आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधाभासी वागणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकाच अंकात वटपौर्णिमेवरची कविता आणि विधवा दिनानिमित्त लेख हा विरोधाभास वाटू शकतो. परंतु, हा विरोधाभासच जणू भारताची एक ओळख बनून गेला आहे. राजकीय पक्षांच्या प्रमुखपदी महिला आहेत (सोनिया गांधी, मायावती, ममता बॅनर्जी, इ.) पण मतदार यादीत सोडा, रेशन कार्डांवर अद्याप हजारो महिलांची नावं नाहीत. देशाची संरक्षणमंत्री एक महिला आहे, पण सर्वसामान्य महिला अनेक गावाशहरांमध्ये असुरक्षित जीवन जगताहेत. अनेक बँकांमध्ये उच्च पदांवर महिला कार्यरत आहेत पण हजारो कमावत्या महिलांना त्यातला एक पैसा खर्च करण्याचा अधिकार घरातली पुरुष मंडळी देत नाही. (न कमावणाऱ्यांचे हाल वेगळेच.) पर्यावरणदिनी पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा घेणाऱ्याच वडाची फांदी तोडून तिची पूजा करून वटपौर्णिमेला जन्मोजन्मी हाच पती मिळो, अशी प्रार्थना करतात. पण नवरा दारुड्या असो की काहीही न कमावणारा, तो मेला की बायकोचं स्थान घरात अगदी तळाशी घसरतं. अर्थात विधवांवर अशी परिस्थिती येऊ देणारे आपण भारतीय एकटे नाहीत. अनेक देशांमध्ये हेच वास्तव आहे.  विधवांना मिळणारी भेदभावाची, तुच्छतेची वागणूक समाजाच्या सर्व थरांमध्ये दिसते. आर्थिक उत्पन्न, जात, धर्म, प्रदेश, भाषा अशा कोणत्याही घटकाचा या वागणुकीवर परिणाम होत नाही. काही कुटुंबांमध्ये ही वागणूक अगदी स्पष्ट दिसते, तोंडावर बोलून दाखवलेली असते; तर काही ठिकाणी ती अगदी सौम्य पद्धतीची, छुपी असते, फक्त त्या व्यक्तीलाच कळेल अशी बोचरी असते. सोसायटीत, मोहल्ल्यात, कार्यालयात, समारंभांमध्ये अशा व्यक्तींना वेगळी वागणूक मिळण्याचीच शक्यता अधिक असते. नवऱ्याच्या संपत्तीत वाटा न देणं, हेही अगदी मोठ्या प्रमाणावर होणारं. अगदी पुढारलेल्या, सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीही विधवांना असं वागवताना पाहिलं की, अचंबित होतो आपण. काय शिकलात नक्की, असं विचारावंसं वाटतं. 


या सगळ्याच्या मुळाशी बाईची प्रतिष्ठा एका पुरुषाशी जोडली जाण्याचा संबंध आहे. नवरा आणि मुलगा या दोन पुरुषांच्या असण्या/नसण्यावर बाईचा सन्मान अवलंबून असतो, तिची ओळख त्या संदर्भातच तयार होते. हे सगळं एकविसाव्या शतकाच्या अठराव्या वर्षात आपण अनुभवतोय, हेच दुर्दैवी आहे.
- mrinmayee.r@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...