Home | Magazine | Madhurima | Priya Prabhudesai writes about smile and songs

मुस्कुराना सिखा दिया

प्रिया प्रभुदेसाई | Update - Jul 31, 2018, 06:10 AM IST

हसण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो पण कित्येक वेळा त्या ओठाच्या छोट्याशा हालचालीने एखाद्याचा जगण्यावरचा विश्वास वाढतो.

 • Priya Prabhudesai writes about smile and songs

  हसण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो पण कित्येक वेळा त्या ओठाच्या छोट्याशा हालचालीने एखाद्याचा जगण्यावरचा विश्वास वाढतो. हसऱ्या लोकांकडे लोक आकृष्ट होतात. त्यांच्या सहवासात काही क्षण का असेना, आपली दुःखे विसरतात. हास्याचं वर्णन करणारीही अनेक गीतं हिंदी चित्रपटांनी दिली आहेत.


  देवाने एक मोठे वरदान मनुष्यप्राण्याला दिले आहे. हसण्याचे वरदान. त्या बाबतीत माणूस इतर प्राण्यांपेक्षा नशीबवान आहे. कितीही निराशाजनक परिस्थिती असू दे, एखादी हास्याची लकेर कानी पडली तर थोडा वेळ का होईना उदासी, काळजी दूर पळते. हसण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो पण कित्येक वेळा त्या ओठाच्या छोट्याशा हालचालीने एखाद्याचा जगण्यावरचा विश्वास वाढतो. हसऱ्या लोकांकडे लोक आकृष्ट होतात. त्यांच्या सहवासात काही क्षण का असेना, आपली दुःखे विसरतात.


  दाताचे बोळके असूनही जेव्हा छोटेसे, गोंडस बाळ तुमच्याकडे पाहून हसते, तेव्हा कठोरातल्या कठोर माणसाच्यासुद्धा हृदयाला पाझर फुटतो. कवी शैलेंद्र यांनी त्याचे सार्थ वर्णन करताना म्हणले आहे,
  कोई भी फूल इतना नहीं ख़ूबसूरत, है जितना ये मुखड़ा तेरा
  मुस्कुरा लाडले मुस्कुरा…

  अगदी लहान मुलालासुद्धा पहिला धडा शिकवला जातो, तो कोणत्याही परिस्थितीला हसून सामोरे जाण्याचा. कितीही संकटे येवो, त्याकडे हसून पाहिले तर त्याचीही तीव्रता निश्चितच कमी होते. कोणत्याही भीतीवर मात करता येते. आयुष्य सुंदर असते. ते बनवायला ओठावरचे हसू नक्कीच मदत करते.
  तेरी ये मुस्कान कोई न छीने कभी
  हो फूल की सेज सोये जवानी तेरी
  मालिक से है ये दुआ, है ये दुआ

  आपल्या बाळाच्या चेहऱ्यावरील हसू कधीही मावळू नये, ते नेहमी सुखी आणि आनंदी असावं, हीच तर प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते.
  कवी शैलेंद्र यांचे वेगळेपण त्यांच्या शब्दात होते. ते फार मोठं तत्त्वज्ञान अगदी साधे सोपे शब्द वापरून सांगत आणि जे लिहायचे त्यात एक गेयता असे. चित्रपटातील गीते ही संवादाचीच कामे करतात असे त्यांचे ठाम मत होते. त्यामुळे कथेचा आशय त्यांच्या गीतात सहज समजून येत असे.
  किसी की मुस्कुराहटों पे हो निसार
  किसी का दर्द मिल सके तो ले उधार
  किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार
  जीना इसी का नाम है…

  अनाडी सिनेमातील हे गीत. सिनेमाच्या नायकाला, राज कुमारला (राज कपूर) १००० रुपये मानधन मिळते. त्याच्यासारख्या गरीब माणसासाठी ही रक्कम फार मोठी आहे. तरीही हे सारे पैसे तो नायिकेला (नूतन) देतो. त्याचा गैरसमज असतो की, नूतन एक गरीब मुलगी आहे आणि तिची आई खूप आजारी आहे. तिच्या इलाजासाठी पैसे देताना तो जराही थबकत नाही. रिकामा खिसा पण समाधानी मनाने घरी परत जाताना त्याच्या ओठावर हे गीत येते.
  माना अपनी जेब से फ़कीर हैं
  फिर भी यारों दिल के हम अमीर हैं
  मिटे जो प्यार के लिए वो ज़िन्दगी
  जले बहार के लिए वो ज़िन्दगी
  किसी को हो ना हो हमें तो ऐतबार
  जीना इसी का नाम है...

  ज्या माणसाच्या मनात कपट नसते, त्याचे आयुष्य एका स्वच्छंद पक्ष्यासारखे असते. या गीताचे चित्रीकरणही खूप सूचक आहे. राज हा एक अनोखा माणूस आहे. तो गरीब आहे पण त्याची त्याला खंत नाही. मनाची श्रीमंती त्याच्याकडे अपार आहे. आपल्या मार्गाने जात असताना एका आंधळ्या भिकाऱ्याला तो मदतीचा हात देतो. केवळ इतकेच नाही तर त्या भुकेल्याला हातातील चणेसुद्धा देऊन टाकतो. आयुष्य हे दुसऱ्यांना सुख देण्यात आहे हे व्रत त्याने हसत अंगिकारले आहे.


  आयुष्य कठीण असते, कोणीही स्वतःमध्येच परिपूर्ण नसते. अनेक वेळा प्रत्येक पायरी चढताना पराभव, वेदना, अगतिकता, विश्वासघात, मृत्यूचाही सामना होतोच. प्रवासात कोणीतरी असतो, जो तुमच्या थकलेल्या चेहऱ्यावर हास्याची रेखा उमटवतो. जगायची उर्मी देतो.
  किसी ने अपना बना के मुझ को मुस्कुराना सिखा दिया
  अँधेरे घर में किसी ने हँस के चराग़ जैसे जला दिया.

  पतिता या सिनेमातली नायिका ही बलात्कारित आहे. खचलेली आहे. अशा वेळी नायक तिला आधार देतो, विवाह करून तिला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देतो. हे गीत म्हणजे त्याच्याविषयी असलेली कृतज्ञताच. प्रेमाचे रूप कसे आहे हे कुणी पहिले नाही. पाण्यासारखाच त्याचाही रंग वेगवेगळा. तरीही जी व्यक्ती केवळ तिच्या अस्तित्वाने, तिच्या शब्दांनी तुमच्या ओठावर हसू आणत असेल, तर निश्चितच त्याच्याबरोबर चाललेली सप्तपदी सुखदायी असणार आहे.

  - प्रिया प्रभुदेसाई, मंुबई
  nanimau91@gmail.com

Trending