आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशाही अंगणवाडी सेविका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पुण्यातल्या निम्नस्तरातील वसाहतींमधून होत असलेल्या कामाविषयी, मनापासून ते काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांविषयी...


अंगणवाडीमध्ये  मुलं जाऊन काही तरी शिकतील, त्यांची वाढ नीट होईल, विकास होईल या दृष्टिकोनातून कोणी बघत नाही. मात्र, पुणे शहरामध्ये काही उच्चशिक्षित महिला वसाहतींमध्ये चालणाऱ्या काही अंगणवाड्यांमध्ये आगळंवेगळं काम करत आहेत.


गोखलेनगरमधील दहा बाय बाराच्या घरात दोन-अडीच वर्षं वयापासून अगदी पाच वर्षांपर्यंतची मुलं हसत येत असतात. आल्यानंतर दरवाजाच्या शेजारी असणाऱ्या चप्पल स्टँडवर आपल्या चपला व्यवस्थित काढून ठेवत ती मुले तिथे छोटा गोल करून बसतात. वर्गात मुलं आल्यानंतर सुरुवातीला व्यायाम, मग हजेरी, त्याच्यानंतर खेळ, गाणी, गोष्टी, यांत त्या मुलांचे काही तास आनंदात जातात. गोखलेनगर, वडारवाडी, जनता वसाहत या नागरी वसाहतींमधील घरांमध्ये भरणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये हे चित्र नेहमी दिसतं.


इतर अंगणवाड्यांपेक्षा या अंगणवाड्या काहीशा वेगळ्या आहेत. इथे येणारी सर्व मुलं आजूबाजूच्या वसाहतींमधूनच येतात. मात्र, या अंगणवाड्यांमध्ये त्यांची शालेय जीवनात प्रवेश करण्यापूर्वीची पूर्ण तयारी करून घेतली जाते. अगदी भाषा विकास, सामाजिक विकास, शारीरिक विकास, भावनिक विकास, बौद्धिक विकास केला जातो. कोणत्याही प्रकारचे दडपण, दबाव मुलांवर न टाकता  या सर्व गोष्टी केल्या जातात. या अंगणवाडीत मुलांसाठी काम करणाऱ्या अनेक अंगणवाडी सेविका अल्पशिक्षित नाहीत, तर त्यांनी कला, वाणिज्य वा विज्ञान शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. उच्चशिक्षित असूनही खूप मनापासून गेली दहा-पंधरा वर्षं या अंगणवाड्या चालवण्याचे काम या महिला करत आहेत. या कामाच्या  अनुभवाविषयी वडारवाडी येथील अंगणवाडी सेविका सविता माने म्हणतात, ‘गेली १६ वर्षं मी येथे अंगणवाडी सेविका म्हणून काम करते.  २००२ मध्ये मी या अंगणवाडीत रुजू झाले. माझे शिक्षण जरी बीएस्सी केमिस्ट्री झाले असले तरी मला नेहमी वाटायचं की, आपल्या वसाहतीत सुधारणा करण्यासाठी काही करावं. म्हणून मी इथे कामाला सुरुवात केली. पहिल्यांदा पालकांना या अंगणवाड्या म्हणजे पाळणाघर असल्यासारखेच वाटायचे. ते केवळ मुलांना आणून सोडून द्यायचे. मात्र, हळूहळू त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला. मुलांमधले बदल त्यांना दिसले. इथे येणारी मुले सुुरुवातीला नुसतीच फिरतात, कोणी फक्त रडतं. पण हळूहळू आम्ही त्यांना प्रेमाने बसण्याची, डब्यातील पोळीभाजी व्यवस्थित खाण्याची सवय लावतो. एकमेकांना मदत केली पाहिजे, हे शिकवतो. यामुळे त्यांच्यामध्ये अनेक बदल घडतात. हीच बदललेली वागणूक मुलं घरीदेखील आचरणात आणतात. मग पालक स्वत: येऊन सांगतात की, मॅडम मुलांमध्ये खूप फरक पडलाय. मात्र, हे सगळं शिक्षण आम्ही प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून देतो. मुलांच्या भाषेचा विकास करताना अनेकदा झाडांची ओळख, मग मुळाक्षरांची ओळख यांसारख्या अनेक गोष्टी आम्ही करतो.  गोखलेनगरमधील जनवाडीमध्ये काम करणाऱ्या सुनीता बारमुख म्हणतात, ‘मुलं जेव्हा या अंगणवाड्यांत येतात तेव्हा सुरुवातीला ती थोडी गोंधळलेली पाहायला मिळतात. मग त्यांना आम्ही विविध खेळ, बडबडगीतांच्या माध्यमातून रमवण्याचा प्रयत्न करतो. एकदा त्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली की, मग मात्र ती इथे रुळतात. प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शिक्षण दिलं जात असल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. एक प्रकारे शालेय जीवनात प्रवेश करण्याची पूर्वतयारी इथे आम्ही करून घेत असतो.


वडारवाडी येथील अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या यशोदा इरकल या अंगणवाडी सेविका सांगतात, ‘दैनंदिन जीवन जगताना समाजात कसे वागावे हे शिकवण्याबरोबरच मुलांची शालेय दृष्टिकोनातून ही तयारी करून घेतली जाते. अलीकडच्या काळात बहुतांश पालकांना मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालायचं असतं. त्यामुळे आम्ही मुलांची एबीसीडीशी ओळख करू देतो. ही ओळख करून देताना कागदापासून तयार केलेली इंग्रजी मुळाक्षरे त्यांना हाताळायला देतो.महिला व बालविकास विभागाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या ‘बालविकास’ प्रकल्पांना २००१ मध्ये शासनाची मान्यता मिळाल्यावर २००२ पासून या अंगणवाड्या कार्यान्वित करण्यात आल्या. बालविकास प्रकल्पाशिवाय या प्रकल्पाच्या माध्यमातून लसीकरण, आरोग्य तपासणी, बालशिक्षण, संदर्भसेवा, १५ ते ४५ या वयोगटातील स्त्रियांना आहार मार्गदर्शन दिले जाते. या सेवांमुळे आजूबाजूच्या महिलांना पायाभूत आरोग्य सुविधा मिळवून देण्यास या अंगणवाडी सेविका मदत करतात. महाराष्ट्रात इतर ठिकाणीदेखील या अंगणवाड्यांचे प्रयोग राबवले जातात.


युनिसेफची  भूमिका महत्त्वाची
युनिसेफच्या अंतर्गत या बालविकास प्रकल्पातील अंगणवाड्यांकरिता ‘आकार’ अभ्यासक्रमाला २०१० ला शासनाची मान्यता मिळाली. यातून मुलांच्या भाषा, शारीरिक, बौद्धिक, भावनिक विकासावर लक्ष केंद्रित केले जाते. अंगणवाड्यांतून प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेली छोटी मुले शालेय वातावरणात अत्यंत आत्मविश्वासाने वावरताना दिसतात. {{{

-  प्राजक्ता ढेकळे, पुणे
prajaktadhekale1@gmail.com

बातम्या आणखी आहेत...