आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषमतेच्या वारुला लगाम!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असे सत्ताधारी, असे राजकारणी आणि अशी लोकशाही काय उपयोगाची, जिथे जाटव समाजातल्या तरुणाची घोड्यावरून वरात नेण्याची इच्छा झाल्यावर सवर्णवर्ग त्याला आडवा जातो. संभाव्य हिंसक प्रतिक्रिया गृहीत धरून शासन-प्रशासनावर लग्नस्थळी मेटल डिटेक्टर बसवण्याची नामुष्की ओढवते...


आखेर १५ जुलै २०१८ रोजी संजयकुमारची वरात शीतलच्या दारात येऊन पोहोचली. एकदाचं दोघांचं लग्न पार पडलं आणि आनंदाने मी माझ्याच भोवती छान गिरकी घेतली!


नाही, संजय किंवा शीतल यांच्यातलं कुणीही माझ्या घरातलं नाहीय. ते माझ्या दूरदूरच्या नात्यागोत्यातलेही नाहीत. ना ते माझ्या आसपास राहणारे आहेत. खरं सांगायचं तर मी त्या दोघांपैकी कुणालाच आजवर भेटलेले नाहीय. आणि तरीही ही आत्यंतिक खरी गोष्ट आहे की त्यांच्या होऊ घातलेल्या लग्नाने मी गेले काही दिवस, खरं तर काही महिने बरीचशी अस्वस्थ होते आणि आता अखेर त्यांचं लग्न निर्विघ्नपणे पार पडलेलं असल्याने मी काहीशी स्वस्थचित्त झालेले आहे.


तुम्ही विचाराल, असं काय बरं नेमकं होतं, या लग्नात ज्यामुळे माझं स्वास्थ्य हरवून जावं? ज्याच्या लग्नात मला रस असायला हवा असा कोण हा राहुल गांधी लागून गेलाय! होय, संजय आणि शीतलचं लग्न होणार आहे, हे तुमच्यासारखंच मलाही या वर्षाच्या मार्चपर्यंत माहीत नव्हतं. तसंही भारतात रोजच प्रचंड संख्येने दरवर्षी लग्न होत असतात. प्रत्येकासाठी लग्न हा कितीही आनंदाचा प्रसंग असला तरी सगळीच लग्नं मला कशी काय माहीत असतील बरं? 


तर झालं असं की, मला मार्चपर्यंत माहीत नसलेल्या संजयच्या होऊ घातलेल्या लग्नात एक विघ्न उभं राहिलं. त्या विघ्नाची बातमी झाली. ती बातमी जिल्ह्याच्या, राज्याच्या सीमा पार करून देशभरात पोहोचली. तशीच ती माझ्यापर्यंत पोहोचली. आणि मी या बातमीत गुंतत गेले. ती बातम आणि तिचा कालपरवापर्यंतचा झालेला प्रवास, इथे मी तुमच्या साक्षीने उलगडणार आहे. 


संजय कुमार हा उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातल्या बसई बाबस गावचा रहिवासी. वय वर्ष २७. शिक्षण पदवीधर. आता पदव्युत्तर कायद्याचं शिक्षण सुरू. उभरता राजकीय कार्यकर्ता. तालुका विकास परिषदेचा सदस्य.
शीतल कासगंजमधल्याच निझामपूर गावची तरुणी. वय वर्षे २०. बारावी उत्तीर्ण झालेली. धीट.
दोघेही जाटव समाजाचे. म्हणजे आपल्याकडील चर्मकार. 


लग्न ठरवून होत होतं. दोघांनी एकमेकांना पसंत केलं. लग्नाची तारीख ठरली २० एप्रिल २०१८. इथवर सगळं रीतीप्रमाणे घडलं. कुठल्याही अडचणींशिवाय. प्रश्न तेव्हा उपस्थित झाला जेव्हा संजयने आपला मनसुबा जाहीर केला की, मी घोड्यावर बसून वाजतगाजत वरात घेऊन येणार. शीतलच्या घरचे थोडे चकित, पण आनंदीही झाले. त्यांनी संजयची इच्छा मान्य केली. पण त्यांच्या मान्यतेने थोडीच सर्व गोष्टी घडणार होत्या? कारण, आजवर गावातील दलितांच्या लग्नात असं कधीही घडलेलं नव्हतं. गेल्या चाळीस वर्षांत ज्या-ज्या वेळी दलित तरुणांनी तशी इच्छा व्यक्त केली तेव्हा गावाने धाकदपटशा करून, दंगे माजवून ते होऊ दिलं नव्हतं. साहजिकच निझामपूर गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. गाव अस्वस्थ झालं. गावात एकूण ४५ घरं. त्यातली ४० क्षत्रिय असलेल्या ठाकुरांची, तर ५ दलितांची. ठाकुरांच्या लग्नाचा थाट तो काय वर्णावा! हातात नंग्या तलवारी घेऊन संपूर्ण गावातून फटाक्यांच्या आतषबाजीत, दारवांच्या अमलाखाली वरात काढून जल्लोषाच्या वातावरणात प्रत्येक ठाकुराचं लग्न होणार. पण तसं धडाक्यात लग्न करण्याची मनीषा दलितांनी बाळगायची? छे! ठाकूर बहुसंख्य असलेल्या गावच्या परंपरेला न शोभणारी बाब ही. गावाने वरात काढायला सरळ मनाई केली. गावच्या वेशीवर संजयने घोडीवरून उतरायचं. गावात चालतच यायचं. बस्स. यावर पुढे चर्चा संभवणार नाही. 


ठाकूर समाजाच्या ऊर्मिलादेवी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या, ‘ते लोक आमची याचना करायला आले नाहीत. त्यांना आम्ही गावातून वरात काढू देणार नाही. ठाकूर हे ठाकूरच राहणार! झगडा तर होणारच!’ शीतलच्या घरच्यांना जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. दलित शेतकऱ्यांच्या शेतीचं पाणी बंद केलं गेलं. सर्वंकष बहिष्कार टाकला गेला. 


पण तरुण आणि राजकारणात सक्रिय असलेल्या संजयला या विरोधाची अपेक्षा होतीच. संजय दहा वर्षांचा असताना गावातील नळावर पाणी प्यायल्याने त्याला उच्चजातीयांकडून शिव्याशाप खावे लागले होते. त्याने जेव्हा शिक्षकांकडे झाल्या प्रकाराची तक्रार केली, तेव्हा शिक्षकाने त्याला शिकून जिल्हा दंडाधिकारी होऊन व्यवस्था बदलण्याचा सल्ला दिला. संजयने त्या वेळी आपल्या नावाची आद्याक्षरे एस. के. आणि जिल्हा दंडाधिकाऱ्याची आद्याक्षरे डी. एम. आपल्या हातांवर गोंदवून घेतली होती. लहानपणापासून लढाऊ बाणा जपलेल्या संजयने निझामपूर गावाचा आदेश मानून माघार घेण्याचा प्रश्नच नव्हता.


संजयने पोलिस, उच्च न्यायालय, प्रसारमाध्यमं सगळी दारं ठोठावली. थेट मुख्यमंत्री योगींकडे दाद मागितली. ‘तुम्ही आम्हाला हिंदू म्हणता. राज्यघटना म्हणते सर्व नागरिक समान आहेत आणि आम्ही लग्नात साधी वरात काढू शकत नाही? आम्ही हिंदू नाही का?’ असा जळजळीत सवाल केला. राज्यभर बातम्या छापून आल्या. निझामपूर गाव नकारात्मक प्रसिद्धीच्या झोतात आलं. गावात खळबळ माजली. अखेर गावाने माघार घेतली. काही अटींवर वरात काढायला परवानगी दिली. पोलिसांनी वरातीचा मार्ग निश्चित केला. पण गावकरी मनातून नाखुश होतेच. लग्नाला थोडे दिवस शिल्लक राहिलेले असताना गावातील एकाने शीतलचं लग्नाचं वय झालं नसल्याचा मुद्दा काढला. शाळेच्या रेकॉर्डनुसार ती अल्पवयीन आहे, हा त्याला आधार होता. प्रत्यक्षात वयाची २० वर्षे पूर्ण केलेल्या शीतलला वैद्यकीय चाचण्यांना सामोरं जाण्याची वेळ आली. पण तिथल्या एकूण अपमानास्पद प्रक्रिया पाहून वैतागलेल्या शीतलने अखेर लग्नाची तारीख पुढे ढकलण्याचा पर्याय सुचवला. त्यामुळे लग्न जुलैपर्यंत पुढे गेलं.  


दरम्यानच्या काळात गावकऱ्यांना, प्रशासनाला एकूण वाटाघाटी करायला वेळ मिळाला. यातून तयार झाला तो तडजोडनामा! अनेक अटी घालून अखेर वरात काढण्यास परवानगी दिली गेली. वरात अख्ख्या गावातून जाणार नाही, तर गावातील प्राथमिक शाळा आणि एखाद् दुसऱ्या ठाकुरांच्या घरासमोरून जाईल, याची खातरजमा करण्यात आली.
संजय-शीतलच्या लग्नाचा मुद्दा जसजसा राज्याच्या राजकारणाचा भाग झाला तसतसे त्यांच्या लग्नाचे परिमाण बदलत गेले. एका राजकीय नेत्याने ‘केवळ घोड्यावरूनच वरात का काढायची, उलट शंभर हत्तींचा ताफा संजयच्या लग्नात असला पाहिजे आणि तसा तो असेलच’ अशी घोषणा करून टाकली. झालं, ठाकुरांचा राग प्रचंड उफाळून आला. लग्नात ‘त्यांच्याकडून’ काही ‘अति’ घडलं तर आम्ही अजिबात चालवून घेणार नाही, हत्यारं बाहेर निघतील अशा धमक्या त्यांनी देऊन टाकल्या.  


अखेर ना हत्तीवर, ना घोडीवर, तर एका घोडागाडीत बसून संजयची वरात १५ जुलै रोजी गावात पोहोचली. वरातीत जवळपास २००० लोक सहभागी झाले. लग्न लागलं. संजयचा हसरा चेहरा माध्यमातून झळकला. पण शीतलच्या चेहऱ्यावरची भीती काही लपत नव्हती. कारण दुसऱ्या दिवशी जरी ती संजयबरोबर त्याच्या घरी, त्याच्या गावात राहायला जाणार असली तरी तिचं संपूर्ण कुटुंब त्याच निझामपूर गावात राहणार आहे. गावातील दुखावलेले, चिडलेले लोक आज ना उद्या कुरापत काढतच राहणार हे ती विसरू शकत नाही आणि तिची भीती मुळीच अनाठायी नाही.


लग्नाच्या दिवशी बव्हंशी ठाकूर पुरुष माणसं गावात थांबलीच नाहीत आणि जी होती त्यांनी घराच्या बंद दरवाज्यांच्या आत राहणंच पसंत केलं. लग्नस्थळी प्रशासनाने मेटल डिटेक्टर बसवले होते. साडेतीनशे पोलीस आणि प्रादेशिक सशस्त्र दलाचे जवान गावात आणि वरातीच्या मार्गावर तैनात करण्यात आले होते. शिवाय शीतलच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी एक पोलिस सहअधीक्षक आणि दोन वरिष्ठ शासकीय अधिकारी नेमलेले होते. वरातीच्या पूर्ण मार्गावर घरांच्या छतांवर बंदूकधारी पोलिस दुतर्फा उभे होते. गावात भारतीय दंड संहितेचं १४४ कलम लावण्यात आलं होतं. हा सगळा आटापिटा लग्न शांततेत पार पडावं यासाठी होता! पण लग्नसोहळा संपल्यावर, पोलिस निघून गेल्यावर गावात अशीच शांतता नांदेल का? 


आपण भारत म्हणून नक्की कुठे उभे आहोत याची आठवण या घटनेने पुन्हा एकवार करून दिली. स्वातंत्र्याला सत्तर वर्षं उलटून गेली आहेत. ते तर जाऊच दे. कारण त्यातली बरीचशी वर्षं काँग्रेस पक्ष सत्तेत होता. पण आता तर गेली चार वर्षं ‘अच्छे दिन’ आहेत. रामराज्यच जणू साक्षात झालेलं आहे. आणि इथे जे लग्न आंतरधर्मीय (लव्ह जिहाद टाइपचं) तर सोडाच साधं आंतरजातीयदेखील नव्हतं, त्या लग्नात वराच्या घोड्यावरून वरात काढण्याच्या इच्छेमुळे वाद निर्माण व्हावा आणि उच्च न्यायालय - पोलिसांपासून सगळ्या प्रशासनाला भूमिका घ्यावी लागावी याला काय म्हणावं!


आणि तरीही मी आनंदाने गिरकी घेतली ती यासाठीच की, सध्या देशभरात चर्चा केवळ ‘लस्ट स्टोरीज’ नि ‘सेक्रेड गेम्स’चीच सुरू आहे. ‘घोड्यावरून वरात काढण्याच्या घटनात्मक अधिकाराची’ चर्चा या लग्नाने सुरू झाली म्हणून मी खुश आहे? कप्पाळ माझं!

- प्रज्ञा दया पवार
pradnyadpawar@yahoocom

बातम्या आणखी आहेत...