आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोरा गोरा अंग लै ले...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्रियांच्या नजरेतून शारीरिक प्रेमाच्या अनुषंगाने लिहिलेली आणि चित्रित झालेली गाणी बॉलीवूडमध्ये फार कमी आहेत. प्रियकराच्या भेटीसाठी आतुरलेल्या नायिकेवर चित्रित अशाच काही मोजक्या गाण्यांविषयी आजच्या भागात.    

 

बॉलीवूड जरी प्रेम आणि शृंगाराच्या पायावर उभे असले तरी स्त्रियांच्या नजरेतून, शारीरिक प्रेमाच्या अनुषंगाने लिहिलेली गाणी अतिशय कमी आहेत आपल्याकडे. प्रेम खट्याळ, पवित्र, निरपेक्ष सगळे काही असते, पण जेव्हा त्याची कामुक बाजू दाखवायचा प्रश्न येतो, तेव्हा सेन्सॉर बोर्ड जागा होतो. खजुराहोची जी मंदिरे या देहाच्या सोहळ्याला समर्पित आहेत, तिथे शारीरिक प्रेमाचा अर्थ फार वेगळा आहे. समागम ही नुसती क्रिया नाही तर ते आहे पुरुष आणि स्त्री दोहोंसाठी स्वतःचे काहीही मागे न ठेवता सर्वस्व अर्पून टाकणे.  प्रेमाची संपूर्णता स्वतःच्या विलयातून अनुभवणे. त्याची सुरुवात होते ती मनाच्या ओढीतून. मग ती एवढी वाढत जाते की देहाचे स्वतंत्र अस्तित्वसुद्धा सहन होत नाही. ‘मी’पण विरघळण्याचा हा क्षण तितकाच पवित्र असतो कारण त्यातून नवनिर्मितीचे, पर्यायाने सृष्टीचे सातत्य सांभाळले जाते.


चार पुरुषार्थांत कामाचे एवढे महत्त्व असताना सुद्धा त्याविषयी लिहिण्याची, बोलण्याची मोकळीक का नसावी? बॉलिवूडमध्येसुद्धा अशा नायिका कमीच. बंदिनी सिनेमातील ‘मेरा गोरा अंग लैले, मोहे शाम रंग दैदे’ म्हणणारी ही नायिका म्हणजे संध्याकाळच्या कलत्या उन्हात, सावल्या गडद होताना प्रियकराला संकेतस्थळी भेटण्यास जाणारी धिटुकली युवती. सामाजिक बंधने तिच्यावर आहेत तरीही ती तोडून चौकटीतल्या प्रणयाची सीमा ओलांडणारी तरुणी. गोऱ्या रंगाचे खरे तर आकर्षण असते आणि हव्याससुद्धा, पण रात्रीच्या अंधारात जर तिचा रंग मिसळून गेला तर प्रियकराला सहज भेटता येईल अशा कल्पनेने ती जगापासून स्वतःला लपवण्यासाठी म्हणते, मला सावळा रंग दे, कारण रात्र मला तिच्या अंधारात लपवू शकेल. 
इक लाज रोके पैया
इक मोह खीचे बैया

मनाची दुविधा तर आहेच. एकीकडे प्रियकराला भेटण्याची आतुरता, तर दुसरीकडे स्त्रीसुलभ लज्जा, पण ही नायिका धीट आहे, रसिक आहे. भावनांना बंध घालणे तिला मान्य नाही. कोणत्याही संकटाची पर्वा न करता, समाजाच्या रीतिरिवाजाला न जुमानता ती प्रियकराला भेटायला आतुर झाली आहे. ही नायिका एकटी आहे. तिच्या सोबतीला आहेत फक्त लुकलुकणारे तारे, सळसळणारे वारे. अंधार किर्र तरीही त्याला भेटण्याच्या उत्कंठेने भीतीवरही मात केली आहे.
कुछ खो दिया है पाय के
कुछ पा लिया गवाय के

शेवटी प्रेम म्हणजे तरी काय? सर्व नात्यात असणारी देवाणघेवाणच न? काही तरी गमवायचे आणि त्या बदल्यात बरेच काही मिळवायचे ही. स्वत:ला हरवून बसल्यावर मन कुठे भरकटतेय त्याची तरी कशाला चिंता आणि पर्वा करायची?
अशाच धीट मागणीचे अजून एक गीत ‘डी डे’ या सिनेमात आहे .
एक घडी और ठहर के जां बाकी हैं
तेरे लब पे मेरे होने का निशां बाकी हैं

रात्रीचा प्रहार एकमेकांच्या सहवासात जागवण्यात संपला आहे. एकमेकांना बिलगून, एक हात दुसऱ्याभोवती लपेटून, नुसत्या स्पर्शाने बोलण्यात. रात्र तर संपून गेली, पण बोलणे मात्र सरलच नाही. सरल्या रात्रीचा अनुभव मात्र अजून गात्रागात्रांत असताना, तुझ्या ओठावरील माझ्या खुणा अजूनही स्पष्ट असताना तू कसा जाऊ शकतोस असे केलेले कोवळे आर्जव आहे हे. सहवासातील जवळीक आणि तरीही मनात नव्याने जागणारी अतृप्तताच ही.
यूं बिछड के मुझ से ना सजा दे खुद को
अभी हाथों से तेरे जुर्म ओ गुनाह बाकी है
एक घडी और ठहर के जां बाकी हैं.

प्रणयाच्या प्रत्येक अनुभवाच्या वेळी उमटलेल्या तुझ्या हाताच्या दणकट स्पर्शाच्या खुणा अजूनही माझ्या अंगावर ताज्या आहेत. त्याची जाणीव तुझ्याही मनात झिरपत असतानाच माझ्यापासून विलग होण्याची सजा तू स्वतःला कशी देऊ शकतोस? जे घडून गेलेले आहे ते सुख, त्याच्या कोवळेपणाला धक्का न लावणारी तरीही धीट अशी ही मागणी. 


भर ओसरलेला आहे. रात्रीचा, तिचासुद्धा. तरीही उजाडणाऱ्या, रंगीत आभाळावर एखादी चांदणी लुकलुकावी तशी रात्रीची आठवण तिच्या मनात जागी आहे. अजूनही त्याच्या मिठीतले गुंतलेपण अजून जागे आहे.
शब के चेहेरे पे चढा रंग सवेरे का तो क्या
ढलते ख्वाबों में अभी अपना जहाँ बाकी है
एक घडी और ठहर के जां बाकी हैं.

पुरुषसत्ताक समाजात, सहवाससुखाची मागणी करणाऱ्या अशा नायिका आणि त्यांची गीते अभावानेच दिसतात. अस्तित्वाचा अहंकार आणि देहाची जाणीव मिटवणे ही काही साधी गोष्ट नाही. हे स्त्रीच करू शकत असेल असे संतांनाही वाटले आहे. म्हणून ज्ञानेश्वरांसारख्या संतांनीही स्त्री होऊनच परमात्म्याशी जवळीक साधली आहे.


दुर्दैव आहे की वर्षानुवर्षे सेक्स हा स्त्रीला वापरायला, दुखवायला आणि संपवायला एका हत्यारासारखा वापरला गेला आहे. तरीही इतिहासात, साहित्यात अशा स्त्रिया दिसतात ज्या आदिम स्त्रीशी नाते जोडतात. भावना, वासनांनी परिपूर्ण अशा इव्हची प्रतिमा बनतात. स्त्रीसुलभ ओढीने पुरुषाला सर्वस्व समर्पण करण्यासाठी झेपावतात. गंगा, उर्वशी, अहिल्या, क्लिओपात्रा आणि अनेक.

-प्रिया प्रभुदेसाई, मुंबई
nanimau91@gmail.com

बातम्या आणखी आहेत...