आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैंनों में बदरा छाये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी सिनेमात पावसाच्या गाण्यांची बरसात आहे. शृंगारिक, विरहिणी, हसवणारी, घाबरवणारी अशी पावसाची असंख्य रूपे मनाला मोहवितात, नायक नायिकांबरोबरच आपल्यालाही भिजवतात. एखाद्या शब्दांत आणि सुरांत मात्र एवढी ताकद असते की, काही गाणी पावसाशिवायही भिजवून टाकतात.


बेल्जियमला स्टेशनवर आम्ही गाडीची वाट पाहत उभे होतो. विद्यापीठांना सुट्या लागल्या असणार. गर्दी तरुण मुलामुलींचीच. निरोपांची देवाणघेवाण होत होती. त्यातच ते दोघे उभे होते. तो बहुतेक निघाला असेल त्याच्या गावाला आणि तिला ते सहनच होत नव्हते. तिची घट्ट मिठी आणि डोळ्यांतून अविरत बरसणाऱ्या धारांमध्ये तो गुदमरून गेला होता. तिला मात्र त्याची जाणीव नव्हती. ओंजळीत पकडलेले क्षण अलगद निसटून जातील म्हणून ओंजळच घट्ट मिटून घेण्याचा तो निकराचा प्रयत्न असावा. तेवढ्यातच फलाटावर गाडी लागली. हलकेच त्याने तिला मिठीतून सोडवले. कपाळावर ओठ टेकून डोळ्यानेच आश्वस्त केले, तो डब्यात शिरला आणि त्याच वेळी गाडीमधून एक मध्यमवयीन गृहस्थ उतरले. पन्नासच्या पुढचेच असावेत. त्यांना पाहताक्षणी त्या गर्दीमधून एक स्त्री पुढे झेपावली. नंतरचे काही क्षण टिपणे म्हणजे आनंदाचा सोहळा होता आमच्यासाठी. सामानही खाली ठेवायला उसंत दिली नव्हती तिने. आपल्या हाताच्या कवेत सामावून घेतलेला त्याचा सहा फुटी देह आणि चेहेऱ्यावर केलेली चुंबनाची बरसात, आम्ही निस्तब्ध होऊन पाहत होतो. एकाच्या विरहाची सुरुवात झाली होती तर दुसरीकडे त्या विरहाचा अंत.


एकाच वेळी दुःखद आणि सुखद अनुभूतीची जाणीव आम्हालाही नकळत स्पर्शून गेली.
नैनो में बदरा छाये, बिजली सी चमके हाये
ऐसे में बलम मोहे गरवा लगा ले


प्रेम आणि विरहाचे नाते आगळे. जेवढा विरह लांबतो तेवढेच प्रेम उत्कट होत जाते. माणूस जेव्हा समीप असतो तेव्हा त्याच्या असण्याची सवय होते. त्याचे असणे आपण गृहीत धरायला लागतो. पण तो दुरावला की लक्षात येते, तो आपले मन व्यापून उरला आहे. त्याला परत एकदा तरी पाहण्याची प्रचंड ओढ मनाला हुरहूर लावते आणि मग त्या असोशीनंतर त्याचे झालेले दर्शन, लज्जेची बंधनेही झुगारून टाकते.
“मेरा साया’ या सिनेमातील संगीतकार मदन मोहन यांचे हे लोकप्रिय गीत.
नायकाच्या पत्नीचे निधन झालेले आहे. त्याच्या मिठीतच तिने प्राण सोडला आहे. सिनेमाची ही सुरुवातच विलक्षण. नायक अतिशय शोकाकुल असतानाच एक अनपेक्षित बातमी त्याला हलवून सोडते. पोलिसांच्या हाताला डाकूंच्या टोळीत काम करणारी एक मुलगी सापडलेली असते. या मुलीचा चेहरा, नायकाच्या पत्नीशी मिळताजुळता. त्यात ती दावा करते की, तीच त्याची पत्नी आहे. पत्नीच्या मृत्यूचा साक्षीदार असल्याने, तिच्यावर विश्वास तरी तो कसा ठेवणार!


तिचे रूप, तिच्या लकबी, तिच्या आठवणी त्याला आपल्या पत्नीची आठवण करून देतात. काय खरे आणि काय आभासी यात हरवलेला असतानाच, लांबून येणारे तिचे सूर त्याला त्याच्या भूतकाळात घेऊन जातात. 


उदयपूर येथे या गीताचे चित्रीकरण झाले आहे. गीताच्या सुरुवातीला संतूरचा तुकडा येतो. संतूरचे स्वर जिथे संपतात तिथे संतूरची सतार जागा घेते. वाद्यांच्या या मैफिलीत तबला आणि व्हायोलिनचे आगमन झाल्यानंतर येणारा लताबाईंचा स्वर्गीय आवाज या गीताला वेगळ्याच उंचीवर नेतो.


प्रेम दीवानी हूँ मैं, सपनों की रानी हूँ मैं
पिछले जनम से तेरी, प्रेम कहानी हूँ मैं
आ इस जनम में भी तू, अपना बना ले
नैनों में बदरा छाये…


“अपना बना ले’ या शब्दांत किती आर्तता आणि आतुरता आहे.
बदरा, बिजली हे शब्द या गीतात आले तर आहेत पण पाऊस मात्र नाही.
प्रियकराला पाहून झालेल्या आनंदाची बरसात तिच्या डोळ्यात साकळून आली आहे.
असेच डोळ्यांत जमलेल्या पावसाचे गीत, येसूदास आणि हेमंती शुक्ला यांनी चश्मेबद्दूर सिनेमात गायले आहे. रोमान्स काही सुरळित फळत नाहीच. या प्रवासात प्रेमीप्रेमिकांना गैरसमज, वाद विवाद, विरह यालाही सामोरे जावे लागते.
इथेही तेच घडले आहे. त्याचे रागावणे, मग तिच्यापासून दूर जाणे. आधीच विरहाचे दुःख आणि तोच मूड संगीत शिक्षकाने गीतात नेमका पकडला आहे.


उतरे मेघ या फिर छाये
निर्दय झोंके अगन बढ़ाये
बरसे हैं अब तोसे सावन
रोए मन है पगला
कहाँ से आये बदरा, घुलता जाये कजरा


काव्यात, आनंद किंवा वेदना, विपुलता किंवा नैराश्य या परस्परविरोधी भावना व्यक्त करण्यासाठी आभाळात जमून आलेल्या काळ्या ढगांचा उल्लेख येतो. पहिल्या गीतात उत्साह आहे, उत्कटता आहे तर दुसऱ्या गीतात निराशा, आर्तता.
डोळ्यांत अवकाळी दाटून आलेले हे ढग, तिच्या डोळ्यातील काजळ पुसून टाकतात.
त्याचे कारण जाणून आहे ती पण ते मान्य करण्याची तयारी नाही.
हिंदी सिनेमात पावसाच्या गाण्यांची बरसात आहे. शृंगारिक, विरहिणी, हसवणारी, घाबरवणारी अशी पावसाची असंख्य रूपे मनाला मोहवितात, नायक नायिकांबरोबरच आपल्यालाही भिजवतात. एखाद्या शब्दांत आणि सुरांत मात्र एवढी ताकद असते की, काही गाणी पावसाशिवायही भिजवून टाकतात.

 

- प्रिया प्रभुदेसाई, मुंबई
nanimau91@gmail.com

बातम्या आणखी आहेत...