Home | Magazine | Madhurima | Parag Potdar write article about bhartiyans

भारतियन्स सकारात्मकतेचा 'सोशल' मंत्र

पराग पोतदार | Update - Jun 26, 2018, 08:14 AM IST

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ने महाराष्ट्राच्या संस्कृतिसंचिताचा व्यक्ती-संस्था व संस्कृतिवैभव अशा तीन प्रकारे शोध चालवला आह

 • Parag Potdar write article about bhartiyans

  ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ने महाराष्ट्राच्या संस्कृतिसंचिताचा व्यक्ती-संस्था व संस्कृतिवैभव अशा तीन प्रकारे शोध चालवला आहे. त्या शोधकार्यात महाराष्ट्राच्या तालुक्यातालुक्यांत ज्ञानोत्सुक, कर्तबगार व्यक्ती तशाच संस्था गवसतात. मात्र ते प्रयत्न एकांडे आहेत; अशा प्रसंगी गरज आहे, ती त्या अज्ञात मंडळींना समाजासमोर आणण्याची, त्यांच्या खटाटोपाचा समाजाच्या संदर्भात अर्थ लावण्याची. अशा निवडक व्यक्ती व संस्थांवर प्रकाशझोत टाकणारे ‘रसिक’मध्ये प्रसिद्ध होत असलेले हे पाक्षिक सदर आजपासून ‘मधुरिमा’मध्ये प्रसिद्ध होईल.


  मनात उफाळून आलेल्या देशभक्तीच्या भावनेतून संपूर्ण कारगिल युद्धाचे दस्तावेजीकरण असणारे एक पुस्तक एका तरुणाकडून साकारले गेले आणि तोच त्याच्या आयुष्यातील निर्णायक टप्पा ठरला! ते पुस्तक गेले ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम या कसबी जवाहिऱ्याच्या हातात. त्यांनी त्या तरुणाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांची भेट झाली आणि डॉ. कलाम यांनी त्याला एका प्रकल्पासाठी सोबत काम करण्याविषयी विचारले. त्या तरुणाने तत्काळ होकार दिला.


  ‘या कामासाठी पैसे किती घेणार?’ कलाम यांनी विचारले असता तो म्हणाला, ‘मी एक रुपया घेईन.’
  त्याच्या अायुष्यातील पुढील दोन महिने कोठल्याही पैशांत मोजता येणार नाहीत इतके लाखमोलाचे असतील इतके भान त्याला होते. सकारात्मकतेच्या ताकदीने ओसंडून वाहणारा कलाम नावाचा धबधबा सतत त्याच्या सोबत असणार होता. कोठलीही समस्या त्यांच्या समोर आली तरी ते गडबडून जात नसत. त्यांच्या मते, प्रत्येक समस्या ही तिच्यासोबत ‘सेट ऑफ सोल्युशन्स’ घेऊन येत असते. त्याकडे संधी म्हणून पाहण्यास मात्र हवे. कलाम यांच्यासोबत काम करताना सकारात्मकता अंगात भिनत गेलेला हा तरुण होता मिलिंद वेर्लेकर. त्याने ‘भारतियन्स’ हा मंच स्थापन केला आहे. ‘गिनीज बुक’मध्ये स्वत:च्या विक्रमाची नोंद करणाऱ्या मिलिंदच्या सुपीक डोक्यातून ‘भारतियन्स’ ही संकल्पना साकारली. ‘फेसबुक’ हे निव्वळ ‘टाइमपासचे माध्यम’ असे समजले जाते. त्या समाजमाध्यमांचा वापर करून भारतीयांपर्यंत सकारात्मक विचार घेऊन जाण्याचा प्रयास ‘भारतियन्स’च्या माध्यमातून केला जातो. ‘भारतियन्स’चे वेब पोर्टल आहे, अॅप विकसित केले आहे, फेसबुकच्या अॅक्टिव्ह पेजला तब्बल पंच्याऐंशी लाखांचा रीच अल्पावधीत प्राप्त झालेला आहे. जगभरातील भारतिय तरुण त्या मंचाचा भाग अाहेत. अमेरिका, जपान, सिंगापूर, जर्मनी, थायलंड आदी देशांत राहणारे एकशे सदुसष्टहून अधिक भारतिय तरुण ‘भारतियन्स’मध्ये सक्रिय आहेत. केवळ मराठी-इंग्रजीपुरते मर्यादित न राहता या साऱ्या तरुणांनी त्याचा विस्तार तब्बल अठरा भाषांमध्ये करण्याचे शिवधनुष्य हाती घेतले आहे. त्याशिवाय, त्यांनी विविध भाषांतून उत्तमोत्तम साहित्य अनुवादित करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी चांगल्या अनुवादकांची फळी उभी राहत आहे. त्याशिवाय, ‘योग फॉर पॉझिटिव्हिटी’ हा उपक्रम जगभरात विविध ठिकाणी राबवून त्याचीही विश्वविक्रमी नोंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे.


  मिलिंद मूळ मुंबईचा. त्याचा लहानपणीच्या स्वभावाबद्दल ऐकले तर तो पुढे इतका ‘सोशल’ होईल अशी कोणी कल्पनाही केली नसती. तो शालेय जीवनात अतिशय भिडस्त स्वभावाचा होता. तो लोकांमध्ये फारसा रमत नसे. वडील प्रख्यात वकील. मिलिंदला खेळांची आवड होती. शाळेतील गुणही बेतास बात मिळत. मित्रपरिवार मोजका. तो बोलू शकणार नाही हा न्यूनगंड अगदी सुरुवातीपासून जोपासलेला. पण मिलिंद बारावीला असताना कॉलेजमध्ये एक तास मोकळा होता म्हणून तो स्टाफरूममध्ये डोकावला. समोर बसलेल्या एका शिक्षकांनी त्याला अात बोलावले आणि नाव विचारले. त्यांनी त्याचे नाव एका कागदावर लिहिले आणि ते म्हणाले, ‘जा आता.’ मिलिंदला काहीच कळेना. शिक्षक म्हणाले, ‘अरे एक वक्तृत्व स्पर्धा आहे. मला तेथे आजच नावे द्यायची होती. तुझे नाव दिले. पण चिंता करू नको. तू गेला नाहीस तरी चालेल.’ घरी अाल्यानंतर मिलिंदच्या वडिलांना नावाचा तो कागद टेबलावर पडलेला दिसला. त्यांनी विचारणा केल्यावर मिलिंद म्हणाला, ‘मी स्पर्धेत भागबिग काही घेणार नाही.’ वडील म्हणाले, ‘अरे, आता नाव दिले अाहेस तर तयारी कर. मी जसा विषय लिहून देतो व तयारी करून घेतो तसा बोल.’


  मिलिंद तयार झाला आणि त्याचा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत राज्यात तिसरा क्रमांक आला. आजवर जो संभाषण करायला धजावत नव्हता अशा मुलाने ते यश मिळवले. त्याचा उत्साह कमालीचा दुणावला. त्यानंतर त्याचा आत्मविश्वास जो काही वाढला, त्या बळावर त्याने राज्यभरात जितक्या वक्तृत्व स्पर्धा होतात त्या सर्वांमध्ये भाग घेतला. त्याने सुमारे दीडशेहून अधिक स्पर्धांमध्ये पहिला वा दुसरा क्रमांक पटकावला! सर्व व्यासपीठे गाजवली. त्यातून दोन फायदे झाले. एक म्हणजे त्याचा संभाषणातील आत्मविश्वास वाढला आणि दुसरा म्हणजे त्याला लोकांत मिसळण्याची सवय झाली. तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असल्याने आणि अखिल भारतिय विद्यार्थी परिषदेचे काम करण्याची संधी मिळाल्याने मिलिंदच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी पैलू पडले. त्याच्या सामाजिक जाणिवा सजग झाल्या. मिलिंदने त्याच प्रेरणेतून ‘वाग्भट’ ही राज्यस्तरीय स्पर्धा सुरू केली. त्याला राज्यभरातील तरुणांचा उत्तम प्रतिसाद लाभला. कारगिल युद्धाच्या काळामध्ये बातम्यांमधून घडामोडी कळत होत्या, पण त्यांचे डॉक्युमेंटेशन होत नाही याची जाणीव काही प्रसंगांतून त्याला झाली. मग त्याने पस्तीस हजार बातम्यांची कात्रणे जमवून, इतर संदर्भाची जोड देऊन कारगिलवरचे पुस्तक साकारले. त्याच्या पाच हजारांहून अधिक प्रती विकल्या गेल्या. कारगील युद्धात शहीद झालेल्या एका जवानाच्या पत्नीच्या हस्ते त्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. पुस्तकाची किंमत सर्वसामान्यांना परवडेल अशी फक्त पन्नास रुपये ठेवली. पुस्तकाची इंग्रजी, हिंदी, संस्कृत, गुजराती या भाषांत भाषांतरे झाली. पुस्तक रघुनाथ माशेलकर यांच्या माध्यमातून कलाम यांच्यापर्यंत पोचले.


  मिलिंद त्यानंतर चार वेगवेगळ्या मोठ्या प्रकल्पांवर काम करत होता. पण साऱ्यांमध्ये काही ना काही अडचणी येत गेल्या आणि काही झाले तरी त्या सुटता सुटेनात. अखेर वैतागून त्याने ते बाजूला ठेवले. त्याने त्याच बेताला इंग्रजी वृत्तपत्रात एक सकारात्मक बातमी वाचली. त्याने तिचे भाषांतर फेसबुकवर पोस्ट केले. त्याला जोरदार लाइक्स मिळाले. त्याचा परिणाम सकारात्मक झाला! गंमत म्हणजे, तो ज्या चार प्रकल्पांमध्ये अडकून पडला होता त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्याला गवसला. ती शक्ती होती सकारात्मकतेची. सकारात्मकतेची ऊर्जा समाजमाध्यमांचा वापर करून सर्वांपर्यंत न्यावी या विचारातून त्याच्याकडून रोज एक सकारात्मक स्टोरी फेसबुकवर पोस्ट होऊ लागली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याने ज्योती रेड्डी नामक एका युवतीचा शेतमजूर ते आयटी कंपनीची सीईओ हा प्रवास मांडला. ती पोस्ट तब्बल बारा हजार वेळा शेअर झाली. लाखो लोकांनी वाचली. पाच हजारांहून अधिक फॉलोअर्स आले. देशभरातील वृत्तपत्रे वाचून त्यातून सकारात्मक स्टोरी निवडणारी एक उत्तम फळी तयार झाली. दक्षिणेकडे एक माणूस जेवणाच्या वेळी त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला अवघ्या दहा रुपयांत जेवण देतो ही पोस्ट वाचून पुण्यात रास्ता पेठेत हॉटेल असणाऱ्या एकाने त्याचे अनुकरण केले. असंख्य लोकांना प्रेरणा देणारे ते व्यासपीठ लोकप्रिय झाले. सकारात्मकता हवी तर शरीरही चांगले हवे म्हणून ‘योग फॉर पॉझिटिव्हिटी’ हा अभिनव उपक्रम जगभरात घेतला गेला. आता तर अठरा भाषांतून ते सारे विस्तारण्याचा मोठा प्रयास सुरू आहे.


  त्याविषयी मिलिंद म्हणतो, ‘सकारात्मकतेची ऊर्जा खरच जबरदस्तच असते. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने झाली तर त्यातून खूप चांगल्या गोष्टी घडत जातात. नकारात्मक दृष्टी असणारे अनेकजण येथे आले आणि सकारात्मक होऊन कायमचे ‘भारतियन्स’शी जोडले गेले. ते काम करताना मिळणारे आंतरिक समाधान फार मोठे आहे.’

  - पराग पोतदार
  sweetparag@gmail.com

 • Parag Potdar write article about bhartiyans
 • Parag Potdar write article about bhartiyans
 • Parag Potdar write article about bhartiyans
 • Parag Potdar write article about bhartiyans

Trending