आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पौर्णिमेच्या निमित्ताने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्याच्या वटपौर्णिमेच्या निमित्तानं या दिवसाची खासियत वर्णन करणारी खमंग काव्यफोडणी...


नारळ तसा सुखवस्तू घरातला
सर्व ज्येष्ठ लोक उच्चपदस्थ,
अंबानींसारखे हायराइझमध्ये निवास,
जवळजवळ देशभर खूप लोकप्रिय,
वयात आल्यावर सर्वत्र कडक वावर,
आणि अनादिकालापासून स्वयंपाकघरात शिरकाव.
एकीकडे अनेक शतकांपूर्वी
मध्यपूर्वेतून जिऱ्याचे भारतात आगमन,
आयुर्वेदात तिची महती आधीच वाचलेल्यांनी
तिचं सगळ्यांनी केलेलं सुंदर स्वागत.
वर्षानुवर्षे सर्वांनी तिला आपले मानलेले,
आणि स्वयंपाकघरात मुक्त वावर.
कुठेतरी हे दोघे भेटले,
आणि महाभारत घडले.
जिरेच्या वडिलांची इच्छा,
की, तिने कम्युनिस्ट नेते लाल मिर्चीशी लग्न करावे.
तिच्या मनात दुसरेच,
आणि मग ती घर सोडून नारळाच्या देशात.
कालांतराने तिचे व खोबऱ्याचे लग्न.
दोघे सुखात, आणि विवध भाज्यांकडून त्यांना बोलावणे.
खोबऱ्याचे स्वतःला थोडे तव्यावर कोरडे गरम होणे
तिला आवडू लागले.
उभयतां खूप प्रवास झाले,
आणि एके दिवशी अघटीत घडले.
खोबर्याच्या चेहऱ्यावर कसले तरी डाग,
आणि काही कळायच्या आत,
त्याचे जमिनीवर मूर्च्छित होऊन पडणे.
जिरा धावून गेली, आणि त्याला कवटाळून बसली.
मनातून निरनिराळ्या भाज्यांचा धावा करू लागली,
आणि यमराज तेथे पोचले तेव्हा,
ती पाट्यावर त्यांना समोरी गेली.
वाद झाले, विनवण्या झाल्या,
बडीशेप, शहाजिरे लोकांनी समजावण्याचे नाटकही केले,
पण जिरा आपल्या मतावर पक्की.
खोबरं कुठेही जाणार नव्हतं.
शेवटी ह्या सर्व प्रकाराने प्रभावित होऊन 
यमराजानी तिला वर दिला,
की ती व खोबरं, जेव्हाजेव्हा एकत्र शेकून घेतील,
तेव्हा तेव्हा ते किंवा त्यांची वाटलेली पूड
खूप दिवस एका डब्यात आनंदाने नांदतील,
आणि वेळोवेळी स्वयंपाकात कामास येतील.
आणि म्हणूनच, ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला,
तमाम बायका जिरे-खोबरे भाजून वाटतात,
पाट्याची पूजा करून
आपल्या आयुष्यात, आपली व नवऱ्याची,
जिरे-खोबऱ्यासारखीच जादुई जोडी असो,
अशी मनोभावे प्रार्थना करतात,
आणि कुठलातरी चविष्ट रस्सा कुटुंबीयांना वाढतात.
अर्थात खोबऱ्यालासुद्धा जिऱ्याच्या पतिव्रतेची
चांगलीच जाणीव असते.
पाट्यावर वाटण सुरू असता,
तोही मनोभावे मनात पूजा करत असतो,
आणि जिऱ्यासारखी भार्या आपल्या सर्व जन्मी मिळावी
अशी प्रार्थना करत असतो.
(एका वेळी पाट्यावर एकच माणूस वाटू शकतो.)
याला पाटा पौर्णिमेचं व्रत म्हणतात .
काही काही लोक मिक्सर पौर्णिमेचं व्रत करतात.
पण मनातला भाव तोच.
आणि हे सर्व घरात सुरू असता,
खिडकीच्या बाहेरचा एक डेरेदार वड,
आपल्या सर्वात जुन्या पारंबीला खुणावून म्हणतो,
“भावना महत्त्वाची.
आजकाल वड आणि पाटे दिसतच नाहीत गं!”

 

-सुरंगा दाते, मुंबई

 

बातम्या आणखी आहेत...