आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयात आलेल्‍या वर्षासाठी शुभेच्‍छा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन वर्षातली आपली ही पहिली भेट. २०१८चा पहिला अंक तुमच्या हातात देताना खूप आनंद होतोय. नवीन विषय, नवीन लेखक घेऊन आलोय ते तुमच्या पसंतीला उतरेल की नाही, अशी धाकधूकही वाटतेय. काही सदरं सुरूच राहणार आहेत.


या वर्षाची सुरुवात काही म्हणावी तशी आनंदी, उत्साही झालेली नाही. अनेक शतकांपासून आपल्याला चिकटून असलेला जातीयवाद अजूनही आपण सोडलेला नाही, राजकारण आणि समाजकारण यांद्वारे यातनं मार्ग निघण्याऐवजी हा भेदाभेदाचा प्रश्न चिघळलाच असल्याचं प्रकर्षाने जाणवलं. ‘ते लोक’ हे दोन शब्द आपल्या वापरातनं जोवर हद्दपार होत नाहीत, तोवर असा भेद, दुजाभाव, सगळं राहणारच. आपण हे दोन शब्द कधी वापरतो, याचा विचार करून पाहा. स्वत:च्या विचारांबद्दल वेगळीच माहिती लक्षात येईल तुमच्या. इतिहासाचे दाखले देऊन आपण वर्तमानकाळ नासवलाच आहे, पण भविष्यकाळाचाही पार इस्कोट करून टाकलाय की काय, अशी भीती वाटतेय. आपण, सर्वसामान्य माणसांनी, हे बदलायला हवंय.


या एकविसाव्या शतकातलं हे अठरावं वर्ष. अठराव्या वर्षी मनुष्यप्राणी वयात येतो, पुरेसा प्रगल्भ होतो, त्याला वेगवेगळे अधिकार मिळतात. मग या वयात आलेल्या वर्षापासून आपणही थोडं बरं वागलो तर हरकत नाही नै? 


नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या या वेदनादायक अनुभवांना मागे टाकायलाच लागेल, तरच सकारात्मक भविष्याकडे आपण जाऊ शकू; पण या अनुभवांतनं आपल्याला काहीतरी शिकावं तर लागेलच. या शिकण्यासाठी, नवीन अनुभवांना सामाेरं जाऊन समृद्ध होण्यासाठी, आनंदी व समाधानी आयुष्यासाठी मधुरिमा टीमतर्फे आमच्या सर्व वाचक मित्रमैत्रिणींना खूप शुभेच्छा. कायम लक्षात राहील, असं काहीतरी घडू दे प्रत्येकाच्या हातून या वर्षात.


- मृण्मयी रानडे, मुंबई
mrinmayee.r@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...