आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुल्या मनासाठी रंगीत तालीम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपला समाज एका मोठ्या स्थित्यंतरातून जातोय, कुटुंब आणि विवाह या दोन संस्था बदलताहेत, त्या अधिक मोकळ्या होऊ लागल्या आहेत. साहजिकच या दोन्हीशी निगडित असलेला एक मोठा घटक, वंशवृद्धी, बदलतोय. म्हणजेच, मूल नको असा निर्णय घेणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढतेय. निव्वळ आळस, कंटाळा ही कारणं या निर्णयामागे नाहीत, हे तर निश्चित. मग काय आहे, ज्यामुळे ही जोडपी असं ठरवतायत, याचा मागोवा घेणारं हे सदर. मूल होऊ न देता समाधानी आयुष्य जगणाऱ्या काही जणांशी बोलून तयार झालेलं.


‘के ल्याने देशाटन...’ असं काहीसं ऐकलेलं आठवतंय. या सगळ्याचे अर्थ आता हळूहळू उलगडायला लागलेत. छोट्या भाचीनं विचारलंच एकदा, तू इतकी का फिरतेस? तिच्या प्रश्नाला उत्तर द्यायच्या निमित्तानं मी स्वतःला विचारत होते की, नेमकं काय घडतं प्रवासात, ज्या गोष्टीसाठी आपण इतके आतूर असतो? आणि इतर अनेक गोष्टींसोबत एक उत्तर परत परत येत राहिलं, ‘शिक्षण!’ प्रवासात अनेक गोष्टी नव्यानं शिकणं होतं, मनाच्या कक्षा नव्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी अधिक खुल्या असतात. एखादा प्रसंग स्वतःच्या घरात घडला आणि तसाच्या तसा प्रवासात घडला तर ‘प्रवासात आहोत’ म्हणून आपण आपले आयुष्याचे स्वतःहून आखलेले नियम शिथिल करून त्याकडे बघू शकतो. 


अशाच एका प्रवासात एका जुन्या मैत्रिणीला भेटायला तिच्या घरी गेलो होतो आणि एक रात्र राहणार होतो. गप्पांमध्ये विषय निघाला आणि आमच्या लक्षात आलं की, आमच्या गोतावळ्यातल्या आठदहा लोकांनी तरी असं ठरवलंय की त्यांना मूल नको आहे. हो, ठरवून त्यांनी मूल होऊ दिलं नाही. आम्ही दोघीही हाडाच्या जीवशास्त्राच्या विद्यार्थिनी. त्यामुळे या वाढणाऱ्या ट्रेंडकडे फक्त सामाजिक बदल असं न बघता, जीवशास्त्रीय दृष्टीनेही बघायचा प्रयत्न करत होतो. त्यात गंमत म्हणजे, मी नुकतीच आई झाले होते आणि तिनं ठरवलं होतं की मूल होऊ द्यायचं नाही. आणि आम्ही दोघीही एकमेकींना आपापली मतं पटवायला जात नव्हतो तर शास्त्रज्ञासारखं या बदलांकडे त्रयस्थपणे बघत होतो. त्या सगळ्या प्रसंगात आज चालू होणाऱ्या लेखमालेची बीजं आहेत. तुम्हा सगळ्यांपुढे वर्षभर झाड वाढत जाईल तेव्हा त्याची बीजं कुठून आलीत हेही ठेवावं, असं वाटलं. हा लेखनवाचनाचा प्रवास आपण एकत्र करावा आणि स्वतःला समृद्ध करत जावं म्हणून हा प्रपंच न मांडणाऱ्यांबद्दलचा  प्रपंच! 


मूल न होऊ देण्याचा निर्णय हा आयुष्य बदलवून टाकणारा असतो खास. किंवा आपण असंही म्हणू शकतो की, आपण जगत असलेलं एकट्याचं किंवा दुकट्याचं आयुष्य मुलं झाल्यावर पूर्णपणे बदलून जातं. ते तसं बदलून जाऊ नये असं कोणाच्या मनात आलं तर मूल न होऊ देणं हे ओघानं येतं. या विषयाबद्दल जिव्हाळ्यानं बोलावंसं वाटतंय याचं कारण आत्ताआत्तापर्यंत वयात आल्यावर लग्नं व्हायची आणि लग्न झालं की मुलं व्हायची. स्वतःचा जन्म आणि स्वतःचा मृत्यू या दोन गोष्टी सोडता आयुष्यातल्या जवळजवळ सगळ्या गोष्टींमध्ये आपलं स्वतःचं एक मत असू शकतं आणि ते अंमलात आणण्याचं धाडस असेल तर त्याची अंमलबजावणीही होऊ शकते, हे फक्त श्रीमंतांपुरतं मर्यादित न राहता मध्यम वर्गापर्यंतही पोहोचलं आहे. अशी ही सामाजिक मुभा घेण्याचा हा काळ, व्यक्तिस्वातंत्र्य फुलण्याचा हा काळ. याचे आपण साक्षीदार आहोत. कदाचित फक्त साक्षीदार नाही तर अनेक छोट्यामोठ्या गोष्टींत बदल घडवणारेही आहोत. अगदी आपल्यापुरता मर्यादित, छोटा का होईना पण आपल्या आयुष्यात हव्या असलेल्या बदलांबद्दल आपण विचार करतोय आणि तो घडवून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न! 


या लेखमालेचं एक उद्दिष्ट असंही आहे की, अशा आपल्या आजूबाजूला घडत असणाऱ्या बदलांना अधिक खुल्या मनानं सामोरं जाण्यासाठी आपलं मन तयार करणं. तो बदल कदाचित स्वतःसाठी आपल्याला मान्य नसेलही पण म्हणून ती गोष्टच अयोग्य आहे, असं नसू शकतं. जे तो स्वतःसाठी घडवू बघताहेत त्यांनीही काही ना काही तरी विचार केला असेल. त्यातून कोणाच्या जिवाला धक्का लागणार नसेल तोवर त्या सामाजिक बदलाकडे आपण मोकळ्या विचारांनी बघणं ही फक्त समाजाची नव्हे तर आपली स्वतःचीसुद्धा गरज आहे. 


विपश्यना ध्यानपद्धतीमध्ये मन निर्मळ करण्यासाठी नेमकं काय करायचं हे सांगितलं जातं. शरीरावर उमटणाऱ्या संवेदना हे आपल्या मनाचं प्रतिबिंब असतं. मन आणि शरीर हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. शरीरावरच्या या संवेदना जशा उमटतात तशा त्या निघूनही जातात, कितीही ढोबळ असोत किंवा सूक्ष्म असोत. त्या निर्माण होतात आणि संपतात. हे बघताना काहीही शाश्वत नाही, प्रत्येक गोष्ट बदलणारच आहे हे आपण मनाला शिकवत असतो. आणि मग बदलणारच आहे तर त्याप्रती मोह किंवा द्वेष करून काय फायदा! तेव्हा स्थितप्रज्ञतेकडे आणि नितळ मनाकडे वाटचाल सुरू होते. आणि ही वाटचाल साक्षीभावातून होते. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये मनाची समता टिकून राहणं महत्त्वाचं. हाच साक्षीभाव रोजच्या व्यवहारात उतरायला हवा. आणि हे तेव्हा शक्य होईल जेव्हा आपण साक्षीदाराच्या त्रयस्थतेतून समाजाकडे बघू शकू.  माझ्या निकटच्या वर्तुळातल्या अशा व्यक्ती, जोड्या यांना हा विषय सांगितल्यावर अनेकांनी स्वतःची आयुष्यकथा सांगायची तयारी दाखवली. काहींना स्वतःच्या नावासकट हे छापून येण्यात काहीही वावगं वाटत नाही तर काहींना स्वतःचं नाव अजिबात यायला नको आहे. नावासकट किंवा नावाशिवाय किंवा नावं बदलून, पण आपण या वर्षभरात खऱ्या गोष्टी वाचणार आहोत. हे प्रत्यक्षात घडतंय, कुठे का होईना. आपली भेट महिन्यातून एकदाच घडेल. पण त्या निमित्ताने तुम्हाला तुमच्या स्वतःत किंवा परिसरात किंवा समाजात बदल घडवून आणण्याचे अनुभव सगळ्यांसमोर मांडावेसे वाटले तर जरूर पाऊल उचला. हे बदल फक्त मूल न होऊ देण्यापुरते मर्यादित असण्याचं कारण नाही. कुठल्याही बदलाबद्दल तुम्ही बोलू शकता. फक्त तो तुमचा स्वानुभव असू देत. ती एक खरी गोष्ट असू देत. तुमच्याकडून येणाऱ्या या प्रतिक्रियावजा स्वानुभव आमच्यासाठी आणि सगळ्याच वाचकांसाठी महत्त्वाच्या ठरतील. तेव्हा हा लिखाणाचा स्रोत दोन्ही दिशांनी वाहू देत. लवकरच भेटू, पुढच्या महिन्यात!

 

- प्रीती ओ., पुणे
jonathan.preet@gmail.com

बातम्या आणखी आहेत...