आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'व्‍यंग' चुरायू होवो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्ताधाऱ्यांची भलामण हे एकच पालुपद सगळीकडे दिसून येत असताना  व्यंगचित्रांबाबत मात्र नेमकं उलट  चित्र दिसून येतयं. याचं एक उत्तर ‘व्यंग’ या संकल्पनेची स्वायत्तता अजूनही टिकून आहे यातून मिळतं. ‘व्यंग’ म्हणजे प्रस्थापितावर केलेलं टीकात्मक विडंबन. एकविसाव्या शतकातल्या भारतवर्षात इतिहास, विज्ञान, शिक्षण, संस्कृती आदी सर्वच बाबींची मोडतोड चालू असताना विद्यार्थ्यांनी टिकवून ठेवलेली व्यंगाची संकल्पना आशेचा किरण देत आहे. 


डिसेंबर-जानेवारीचे दिवस हे कुठल्याही महाविद्यालयामध्ये एक वेगळी सळसळ घेऊन येत असतात. औपचारिक शिक्षणाला पूरक ठरणारे अनेक कार्यक्रम एकापाठोपाठ एक सुरू असतात. स्नेहसंमेलने, विविध ‘डे’ज, स्पर्धा, सहली अशी सगळी धामधूम उडालेली असते. अशाच एका महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या व्यंगचित्रकला आणि अन्य काही स्पर्धांची आयत्यावेळची परीक्षक म्हणून मला जावं लागलं. व्यंगचित्र स्पर्धेचा विषय होता ‘अच्छे दिन’! 


हे शेवटचं विधान आजच्या काळात अतिशय स्फोटक ठरू शकणारं विधान आहे, याची मला पूरेपूर कल्पना आहे. कारण ‘अच्छे दिन’ आणि ‘व्यंग’ यांना एकत्र आणणं हाच देशद्रोह समजला जातोय सध्या. कधी काळी सुजाण, साक्षेपी अशी ओळख असणारा मध्यमवर्ग अशा विषयांकडे चुकूनही वळताना दिसत नाही. मी वळू धजतेय कारण हा लेख मी ज्या दिवशी लिहिते आहे तो प्रजासत्ताक दिन आहे. हा दिवसच मला असं लिहिण्याची विलक्षण ताकद देतो. विद्यमान सरकारला न आवडणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या पुढाकाराने भारतातील प्रजासत्ताकाचा पाया रचला गेला आहे. तो इतका तगडा रचला गेलाय, की मनातून या प्रजासत्ताकाचा कितीही तिरस्कार वाटत असला तरी तीच परंपरा आम्ही अधिक कार्यक्षमपणे कशी चालवत आहोत हे या सत्ताधाऱ्यांना सातत्याने दाखवावं लागतं.  


एक गमतीची बाब सांगते. काँग्रेसी परंपरांचा मोह विद्यमान सत्ताधाऱ्यांना तर आहेच, पण भारतातल्या ‘अच्छे दिना’विषयी चिकित्सक भाषेत बोलणं टाळणाऱ्या अनेक सार्वजनिक व्यक्तिमत्त्वांनाही आहे. म्हणून तर २०१७च्या पद्म पुरस्काराचा स्वीकार करणाऱ्यांमध्ये आपल्याला गांधीवादी आणि आंबेडकरवादीही उत्फुल्ल चेहऱ्याने जातीने हजर दिसतात. हिंदुत्ववादी सरकार आंबेडकरी विचार आणि गांधी विचार मानणाऱ्यांचा सत्कार करते आहे म्हणजे ते किती सहिष्णू आहे, सर्वसमावेशक आहे हे दिसत असताना मी उगीचच नकारघंटा का वाजवत आहे, असा प्रश्न काहींना पडेल. तसं तर याही वेळी बऱ्याच महानुभावांना पद्म पुरस्कार मिळाले आहेत, पण मी केवळ गांधीवादी आणि आंबेडकरवादी अनुयायांचाच उल्लेख केला त्याचं एक विशेष कारण आहे.  


महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या प्रजासत्ताकाचे दोन मजबूत आधारस्तंभ आहेत. तत्कालीन काँग्रेसचे राजकीय विरोधक असणारे बाबासाहेब राज्यघटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी ज्या सामूहिक निर्णयप्रक्रियेमुळे जाऊ शकले त्यात गांधींची एक महत्त्वाची भूमिका होती. गांधीविचार आणि आंबेडकरविचार यांच्यातील नातं एक झाकावं आणि दुसरं काढावं असं नक्कीच नाही. वरवर पाहता ते विरोधात्मक नातं आहे. पण जरा खोलवर उतरत गेलो तर ते द्वंद्वात्मकतेने एकमेकांशी बांधलेलं असल्याचं दिसतं. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही तत्त्वं नागरिकांसाठी आणि सार्वभौमत्व, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही प्रजासत्ताक ही तत्त्वं राजसत्तेसाठी घडवू पाहणारे संविधान हे भारतासारख्या विषमताप्रधान व्यवस्थेनं विभाजित केलेल्या समाजात निर्माण करणं ही बाब अजिबात सरळ सोपी नव्हती. त्यासाठी मुक्तिदायी दिशेने समाजपरिवर्तनाच्या संभाव्यतेवर एक प्रकारचा दृढ विश्वास असणं आवश्यक होतं. म. गांधी आणि डॉ. आंबेडकर या दोघांमध्येही हा विश्वास अटळपणे होताच. गांधी-आंबेडकर हे दोघेही व्यवहारात एकमेकांच्या विरोधी राजकारण करत होते, एकमेकांच्या मर्यादा दाखवणारे लेखन करत होते, प्रसंगी काही मुद्द्यांवर एकमेकांच्या विरोधात थेटपणे उभे राहत होते. ‘पुणे करार’ हे त्याचं ढळढळीत उदाहरण म्हणता येईल. भारतीय इतिहासाच्या ज्या टप्प्यावर आणि ज्या ठिकाणी ते दोघे उभे होते त्यातून हा विरोध समजून घेता येतो. विरोधाचे हे सगळे मुद्दे नाकारण्यात काही हशील नाही आणि तरीही दोघे मानवमुक्तीचा विचार मांडत होते आणि हीच बाब दोघांना एकमेकांशी सांधत होती, हेही खरंच आहे. महात्मा गांधींनी ‘मी एक सनातनी हिंदू आहे’ असं म्हणत हिंदू धर्माला मानवतावादी चौकटीचं, सत्य व अहिंसेचं रूप प्रदान करू पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माच्या द्वारे आपली समता-स्वातंत्र्याची मांडणी अधिक व्यापक केली. मानवमुक्तीसाठी अहमहमिकेच्या राजकीय चळवळीसोबतच इहवादी नीतीशास्त्रावर आधारित धार्मिक विचारांचं अधिष्ठान मिळवून देणं दोघांनाही अनिवार्य वाटलं. बाबासाहेबांच्या मार्गक्रमणेत मंदिर प्रवेशाच्या चळवळीपासून हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माच्या स्वीकृतीपर्यंतचा प्रवास आणि गांधींच्या जीवनविचारामध्ये सुरुवातीच्या टप्प्यावरील वर्णव्यवस्थेच्या समर्थनापासून पुढे जातीविरोधी विचारांचा प्रवास, गांधींनी ‘हिंदस्वराज’द्वारे केलेली पश्चिमी भांडवलशाहीची मूलगामी चिकित्सा तर बाबासाहेबांनी ‘अॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ (जातिप्रथा निर्मूलन) या भाषणातून जातिव्यवस्थेची केलेली मूलगामी चिकित्सा या सर्व बाबी त्या दोघांना मानवमुक्तीच्या लढ्यात हातात हात घालून निघालेले शिलेदार (जरी त्यांनी प्रत्यक्षात हातात हात घेतले नसले तरी) ठरवतात. आज जेव्हा गांधी - आंबेडकरांना जाऊन साठहून अधिक वर्षे उलटून गेली आहेत आणि सगळे संदर्भ बदलून गेले आहेत तेव्हा त्यांच्यातील संघर्ष कहाण्यांचे आणि संदर्भांचे गुऱ्हाळ चालवण्यापेक्षा त्या दोघांचे नातू राजमोहन गांधी आणि प्रकाश आंबेडकर नागपूरमध्ये दक्षिणायनच्या सभेत एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून हिंदुत्ववाद्यांना आव्हान देतात आणि भारतातल्या तरुणाईसमोर नवा पर्याय ठेवतात तेव्हा गांधीवादी-आंबेडकरवादी चर्चाविश्वाला एक नवा धुमारा फुटताना दिसतो.  


लेखाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या ज्या व्यंगचित्र स्पर्धेचा मी उल्लेख केला त्या मुद्द्याकडे आता येते. गमतीची गोष्ट म्हणजे व्यंगचित्रांच्या गुणवत्तेमध्ये कमी-जास्त फरक असू दे पण सरसकट सर्व व्यंगचित्रांमध्ये ‘अच्छे दिन’ या संकल्पनेवर परखड टीकात्मक भाष्य केलेलं होतं. मला काहीसं नवल वाटलं. कारण, अलीकडच्या दोन-तीन वर्षात मी अनेक वक्तृत्व स्पर्धा ऐकलेल्या आहेत, स्वतः आयोजितही केलेल्या आहेत. मोदी शासनाची भलामण हे एकच पालुपद त्यात सरसकटपणे आढळून आलं. मग व्यंगचित्रांबाबत मात्र नेमकं उलट कसं काय घडलं? कदाचित स्पर्धेत भाग घेतलेल्या व्यंगचित्रकारांशी मी व्यक्तिगत पातळीवर संवाद केला असता तर त्यांचा एवढा स्पष्ट संकल्पनात्मक विरोध दिसला असता का, याबद्दल मी साशंक आहे. पण मग सर्वच चित्रं सत्ताधाऱ्यांच्या धोरणांच्या विरोधात कशी? याचं एक उत्तर ‘व्यंग’ या संकल्पनेची स्वायत्तता अजूनही टिकून आहे यातून मिळतं. ‘व्यंग’ म्हणजे प्रस्थापितावर केलेलं टीकात्मक विडंबन. एकविसाव्या शतकातल्या भारतवर्षात इतिहास, विज्ञान, शिक्षण, संस्कृती आदी सर्वच बाबींची मोडतोड आणि हिंदुत्वाच्या सनातनी लोलकातून पुनर्मांडणी चालू असताना विद्यार्थ्यांनी टिकवून ठेवलेली व्यंगाची ही संकल्पना माझ्या मनात आशेचा किरण पेरून गेली.  बाकी, हा लेख पूर्ण केला त्या दिवसाची सुरुवात मी कॉलेजमध्ये जाऊन अत्यंत मनोभावे तिरंग्याला मानवंदना देऊन केली होती. लेख झाल्यानंतर त्याच संध्याकाळी राज्यघटनेने दिलेला आणखी एक अधिकार बजावून आले. घराजवळ असलेल्या मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये जाऊन संजय लीला भन्साळी यांचा त्याच दिवशी लागलेला ‘पद्मावत’ पाहिला. चित्रपट कसा वाटला हे तूर्तास गुलदस्त्यात ठेवते. मात्र त्या रात्रीची माझी झोप मला आगामी लढाईच्या विचाराने ‘घुमर घुमे, घुमर घुमे’सारखी घुमवतच राहिली.


प्रजासत्ताकाचे आधारस्तंभ
महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या प्रजासत्ताकाचे दोन मजबूत आधारस्तंभ आहेत. बाबासाहेब राज्यघटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी ज्या सामूहिक निर्णयप्रक्रियेमुळे जाऊ शकले त्यात गांधींची एक महत्त्वाची भूमिका होती.  गांधीविचार आणि आंबेडकरविचार यांच्यातील नातं एक झाकावं आणि दुसरं काढावं असं नक्कीच नाही. वरवर पाहता ते विरोधात्मक नातं आहे. पण जरा खोलवर उतरत गेलो तर ते द्वंद्वात्मकतेने एकमेकांशी बांधलेलं असल्याचं दिसतं. 


- प्रज्ञा दया पवार  
pradnyadpawar@yahoo.com  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...