आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटेवरती काचा गं!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लैंगिक अत्‍याचार, शोषण विशिष्‍ट वर्गातले, लोकच करतात, अत्‍याचाराच्‍या विशिष्‍ट जागा तेवढ्या असतात, या गैरसमजाला छेद देणारी यादी राया सरकार नावाच्‍या विद्यार्थीनीने जाहीर केली. अकादमिक विश्‍व, त्‍यातले पुरोगामी-उदारमतवादी प्राध्‍यापक उपवाद नाही. हे वास्‍तव त्‍यातून पुढे आलं.

 

‘शिंडलर्स लिस्ट’ हा चित्रपट मला आठवतोय. हिटलरच्या जर्मनीत ज्यूंचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर शिरकाण सुरु असताना, शिंडलर नावाचा एक जर्मन कारखानदार स्वस्त मजुरीच्या निमित्ताने ज्यू कामगारांना कामावर घेत असतो. पण एकदा जेव्हा तो हे, शिरकाण स्वतःच्या डोळ्यांनी पाहतो, तेव्हा त्यातल्या क्रौर्याने अंतर्बाह्य हादरून जातो. नंतर कुठल्या तरी एका क्षणी आपल्या या कारखान्याच्या आड राहून अनेक ज्यूंचे प्राण वाचवले जाऊ शकतात, याची लख्ख जाणीव त्याला होते. मग त्यासाठी भरपूर लाचखोरी करून, तो त्या कथित कारखान्यासाठी आपला जीव वाचवू पाहणाऱ्या ८५० ज्यू स्त्री-पुरुषांची यादी तयार करतो. ‘शिंडलर्स लिस्ट'ची आठवण येण्याचं कारण, सध्या भारताच्या अकादमिक विश्वात अशाच एका लिस्टने, म्हणजेच यादीने वादळ निर्माण केलं आहे. फरक एवढाच, की या यादीत नाव असल्याने जीव काही वाचतबिचत नाही, तर जीव गमावायची वेळ येते! माझं हे शेवटचं विधान थोडं अतिशयोक्तीपूर्ण आहे. कारण तसा तर जीव कुणाचाच गेलेला नाहीय. पण जीवाला विलक्षण घोर लागावा, असं मात्र या यादीत नक्कीच आहे.

 

२४ ऑक्टोबर २०१७ रोजी अमेरिकेत कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या २४ वर्षांच्या राया सरकार नावाच्या विद्यार्थिनीने जेव्हा फेसबुकवर ही यादी टाकली, तेव्हा सर्वांसमोर आली. त्या पोस्टमध्ये तिने विद्यापीठांमधून  शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणाऱ्या दीपेश चक्रवर्ती आणि कनक सरकार या दोन प्राध्यापकांची नावं जाहीर केली. असेच अनुभव आलेल्या देशभरातील अन्य मुलींना त्यांना लैंगिकदृष्ट्या छळणाऱ्या प्राध्यापकांची नावं जाहीर करण्याचं आवाहनही केलं. आणि पाहता पाहता दोन या संख्येने सुरु झालेली ही यादी पाऊणशेच्या घरात जाऊन पोहोचली! हे पाऊणशे प्राध्यापक भारतीय होते. अगदी दिल्ली, बंगलोर, कोलकाता-पुण्यापासून ते थेट युरोप-अमेरिकेत शिकवणारे होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्यांच्या त्यांच्या विद्याशाखांमध्ये अत्यंत नावाजलेले प्राध्यापक होते. साहजिकच अकादमिक क्षेत्रात एकच खळबळ माजली. नेहमीप्रमाणे दोन प्रकारच्या प्रतिक्रियांना राया सरकारला सामोरं जावं लागलं.

 

‘ही अभ्यासू, पुरोगामी प्राध्यापकांची बदनामी आहे', ‘या यादीमध्ये ज्यांचं नाव घेतलं आहे, त्यांना त्यांची बाजू मांडता येण्याची कुठलीच सोय नाही'. ‘केवळ नाव देणं चुकीचं आहे, जे काही घडलं असेल ते समोर आलं पाहिजे'. ‘कामाच्या किंवा शिक्षणाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार झाल्यास त्याला प्रतिबंध घालण्यासाठी एक कायदेशीर प्रक्रिया असते, एक यंत्रणा असते, तिला पूर्णपणे बाजूला ठेवून, अशा रीतीने नावं जाहीर करणं हे चुकीचं आहे' इ. इ. सभ्य प्रतिक्रियांपासून ते विद्यमान भारताची ओळख बनू पाहणाऱ्या ‘तुला उद्ध्वस्त करून टाकू', ‘तुला मारून टाकू', ‘तुझ्यावर बलात्कार करू' अशा प्रतिक्रियाही होत्या. अर्थात राया खचली नाही. कारण, रायाने जाहीर केलेल्या यादीमुळे तिच्या समर्थनार्थही बरंच काही घडत होतं. तिच्याकडून प्रेरणा घेऊन  मालती कुमारी या आणखी एका विद्यार्थिनीने एक स्वतंत्र यादी तयार करून, फेसबुकवर पोस्ट केली. रायाच्या धारिष्ट्याला दाद देणारे, तिच्या पाठीशी उभं राहण्याचं आश्वासन देणारेही अनेक हात उभे राहिले. यादी येऊन जवळपास चार महिने उलटून गेले आहेत. तरीही त्याविषयी दोन्ही बाजूंनी अगदी तावातावाने अजून बोललं जात आहे. खरं तर शिक्षणसंस्थांमधील लैंगिक अत्याचार ही अत्यंत आम बाब आहे, हे सांगतानाही मला शरम वाटते आहे. विद्यापीठेच नव्हे तर महाविद्यालये, माध्यमिक, प्राथमिक शाळा यांपासून ते अगदी मतिमंदांच्या आश्रमशाळादेखील यातून सुटलेल्या नाहीत.

 

१९९१नंतरच्या उदारीकरणोत्तर भारतात विषमता विक्राळ स्वरुपात वाढताना दिसतेय. अशा वेळी शिक्षणक्षेत्रातून, विशेषतः उच्चशिक्षणाच्या वाटेने परिघावर असणाऱ्यांसाठी प्रगतीचे दरवाजे काही प्रमाणात किलकिले होऊ शकतात, हे तर खरंच आहे. उच्चशिक्षणाच्या या केंद्रांवर घडणारा कुठलाही अन्याय हा किती जीवघेणा ठरू शकतो हे रोहित वेमुलाच्या आत्महत्येने आपण अनुभवलं आहे आणि आयआयटीमध्ये वर्षानुवर्षे घडणाऱ्या दलित-आदिवासी विद्यार्थ्यांच्या आत्महत्याही आपण पाहात आलो आहोत.
मुलींचा, स्त्रियांचा लैंगिक छळ हाही, असाच एक जीवघेणा प्रकार असतो. नक्की काय स्थिती असते विद्यापीठात? विद्यापीठात सरळसरळ दोन प्रकारचे वर्ग असतात. एक वर्ग असतो, निवृत्त होईपर्यंत कायमस्वरूपी पदावर असलेल्या प्राध्यापकांचा. हा ताकदवान, वलय असलेला वर्ग असतो. यातला जवळपास प्रत्येकजण त्याच्या स्वतःच्या नजरेत एक स्वायत्त, सार्वभौम केंद्र असतो! इतकंच नाही, तर आपण स्वतःच एक विद्यापीठ असल्याची त्याची जवळपास खात्रीच झालेली असते. तर दुसऱ्या बाजूला उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या  मुली वयाच्या विशीमध्ये नुकतंच पाउल ठेवलेल्या, करिअर घडवण्यासाठी उच्चशिक्षणाची वाट जाणीवपूर्वक निवडणाऱ्या, गरीब आणि मध्यमवर्गीय घरातून आलेल्या असतात. अलीकडच्या काळात विद्यापीठात येणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये बव्हंशी बहुजन-दलित समाजातून येणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते.


महाविद्यालयात असताना, ज्या लेखकांची पुस्तकं आपण वाचत होतो, संदर्भांसाठी वारंवार ज्यांच्या साहित्यनिर्मितीकडे आपण वळत होतो, त्यांच्याकडे आता आपण शिकणार आहोत, या विचाराने त्या अत्यंत भारावून गेलेल्या असतात. अशा या दोन अत्यंत विषम वर्गातील व्यक्तींचं एकमेकांच्या सहवासात येणं, ही नीटपणे समजून घेण्याची बाब आहे. ज्या रीतीने पोलीस स्टेशनमध्ये पाय ठेवणारी सर्वसामान्य स्त्री, ही एका अत्यंत पुरुषी ताकदीच्या क्षेत्रात प्रवेश करत असते, तशीच काहीशी परिस्थिती इथे असते. पण या परिस्थितीला असलेलं सत्तेचं नेपथ्य काहीसं वेगळं असतं. ते असतं अभ्यासाचं, ज्ञानाचं, उदारमतवादाचं आणि मोकळेपणाचं. प्राध्यापक जेव्हा या विद्यार्थिनींशी अत्यंत सलगीने व्यवहार करतात, तेव्हा या विद्यार्थिनींना आपण विशेष कुणीतरी असल्याचा फील येतो. त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या करिअरची वाट प्रशस्त करणं अथवा आक्रसवून टाकणं हे या प्राध्यापकवर्गाच्या हातात असतं. त्यामुळे त्यांच्याशी पंगा घेणं, ही बाब किती मोठी किंमत चुकवणारी आहे, हे त्या मनोमन जाणून असतात. हे खरोखरच अत्यंत वेदनादायक आहे, की अशा घटना सर्रास घडत आहेत. प्रत्येक महाविद्यालयात किमान चारदोन आणि विद्यापीठांमध्ये विभागागणिक एकदोन असे शिकारी असतातच, असा माझा शिक्षण क्षेत्रातला अनुभव आहे. आपल्याला मिळालेल्या सत्तेचा, पदाचा असा दुरुपयोग करताना त्यांना काहीच वाटत नाही, हे अधिक अस्वस्थ करणारं वास्तव आहे.

 

साहजिकच राया सरकारकडे अशा प्राध्यापकांची नावं तर खूप आली, पण नावं देणाऱ्या मुलींनी रायाला आपलं नाव उघड न करण्याची विनंती केली. असं झालं तर आम्हाला अतोनात त्रास होईल, असं त्यांनी म्हटलं. रायाचं यावर एकच म्हणणं होतं. तुम्ही मला जे काही घडलंय, कधी घडलंय ते सगळं सांगा. ते वाचल्यानंतर मी तुम्ही सांगितलेल्या नावांचा यादीत समावेश करेन. तुमचं नाव मी कुणाला कळू देणार नाही. इतकंच नव्हे, तर सगळे तपशीलही गुप्तच ठेवेन. आपण एक लक्षात घेऊयात. या मुली इतक्या का घाबरतात? तसं पाहायला गेलं तर माणूस दोन प्रकारच्या व्यक्तींनाच सहसा घाबरत असतात. गुंडांना आणि पोलिसांना! या दोघांशी पुरुष प्राध्यापक वर्गही कसा काय बरं स्पर्धा करू लागला आहे, असा प्रश्न पडतो.
रायाचीच एक वेगळी पोस्ट इथं संक्षेपाने देणं रास्त ठरेल. म्हणजे, प्राध्यापकांची दहशत ही काय चीज असते, हे कळेल. ती लिहिते, ‘या यादीतला एकजण माझा मार्गदर्शक होता. मला त्याच्याविषयी इतका आदर होता, मी त्याच्या इतक्या प्रभावात होते, की तो आपल्याशी काही तरी चुकीचा वागून गेलाय, हे कळायलाही मला वेळ लागला! या यादीतले अनेकजण हे देशातील वैचारिक अग्रदूत मानले जातात. विचार करणाऱ्या अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या आहेत. साहजिकच आमच्यातल्या अनेकजणी बोलायला उत्सुक नव्हत्या, कारण आपल्या बोलण्याने त्यांची व्यक्तिगत प्रतिमा तर डागाळेलच, पण पुरोगामी विचारविश्वाचीही पीछेहाट होईल अशी भीती आम्हाला वाटत होती. त्यांच्यासमोर आपण तर किस झाड की पत्ती! याचीच जाणीव आम्हाला पुरोगामी, स्त्रीवादी म्हणवणाऱ्या प्राध्यापक-लेखिकांनी करून दिली. नावं घेणाऱ्या आम्ही मुली नेमक्या कोणकोणत्या मानसिकतेतून गेलेलो असू, याचा जराही विचार न करता आमच्या यादी प्रसिद्ध करण्यावर त्यांनी आक्षेप घेतले.

 

ही गोष्ट खरीच आहे, की अजूनही देशातील व परदेशातील शिखरस्थ विद्यापीठांमध्ये उच्चजातवर्गीय पुरुषांचा भरणा आहे. ते बव्हंशी डावे, पुरोगामी, किमानपक्षी उदारमतवादी आहेत. त्यांच्या अभ्यासविषयामध्ये त्यांनी पायाभूत काम केलेले आहे. ते देशाच्या वैचारिकतेची ओळख व शान आहेत. रायाने दिलेल्या यादीत साहजिकच त्यांचाच भरणा दिसतो. पण या सगळ्याला केवळ जातीच्या नजरेतून पाहणंही योग्य ठरणार नाही. दलित जातीची व्यक्ती जेव्हा प्राध्यापकवर्गाचा भाग होते, तेव्हा ती याहून अजिबात निराळं वागत नाही. आणि जेव्हा त्यांचे अपराध उघडकीस
येऊ लागतात, तेव्हा आम्ही दलित असल्यानेच आम्हाला लक्ष्य केलं जात आहे असा ढोल ते बडवत राहतात. एका स्त्री-प्राध्यापिकेनं केलेलं याहूनही एक महान विधान मी अलीकडेच मुंबई विद्यापीठात ऐकलं. ‘खरा आंबेडकरवादी हा स्त्रीवर लैंगिक अत्याचार करूच शकत नाही!' त्यामुळे या प्राध्यापकांवर झालेले सर्व आरोप हे धादांत खोटेच असले पाहिजेत. थोर विधानं करण्याचा मक्ता फक्त विद्यमान सत्ताधाऱ्यांचा राहिलेला नाही. रायाच्या यादीवर आक्षेप घेणाऱ्या काहींचं, तर असं म्हणणं होतं, की ‘आपला देश अत्यंत संकट काळातून जात असताना, या पुरोगामी विद्वानांवर असे आरोप करण्यातून आपण आपलीच फळी शबल करीत आहोत'. ही जर आपली ‘फळी' असेल तर ती काडकन् मोडून टाकण्यातच आपल्या सर्वांचं हित आहे, हे आपल्या लक्षात येईल तोच खरा सुदिन!

 

pradnyadpawar@yahoo.com

 

बातम्या आणखी आहेत...