आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजही छान, पवारही छान, मुलाखतही छान!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जी घटना अ-राजकीय म्हणून जाहीर केली गेली, तीच घटना, अर्थात राज ठाकरेंनी शरद पवारांची घेतलेली महामुलाखत विचारविश्व ढवळून काढणारी सगळ्यांत मोठी राजकीय घटना ठरली. अजातशत्रू पवारांना आलवेज अँग्री यंग लीडर ठाकरेंनी सोयीचेच तेवढे प्रश्न विचारले आणि पवारांनी गतलौकिकास जागत एका विधानाचे असंख्य अर्थ निघतील, अशा प्रकारे उत्तरं दिली. पण यामुळे मायाजाळ तेवढे आकारास आले, जात-धर्म आणि राजकारणामुळे  महाराष्ट्राची दुर्दशा का आपण होऊ दिली याची मीमांसा परीघाबाहेरच राहिली...

 

ज्ये ष्ठ संपादक गोविंदराव तळवलकर यांची ज्येष्ठ सुसंवादक, सुहास्यवदनी गुलाबजाम, महाराष्ट्राचं हसरं साखरपाक व्यक्तिमत्त्व सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली कुठलीशी जुनी मुलाखत तळवलकरांच्या निधनानंतर आम्हा च्यानलांकडे आली होती. आम्ही सर्वांनीच ती दाखवली. त्यावर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी मार्मिक टिप्पणी केली होती की, मुलाखत कशी घेऊ नये आणि कशी देऊ नये याचा वस्तुपाठ म्हणजे ही मुलाखत.

 

हे आठवायचं कारण म्हणजे परवा मनसे अध्यक्ष (जाहिरातीत उल्लेख फक्त व्यंगचित्रकार असा होता) राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचे सर्वेसर्वा आणि झालंच तर राष्ट्रवादी काँग्रेसचेही प्रमुख नेते शरद पवारांची घेतलेली महामुलाखत. राज यांनी मुलाखतीच्या सुरुवातीलाच ‘मी नेहमीचे प्रश्न विचारणार नाहीये’, असं सांगून आधीच ताणली गेलेली उत्कंठा आणि अपेक्षा अधिकच वाढवून टाकली. अगदी पहिल्या प्रश्नात ‘खरं बोलल्याचा त्रास होतो का’ या वक्रोक्तीपूर्ण प्रश्नानं मुलाखत खरंच काहीतरी वेगळं देईल असं वाटू लागलं. मात्र नंतर एक एक प्रश्न येत गेला आणि हिरमोड होत गेला. अर्थात, ज्या लोकांना राज यांचं खर्जातलं बोलणं, श्लेष काढणं, कोटी करणं याचंच कौतुक असेल तर ते अलाहिदा. पण, मुलाखतीचा आशय जर मुलाखत तंत्र आणि भाषिक करामतींमध्ये हरवला किंवा मुद्दाम दडवला जात असेल तर अशा मुलाखतींकडे गंभीरपणे पाहणाऱ्यांनी तरी टाळ्या पिटणाऱ्यांना सामील होऊ नये.

 

खरं सांगायचं तर या मुलाखतीतल्या अनेक  गोष्टी, घटना, किस्से शरद पवारांनी याआधीही असंख्य वेळा अगदी त्यांच्या आत्मचरित्रात्मक दोन ग्रंथांमध्येही सांगितल्या आहेत. याही मुलाखतीत त्या सांगितल्या गेल्या मात्र काही वेळा मुलाखतीला बीएससीसीच्या (पुढे कॉलेज म्हणायचं नाही कारण शेवटचा "सी'कॉलेजचाच आहे) मैदानातून कात्रजच्या घाटात नेण्यासाठी असं मानायलाही जागा आहे. नाही म्हणायला, दोन गोष्टींसाठी राज ठाकरे आणि या मुलाखतीला गुण द्यावे लागतील. शरद पवारांनी अगदी स्पष्टपणे ‘यापुढे दलित व आदिवासी वगळता अन्य जातींसाठी आर्थिक निकषावर आरक्षण दिलं जावं’ असं सांगितलं. पवारांच्या हेतूंबद्दल शंका न घेता म्हणायचं झाल्यास पवारांची ही भूमिका मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला पाठिंबा देण्याइतकी महत्वाची आहे. त्याचे पवारांसाठी दुष्परिणामही त्यावेळसारखेच असू शकतात. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातच मराठ्यांच्या आरक्षणाचा अभ्यास करणारे आयोग नेमून झाल्यावर, मराठा समाजाचे विराट मोर्चे झाल्यानंतर आणि मुख्य म्हणजे या प्रयत्नांबाबत पवारांकडेच मराठा समाज आशेने पाहत असल्यानं पवाराची ताजी भूमिका त्यांचा मुखभंग करणारी ठरेल. याची निवडणुकीय किंमतही त्यांना मोजावी लागू शकते.

 

असं असलं तरी, कुमार सप्तर्षींसारख्या राजकीय निरीक्षक याकडे मधल्या काळात राष्ट्रवादीपासून दुरावलेला, मराठा आक्रमकपणानं भांबावलेल्या दलित-ओबीसींना चुचकारण्याचा प्रयत्न मानतात. पवारांच्या बोलण्यातून काय ऐकायचं आणि काय घ्यायचं हे माहीत असलेल्या मराठा समाजाला हा विरोधविकासवाद अंतिमत: आपल्याच फायद्याचा आहे याची कल्पना आहे. आर्थिक निकषावर आरक्षण ही भाषा महाराष्ट्रात प्रथमत: शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरेंनी मांडली. पुढे राज ठाकरेंनी मनसे स्थापन केली तरी शिवसेनेचंच वैचारिक चारित्र्य पुढे चालवलं. हे पाहता पवारांनी राज यांच्या खासगीकरणाच्या जमान्यात आरक्षणाचं महत्व या प्रश्नावर आर्थिक आरक्षणाची भूमिका घेणं हा योगायोग नक्कीच नाही. पवारांच्या या भूमिकेचे अर्थ अजून लागताहेत न लागताहेत तोच, त्यांनी नुकतीच शेतकऱ्यांसाठी आरक्षणाची मागणी केलीये. म्हणजे अपेक्षेप्रमाणे आर्थिक निकषाचा मुद्दा अंगलट आल्याचं त्यांना लगेच जाणवलंय. मुळात आरक्षण हा काही आर्थिक उन्नतीचा उपाय नव्हे. त्यात आर्थिक आरक्षण घटनेनुसार शक्य नाही. हे माहीत असूनही पवार अशी विधानं करून गरीब शेतकरी वर्गाला का झुलवताहेत असा प्रश्न पडतो.

 

दुसरी गोष्ट म्हणजे, बुलेट ट्रेन हा मुंबईचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न आहे आणि मुंबई तोडण्याच्या डावापासून मराठी माणसानं, महाराष्ट्रानं सावध राहायला पाहिजे ही पवारांची विधानं अभूतपूर्व आहेत. काँग्रेसची विचारधारेतील कोणत्याही नेत्यानं मुंबई वेगळी करण्याची भाषा वापरण्याची वसंतदादा पाटलानंनंतरची ही दुसरी वेळ. आधी म्हटल्याप्रमाणं पवार हे मनापासून बोलत असतील तर बरंच आहे. अन्यथा मुंबईबाहेरील मराठी नेतृत्वाला मुंबईतल्या मराठी लोकांची काही पडलेली नसते हाच अनुभव आहे. गंमत म्हणजे गिरणगाव, लालबाग, परळमध्ये मराठी टक्का घसरून आता मराठी भाषाही कशी ऐकायला मिळत नाही असे उसने अश्रू पवार गाळत असताना, मुंबईत या मंडळींचं फावत असताना, गिरण्या मालकवर्गाच्या घशात जात असताना, बिल्डरांना स्वस्तात जागा मिळत असताना, मोक्याच्या भूखंडांचे रमणे वाटले जाताना भूमिका घेण्यापासून, निर्णय घेण्यापासून तुम्हाला कुणी अडवलं हे ना पवारांनी सांगितलं ना राज यांनी विचारलं.  पवारांच्या अशा (त्यांच्यासाठी आणि संबंधितांसाठी) सोयीस्कर भूमिकांचा धांडोळा जगन फडणीस यांच्या ‘शरद पवार: धोरणे व परिणाम’ या पुस्तकात वाचायला मिळतो. तुमच्या नशिबानं ते पुस्तक सापडल्यास वाचा.

 

पवारांनी एक महत्वाचा आरोप राज्यकर्त्यांवर केला, की महाराष्ट्रात काही जातीयवादी संघटनांना सत्ताधाऱ्यांचं समर्थन मिळतंय. भीमा-कोरेगाव प्रकरणात आरोपी असलेल्या भिडे-एकबोटे यांच्या संघटनांशी संघ-भाजपचे जिव्हाळ्याचे संबंध याला अनुसरूनच हे विधान आहे. काही प्रमाणात ते खरंच आहे आणि चिंतेचंही. मात्र, याच विषयावर झालेल्या चर्चेत संशोधक डॉ. हरी नरके यांनी पवार आणि त्यांच्या पक्षानं मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आदी जातीय संघटनांना वाढू दिलं असा थेट आरोप केलाय. आज महाराष्ट्राच्या सामाजिक वातावरणात मराठा समाजातील काही समूह, संघटना व्यक्तींचा आक्रमकपणा याचंच द्योतक आहे. इतर वेळी पुरोगामीपणाचा आव आणणाऱ्या या मंडळींना जरासाही विरोध सहन होत नाही, हे आरक्षणाच्या चर्चांमध्ये दिसून आलंय. आधी मराठा बहुजन तरुण हिंदुत्ववाद्यांच्या हातचं शस्त्र झाला. मात्र आता त्याला अशा संघटनांच्या कच्छपी लावलं जातंय. कम्युनिस्ट चळवळीतील महत्वाचे कार्यकर्ते यांनी सदर लेखकाशी बोलताना अशा संघटनांमधील लोकं दलित अत्याचारांवेळी कशी बोटचेपी आणि प्रसंगी आरोपींना मदतीची भूमिका घेतात हे विशद केलंय. मात्र, असले अडचणीचे प्रश्नही राज यांना बहुधा पडले नसावेत. इथं एक आठवण म्हणजे, ज्या नामांतर प्रकरणाचे श्रेय पवारांना दिले जाते त्या धगधगत्या काळात मराठवाड्यात झालेल्या दलितांवरील अत्याचारात पवारांनी अत्याचार करणाऱ्यांवरचे अनेक खटले मागे घ्यायला सांगितलं, हे डॉ. कुमार सप्तर्षी यांनी जाहीररीत्या सांगितलं आहे. सप्तर्षींच्या याच म्हणण्याच्या पार्श्वभूमीवर, भीमा कोरेगाव परिसरातील ग्रामपंचायती कोणत्या पक्षाच्या ताब्यात होत्या, त्यांनी कसं असहकार्य केलं आणि मग प्रकाश आंबेडकरांना त्या गावांची रसद तोडावी असे शासनाला का सांगावं लागलं हे कळतं. आंबेडकर शरद पवारांना जातीयवादी का म्हणतात तेही मग लक्षात येतं. पण हे मुद्दे राज ठाकरेंना एक तर कळत नसावेत वा विचारायचे नसतील.

 

राज यांनी असे अनेक मुद्दे अर्धवट तरी सोडले किंवा तसे प्रश्नच विचारले नाहीत. आज शेतकऱ्यांविषयी उमाळा येणारे पवार इतक्या वर्षातल्या शेतकऱ्यांच्या विक्रमी आत्महत्येनंतर  कुणा शेतकऱ्याच्या घरी गेल्याचं जनतेला माहीत नाही ना त्यावर काही विधान नाही. स्वामिनाथन आयोग लागू करा असं राष्ट्रवादीवाले म्हणतात, मग १० वर्ष त्यांना कुणी थांबवलं होतं? लवासा प्रकरणाबाबत आजच्या घडीला पवारांना काय वाटतं? पवारांना काँग्रेस दुबळी झाल्यावरही स्वबळावर मुख्यमंत्री का आणता आला नाही? असेही प्रश्न विचारता आले असते. पण, त्यासाठी पत्रकार असावं लागतं, प्रचारकी राजकारणी नव्हे...असो!
सरतेशेवटी लेखाच्या शीर्षकाविषयी-फेरीवाल्यांविषयी नाना पाटेकरांनी सहानुभूती दाखवल्यावर राज यांनी नाना एखाद्या सत्तरीतल्या म्हाताऱ्यासारखे ‘तोही चांगला, तूही चांगला’ असं म्हणतात असं विडंबन केलं होतं. ही मुलाखतही मला अशीच वाटते...

 

prasann.joshi@gmail.com


 

 

बातम्या आणखी आहेत...