आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेरी जाँ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोमँटिक गाण्याच्या चित्रीकरणात पावसाचा हातभार लागतोच पण रोमान्स काही प्रेक्षणीय नसतो. तो अनुभवायचा असतो. ओल्या शरीराला चिकटलेल्या नजरा म्हणजे थोडाच रोमान्स असतो? पाऊस अंगावर कोसळला नाही तरी चालेल पण मनात झिरपावा लागतो.


सिनेमातील गाण्याच्या चित्रीकरणातील पाऊस नाठाळ असतो, खोडकर असतो, व्रात्य असतो, एखादी फटाकडी मिळाली तर चावटही होतो, अंगाला झोंबतो, कधी नजरेच्या मर्यादाही ओलांडतो. रोमँटिक गाण्याच्या चित्रीकरणात पावसाचा हातभार लागतोच पण रोमान्स काही प्रेक्षणीय नसतो. तो अनुभवायचा असतो. ओल्या शरीराला चिकटलेल्या नजरा म्हणजे थोडाच रोमान्स असतो? पाऊस अंगावर कोसळला नाही तरी चालेल पण मनात झिरपावा लागतो. मनाबरोबर डोळेही भिजवून टाकणारा पाऊस मला आवडतो कारण असा चिंब करणारा पाऊस फक्त त्या दोघांसाठी असतो. पावसाळी गाणी आणि भिजलेले नायकनायिका हे समीकरण बॉक्स ऑफिसवर यश देणारे असले तरीही काही गाणी पाऊस असूनही चार भिंतीत चित्रित केलेली पाहायला मिळतात.
बासू चटर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या अनुभव या सिनेमात असेच एक गीत आहे, ‘मुझे जाँ ना कहो मेरी जाँ मेरी जाँ...’
अनुभव सिनेमा लग्नाला सहा वर्षं झालेल्या अमर आणि मीता या जोडप्याची गोष्ट सांगतो. कथा घडते ती मुंबईत. हे महानगर तुम्हाला पैसा, कीर्ती, काम देते पण त्याच्या वेगाशी जुळवून घेताना तुमची दमछाकसुद्धा होते.

 

अमर हा कामात डुबलेला संपादक. कामाचा ताण, वेळेचा ताण यात घर, पत्नी सगळ्याचाच विसर पडलेला “न वरा.“ मीता एक गृहिणी आहे. तिचं जग म्हणजे तिचं घर, घरकाम करणारे नोकर, कधीही घरात न असणारा आणि घरी दमून आल्यानंतर तिची दखल घेण्याचीही ताकद आणि त्याहीपेक्षा इच्छा नसणारा नवरा याभोवती फिरते. या जोडप्याला मूल नाही. मूल होण्यासाठी आवश्यक असलेली जवळीक, शारीरिक आणि मानसिक, त्यांच्यात उरलेली नाही. एका बिछान्यावर दोन बाजूला निद्रेची आराधना करणारी ती दोघे मोडकळीला आलेल्या संसाराचे प्रतीक आहे. चेहरा नसलेली माणसे, तुकड्यातुकड्यानी होणारे निरर्थक संभाषण आणि भरून राहिलेला एकटेपणा.
‘जिंदगी के हर संबंध में तरक्की होती है. बस एक पति-पत्नी के संबंध है, जिन्हें ‘टेकन फॉर ग्रांटेड’ लिया जाता है. उन्हे ना तो बढाने के लिये कोशिश होती है, ना तो तरक्की के लिये,’ हे वाक्यच बोलकं आहे.
मीताचं आपल्या आयुष्यावर प्रेम आहे. स्वतःला काय हवं या बाबतीत ती जागरूक आहे. आपल्या नवऱ्यावर तिचं प्रेम आहे आणि तिचा संसार तिला टिकवायचा आहे. जेव्हा रात्रीचा एकांतही दोघांना जवळ यायला मदत करत नाही तेव्हा मात्र ती जागी होते. घर स्वतःच्या हातात घेते. एका टेबलवर बसून एकत्र जेवणंसुद्धा तुम्हाला एकमेकांची नव्याने ओळख पटवून देऊ शकतं. मनं मोकळी होऊ लागतात. गाठ सुटू लागते आणि नंतर ती रात्र येते…
सूखे सावन बरस गये
कितनी बार इन आँखों से
दो बूँदे ना बरसे, इन भीगी पलकों से
मेरी जाँ
नायिकेची मन:स्थिती या दोन ओळीत समजून येते. एवढ्या वर्षाचा एकटेपणा, असा जीवघेणा की डोळ्यांनाही त्याची सवय झालेली आहे. तेसुद्धा कोरडे, नायिकेच्या मनासारखेच. आज मात्र बऱ्याच दिवसांनी दोघांनी एकत्र जागवलेली रात्र. तनामनावर पसरलेली तृप्तीची धुंदी आणि त्या मिलनाला आशीर्वाद देणारा पाऊस. इथे सगळ्या संवेदना जागृत असतात. एका खिडकीच्या चौकटीमध्ये हे गाणे चित्रित केले आहे. पावसाच्या कोसळणाऱ्या धारा, त्याने चिंब झालेली पाने, भिजलेली तावदाने आणि रात्रीच्या तृप्तीची लाट अंगावर पांघरलेली ती दोघे.
जाँ ना कहो अन्जान मुझे
जान कहाँ रहती है सदा
अन्जाने क्या जाने,
जान के जाए कौन भला
मेरी जाँ
‘जाँ’ या शब्दावर गुलज़ारजींनी श्लेष केला आहे. ‘जाँ’चा अर्थ आहे प्रिय आणि त्याचा दुसरा अर्थ आहे माझा प्राण, माझं आयुष्य. नायिका म्हणते, तू मला तुझ्या आयुष्याची उपमा देऊ नकोस कारण जीवनाला अंत आहे. गुलजारजींच्या शब्दात जी जवळीक आहे, घसट असूनही जी कोवळीक आहे ती क्वचित इतर कुठे पाहायला मिळते.
बाल्कनीमध्ये बसून काचेच्या तावदानावर पडणाऱ्या पावसाची मजा घेतली आहे कधी? पाऊस बाहेर पडत असतो पण काचेवर पडणाऱ्या त्याच्या आवाजाचे गीत तुमच्या मनात गुणगुणत राहते. अशा एखाद्या मस्त सायंकाळी दोन खुर्च्या टाकून बसा. बायकोवर प्रेम असेल, तर बाहेरून भजी आणा आणि नेहमी दमणाऱ्या तिच्या हाताला विश्रांती द्या, स्वतः केलेली कॉफी देऊन. बघा, वाजतं की नाही तुमच्याही मनात ‘मुझे जाँ ना कहो मेरी जाँ मेरी जाँ’?

 

nanimau91@gmail.com

बातम्या आणखी आहेत...