Home | Magazine | Madhurima | Preetee O writes about rejecting biological parenthood

स्वातंत्र्याचं मोल

प्रीती ओ. पुणे | Update - Jul 31, 2018, 05:46 AM IST

प्रत्येकाकडे सांगण्यासारखी एक कहाणी असते. अगदी सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या माणसांच्या आयुष्यातही काहीतरी भन्नाट होतंच.

 • Preetee O writes about rejecting biological parenthood

  प्रत्येकाकडे सांगण्यासारखी एक कहाणी असते. अगदी सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या माणसांच्या आयुष्यातही काहीतरी भन्नाट होतंच. हे झालं एका माणसाचं. अशी दोन माणसं एकत्र एक आयुष्य सुरू करतात तेव्हा हा भन्नाटपणा द्विगुणित होणं साहजिकच आहे. समीर आणि सिद्धी ही अशी दोन माणसं एकत्र आली. स्वातंत्र्य दोघांनाही प्रिय होतं, पण स्वातंत्र्याचा अर्थ त्यांच्यासाठी वेगळा होता. हे स्वातंत्र्य जपण्यासाठीच त्यांनी मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला. ते तिथपर्यंत कसे पोचले?


  स मीर आणि सिद्धी एका बँकेत पण वेगळ्या विभागांत काम करायचे. एकमेकांशी ओळख होती फक्त. काही कारणांनी सिद्धीने नोकरी सोडली पण ते संपर्कात राहिले. सिद्धी ही गोड, बोलकी आणि मनापासून काम करणारी मुलगी आहे, हे समीरला ठाऊक होतं. त्यांचा संपर्क नंतरही कायम राहिला, मैत्री झाली. पण समीरला लग्नच करायचं नव्हतं. हे असं बऱ्याच जणांना वाटतं पण पंचविशी आली की जवळजवळ सगळ्यांना लग्न करावंसं वाटू लागतं. समीरला मात्र वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षापर्यंत लग्न करायचं नव्हतं आणि त्याची कारणं अनेक गोष्टींमध्ये होती. जवळची लग्नं छान म्हणावी अशी नव्हती. मित्रमैत्रिणींची लग्नं मोडत होती. लग्न केल्यावर आपलं स्वातंत्र्य हिरावलं जाईल असं त्याला अगदी मनापासून वाटत होतं. त्याला काहीतरी मोठं करायचं होतं. काय ते नक्की माहीत नसलं तरीही! आणि लग्न त्याच्या आड येईल असं दिसत होतं. लग्न, मुलं म्हणजे पैसे मिळवत राहण्याचं बंधन ओघानेच आलं. एकटा सडाफटिंग कमी पैशात भागवू शकतो हे तर खरंच!


  सिद्धी आवडत असली तरी ते स्वतःहून तिला सांगणं त्याला मान्य नव्हतं. ‘तिने नाही म्हटलं तर...’ ही भीती खूप मोठी होती त्याच्यासाठी. (खूप पुरुषांसाठी असते तशीच!) त्यातून सिद्धी स्वतःही एका अवघड प्रसंगातून जात होती. तिचं आधीचं लग्न मोडकळीस येत होतं आणि ते सहजगत्या होत नव्हतं. अर्थात लग्न मोडलं तरी लग्नसंस्थेतला तिचा विश्वास मोडला नव्हता. आपल्याला आयुष्यासाठी साथीदार हवा आणि तो लग्न या मार्गानेच आपण मिळवू शकू असं तिला वाटत होतं. तिनं स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला. लग्नासाठी स्वतःहून विचारायला वेळ जरी घेतला तरीही ते धाडसी पाऊल अखेर तिनंच उचललं. समीरला ‘हो’ म्हणणंही इतकं सोपं वाटत नव्हतं. लग्नाच्या बंधनात अडकून स्वतःच्या स्वातंत्र्यापासून त्याला फारकत करायची नव्हती. पण लिव्ह इनसारख्या पर्यायाविषयीही विश्वास वाटत नव्हता. त्याची आई तटस्थ होती. “हवं ते कर पण लवकर निर्णय घे. तिला ताटकळत ठेवू नकोस,” एवढंच तिचं म्हणणं होतं. बहिणीनेही असंच सुचवल्यावर त्याने लग्नाचा निर्णय घेतला.


  मोठ्या बहिणीच्या दोन मुलांशी अतिशय प्रेमाने खेळणाऱ्या समीरला हे चांगलंच कळून चुकलं होतं की, असं थोडा वेळ मुलांना सांभाळणं आणि स्वतःची मुलं असणं यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. असंही झालं की मामा होता होता, त्याला त्याची ताई मिळेनाशीच झाली. लग्न झालं तरी स्वतःचं स्वातंत्र्य सांभाळून असलेल्या समीरच्या मनात ‘मुलं नकोत’ हे अजूनही निश्चित होतं. सिद्धीला स्वतःचं मूल हवं होतं पण तिने कधीच लहान मुलांना सांभाळलं नव्हतं. तिला स्वतःला मुलगी हवी होती. पण मूल जन्माला घालण्याची तिला भीतीही वाटत होती. मुलांचं शीशू कसं सांभाळायचं हा तिच्यासाठी पडण्याइतका पुरेसा मोठा प्रश्न होता. समीरला माहीत होतं, शीशू काय कसंही सांभाळता येईल, पण ही आयुष्यभराची जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे का!


  स्वतःचं असं जैविक मूल असण्याबद्दल त्यांची मतं भिन्न असली तरीही आयुष्यातला हा इतका मोठा निर्णय विशेष न रडता, भांडता होऊन गेला. त्यांनी एकत्र मिळून मुलांसाठी घेतलेल्या एका शिबिराने या निर्णयावर शिक्कामोर्तबच केलं. एवढ्या मुलांना इतके तास सांभाळताना त्यांना जाणवलं की, आपल्याला मुलं कितीही आवडत असली तरीही आपण एका ‘सॅच्युरेशन पॉइंट’ला पोहोचतो. मुलांबरोबर काम करत असताना अशा वेळी एक ‘ब्रेक’ घेता येतो. स्वतःच्या मुलांबरोबर हा ब्रेक कसा मिळायचा? आजही मुलांबरोबरच्या कामात समीर अगदी रमून जातो. कुठल्याही वयोगटाच्या मुलांना तो हवाहवासा वाटतो हे त्याचं बलस्थान आहे, असं अगदी सिद्धीलाही वाटतं.


  “बाबा म्हणून माझ्याकडे दोन पर्याय उपलब्ध आहेत, माझ्या मुलांच्या जडणघडणीमध्ये सामील व्हायचं किंवा नाही व्हायचं. पहिल्या पर्यायात माझं आयुष्य बदलणार हे निश्चित, जे की मला करायचं नाहीये. दुसऱ्या पर्यायात मी सिद्धीला पालकत्वामध्ये एकटं पाडणार जेही मला करायचं नाहीये. अजून एक पर्याय म्हणजे सुरुवातीच्या स्तनपानानंतर मी ‘house husband’ व्हायचं आणि सिद्धीने बाहेर पडून पैसे कमवायचे. पण हेही मला खूप आवडेल असं वाटत नाही. आणि ‘पुरुषांनी पैसे कमवावे’ या सामाजिक नियमात मी खेचला जाईन असं मला वाटतं. आणि मूल झालं तर त्याचं सगळं नीट करावं असं वाटतं. मग त्यासाठी पैसे कमवत राहणं आलं. मला त्या स्पर्धेत उतरावंच वाटत नाही.”


  मूल न होऊ देण्याचा निर्णय झालाच होता, आता तो आप्तस्वकीयांना सांगणं बाकी होतं. प्राथमिक कुटुंबापलीकडचे ‘काय म्हणतील’ हा त्यांच्यासाठी प्रश्नच नव्हता. कुटुंबातील लोकांबरोबर चांगला संवाद सुरुवातीपासूनच असल्यानं हे सांगणं एवढं अवघड गेलं नाही. मूल असणं किंवा नसणं हा निर्णय पूर्णतः पतीपत्नींचा असावा हे कुटुंबातल्या सगळ्यांना मान्य होतं. तरीही कुटुंबातल्या वेगवेगळ्या व्यक्तींनी खोदून खोदून विचारलंच. सिद्धीला जास्त आणि समीरला कमी. “पिढ्यानपिढ्या ही लोकं मुलं जन्माला घालताहेत याचा अर्थ त्यात काहीतरी तथ्य असणार. त्यांना काय म्हणायचंय हे आज कळत नसलं तरीही खूप म्हातारपणी नेमकं कसं वाटेल हे मला नाही सांगता येत. पण तेव्हा याबाबतीत काही करता येणार नाही,” असाही विचार सिद्धीच्या मनात डोकावून जातो. पण आत्तातरी मूल न होऊ देण्याचा निर्णयच रास्त वाटतोय हे खरं. लग्न झाल्यावरही काहीतरी भारी करण्याच्या शोधात असताना समीरच्या लक्षात यायला लागलं, “आपण म्हणतो ते स्वातंत्र्य आणि त्याला बाधा आणणारं बंधन हे सगळं आपल्या मनातच आहे. सिद्धीने आपल्याला कधीच कुठल्या गोष्टीला नाही म्हटलं नाहीये. आजही मी हवं ते करूच शकतो.” पण अशी परिस्थिती शक्य आहे कारण सिद्धी शिकली- सवरलेली आणि आर्थिकदृष्ट्या निर्भीड आहे. त्यांचे आर्थिक व्यवहार एकत्र असले आणि एकमेकांवर अवलंबून असले तरी एकाच्या गैरहजेरीत दुसऱ्याने चरितार्थ चालवणं दोघांनाही सहजच शक्य आहे.


  या स्वातंत्र्याच्या मुद्द्याला घेऊनच त्या दोघांमध्ये सुरुवातीच्या काळात झालेली एक चर्चा त्यांचं आयुष्य बदलवून टाकणारी होती. सिद्धीचं म्हणणं होतं, “ज्या स्वातंत्र्याविषयी एवढं बोलतोय ते खरंच आपण जगतोय का? आणि नाही, तर जगायला तरी लागू किंवा मूल तरी होऊ देऊ.” नित्य नवीन गोष्टी करायला तिला आवडतात. छंद, आवडीनिवडी ती मनापासून जपते. प्रवास करायला आवडतो आणि लहानपणी आर्थिक परिस्थिती आणि मित्रमैत्रिणींबरोबरच्या सभ्य बंधनांपायी ते शक्य झालं नाही. तेव्हा आता आपल्या साथीदाराबरोबर तरी हक्काने फिरता यावं असं तिला वाटतं. आणि त्यांच्यातल्या या चर्चेमुळे ते शक्य होऊ लागलं. समीरला असंही लक्षात येतं की, “मी स्वातंत्र्याबद्दल बोलत असलो तरी सिद्धीच अधिक स्वतंत्र आहे मनातून. तिने स्वतःलाच घालून घेतलेली बंधनं खूप कमी आहेत आणि मला ते शिकावं लागतंय. लग्न ही मोठं होण्याची एक संधी असते आणि ते आमच्यात निश्चित घडताना दिसतंय. आम्ही एकमेकांबरोबर खूप गोष्टी केल्या, करतो. नव्याने शिकलो. खूप बदललो. हा बदल स्वागतार्ह आहे. पण मूल होऊ देणं ही अजून एक संधी असते शिकण्याची आणि मोठं होण्याची, असं पालकत्वाकडे पाहणारे खूपच कमी जण आहेत आमच्या आजूबाजूला. मूल असण्यात आनंद असला असं ते म्हणत असले तरीही मला ते प्रमाण 60:40 असं वाटतं. आनंद आणि नकोसं वाटणं यांचं हे प्रमाण मला मान्य नाही.” “आपल्या पोटी कसं मूल जन्माला येईल हे काही आपल्या हातात नाही. आणि जन्माला आल्यावरही आपण सगळ्या योग्य त्या गोष्टी करूनही मूल कसं वागेल हे काही सांगता येत नाही. ही पूर्ण परिस्थिती अजिबातच आपल्या हातात नाही. त्यावर आपलं काहीच नियंत्रण नाही. हे नियंत्रण माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. माणूस म्हणून अतिशय चांगल्या असलेल्या पालकांची मुलं जेव्हा वाया गेलेली दिसतात तेव्हा मला हे प्रकर्षानं जाणवतं.” मुलाला जन्म देणं आणि न देणं या फरकातून ‘स्त्री’ आणि ‘पुरुष’ जन्माला आले. मुळातच कामाच्या विभागणीतून असमानता निर्माण झाली. आता हा निर्णय स्वतःच्या हातात घेतल्यावर स्त्रीपुरुष असमानतेतला मुख्य मुद्दाच निखळून पडतो आहे. अशा दोन प्रौढ व्यक्ती एकमेकांशी माणूस म्हणून वागण्याची जास्त शक्यता निर्माण होते आहे.

  - प्रीती ओ. पुणे
  jonathan.preet@gmail.com

Trending