मायलेकींच्या संघर्षाची गोष्ट / मायलेकींच्या संघर्षाची गोष्ट

‘व्हाय नॉट आय?’ हे पुस्तक आहेे मायलेकींच्या प्रवासाचं. सकारात्मकतेचं. पतीच्या माघारी वैधव्य आलेल्या पत्नीच्या जिद्दीचं. डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारांमुळे दृष्टी गमावून बसलेल्या मुलीला लोकांची सहानुभूती मिळवण्याची धडपड न करण्याऐवजी तिला अंधारापलीकडचं लोभस जग दाखवणाऱ्या आईचं...

Jul 31,2018 06:28:00 AM IST

‘व्हाय नॉट आय?’ हे पुस्तक आहेे मायलेकींच्या प्रवासाचं. सकारात्मकतेचं. पतीच्या माघारी वैधव्य आलेल्या पत्नीच्या जिद्दीचं. डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारांमुळे दृष्टी गमावून बसलेल्या मुलीला लोकांची सहानुभूती मिळवण्याची धडपड न करण्याऐवजी तिला अंधारापलीकडचं लोभस जग दाखवणाऱ्या आईचं...


सु टीमध्ये मुलीकडे गेले होते तेव्हा वृंदा भार्गवे यांचं व्हाय नॉट आय हे पुस्तक वाचण्यात आलं. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील चित्रावर माझे डोळे खिळून राहिले. ते चित्र होतं उंच आकाशात ढगांच्या अंधाराला चिरत आपल्या मजबूत व स्थिर पंखांनी प्रकाशाकडे झेपावणाऱ्या पक्ष्याचं. या चित्रातून कथेतील पात्रांची, त्यांच्या जिद्दीची व यशाकडे वाटचाल करण्याच्या मनोधैर्याची ओळख होते.


आपल्या ध्येयाकडे शांतपणे व स्थिर पावले टाकणाऱ्या एका आई व मुलीच्या जीवनप्रवासाची कथा सांगणारी ही कादंबरी आहे. येणाऱ्या संकटांना तोंड देत व सकारात्मक दृष्टी ठेवून जगणाऱ्या मायलेकींची प्रत्यक्ष भेट घेऊन त्याआधारे लेखिकेने ही कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीतील घटना सत्य असल्या तरी पात्रांची नावं काल्पनिक आहेत.


देबूच्या आईचा आंतरजातीय प्रेमविवाह झालेला असतो. माहेरची माणसं त्यामुळे तिच्यावर नाराज असतात. देबूचं घर हे एकत्र कुटुंब असतं. आजी, आजोबा, काक-काकू, देबूचे वडील, मोठी बहीण, आई सगळे एकमेकांच्या सहवासात खूप आनंदी असतात. देबूची आई एका शाळेत शिक्षिका असते. देबू पाच वर्षांची होते आणि अचानक संकटांची मालिका सुरू होते. तिच्या वडलांचा मृत्यू होतो. वडलांच्या मृत्यूमुळे देबूच्या आईच्या वागण्यावर सून म्हणून मर्यादा येऊ लागतात. नवरा वारला म्हणून बाईनं कसं गंभीर असावं, कार्यक्रमांना जाऊ नये, जास्त बोलू नये, हसत खेळत राहू नये असं देबूच्या आजीला वाटतं. या आपल्यावर आलेल्या बंधनांनी मुलीवर अकाली प्रौढत्व येतंय हे देबूच्या आईच्या लक्षात येतं. मुलीच्या वडलांचा अकाली मृत्यू झाला म्हणून मुलीचा आनंदी राहण्याचा हक्क का हिरावून घ्यायचा, हा प्रश्न देबूच्या आईला पडतो. म्हणून आपल्या आईवडलांकडे मुलीला घेऊन राहण्याचा निर्णय ती घेते. देबूच्या आईच्या आंतरजातीय प्रेमविवाहामुळे अधिक नाराज असणाऱ्या आईवडलांना तिचं तिथं येणं फारसं आवडत नाही. पण देबूच्या आईनं तिचा सगळा पगार त्यांच्या हातात द्यावा, ही अपेक्षाही ते बोलून दाखवतात. या मायलेकींना अनुभवाने नातलग वेगळे आणि माणूसपण वेगळं यांची पदोपदी जाणीव होते. नातलगांमध्ये माणूसपण मिळणं थोडं कठीण तर इतरांमधलं माणूसपण, आपलेपण आपल्यात आरपार शिरतं याची त्यांना जाणीव होते.


दरम्यानं देबूला खूप ताप चढतो. सतत आठवडाभराच्या तापानं अंगावर पुरळ पण उठतात. बालरोगतज्ज्ञाचं निदान चुकतं. त्यामुळे सतत चुकीच्या औषध उपचारामुळे देबू कायमची दृष्टिहीन होते. तिला दृष्टी परत मिळावी म्हणून हैदराबाद, मुंबईतल्या नामांकित डॉक्टरांकडून देबूची आई तिच्यावर उपचार करवते. पण तिचे प्रयत्न निरर्थक ठरतात. या सगळ्या संकटांच्या मालिकेने खचून न जाता दोन्ही मुलींच्या शिक्षणावर, त्यांच्या छंदामध्ये लक्ष घालून देबूच्या आईनं आपल्या दृष्टिहीन मुलीला जगण्यासाठीचा डोळसपणा कसा आणून देत गेली ते लेखिकेने प्रत्येक प्रसंगातून रंगवलं आहे.


कुणाबद्दलही नकारात्मक भावना न ठेवता प्रचंड सकारात्मकतेनं माणसं जोडत जाणं हे या मायलेकींचं वैशिष्ट्य. म्हणूनच देबू कॉलेजच्या पहिल्या वर्षाला पोहोचते तोच, टाइम या जगप्रसिद्ध मासिकात इंडियन इकॉनॉमी या विषयावर आलेला तिचा लेख लोकांना विचार करायला भाग पाडतो. देबू तिच्या आईकडून किंवा इतरांकडून वाचून घ्यायची, त्याचं चिंतन करायची. म्हणूनच राजकारण, समाजकारण, अर्थकारण, यावर तिचे विचार अगदी स्पष्ट होते. तिच्या तल्लख बुद्धीला आईच्या घडवण्याची जोड होती म्हणूनच कुठेही आपल्या शारीरिक व्यंगाचं भांडवल न करता ती जगत होती. स्वतंत्र विचार करण्याचं सामर्थ्य तिच्या अंगी आलं होतं. अनेक ज्वलंत विषयांवर दोघी मायलेकींच्या चर्चा होत असत.


वृन्दा भार्गवेंनी ही कथा पात्राच्या अंगी असणाऱ्या कृतज्ञतेवर, सकारात्मकतेवर भर देऊन फुलवली आहे. डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारांमुळे आपल्या मुलीची दृष्टी गेलेली असूनही दु:ख, आक्रोश करून लोकांची सहानुभूती मिळवण्याची धडपड न करता, त्या प्रसंगामधून अंधारापलीकडचं लोभस जग आईने आपल्या मुलीला दाखवण्याचा केलेला प्रयत्न या पुस्तकात आहे. अशा प्रचंड मन:सामर्थ्य व पॉझिटिव्ह सिंड्रोम घेऊन जगणाऱ्या मायलेकींची कथा संपूर्ण वाचल्याशिवाय पुस्तक खाली ठेववतच नाही.


- प्रतिभा जावळीकर, औरंगाबाद

X