आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘मुलीदेखील बिअर पितात, हे पाहून मला आताशा काळजी वाटू लागली आहे...असं गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर म्हणाल्याचं कळून मलाच काळजी वाटू लागलीये. कारण त्यांना हे अगदी नीट माहित्येय की, गोव्यात आणि देशात किंवा जगातही ख्रिश्चन समुदायात मद्यपान हा धार्मिक आणि त्यांच्या आहारविधीचाही भाग आहे. तेव्हा, पर्रिकरांना अन्य धर्मीय व पर्यायानं हिंदू धर्मीय मुलींबद्दल हे विधान करायचं होतं का?
‘मुलीदेखील बिअर पितात, हे पाहून मला आताशा काळजी वाटू लागली आहे’, असं गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर म्हणाल्याचं कळून मलाच काळजी वाटू लागलीये. मला आपली उगाच शंका आहे, माननीय पर्रिकरजी स्वत:च त्या वेळी ‘प्लेझेंट हाय’मध्ये नव्हते ना? कारण, गोव्यातच काय, पण साऱ्या देशात अगदी कॉन्झर्वेटिव्ह असण्याच्या ३०-४० वर्षांपूर्वीदेखील किमान शहरातल्या मुली बिअर पीत होत्या. किंबहुना, आपल्या घरात, परिसरात किंवा अगदी आपल्या शहरात बिअर वा तत्सम मंतरलेलं पाणी न पिता आल्यानं, असंख्य पिढ्यांनी पर्रिकरांच्या गोव्यातच या आनंदभ्रमकारक उत्तेजनावर्धक पेयाचा चषक पहिल्यांदा आपल्या ओठांना टेकवला असेल. पर्रिकर यांनी हे विधान गोवा राज्य विधिमंडळानं आयोजित केलेल्या राज्य युवा संसदेत उपस्थित तरुण-तरुणींसमोर केलंय. मला खात्री आहे, आपल्या मुख्यमंत्र्यांच्या या पांचट विचारांवर उतारा म्हणून त्यातील अनेकांनी कार्यक्रम संपल्या संपल्या अन्य कडवट द्रवांचा सहारा घेतला असेल. त्यांच्यासाठी पहिलेप्रथम थ्री चिअर्स...!
पर्रिकरांच्या या विधानात एक गोम आहे. त्यांना हे अगदी नीट माहित्येय की, गोव्यात आणि देशात किंवा जगातही ख्रिश्चन समुदायात मद्यपान हा धार्मिक आणि त्यांच्या आहारविधीचाही भाग आहे. त्यामुळे उघड आहे की, ख्रिश्चन मुली बिअर पितात, हे गोव्याच्या मुख्यमंत्र्याना धक्कादायक वाटणं खचितच अशक्य आहे. तेव्हा, पर्रिकरांना अन्य धर्मीय व पर्यायानं हिंदू धर्मीय मुलींबद्दल हे विधान करायचं होतं का? किंवा असं काही आहे का, बिअरच्या माध्यमातून ‘आपल्या’ हिंदू मुली कुणाच्यातरी ‘लव्हक्रुसेड’ला (म्हणजे ते ‘लव्हजिहाद’ सारखं!!) बळी पडू नयेत, म्हणून पर्रिकरांना ही काळजी आहे? ‘पद्मावत’च्या राणी पद्मावतीच्या नृत्याला विरोध असो किंवा काँग्रेस नेत्या रेणुका चौधरींचं मोदींच्या राज्यसभेतील भाषणावेळचं गडगडाटी हास्य, भाजपवाल्यांना एकतर भारतीय स्त्रीला जौहर करणारी पद्मावती ठरवायचीये किंवा शूर्पणखा राक्षसीण तरी. त्यात आजच्या २१व्या शतकातली भारतीय मुली खुलेआम बिअर पीत असतील तर भाजपवाल्यांना ते ‘मनोहर’ का बरं वाटावं? त्यातून पर्रिकर पडले गोव्यातले! तिथे ‘सनातन’वाल्यांचा मुख्य आश्रम आहे. रात्रीच्या वेळेत वातावरणात असलेले दैत्य, भूत, पिशाच्च किंवा पाश्चिमात्य पेहराव, खाणं-पिणं यातून तयार होणाऱ्या नकारात्मक ऊर्जा (म्हणजे काय ते विचारू नका!) असल्या गोष्टींवर यांचा भारी विश्वास. असंख्य तरुण-तरुणी या संघटनेच्या कच्छपी लागलेत, ते पर्रिकरांना चिंताजनक का बरं वाटत नाही?
मुद्दा हा आहे की, सत्तेतल्या भाजप नेत्यांना झालंय तरी काय? गेल्या काही दिवसांतील आणि काही वर्षांतील या मंडळींची विधानं बघितली की वाटतं, असं विधान केल्या केल्या त्यांच्या तोंडासमोर कान नेऊन (खरं तर आपलं नाक नेऊन) ‘साहेब, जरा तुमचं नाव सांगा...’ असं ट्रॅफिक पोलिसांच्या स्टाइलनं विचारावं वाटतं. पण, खुद्द पर्रिकरांनीच अशी अतिरेकी विधानं यापूर्वीही केली आहेत. गेल्याच वर्षी डिसेंबरला ते म्हणाले होते की, ड्रग्ज घेतल्याशिवाय कुणीही रात्रभर डान्स करू शकत नाही. ही विधानंही कमी म्हणून की काय पर्रिकरांनी, संघाच्या शिकवणुकीमुळेच ‘सर्जिकल स्ट्राइक’ होऊ शकला, असं संरक्षणमंत्र्याला अशोभनीय वाटणारं वक्तव्य केलं. देशाच्या दुर्दैवानं या भाजप सरकारच्या काळात अशा बेजबाबदार विधानांचा ‘कुभाषित कोश’ बनवता येईल इतकी सामग्री भाजपच्या नेत्या, मंत्र्यांनी ‘न घेताच’ दिली आहे.
या पक्षाचा विनय कटियारसारखा खासदार म्हणतो की, देशातल्या सर्व मुसलमानांना पाकिस्तानात पाठवून फाळणी पूर्ण करा. त्याच्यावर पक्षशिस्त म्हणूनही काही कारवाई होत नाही. काँग्रेससह देशाला देशभक्ती शिकवण्याचा ठेका घेणाऱ्या भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नितीन गडकरी नौदलाला दक्षिण मुंबईत एक इंचही जागा देणार नाही, असं ठणकावतातच पण नौदलवाल्यांनी सीमेवर जावं, असा शहाजोग सल्लाही देतात. मात्र, तेवढं होऊनही संघ-भाजपातला एकही देशभक्त उभा ठाकत नाही. मनुष्यबळ विकाससारखं अत्यंत महत्त्वाचं खातं असलेले सत्यपाल सिंगसारखे पीएचडीधारक महाभाग ‘खोपडी’ (ही मुंबईतल्या बेकायदा गुत्त्यांमध्ये बनवली जाणारी खतरनाक दारू आहे. बातम्यांमुळे मला माहित्येय. गैरसमज नसावा!) लगावून आल्यासारखे, डार्विनचा उत्क्रांतिवाद नाकारतात. त्यांचं म्हणणं असं की, उत्क्रांतीसारखे बदल कोणत्याच माणसानं कुठल्याही ग्रंथात पाहून नमूद केलेले नाहीत.! माकडाचा माणूस झाल्याचं कुणीही पाहिलेलं नाही!! आता असा मनुष्यबळ विकास राज्यमंत्री असल्यास तरुणाई पकोडे विकणं तेवढं शिकू शकते, यावर विश्वास बसतो.
भाजपचे म्हैसूरचे तेजतर्रार खासदार आणि मंत्री अनंत हेगडे यांनी तर, ‘आम्ही सत्तेत आल्यास संविधान बदलू’ असं जाहीरच केलंय. शिवाय, ‘मला सेक्युलर म्हणवणाऱ्यांपेक्षा स्वत:ला त्या त्या जाती-धर्माचे म्हणवून घेणारे लोक जास्त आवडतात’, असंही क्रांतिकारी वक्तव्य केलं. भाजपच्या खऱ्या भूमिका आणि उद्दिष्टांना हेगडेंनी असं खुलेआम मान्य केल्यामुळे माणूस दारू प्यायल्यावर खरं बोलतो, ही अंधश्रद्धा असून दारू न पिताही माणूस सत्यवचनी असू शकतो, याचा साक्षात्कार मला झाला आहे.
भाजपचे आसाममधले आरोग्य मंत्री आहेत, हिमंत बिस्वा शर्मा. मागच्या नोव्हेंबरमध्ये त्यांनी म्हटलं की, मनुष्याला होणारे आजार, रोग ही त्याच्या गेल्या जन्मीच्या कर्माची फळं असतात. एखाद्या लहान मुलालाही कॅन्सर होतो, कारण त्याचं पूर्वजन्माचं संचित. अशा माणसाच्या हातात आसाममधली आरोग्य व्यवस्था असणं पर्रिकरांना चिंतेचं वाटतं नाही. सत्यपाल सिंग असोत की बिस्वा, स्वत: आयआयटीयन असलेल्या पर्रिकरांना अशा बोलभांडांबद्दल चकार शब्दही काढावासा वाटत नाही, हे भाजपच्या आतला दबाव किती मोठा आहे, ते दाखवतो. बिस्वांमुळे मला रामदेव बाबा आठवले. कारण, मीडिया तुटून पडला असताना बिस्वांच्या बोलण्याला एकट्या रामदेव बाबांनी जाहीर समर्थन दिलं. भाजप आणि बाबांचं तसं फारच गुळपीठ. २०१४पूर्वी जातील तिथे काळ्या पैशांबाबत ठ्यॉक ठ्यॉक दंड थोपटणारे बाबा रामदेव आता शांत-निवांत असतात. आता ते बड्याबड्या मल्टिनॅशनल कंपन्यांच्या तोंडाला फेस आणणारा ‘पतंजली’ हा कोट्यवधींची उलाढाल असलेला उद्योग सांभाळतात. बाबा रामदेवांच्या लवचिक व्यक्तिमत्त्वाप्रमाणे ‘पतंजली’चे दावेही भन्नाट असतात. ‘पतंजली’वाल्यांनी कोट्यवधी लोकांवर चाचण्या घेऊन औषध तयार केलीयेत म्हणे. एवढा प्रकल्प देशात सुरू होता आणि आपल्याला कळलादेखील नाही! गोमूत्रानं कॅन्सर बरा होतो वगैरे बोधामृतही रामदेब बाबा येता-जाता शिंपडत असतात. आयआयटी मद्रासमधल्या कॅन्सर परिषदेत या बाबांना बोलावलं गेलं म्हटल्यावर ही परिषद स्पॉन्सर करणाऱ्या अमेरिकन इन्स्टिट्यूटनं माघार घेतली. अशा या चमत्कृतिपूर्ण रामदेव बाबांवर भाजप कृपावंत आहे. स्वस्तात जमिनी, शासन-प्रशासनाची फौज त्यांच्यासाठी हात जोडून उभी असते. ते समोर दिसताच लोटांगण घालते. पर्रिकरांना याच्याशीही काही देणं घेणं नसावं. भाजप खासदार साक्षी महाराज यांचं हिंदू स्त्रीनं ५-६ मुलांना जन्म द्यावा, हे विधान, केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती, मंत्री गिरिराज सिंग अशी ही यादी वाढत जाणारी आहे. या सर्वांचे मेरुमणी म्हणजे, सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी! भागवतांनी हा देश हिंदू राष्ट्रच आहे, आरक्षण संपायला हवं, अशी विधानं वेळोवेळी केलीयेत. लोकसभा निवडणुकीचा कसोटी सामना अजून थोडा लांब असल्याने मोदी भडकाऊ भाषा सध्या वापरत नसले, तरी थेट संसदेत इतिहासाची यथेच्छ मोडतोड करतात.
ही सगळी जंत्री मांडायचं कारण, पर्रिकरांना तरुण मुलींचं बिअर पिणं खटकतं, पण डोळ्यांदेखत चाललेलं स्वपक्षीयांचं, मंत्र्यांचं वागणं-बोलणं खटकत नाही. श्रीयुत पर्रिकर ही तुमची भूमिका आहे की हतबलता? एकदा बोलूयात का आपण तुमच्या गोव्यातल्या बंगल्यात, किंवा जाऊ एखाद्या कॅसिनोत (जे बंद करण्याच्या वल्गना तुम्ही काँग्रेसच्या काळात केल्या होत्या) ...मात्र तिथं ‘बसावं’ लागेल... आहे मंजूर?
ता.क. हा लेख पाठवतानाच स.सं.प.पू भागवतांचं विधान कानावर आलं की, गरज पडल्यास संघ स्वयंसेवक शत्रूशी लढेल, त्यासाठी केवळ तीन दिवसांत सैन्याची उभारणी करेल. पर्रिकर जी....नशीब तुमचं! संरक्षण मंत्रालय सोडून परत आलात...असं काही बघण्यापूर्वी डोळे मिटलेले बरे (अहो बिअर पिऊन!)
- प्रसन्न जोशी
prasann.joshi@gmail.com
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.