आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाली बाई शाळा सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अगदी दहापंधरा वर्षांपूर्वीपर्यंत, वार्षिक परीक्षा संपण्याची तारीख होती १३ एप्रिल आणि नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची तारीख होती १३ जून. विदर्भात उन्हाळ्यामुळे ही तारीख थोडी पुढची असते. तो काळ होता राज्यभर राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा असण्याचा, म्हणजे एसएससी बोर्डाचा. गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या परीक्षा मंडळांना शाळा संलग्न होऊ लागल्या आणि शाळांचं वार्षिक सत्र सुरू होण्याच्या व संपण्याच्या तारखा वेगवेगळ्या झाल्या. एसएससीच्या शाळा अजूनही हेच वेळापत्रक पाळतात. बाकी कोणाला मार्चमध्ये सुटी, एप्रिलमध्ये शाळा नि परत मेमध्ये सुटी. तर काही शाळांना १५ जूनला वार्षिक सुटी लागते. या सगळ्यात मुलांच्या खेळण्याचा, मित्रमैत्रिणी एकाच वेळी मोकळ्या असण्याचा प्रश्न निर्माण होतो. शिबिरांत वगैरे घालायचं तर तारखा जुळत नाहीत. कोणाकोणाच्या तर परीक्षांच्या वेळी इतरांच्या सुट्या चालू असतात. आता या सगळ्याला आपण रुळलोय. पण यामुळे काही काळाने उन्हाळ्याची सुटी ही संकल्पनाच बदलून जाईल, यात शंका नाही.

 

आता बऱ्याच शाळा सुरू झाल्या आहेत, वा आजउद्या होतील. पालकांनी एक मोठ्ठा निश्वास सोडला असेल त्यामुळे. जरी त्यामुळे लवकर उठणं, मुलांना वेळेवर उठवणं, तयारी करणं, डबे देणं, क्लासला आणणंपोचवणं ही कामं पुन्हा सुरू होणार असली, तरी एक नेहमीचा सवयीचा दिनक्रमही सुरू होणार असतो. तसंच दिवसभर मुलांचा वेळ कसा जाणार, याची चिंताही मिटणार असते. घर काही तास तरी मोकळं, शांत मिळणार असतं. पालकांना, खासकरून आईला, असा वेळ मिळणं कठीण असतं, पण आवश्यकही.
जून महिना पावसाचा. शाळा सुरू होण्याचा. नवीन पुस्तकांचा. नवीन शिकण्याचा. नव्या आव्हानांना सामाेरं जाण्याचा. पण हे करताना या आव्हानांचं ओझं होऊ न देण्याची जबाबदारी पालक आणि शिक्षकांची. दहावीचं वर्ष असेल वा बारावीचं, तो आपल्या आयुष्याचा एक सर्वसाधारण भाग अाहे, हे मुलांना समजावून तसं वागण्याची कामगिरी त्यांनी पार पाडायला हवी. पावसानंतर झाडं तरारून उठतात, त्यांच्या हिरव्या पानांना तजेलदार झळाळी येते, त्याच तजेल्याने जगण्याचा धडा आपण आपल्या आसपासच्या तरुणवर्गाला द्यायला हवा.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा छोट्या दोस्तांना, त्यांच्या पालकांना आणि मोलाची भूमिका निभावणाऱ्या शिक्षकवृंदाला.


mrinmayee.r@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...