओ, बेटी पढाओसारख्या पोकळ योजना शासनाकडून राबवल्या जातात. खासगी असो किवा सरकारी क्षेत्र,  शिकलेल्या मुलींना रोजगार आणि काम करण्यास पोषक वातावरणच निर्माण केले जात नाही. त्यामुळे अनेक मुली गृहिणी म्हणून राहतात, तर उच्चशिक्षित मुली अगदीच कमी वेतनावर काम करतात. मुलांना रोजगार मिळणे जितके आवश्यक आहे तितकाच मुलींच्या रोजगाराचा प्रश्नदेखील मोठा आहे.
- किरण मोघे (स्त्रीवादी विचारवंत)


बेरोजगारीच्या प्रश्नांची चर्चा करताना फक्त मुलांचा विचार केला जातो हे आपल्या पुरुषप्रधानतेचे लक्षण आहे. ज्या शासकीय योजना राबवल्या जातात त्यादेखील पुरुषकेंद्रित असतात त्यामुळे शासन पातळीवर महिलांच्या रोजगाराचा विचार करत असताना फक्त महिलांसाठी आरक्षण देणे पुरेसे नाही, तर विशेष धोरणांची, योजना राबवण्याची गरज आहे. आर्थिक उत्पादनात त्यांचा सहभाग वाढवणे गरजेचे आहे.
- डॉ. भालचंद्र मुणगेकर (अर्थतज्ज्ञ)

 

minalatkar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...