आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहासाची सफर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात एक अप्रतिम प्रदर्शन महिनाभर सुरू आहे. India and the world: A history in nine stories. भारत आणि विश्व, नऊ कहाण्यांमधनं सांगितलेला इतिहास असं याचं नाव आहे. एकच घटना वा एकच शोध, पण तो जगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी लागला. उदा. शस्त्रं, मातीची भांडी, कालमापन, इ. भारत या सगळ्यात कुठे होता आणि भारतात काय सुरू होतं, याचा काहीसा अंदाज या प्रदर्शनातनं येतो. शेतीचा शोध लागल्याने नक्की काय झालं, मातीची भांडी करायला माणूस शिकल्याने त्याच्या आयुष्यात काय फरक पडला, भारताचा उर्वरित जगातील माणसांशी कसा व कधीपासून संबंध होता, हे आणि इतर बरंच काही या प्रदर्शनातनं पाहायला मिळतं. ग्रीक लोक ज्याला महासागरांचा देव मानतात, त्या पाॅसायडनचा, इसवी सन पूर्व एक शतक ते इसवी सन पहिले शतक या काळातला, पुतळा महाराष्ट्रात कोल्हापुरात सापडलेला आहे. अकराव्या शतकात इजिप्तमध्ये भारतातून वेगवेगळी कापडं जात होती. त्याचे काही तुकडे यात पाहायला मिळतात. राणी एलिझाबेथचा एक छोटासा आफ्रिकन कलाकाराने केलेला पुतळा आहे. त्याची गंमत अशी आहे की, त्याने आफ्रिकन परंपरांनुसार राणीचे पाय अतिशय नाजूक तयार केले, त्यावर छानसे बूटही चढवले. परंतु राणीच्या अधिकृत चित्रांमध्ये वा पुतळ्यांमध्ये तिचे पाय दाखवले जात नाहीत, त्यामुळे या कलाकाराने राणीचा झगा लांब केला आणि ते पाय झाकून टाकले. या प्रदर्शनात उत्तम चित्रंही आहेत. दागिने आहेत. एकुणात हे प्रदर्शन मनुष्यप्राण्याच्या काही लाख वर्षांच्या प्रवासाची आपल्याला सफर घडवून आणते. आफ्रिकेत पहिला मानव जन्माला आला, काही लाख वर्षांपूर्वी. तेव्हापासून आजवर आपण कसे विकसित होत गेलो, राज्यं कशी तयार झाली, वाढली, विज्ञानाचा हात धरून आपलं जीवन कसं सुसह्य होऊ लागलं, ते सगळं पाहणं हा एक विलक्षण अनुभव आहे. नवीन वर्षाची सुरुवात अशी भूतकाळात डोकावून, परंतु भविष्यकाळाकडे नजर ठेवून झाली आहे. मधुरिमाच्या सर्व वाचकांनी हा अनुभव घ्यावा असं प्रकर्षाने वाटलं, म्हणून हे लिहिलंय.


- मृण्मयी रानडे, मुंबई
mrinmayee.r@dbcorp.in