आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खो खो च्‍या पंढरीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राजक्ता ढेकळे मुक्त पत्रकार आहेत व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात अध्यापन सहायक म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या विलक्षण कर्तबगार मुली व स्त्रियांची, त्यांच्या कामाची ओळख करून देणारं त्यांचं सदर या अंकापासून सुरू करतोय, त्यातला हा पहिला लेख राज्यातल्या खोखोसाठी प्रसिद्ध असलेल्या गावाविषयीचा.


फ लटणपासून १८ किमीवर वसलेल्या साखरवाडीला मी निघाले, एसटीने. ऊसतोडणीचा हंगाम असल्यामुळे रस्त्यावर साखर कारखान्यांकडे ऊस घेऊन निघालेल्या अनेक बैलगाड्या, ट्रॅक्टर ट्राॅली, ट्रक्स नजरेस पडत होते. जिंती फाट्यावरून उजवीकडे वळून एसटी फरतडवाडी मार्गे साखरवाडीचा रस्ता कापत होती. डांबराचे फवारे मारून तयार केलेले कच्चे रस्ते. या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वाढलेल्या बाभळीच्या फांद्या चुकवत गाडी वेग पकडण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती.


बसस्थानकावर न्यायला आलेल्या संजय बोडरे सरांबरोबर मी थेट साखरवाडी विद्यालयात पोहोचले. शाळेच्या आजूबाजूचा परिसर प्रशस्त. काहीशी शहरातील शाळांसारखीच इमारतीची रचना. इमारतींच्या मधोमध खेळाचे मैदान, इमारतीच्या बाजूने उंच उंच वाढलेली सुरूची झाडे, शाळेच्या व्हरंड्यातून फिरता असताना भिंती व फळ्यावर लिहिलेले सुविचार, श्लोक, सूचना वाचत पुढे जात असतानाच लक्ष वेधले ते मैदानावरील हालचालीने. एकाच रंगाच्या, टेरिकाॅटचे ढगळे शर्ट आणि हाफ ट्रॅकसूट घातलेल्या, डोक्याला चपचपीत तेल लावून वेणी घातलेल्या, किडकिडीत शरीरयष्टीच्या साधारण ११ ते १६ वर्षं वयोगटातील मुली मैदानावर बादलीत पाणी घेऊन मोकळ्या वेफर्सच्या पिशवीच्या साहाय्याने मैदानावर पाणी मारून मैदानावरील धुरळा खाली बसवण्याचा प्रयत्न करत होत्या. काही मुली पांढऱ्या खडूपासून तयार केलेल्या भुकटीच्या साहाय्याने दोन खांबांच्या मध्ये फकी आखून मैदान तयार करत होत्या. ते आटोपल्यावर त्यांनी एका खांबाच्या जवळ जाऊन वाकून त्याला नमस्कार केला आणि दोन खांबांच्या मध्ये ओळीत व्यवस्थित बसून त्यांनी सकाळचा खो-खोचा डाव सुरू झाला. हा खेळ तसा प्रत्येक शाळेत खेळला जातो, पण या शाळेतील या खेळाचे खास वैशिष्ट्य आहे. या पारंपरिक खेळामध्ये साखरवाडी विद्यालयातील तब्बल सात विद्यार्थिनींनी राज्य सरकारचा खेळातील सर्वोच्च शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. विद्यालयाचे शारीरिक शिक्षण व खो-खोचे प्रशिक्षक संजय बोडरे यांना देखील त्यांच्या खो-खोमधील योगदानासाठी राज्य सरकारकडून दादोजी कोंडदेव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. साखरवाडीसारख्या ग्रामीण भागात जिथे खेळाचे कसलेही वातावरण नसताना केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या विद्यालयाने हे देदीप्यमान यश खेचून आणले आहे. शहरी भागात अद्ययावत मैदाने, प्रशिक्षण केंद्रे उपलब्ध असणाऱ्या शाळांनादेखील असे यश प्राप्त करणे शक्य होत नाही. मुळातच ग्रामीण भागातील मुली काटक, चपळ असतात; पण गरज असते ती फक्त योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाची. मुलींचा खेळाबाबत विश्वास वाढवण्याची हीच गरज बोडरे सरांनी ओळखली आणि या रानफुलांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात या खेळातील सर्वात जास्त शिवछत्रपती या एकाच गावातील मुलींनी अत्यंत कमी वयात मिळवले आहेत. त्यामुळे साखरवाडी गावाची ओळख महाराष्ट्राला आता खो-खोची पंढरी म्हणून होत आहे. याशिवाय राणी लक्ष्मीबाई, वीरबाला, जानकी असे राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारदेखील या मुलींनी पटकावले आहेत.


साखरवाडी १० हजार लोकवस्तीचे गाव. उद्योगपती भाऊसाहेब आपटे यांनी या गावात साखर कारखाना उभारला, अन या गावाचे नाव साखरवाडी पडले ते कायमचेच. पुढे या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी साखरवाडी विद्यालयाची स्थापना करण्यात आली. आज साखरवाडी गावाची ओळख साखर कारखान्यापेक्षा गावातील मुलींच्या राष्ट्रीय पातळीवर खोखोमधील कामगिरीमुळे आहे. १९९५पर्यंत गावाची स्थिती म्हणजे ज्ञानापेक्षा अज्ञानाला आणि कर्तृत्वापेक्षा परंपरेला अधिक प्राधान्य दिले जात होते. पण १९९६मध्ये संजय बोडरे हा गावाचाच मुलगा क्रीडा शिक्षक म्हणून साखरवाडी विद्यालयाला लाभला. गावातील शाळेतील चित्र पालटण्यास सुरुवात झाली. संजय बोडरे स्वत: राष्ट्रीय पातळीवरील खो-खोचे खेळाडू. त्यांनी शाळेतील मुलींना खो-खोचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. या खेळातील मुलींची चपळाई, तत्परता बघून मुलींना खेळात गती असल्याचे त्याच्या लक्षात आले. तेथून पुढे साखरवाडी विद्यालयातील मुलींचा खेळातील प्रवास सुरू झाला. पण हा प्रवास साधा, सरळ नव्हता. मुलींना या खेळात गती असल्याचे शिक्षकाला कळत असले तरी ते पालकांना समजावून सांगणे खूप अवघड होते. ‘खेळून काय होणार आहे’, ‘एकतर शाळा शिका नाहीतर घरची कामं करा,’ अशा प्रतिक्रिया मुलीच्या पालकांकडून मिळाल्या. 


मात्र, क्रीडा शिक्षक मागे हटले नाहीत. ‘शाळेच्या वेळातच मुलींचा सराव घेईन,’ ‘अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही याची खबरदारी घेईन’ अशी हमी त्यांनी दिली. याबरोबरच मुलींच्या पालकांच्या बैठका घेऊन त्यांना खेळाचे महत्त्व पटवून सांगितले. रडतखडत का होईना पालकांनी खेळण्यास परवानगी दिली. मुलींचा सराव सुरू झाला. सरावाच्या दरम्यान सरांच्या लक्षात आलं की, शालेय गणवेष घालून मुलींना अधिक गतीने खेळता येत नव्हते. खेळताना त्यांना योग्य त्या पोशाखाची आवश्यकता होती. मुलींना हाफ पँट आणि टी-शर्ट घालून देण्यास पालकांनी मात्र ठाम नकार दिला. ‘आमच्या मुली हाफ पँट घालून खेळणार का?’, ‘लोक काय म्हणतील’, ‘समाज काय म्हणेल,’ असे केवळ पालकांकडूनच नाही तर सहकाऱ्यांकडूनही विचारले जाऊ लागले. मग लोकांची ही मानसिकता बदलण्यासाठी व पालकांची परवानगी मिळवण्यासाठी क्रीडा शिक्षकांनी राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या मुलींच्या स्पर्धांचे व्हिडिओ त्यांना दाखवले. त्या मुलींप्रमाणेच आपल्या मुलीदेखील खेळून गावाचे नाव रोशन करू शकतात, राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे नेतृत्व करू शकतात, असा आशावाद पालकांमध्ये निर्माण करत स्पोर्ट््स ड्रेससाठी परवानगी मिळवली. नंतरच्या सहा महिन्यांतच राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये यश मिळवून गावाला सुखद धक्का दिला. १९९६ पासून सुरू झालेला यशाचा आलेख नेहमी चढताच राहिला.


या खेळामुळे मुलींना स्वतंत्र ओळख मिळू लागली. मुलींची प्रगती पाहून गावातील इतर पालकांनाही आपल्या मुलींनीदेखील खो-खो खेळावे असे वाटू लागले. ही झाली साखरवाडीच्या खो-खो प्रेमाची गोष्ट. 


साखरवाडी गावाला अभिमान वाटावा असे काही खेळाडू गावात तयार झाले. शिवछत्रपती पुरस्कार विजेती प्रियांका येळे त्यातलीच एक. साखर कारखान्यातील कामगार कॉलनीमधे तिचं घर. खेळातील राज्यस्तरावरील सर्वोच्च अशा शिवछत्रपती पुरस्कारासोबतच जानकी, वीरबाला, राणी लक्ष्मीबाई यांसारख्या अनेक पुरस्कारांची मानकरी असलेल्या प्रियांकाच्या घर अगदीच साधं, माझा भ्रमनिरास करणारं. सिमेंट आणि खडीच्या साहाय्याने तयार केलेले अंगण, रंग उडालेल्या भिंती, सहज फिरता येईल एवढ्या आकाराच्या दोन खोल्या, टेबलावर मांडलेला टीव्ही एवढीच काय ती या घरातील भौतिक समृद्धी. मात्र या समृद्धीलाही लाजवेल असं होतं पुढचं चित्र. भिंतीवर चारी बाजूंनी लाकडी फळी ठोकून त्यावर मांडलेल्या बक्षिसांच्या ट्रॉफीज व फळीच्या पुढील बाजूस छोटे खिळे ठोकून त्याला अडकवून ठेवलेली मेडल्स. प्रियांकाला मिळालेल्या अनेक ट्रॉफीमध्ये शिवछत्रपती पुरस्कार उठून दिसत होता.


प्रियांकाची खो-खोची आवड लक्षात घेऊन पालकांनी तिला खेळायला प्रोत्साहित केले. प्रियांकाचे वडील कारखान्यात हंगामी कामगार आहेत. आई घरी शिलाईकाम करते. आर्थिक परिस्थिती बेताचीच. मात्र घरच्या परिस्थितीचे भांडवल न करता ती खेळत राहिली. खेळाबरोबरच शिक्षणातही कायम पुढेच राहिली. तिने विज्ञान शाखेतून शिक्षण घेतलंय. खेळामुळे अभ्यासात नुकसान होऊ नये, म्हणून रात्री जागून अभ्यास करण्याची सवय तिने स्वत:ला लावून घेतली. बारावीच्या वर्षात परीक्षेला एका महिना राहिला असताना बुडालेला अभ्यासक्रम उरकण्यासाठी ती रात्री जागून अभ्यास करायची आणि प्रियांकाला झोप येऊ नये म्हणून आई रात्री शिलाईची कामे करायची. आज खेळ, अभ्यास दोन्ही पातळ्यांवर प्रियांका यशस्वी झाली आहे.


खुशबू, करिष्मा आणि मुस्कान या तिघी बहिणींनीदेखील खो-खोत आपल्या नावाची मोहर उठवली आहे. आम्ही त्यांच्या आई शहिदा नगारजे यांना भेटलो. त्या सांगायला लागल्या, ‘तिघी लेकींनी राज्य, राष्ट्रीय पातळीवर खेळात मजल मारली आहे. सुरुवातीला आपल्या समाजात मुली शॉर्ट कपडे घालून खेळतात का, म्हणून लोकांची बोलणी ऐकली, पण मुलींना खेळात मिळत असलेले यश बघून लोकांची तोंडे आपोआप बंद झाली. सुरुवातीला तिन्ही मुलींचा खर्च भागवणे थोडे जिकिरीचे होते, पण मुलींच्या चांगल्या भविष्यासाठी मागे हटायचे नाही, असे ठरवून आम्ही नवरा-बायकोने जास्तीची कामे केली.’


साखरवाडीचे नाव खेळातून सर्वदूर पोहोचवलेल्या प्रियांका, मुस्कान यांच्या घरच्या परिस्थितीच्या  जवळपास जाणारी परिस्थिती  सर्वच खेळाडूंच्या घरी पाहायला मिळते. बहुतांश खेळाडूंचे वडील साखर कारखान्यात हंगामी कामगार म्हणून काम करतात आणि उरलेल्या वेळात शेती तर कधी शेतमजूर म्हणून काम करतात. या पालकांचा आर्थिक स्तर जरी बीपीएल असला तरी आपल्या मुलींनी खेळावे, चांगले शिक्षण घ्यावे यासाठी ते कायम आग्रही असलेले दिसतात. सातारा जिल्ह्यातील साखरवाडी या गावाची नवी ओळख अलीकडच्या काही वर्षांत झालेली आहे. एका कोपऱ्यात वसलेल्या या गावाने खोखो या खेळातून सगळ्याच लक्ष वेधून घेतलं आहे. साखर कारखाना झाल्यावर हे गाव देशाच्या नकाशावर आलं होतंच. पण आता हे गाव खो-खो खेळातून राज्यातील क्रीडा अभ्यासकांच्या अभ्यासाचा विषय झालं आहे. आता ‘साखरवाडीचा खोखो पॅटर्न’ तयार झाला आहे. एकाच गावात एकच खेळ खेळणारी आणि त्या खेळात उत्तुंग यश मिळवणारे राष्ट्रीय स्तरावर खेळाणारे नव्वदहून अधिक खेळाडू या गावाच्या मातीत तयार झाले आहेत. या खेळाडूंपैकी अनेक मुली स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन आज क्लास वन अधिकारी, वरिष्ठ लिपिक, पोलीस उपनिरीक्षक, आदि पदांवर कार्यरत आहेत.

 
संजय बोडरे यांच्यासारखा प्रशिक्षकाचेही कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे. कारण खेळाची आवड रुजवण्याचे आणि खेळाडू घडवण्याचे अवघड काम त्यांनी केले आहे. लहान, मध्यम आणि वरिष्ठ गटात सर्वत्र त्यांचे खेळाडू स्पर्धा गाजवत आहेत. त्यांच्या कामाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. ते सांगतात, ‘खेळातून करिअर घडवता येते. साखरवाडीत आम्ही तेच केलंय. पुस्तकं वाचली पाहिजेतच पण खेळलेही पाहिजे. गावोगावी अशी अनेक मुलं आहेत पण त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. केवळ मार्गदर्शन नसल्यामुळे वाया चालले आहेत. आम्ही खेळाडू हेरले आणि ते घडले.’ ज्याच्या मार्गदर्शनाखाली सराव केलेल्या सात खेळाडूंनी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळवला आहे असा हा माणूस सगळं सहजपणे सांगत होता. साखरवाडी आणि तिथले गुणवंत खेळाडू आणि पालकांना आम्ही भेटत होतो. दिवस मावळायला गेला. सरांना ग्राउंडवर जायचे वेध लागले. मुलीही सरावासाठी शाळेच्या आवारात पोहोचल्या. मी साखरवाडी सोडली तेव्हा माझ्या कानावर पुसटसे आवाज येत होते खो-खो-खो...

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो... 

 
- प्राजक्ता ढेकळे, पुणे
prajaktadhekale1@gmail.com

बातम्या आणखी आहेत...