आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मरण कुरुंदकरांचे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक असतो विचारांचा थिसिस, दुसऱ्या प्रकाराच्या विचारांचा असतो अँटिथिसिस. आणि यातल्या घुसळणीतून पुढे येतो तो सिंथेसिस. आचार्य कुरूंदकर हे असे सिंथेसिस मांडणारे होते. अतिशयोक्तीचा आरोप स्वीकारूनही म्हणायचं झाल्यास कुुरुंदकर हे महाराष्ट्रातील शेवटचे पुरोगामी होते. कारण विचारव्यूहाला पुरो-पुढे घेऊन जाण्याची क्षमता त्यांच्यात होती आणि त्यात पूर्वग्रहाची लागण त्यांनी होऊ दिली नव्हती...

 

आज आचार्य नरहर कुरुंदकर (१९३२-१९८२) असते, तर ८६ वर्षांचे असते. मात्र, मला तसं वाटत नाही. कुरुंदकर ८२ मध्ये निर्वतले नसते, तर महाराष्ट्रातल्या पुरोगाम्यांनी त्यांच्या विचारांचा एव्हाना खून केला असता याची मला खात्री आहे. एरवी, शारीरिक खून अतिशय सोपा असल्यानं अशी बुद्धिहीन कृती उजवे करू शकतात, ते ती करतातही. मात्र, एखाद्या माणसावर आरोप करून, त्याबद्दल गैरसमज, वाद तयार करून, त्याच्या प्रागतिकतेवर संशय घेऊन त्याला जीवनातून उठवणं हाही सार्वजनिक जीवनाचा मृत्यूच. असं करायला काही एक बौद्धिक कुवत लागते, अभ्यास, वाचन आणि सांस्कृतिक राजकारणाचं भान लागतं. तर असा खून इथल्या पुरोगाम्यांनी कुरुंदकरांचा नक्की केला असता. कारण, कुरुंदकर महाराष्ट्रात व देशात सध्या प्रचलित झालेल्या पुरोगामी-प्रतिगामीपणाच्या बाष्कळ व्याखेपलीकडे होते. आपण मार्क्सवादी आहोत, असं ते म्हणत. राष्ट्र सेवादलाचे ते कार्यकर्तेही होते. मात्र, त्या विचारांच्या पोथ्यांचे ते भाट झाले नाहीत. दुर्दैवानं, आपल्याकडे कोणत्याही वादाचे तथाकथित पुरोगामी (पक्षी- हिंदूविरोधी, मुस्लिम-दलित केंद्री,राष्ट्रवादविरोधी, भांडवलशाही किंवा खुल्या आर्थिक धोरणविरोधी)-प्रतिगामी (पक्षी-ब्राह्मणी, भाजपेयी, हिंदुत्ववादी, जातीयवादी, दलितविरोधी, मुस्लिमविरोधी) अशा छावण्या बनल्या आहेत. त्यातही उपछावण्या आणि त्यांचेही गटतट आहेतच. याच विचारांच्या चष्म्यातून इतिहास आणि भूतकाळाकडे आपल्याला पाहायला लावलं जातंय.


मी परवा रविवारी पुण्यात ‘मार्क्सवादी दृष्टीतून कला व संस्कृती’ या विषयावरील एक परिसंवाद ऐकायला गेलो होतो. तिथं साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी राजेश जोशी बोलत होते. त्यात ते एके ठिकाणी म्हणाले की, तुम्ही एकतर मार्क्सवादी असू शकता किंवा मार्क्सविरोधी. तिसरा पर्याय तुम्हाला उपलब्ध नाही. ही मांडणी उफराटी आहे. अशीच मांडणी आज देशभरात करण्याचा प्रयत्न उजवे व डावे दोघेही करताहेत.


ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे या संदर्भात एक छान मांडणी करतात. ते म्हणतात की, एक असतो विचारांचा थिसिस, दुसऱ्या प्रकाराच्या विचारांचा असतो अँटिथिसिस. आणि यातल्या घुसळणीतून पुढे येतो, तो सिंथेसिस. आता अनेक कडव्या डाव्यांना हा पलायनवाद वाटू शकतो (संशोधक संजय सोनवणी यांच्या एका पुस्तक प्रकाशानात सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी तसा खोचक टोला डॉ. मोरेंना लगावलाही होता). तर माझ्या मते, आचार्य कुरुंदकर हे असे सिंथेसिस मांडणारे होते. किंबहुना ते त्याहीपुढे एखाद्या अस्सल बातमीदाराच्या शिस्तीतले ‘आहे हे, असे आहे’ असं सांगू शकणारे प्रामाणिक विचारकर्मी होते. अतिशयोक्तीचा आरोप स्वीकारूनही म्हणायचं झाल्यास कुरुंदकर हे महाराष्ट्रातील शेवटचे पुरोगामी होते. कारण विचारव्युहाला पुरो-पुढे घेऊन जाण्याची क्षमता त्यांच्यात होती आणि त्यात पूर्वग्रहाची लागण त्यांनी होऊ दिली नव्हती.


माझी तक्रार पुरोगाम्यांकडून आहे. कारण आशाही त्यांच्याचकडून आहे आणि मार्गदर्शनाची अपेक्षाही! कारण, भारतात पाश्चात्य देशांप्रमाणे गंभीर उजवे ही भानगडच नाही. इतिहासकार रामचंद्र गुहांनी याबद्दल प्रदीर्घ लेखच (इन अॅब्सेन्शिया: व्हेअर आर इंडियाज कन्झरवेटिव्ह इंटेलेक्चुअल्स: कॅरव्हान-मार्च २०१५) लिहिलाय. परंतु काही एक गंभीर मांडणी करणारी उजवी मंडळी नसणं, हे आपलं नुकसान आहे याची कल्पना सध्याच्या उजव्या पक्षांना, गटांना, संस्थाना तर नाहीच आणि डावे किंवा ज्यांना केंद्राच्या डावीकडले असे म्हणतो, त्यांच्यासाठी उजवे बुद्धिमान असू शकतात हीच एक अंधश्रद्धा आहे अशी स्थिती! संघ आणि भाजपलाही याची काही पडलेली नाही. ‘एकटे सुब्रम्हण्यम स्वामी किंवा महाराष्ट्रात सच्चिदानंद शेवडे, भाऊ तोरसेकरादी’ मंडळी कुठे कुठे पुरे पडणार? वसंत बापट, निळू फुले, कुरुंदकर यांची नावं आज राष्ट्र सेवादलाला सांगता येतील अशी नावं संघ सांगू शकेल काय? त्यातल्या त्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे किंवा साक्षेपी संपादक आनंद हर्डीकर (यांनी जिन्नांवर ‘कायदेआझम’ हा ग्रंथ लिहिलाय.) किंवा अशीच दोन चार नावं ते देतीलही. मात्र  ही मंडळी स्वत:च्या अभ्यासानं आणि प्रयत्नांनी मोठी झालीत. मात्र सांगण्याचा मुद्दा हा की, जशी उजवे विचारवंत, अभ्यासकांची वानवा आहे तशीच डाव्या-उजव्यांपलिकडच्या संमिश्र छटा आकळून समजावू शकणाऱ्या तटस्थ विचारकांची उणीव आज मोठी आहे. कुरुंदकर हे असे बहुधा शेवटचे आणि एकमेव!


कुरुंदकरांचं हे वेगळेपण सध्याच्या काही वादंगांच्या पार्श्वभूमीवर उदाहरणांनी स्पष्ट दाखवता येईल. ‘जमात-ए-इस्लामी’च्या एका कार्यक्रमात कुरुंदकरांना वक्ता म्हणून आमंत्रण होतं. कुरुंदकरांनी तिथे जमलेल्या मौलवी, उलेमा व मुस्लिम श्रोत्यांना एक मर्मग्राही प्रश्न विचारला की, मी नास्तिक आहे. धार्मिक अर्थानं मी हिंदू नाही. पण मी मुसलमानही नाही, हे तुम्हाला मान्य आहे का? माझा मुसलमान नसण्याचा हक्क तुम्हाला मान्य आहे काय? आज ही हिंमत दाखवणारे विचारवंत आढळतात? आज तोंडी तलाकच्या मुद्यावरून भाजपनं काँग्रेसला ‘मुस्लिम पुरूषांचं हित बघणारा पक्ष’ असं म्हटलंय. भाजपला पर्यायानं संघाला आणि म्हणून हिंदुत्वाला विरोध म्हणून धर्मनिरपेक्ष शक्ती मुस्लिमांसंबंधित विषयांवर सावध भूमिका घेतात. एक राजकीय गरज म्हणून ते समजूनही घेण्यासारखं आहे. मात्र, साऱ्या पुरोगामी विचारविश्वालाच अशी झापड ओढून चालणार नाही. याबाबत हमीद दलवाई आणि कुरुंदकरांचं वेगळेपण दिसून येतं, ते हे असं.


आणखी एक उदाहरण, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे. अभिनेता रितेश देशमुखने रायगडावर काढलेले फोटो असोत, की शिवस्मारकाची उंची पुतळ्यापेक्षा तलवारीची अधिक असो, आमच्या भावनांच्या पुरात बाकीचे प्रश्न बुडालेच समजा. शिवरायांना एकतर ‘हिंदुपतपातशहा’ पक्षी मुस्लिम विरोधक तरी दाखवण्याचा प्रयत्न होतो किंवा त्यांना पुरोगामी करण्याच्या नादात जणू कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य-कॉम्रेड तरी बनवलं जातं (यातूनच एखादी पुस्तिका साद्यंत इतिहास असल्यागत डोक्यावर घेतली जाते). इथे पुन्हा कुरुंदकर तिसरी मिती दाखवतात. ते म्हणतात, ‘आमचे विचारवंत एक तर शिवाजीला हिंदू महासभेचा सभासद करून प्रत्येक मुसलमानाचा द्वेष करावयास लावतात किंवा त्याच्या माथ्यावर आधुनिक ‘सेक्युलरिझम’ लादतात. छत्रपतींच्या थोरवीला सतराव्या शतकातील हिंदू मनाची मर्यादा होती, हे शेजवलकर कधी विसरले नाहीत. हा त्यांचा इतिहासाशी असणारा प्रामाणिकपणा मला स्तुत्य वाटतो.’  


आजचे शिवशाहीर किंवा सरकार बदललं की इतिहास बदलणारे, आपल्या बहुसंख्याक जातीच्या संघटनांच्या पदराखाली दडणारे इतिहासकार किंवा विद्रोहाच्या नावाखाली जातीय विद्वेष मांडणाऱ्यांना हे कुरुंदकर झेपणारे आणि परवडणारे नाहीत. सध्या संभाजी भिडे यांच्या निमित्तानं ‘मनुस्मृती’ चर्चेत आलीये. ‘मनुस्मृती’चं ब्राह्मण्य निषेधार्हच. मात्र, तो निषेध करताना ‘मनुस्मृती’च्या लाभार्थी इतर जाती मात्र आपल्या लाभाचा आणि केलेल्या अन्यायाचा इतिहास विसरतात. याबाबत कुरुंदकर आपल्या ‘मनुस्मृती’ या पुस्तकात लिहितात, ‘ब्राह्मणवर्ग वर्णव्यवस्थेचा अभिमानी व समर्थक राहिला हे खरेच आहे. या व्यवस्थेचा त्यांनी लाभ घेतला, तिचे समर्थन केले, ती व्यवस्था राबविली, ती बळकट करण्याचा प्रयत्न केला, टिकवण्याचा प्रयत्न केला हे सारे खरेच. पण हे सारे मान्य केले तरी वर्णव्यवस्था आणि जातिव्यवस्था ब्राह्मणांनी निर्माण केली असा मात्र याचा अर्थ होत नाही. समाजव्यवस्था निर्माण करण्याचे, टिकवण्याचे सामर्थ्य ब्राह्मणांच्याजवळ कधीच नव्हते. ती व्यवस्था व्यवहारात ब्राह्मणांना पुष्कळ सवलती देणारी असली, तरी वाटते तितकी हिताची नव्हती.’ याचं कारण ही व्यवस्था राबवणं, त्यासाठी नियमनाचे दंडविधान बनवणं आणि यातून तयार झालेली सत्ता आपल्या वंशंजांनाच मिळत राहावी, व पर्यायानं आपल्याच वर्णाकडे राहावी, या हितसंबंधात क्षत्रियांचा वाटा ब्राह्मणांपेक्षा मोठा आहे. आज आपण त्या गावचेच नाहीत अशा थाटात  शिवराय, जिजाऊ माता जमलंच तर गौतम बुद्ध वगैरेंची नावं घेणारे विचारवंत धर्म की धर्मापलिकडे असं म्हणता म्हणता जातीनिष्ठ धर्माची निर्मिती २१व्या शतकात करतात, तेव्हा त्यांना जाब विचारण्यासाठी कुरुंदकरच हवे होते, असं वाटतं.

 

 

कुरुंदकरांच्या स्मृतींना वंदन करताना थोर समाजसेवक बाबा आमटेंनी त्यांच्यावर लिहिलेल्या या ओळी आठवतात...

वास्तवाच्या जाणिवांना वाचा यावी; तसं बोलायचास 

प्रज्ञेच्या दाहक हुंकारासारखा.

काळोख उजळत येणाऱ्या किरणांसारखा 

यायचा तुझा शब्द;

नीतीच्या वाटा प्रकाशत,आयुष्याचे अर्थ दाखवत.

त्यातून दिसायचे नवे प्रश्न, नव्या दिशा;

कुणाला गवसायचा प्रकाश, कुणाला संधी,

तर कुणाला सापडायचे ते स्वत:च...

 

- प्रसन्न जोशी

बातम्या आणखी आहेत...