Home | Magazine | Madhurima | Mrinmayee Ranade writes about plight of salesgirls

काउंटरमागचं ‘उभं’ जग

मृण्मयी रानडे, मुंबई | Update - Jul 31, 2018, 05:30 AM IST

वातानुकूलित शोरूममध्ये काम म्हणजे किती सुखाचं असं वाटत असतं अनेकांना.

 • Mrinmayee Ranade writes about plight of salesgirls

  वातानुकूलित शोरूममध्ये काम म्हणजे किती सुखाचं असं वाटत असतं अनेकांना. पण तिथल्या विक्रेत्यांना दिवसभरात पाच मिनिटं खाली बसण्याचीही मुभा नसते, मूलभूत सोयीसुविधांचाही अभाव असताे, हे ठाऊक नसतं. केरळ विधानसभेने नुकतीच अशी सुविधा देण्याविषयीची सुधारणा कायद्यात केली आहे, त्या निमित्ताने...


  गिन्यांच्या वा तयार कपड्यांच्या दुकानात काउंटरच्या मागे उभे असलेले विक्रेते/विक्रेत्या हे दृश्य आपल्या सर्वांच्या अगदी परिचयाचे. माॅलमध्ये हे विक्रेते/विक्रेत्या उभे तरी किंवा सामानाची व्यवस्था लावताना दिसतात. ते किती तास असं उभ्याने काम करत असतात, याचा विचार खरेदी करणाऱ्यांच्या मनात फारसा येत नाही. दहाएक तास असं सलग उभं राहून हा विक्रेतावर्ग काम करत असतो, याची जाणीव एखादी बातमी मात्र लख्खपणे करून देऊ शकते. “सलग पाच तास उभ्याने काम केल्यानंतर काही मिनिटं बसण्याची मुभा विक्रेत्यांना असावी,’ हा मुद्दा केरळ विधानसभेने राज्याच्या दुकान व आस्थापना कायद्यात केलेल्या सुधारणांमध्ये नुकताच स्वीकारला, ही ती बातमी.


  केरळमध्ये सोन्याचे दागिने व कपडे/कापड यांच्या मोठ्या बाजारपेठा आहेत, मोठमोठी दुकानं आहेत. तिथे अनेक महिला कर्मचारी आहेत. चारपाच वर्षांपूर्वी महिला दिनी कोळीकोड शहरामधील एका शोरूममधल्या काही महिला कर्मचाऱ्यांनी खुर्ची मोर्चा काढला आणि काही मिनिटं विश्रांतीच्या हक्काची मागणी केली. अनेक दिवस प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या. याची बातमी वाचून अलप्पुळा येथील आणखी काही महिलांनी विश्रांती आणि स्वच्छतागृहांची मागणी लावून धरली. या महिला असंघटित होत्या, हे विशेष. केरळमध्ये अनेक कामगार संघटना असूनही या महिलांसाठी त्यांनी काही केलं नव्हतं, कारण या महिला त्यांच्या सदस्य नव्हत्या. सदस्यांच्याच समस्या सोडवण्यात संघटनांना रस असतो, असं या कामगारांना लक्षात आलं.


  सर्वसाधारणपणे नऊ ते दहा तास हे विक्रेते उभे असतात. अनेक दुकानांमध्ये त्यांना काही क्षण टेकता यावं, यासाठी काहीही सोय नसते. जेवावंही लागतं तिथेच, काउंटरच्या आड, जमिनीवर बसून. ग्राहक समोर असताना बसून राहिलेला विक्रेता/विक्रेती पाहण्यात नसतेच आपल्या. पण ग्राहक नसतानाही त्यांना बसू न देण्यामागे काय भूमिका असेल ते कळू शकत नाही. (ज्या दुकानांमध्ये गाद्या असतात, आणि खाली बसूनच व्यवहार होतो, तिथल्या विक्रेत्यांना उभं राहावं लागत नाही इतकंच. बाकीचे त्रास काही चुकत नाहीत.) यातले बहुतांश विक्रेते लांबचा प्रवास करून, तोही उभ्याने, दुकानात पोचलेले असतात. महिला तर सकाळी उठल्यापासून उभ्याच असतात, घरातली कामं करत असतात. घरी गेल्यानंतरही तीच कथा असते. त्यामुळे थकवा जाणवलाच तर भिंतीला किंवा काउंटरला टेकून उभं राहणं, इतकंच त्यांच्या हातात असतं. खेरीज या शोरूम्समध्ये सीसी कॅमेरे असतात. विक्रेत्यांनी आपापसात बोलण्यावरही बंदी असते, बोलताना आढळलं तर दंडही केला जातो.


  स्वच्छतागृहं ही तर बहुतांश कामगारांसाठी दूरची गोष्ट. छोट्या दुकानांमध्ये स्वतंत्र स्वच्छतागृह नसतंच. त्यामुळे स्त्री व पुरुष दोघांनाही जवळपासच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचाच अासरा असतो. अनेक दुकानांमध्ये फक्त अर्ध्या तासाची जेवणाची सुटी असते. त्याच वेळात स्वच्छतागृहात जाऊन येणंही अपेक्षित असतं. माॅलमधल्या शोरूममध्ये काम करणाऱ्या कामगारांना किमान स्वच्छतागृहं तरी जवळ उपलब्ध असतात, परंतु बाजारपेठेत बहुतेक ठिकाणी ही सोय नसते. दुकान अत्यंत ‘पाॅश’ असतं, वातानुकूलितही असतं, पण तिथल्या विक्रेत्यांना स्वच्छतागृह उपलब्ध असतं ते सार्वजनिक. मोठ्या शोरूममध्ये सहसा फ्लोअर मॅनेजर पुरुष असतो, आणि विक्रेत्या महिलांना त्यांना विचारल्याखेरीज स्वच्छतागृहातही जाता येत नाही. मासिक पाळीच्या दिवसांत जास्त वेळा जावं लागलं तर त्यांना कानकोंडं वाटतं, परंतु पर्याय नसतो. त्यामुळेच अनेक स्त्रिया पाणी कमी पितात आणि स्वच्छतागृहात जाणं शक्य तितकं लांबवतात/टाळतात.


  मुंबईत तयार कपड्यांच्या प्रतिष्ठित शोरूममध्ये काम करणारी एक मुलगी म्हणते, ‘सकाळी १०.३० ते ८.३० कामाची वेळ असते. जेवायला सोयीनुसार जाता येतं, पण फक्त अर्धा तास. जायची यायची वेळ नोंदवावी लागते, त्यामुळे तेवढ्या वेळेत परत यावंच लागतं. दहा तासांच्या ड्यूटीत बसायला मिळतं फक्त जेवण्यापुरतं. एरवी कामच. तीनेक किलो वजन कमी झालं माझं उभं राहून राहून, वडलांना काळजी वाटायला लागली होती. शनिवार, रविवार, आणि सणांच्या दिवशी सुटी घेता येत नाही. साप्ताहिक सुटी सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांत घ्यायची.’ महिलांचं स्वच्छतागृह कर्मचारी आणि ग्राहक यांच्यासाठी मिळून एकच होतं. मोबाइलही गेल्या गेल्या जमा करावा लागतो, फक्त जेवणाच्या वेळेत वापरता येतो. केरळमध्ये तीनचार वर्षांत वेगवेगळ्या दुकानांमधल्या कामगारांनी केलेल्या मागण्यांमुळे त्यांच्यापुरते बदल घडून आले. ज्या महिलांनी आस्थापनांविरुद्ध तक्रार केली, बंड केलं, त्यांना नोकरीवरनं काढून टाकण्यात आलं. त्यांचे खटले कामगार न्यायालयासमोर प्रलंबित आहेत. अगदी मूलभूत हक्क मिळवण्याचा कामगारांचा झगडा अजूनही संपलेला नाही, हेच यातून दिसून येतं. महिला कामगारांना अधिक सुविधा द्याव्या लागल्या तर त्यांना कामावर ठेवताना आस्थापना विचार करतील, आणि त्यांच्या कामावरच गदा येईल, अशी भीतीही अर्थात महिलांना वाटतेच आहे.


  सूर्यप्रकाशाची उणीव
  माॅल्स वा पंचतारांकित हाॅटेल्सच्या स्वच्छता विभागात काम करणाऱ्या महिलांना वेगळ्या प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. नऊदहा तासांच्या ड्यूटीच्या वेळात अजिबात बाहेर पडता येत नाही, सूर्यप्रकाशाचा उणीव शरीराला भासते. सतत पाणी आणि स्वच्छता राखणाऱ्या रसायनांच्या सान्निध्यात राहून वारंवार आजारपण येतं.


  तक्रार कुठे करणार?
  अमरावतीत एका तयार कपड्यांच्या दुकानात काम करणाऱ्या विक्रेतीने सांगितले की, दिवसभर उभं राहूनच काम करावं लागतं. स्वच्छतागृह पाच मिनिटं चालत गेल्यानंतर आहे, तेही सार्वजनिक. जेवणाची सुटी अर्धा तास असते. बसायचं नाही, असं स्पष्ट सांगितलेलं नसलं तरी बसणं अपेक्षित नसतं. कामावर घेताना कोणतंही पत्र किंवा करार नसतोच, त्यामुळे तक्रार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.


  नोकरी सोडावी लागलीे
  एका इलेक्ट्रिकल कंपनीत गेली अठ्ठावीस वर्षं काम करणारी एक महिला म्हणते, आठ-दहा तास उभं राहून काम करणं खूप त्रासदायक जातं. पाळीच्या चार-पाच दिवसांत तर हा त्रास अधिकच जाणवतो. मात्र काम करणं आणि पैसा कमावणं ही गरज असल्यामुळे करावंच लागतं. बसून काम करण्यासाठी कंपनीनं खुर्च्या दिलेल्या आहेत. मात्र त्या खुर्च्यांची उंची आणि मशीनवर करावं लागणारं काम याचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे उभं राहूनच काम करावं करतो आम्ही. माझ्या कित्येक मैत्रिणींना कामाच्या अशा स्वरूपामुळे नोकरी सोडून द्यावी लागली आहे. सध्या कंपनी तोट्यात आहे. नोकरकपात सुरू आहे. येत्या दिवाळीपर्यंत बहुदा कंपनी बंद करावी लागेल अशी चिन्हं आहेत. इतकी वर्षं केलेले कष्ट वाया गेलेत आमचे.


  व्हेरिकोज व्हेन्सची शक्यता : डॉ. दिलीप धनेश्वर, अहमदनगर
  अधिकाधिक वेळ उभं राहण्यामुळे पायाच्या व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना सूज येते. त्यातून रक्तप्रवाह सुरळित होण्यास अडथळा निर्माण होतो. परिणामी त्या जाड होतात. या व्हेन्स जाड झाल्यामुळे सातत्यानं पायदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखीचा त्रास उद्भवतो. स्त्रियांना मुळातच कॅल्शियम, व्हिटॅमिन ई, डी, यांची खूप गरज असते. मात्र त्यांच्या स्वत:च्या आणि कुटुंबाच्या दुर्लक्षामुळे त्यांना पुरेशा प्रमाणात ते मिळत नाहीत. शिवाय बहुतांश महिला अॅनिमिक असतात. ज्यांना अशा प्रकारे काम करावं लागतं त्यांनी कामाच्या मध्ये किमान पाच मिनिटांची विश्रांती घ्यावी. मांडी घालून बसावं. त्याव्यतिरिक्त घरी गरम पाण्यानं शेकणं, पाय उंचावर ठेवणं, रोजचा आहार सर्वसमावेशक घ्यावा. मुख्य म्हणजे आहारात ताज्या ताकाचा अवश्य वापर करावा. ताज्या ताकातल्या लॅक्टिक अॅसिडमुळे रक्त पातळ होऊन रक्तप्रवाह नियमित होण्यास मदत होते.

  - मृण्मयी रानडे, मुंबई
  mrinmayee.r@dbcorp.in

 • Mrinmayee Ranade writes about plight of salesgirls
 • Mrinmayee Ranade writes about plight of salesgirls
 • Mrinmayee Ranade writes about plight of salesgirls
 • Mrinmayee Ranade writes about plight of salesgirls

Trending