Home | Magazine | Madhurima | Mrinmayee Ranade writes about 'mansplaining'

पण मी काय म्हणतो...

मृण्मयी रानडे, मुंबई | Update - Jul 24, 2018, 06:58 AM IST

बाळंतपणाच्या वेदना किती त्रासदायक असतात तुला माहीत आहे का, मला माहीत आहे, मी माझ्या बायकोसोबत होतो.

 • Mrinmayee Ranade writes about 'mansplaining'

  हा वाचक मैत्रिणींसाठी प्रश्न. तुम्हाला कधी असा अनुभव आलाय की, तुम्ही एखाद्या विषयात तज्ज्ञ आहात, त्या क्षेत्रात तुम्हाला खूप अनुभव आहे तरीही पुरुष सहकारी किंवा अवतीभवतीचे पुरुष तुम्हाला तोच विषय समजावतायत? तुम्ही काही बोलत असताना ते मध्येच तोंड खुपसतात, किंवा तुमच्या वर आवाज चढवून बोलतात; जेणेकरून पुढच्या वेळेस तुम्ही न बोलण्याचा निर्णय घेता? बायकांना कसं काहीच कळत नाही, पुरुषांना सगळ्या विषयातलं सगळं कळतं, अशा विचारातूनच असे प्रकार घडतात. हे घडत पूर्वीपासून आलं असलं तरी गेल्या काही वर्षांत याला mansplaining (man explaining) असं म्हणू लागले आहेत.


  काही वर्षांपूर्वी एका पार्टीत एका लेखिकेला एक माणसाने विचारलं, सध्या काय चाललंय. तिने नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या तिच्या पुस्तकाचं नाव सांगितलं, आणि पुस्तकाबद्दल सांगू लागली. पुस्तक एका कलाकाराबद्दल होतं. तर तो माणूस तिचं बोलणं अर्धवट तोडत त्या कलाकारबद्दल स्वत:च बोलू लागला. तिने कपाळावर हात मारून घेतला फक्त. यावर तिने नंतर एक लेख लिहिला. त्यावेळी एका कमेंटमधनं मॅन्सप्लेनिंग हा शब्द पुढे आला आणि मग तो डिक्शनरीतच जाऊन बसला. याचे महिलांना आलेले अनुभव वाचून हसायला येतं पण त्या पुरुषांची कींवही येते. उदा. एका कृष्णवर्णीय महिलेशी दूरचित्रवाणीवरील चर्चेत बोलताना एका गोऱ्या कलाकाराने हाॅलिवूडमध्ये कसा वर्णभेद नाही, असं मत व्यक्त केलं.


  याच अभिनेत्याने मीटू मोहिमेच्या दरम्यान, बायकांनी बलात्कार आणि छळ किंवा छेडछाडीतला फरक लक्षात घ्यायला हवा, कोणीतरी हात लावला म्हणजे काही बलात्कार झाल्यासारखं वाटून घेऊ नये, असं म्हटलं होतं. एका भारतीय लेखिकेला ट्विटरवर एका पुरुषाने म्हटलं की, बाळंतपणाच्या वेदना किती त्रासदायक असतात तुला माहीत आहे का, मला माहीत आहे, मी माझ्या बायकोसोबत होतो. हे व असं बरंच काही.


  चांगला भाग हा आहे की, आता काही पुरुषांच्या हे लक्षात येऊ लागलंय. आपण घरातल्या महिला त्यांना ज्यातलं अधिक कळतं त्याविषयी बोलत असताना, कार्यालयातल्या सहकारी त्यांच्या कामाबद्दल बोलताना तोंड खुपसतो, त्यांना काही कळत नाही, असं आपल्याला वाटत असतं, याची जाणीव पुरुषांना होऊ लागलीय.


  वर्षानुवर्षं हे असंच होत आलंय, त्यामुळे बायका हळुहळू बोलणंच टाळतात, चर्चेत सहभागी होत नाहीत, मागे मागे राहतात. त्यांचा अनुभव, कौशल्य, ज्ञान यांचा उपयोग करणं अशाने शक्यच होत नाही.
  आलेत का असे अनुभव तुम्हालाही?

  - मृण्मयी रानडे, मुंबई
  mrinmayee.r@dbcorp.in

Trending