आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उसवणा-या समाजाच्‍या काही नोंदी...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बातम्यांच्या गदारोळात काही बातम्या वर्तमानाच्या उदरात लपलेल्या भयसूचक भविष्याची झलक दाखवतात. फिफा वर्ल्डकप पाहून चित्कारणाऱ्या, बिग बॉस पाहत परपीडा-दु:ख, सुखाचे घुटके घेणाऱ्या समाजाच्या फेसाळणाऱ्या अभ्र्याखालची जमा झालेली राळही त्या दाखवतात...

 

पत्रकारिता करताना गेल्या १२-१५ वर्षांच्या काळात असंख्य घटना म्हणजे, बातम्या पाहिल्या-वाचल्या आणि दिल्यात की, आता त्यातली भीषणताही जून झाल्यासारखी वाटते. आपणही निबर, निर्ढावलेले होतो.  मात्र, मनातला एखादा कोपरा असतोच, जो या घटनांबाबत आतल्या आत दुखावतो, रडतो किंवा आक्रंदतो, चिंतित होतो. या घटना मुंबईतल्याच असतात असंही नाही. पुणं, औरंगाबाद, नागपूर, राज्यातलाच काय देशा-परदेशातल्या घटनाही अस्वस्थ करून जातात. परवा अफगाणिस्तानातल्या काबूलमध्ये हिंदू आणि शीख अल्पसंख्याकांसाठी लढणारे अवतार सिंग खालसा यांचा एका बॉम्बस्फोटात मृत्यू झाल्याची बातमीही असेच चरे पाडून गेली. बातम्यांच्या अशाच गदारोळात काही बातम्या मात्र वर्तमानाच्या उदरात लपलेल्या भयसूचक भविष्याची झलक दाखवतात. फिफा वर्ल्डकप पाहून चित्कारणाऱ्या, बिग बॉस पाहत परपीडा-दु:ख, सुखाचे घुटके घेणाऱ्या समाजाच्या फेसाळणाऱ्या अभ्याखालची जमा झालेली राळ त्या बातम्या दाखवतात. गेल्या काही दिवसातल्या अशाच काही बातम्या मी या लेखासाठी म्हणूनच निवडल्यात. वस्तुत: जुन्या घटना निवडल्या असत्या तरी फरक पडला नसता. आता हेच पाहा ना... २०-२५ वर्षांपूर्वी मुंबईसह महाराष्ट्राला हादरवणारी रिंकू पाटील जळीतकांडाची बातमी, मानवत हत्याकांड, जरा अलिकडचं खैरलांजी प्रकरण, या घटना आहेतच की हाताशी!  पण, मी निवडलेल्या या काही बातम्या समाजाच्या बहुतेक सर्व स्तराला स्पर्श करणाऱ्या आहेत. आजची बातमी म्हणजे, उद्याची रद्दी... तर अशा मेलेल्या बातम्यांच्या व्हिसेरांचे परिक्षण आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

 

बोकडांची निर्यात थांबवली...
देशात गोमांस बाळगणे, विक्री करणं यावर बंदी आहे. त्यावरून गदारोळ तर झालाच मात्र काही मुस्लिम तरुण, म्हाताऱ्या व्यक्तींचे जीव गोमांस बाळगण्याच्या नुसत्या संशयापोटी घेतले गेले. दुसऱ्याच्या ताटात नाक खुपसण्याची ती सुरुवात होती. तोपर्यंत मुंबईत काही सोसायट्यांमध्ये शाकाहार सक्ती, मांसाहारी (पर्यायानं मराठी) लोकांना घर न देण्याचे नियम उगवू लागले होतेच. याचा कडेलोट झाला, तो परवाच्या नागपूर प्रकरणात. बोकडांच्या निर्यातीचा एक प्रयोग होणार होता. मात्र, काही जैन मंडळींनी त्याला विरोध केला अन् राज्य शासनानंही निर्यातीची प्रस्तावित विमानफेरी रद्द केली. मुंबईत याच जैनांचे धर्मगुरू शाकाहार मान्य असणाऱ्या आणि तोच अजेंडा रेटणाऱ्यांना मतं मिळतील, असे आदेश देऊ लागलेत. काही प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्येही मांसाहार बंद केल्याच्या बातम्या आल्या. काही म्हणा पण या मंडळींनी मुस्लिमांच्या-काही मागासवर्गीयांच्या अन्नावर बंदी आणल्यावरही सुशेगाद राहणाऱ्यांना किमान आपल्या चिकन-मटणाच्या मुद्यावर एक व्हायला लावलं, हे नसे थोडके!

 

पाच जणांची जमावाकडून हत्या...
‘आले तसे पाठवले’ असे व्हॉट्सअप मेसेज करणारी मंडळी ही जन्मत: जेवढं डोकं घेऊन आली तितकंच, ते राहिलं असं वाटावं अशी स्थिती आहे.  खातरजमा न करण्याच्या आणि मुळात स्वत:ची कसली, तरी लसलसती द्वेषाची, क्रौर्याची भावना शमवण्यासाठी हे लोक हानीकारक मेसेज फॉरवर्ड करत वणवा पेटवतात. मुलं पळवणारी टोळी ही अशीच एक अफवा. या फक्त अफवेपोटी देशात अनेकांचे बळी गेलेत. आपल्या धुळ्यात परवा अशीच घटना घडली. यात गोसावी समाजातील ५ जणांना जमावानं अंगात सैतान संचारल्यासारखं मारून तुडवून संपवलं. अशीच घटना मालेगावातही घडली. गोमांस बाळगण्याच्या, मुलं पळवण्याच्या फक्त अफवेवरून सामान्य लोक सर्रास कायदा हाती घेऊ लागलेत. आणि त्याहून भयानक म्हणजे एखाद्या माणसाला ठार करणं सर्वमान्य ठरू लागलंय. आयुष्यात गंभीर गुन्हे न केलेला एखादा अनोळखी लोकांचा समूह असा जीवघेणा का बनतो आहे? कुणाला तरी मारूनच टाकलं पाहिजे, अशी भावना का वाढतेय आपल्यात...

 

११ जणांची सामूहिक आत्महत्या...
बहुदा आरूषी तलवार हत्या प्रकरणानंतर दिल्ली पोलिसांची मती गुंग करणारं हे प्रकरण ठरणार आहे. या आत्महत्या आहेत, असं सध्यातरी पोलिसांचं मत आहे. मृतांपैकी एका व्यक्तीच्या स्वप्नात त्यांचे दिवंगत वडील येत आणि त्यांनीच या कृत्याविषयी मार्गदर्शन केलं असं, तिथं सापडलेल्या डायरीत आढळून आलंय.  साठीपार म्हाताऱ्या आजींपासून ते २०च्या आत असणाऱ्या मुलींपर्यंत सर्वांनीच आत्महत्या केल्या. कुटुंबातील सदस्य एकामागोमाग फास घेताहेत, डोळे व हात बांधलेली त्याची शरीरं शेवटचे आचके देताहेत, हा प्रसंग कल्पून पाहिला तरी अंगावर काटा येईल. माणसं असंही वागू शकतात? त्यातील लहान मुलं-मुली स्वत:हून मरणाला कशी कवटाळती झाली? असलं काही आपल्या शेजाऱ्यांच्या मनात चाललंय याची कल्पनाही त्यांच्या इमारतीत कुणालाही आली नाही... आपल्या सभोवतालचे हसरे चेहरे तरी खरे आहेत?

 

बलात्कार आणि धर्माचे चष्मे...
या बलात्कार प्रकरणात आरोपी मुस्लिम समाजाचे आहेत. त्यामुळे झालं असं की काश्मिरातल्या असिफा प्रकरणात हिंदू आरोपी असल्यानं, जोडीला अनेक आक्रस्ताळ्या पुरोगाम्यांनी हिंदू धर्माच्या नावे बोंब ठोकत आणि हिंदू किंवा भारतीय असल्याची लाज वगैरे व्यक्त केल्यानं, मंदसौरमुळे हिंदूमधल्या एका मोठ्या गटाला प्रत्युत्तर दिल्यासारखं वाटलं. बलात्काऱ्यांनी त्या मुलींचे धर्म पाहिले होते की, नाही माहीत नाही, मात्र त्या मुलींच्या किंकाळ्या ‘धर्मनिरपेक्ष’ असणार हे नक्की! पण, धर्मांधांच्या लढाईत त्या ऐकायच्यात कुणाला?

 

सुषमा स्वराज यांचं ट्रोलिंग...
एका मुस्लिम-हिंदू जोडप्याला पासपोर्ट मिळवताना वाईट वागणूक मिळाल्याचं कळताच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी हस्तक्षेप करून त्यांचं काम करून दिलं. झालं! एवढ्याच मुद्यावर सुषमा स्वराजना ट्रोलभैरवांनी समाज माध्यमांवर झोडपून काढलं. यातल्या अनेकांनी त्यापूर्वी वरिष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या, काँग्रेस किंवा विरोधी पक्षातल्या नेत्यांना किंवा अचूक सांगायचं, तर मोदी-भाजप-हिंदूविरोधी काही सांगू पाहणाऱ्यांना ट्रोल केलंय. विशेष म्हणजे केंद्रातील पहिल्या पाच मंत्री पदांपैकी एक असलेल्या स्वराज यांच्यावर हे ट्रोल हल्ले होऊनही मोदींना त्यावर एकही टिप्पणी करावीशी वाटली नाही. मला एका वेगळ्या अर्थानं स्वराज यांचं ट्रोल होणं सुखावलंय. कारण, या निमित्त त्यांना आणि भाजपमधल्या अनेकांना आपण कोणते भस्मासूर पाळतोय ते कळलं असावं.

 

मुंबईत मुलीची आत्महत्या...
जगणं म्हणजे काय हेच ज्या लहानग्यांना कळणं कठीण त्यांना एखाद्या खाणीत बुडून किंवा उंच इमारतीवरून उडी देऊन संपवण्याचं वेड कुठून मिळत असेल? काही महिन्यांपूर्वी एका वरिष्ठ सनदी अधिकारी दाम्पत्याच्या एकुलत्या एका मुलानं अशीच आत्महत्या केली. त्याहीपूर्वी ‘ब्लू व्हेल’ गेम खेळून मुलांनी स्वत:ला इजा करून घेतल्याच्या बातम्या आपण पाहिल्या. यातून होतंय असं की, आई-वडील असोत की शिक्षक, त्यांच्याकरता मुलांना साधं दरडावणंही धोक्याचं वाटू लागलंय. मास्तरांनी शाळेत बडवल्यावर घरी बाबांकडूनही बोनस मार खाऊन आणि जोडीला घरची बेताची स्थिती असली तरीही बालपण मजेत घालवणाऱ्या पिढीच्याच पुढच्या पिढ्यांमध्ये हा ठिसूळपणा आला कुठून?

 

ब्रिज कोसळणं, स्टेशनवर आग..
मुंबईकर कसाही मरू शकतो. विमान कोसळून झालेल्या अपघातात, ट्रेनच्या गर्दीतून पडून, ब्रिज कोसळून, झाड कोसळून, तुंबलेल्या रस्त्यावरच्या मॅनहोलमध्ये जाऊन, मद्यधुंद चालकाच्या गाडीखाली येऊन वगैरे. त्यातून त्याचं नशीब असलंच तर आजारीपणानंही मरतो बरं. अर्थात सव्वाशे कोटी लोकसंख्येत अशा मृत्यूंचं काय वैषम्य म्हणा? नेमाडेंच्या भाषेत खानेसुमारीच्या ओळी काय त्या वाचल्या. जपानमध्ये ट्रेन उशीरा आली, तर त्यांचा मुख्याधिकारी राजीनामा देतो. आपले मंत्री, राजकीय पक्ष किमान खेद व्यक्त करतात याचं जरासंही कौतुक नाही तुम्हाला?

 

भावानं थोरल्याच्या किडन्यांसाठी आत्महत्या केली
थोरल्या भावाच्या दोन्ही किडन्या गेल्यानं त्याला आपल्या किडन्या देऊन वाचवण्यासाठी धाकट्यानं हॉस्टेलमध्ये फास लावून घेतला. नशिबाची थट्टा अशी की, त्याचा मृत्यू काही तासानंतर कळल्यानं तोपर्यंत त्याचे अवयव निकामी झाले.  धाकट्याची आत्महत्या, थोरल्याच्या किडन्या गेलेल्या...काय झालं असेल, त्यांच्या आई-वडलांचं?  एकीकडे नातेसंबंधाचा हा असा घट्ट बंध समोर येतो तर दुसरीकडे नात्यांची उरलेली कलेवरं.  पुण्यात मुलगा अनेक दिवसांनी आपल्या आईच्या घरी आला तेव्हा त्याला कळलं की, आईचा मृत्यू झालाय. घरी त्याला आईचा सांगाडाच दिसला. एकटी म्हातारी बाई म्हणून सोसायटीतही कुणाशी फारसा संबंध नाही. त्या महिलेसाठी जास्त भयानक काय ठरलं असेल...कणाकणानं ग्रासणारा मृत्यू की खिडकीबाहेर, भिंतीकडे पाहात न संपणाऱ्या क्षणांचा दुर्लक्षित एकटेपणा?
या घटना अस्वस्थ करतात मला...
माणूस होणं इतकं अवघड आहे?

 

prasann.joshi@gmail.com

बातम्या आणखी आहेत...