आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विलक्षण विज्ञानयात्री!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

“पद्मश्री’हा मानाचा पुरस्कार जाहीर झालेल्या अरविंद गुप्तानामक माणसाचं वेडेपण आणि काम इतरांनाही झपाटून टाकणारं आहे. ते टाकाऊ वस्तूंपासून वैज्ञानिक खेळणी बनवतात. ती खेळणी वापरून विज्ञानातल्या विशेषत: भौतिकशास्त्रातल्या अनेक किचकट संकल्पना हसत-खेळत समजावून सांगत जगण्याचा नवाच आदर्श निर्माण करतात...  


अमेरिकेतल्या ओहायो स्टेटमधली गोष्ट. एक लहान मुलगा नऊ - दहा वर्षांचा. धडपड्या, कडकड्या, आगाऊ, खट्याळ. एका जागी स्वस्थ बसणं ही त्याच्यासाठी अशक्य गोष्ट. पत्रे, खिळे, तारा, काचेचे तुकडे, भंगारातल्या वस्तू जमवण्याचा त्याला भारी नाद. घरातल्या एका खोलीत असं सगळं त्याने भरून ठेवलं होतं. त्याच्या उचापतींमुळे घराला पार भंगारच्या दुकानाचं रूप येऊ लागल्यानं त्याच्या आईनं त्याची चांगलीच खरडपट्टी काढलेली, पण तरीही हा मुलगा बिनघोरपणे दिवस - दिवस त्याच्या खोलीत बसून तारा, काचा, पत्र्याचे तुकडे, खिळे याची तोडफोड, जोडणी नि काय काय कुटाणे करत असे. या सगळ्याला तो ‘प्रयोग’ म्हणत असे, जे करता करता एक दिवस त्याच्या खोलीत स्फोट झाला आणि त्याची घराबाहेर हकालपट्टी झाली. मग स्वारी रेल्वेच्या डब्यात प्रवासातही प्रयोग करू लागली, ते पाहिल्यावर त्याची तिथूनही हकालपट्टी झाली. असे ‘प्रयोग’ करता करता या पोराने विजेवर चालणाऱ्या दिव्याचा म्हणजेच इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावला, इतरही अनेक महत्वाचे शोध त्याच्या नावावर आहेत. या मुलाचं नाव थॉमस अल्वा एडिसन! शाळेत असताना कधी तरी ही गोष्ट मी मराठीच्या पुस्तकात वाचली होती. 


एडिसनची गोष्ट आणि हे सगळं आता आठवायचं, कारण म्हणजे, डॉ. अरविंद गुप्ता! शिक्षणाच्या, विज्ञानाच्या क्षेत्रातलं त्यांचं उत्तुंग काम. त्यांना भारत सरकारने नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर केला. अरविंद गुप्ता या माणसाचं वेडेपण आणि काम आपल्या सगळ्यांना झपाटून टाकणारं आहे. ते टाकाऊ वस्तूंपासून वैज्ञानिक खेळणी बनवतात. ती खेळणी वापरून विज्ञानातल्या विशेषत: भौतिकशास्त्रातल्या अनेक किचकट संकल्पना हसत-खेळत समजावून सांगतात. त्या दृष्टीनं त्याचं प्रात्यक्षिक असलेले व्हिडिअो बनवून ते यूट्यूबवर अपलोड करतात. विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेतात. खेडोपाडी जाऊन मुला - मुलींशी विद्यान - संकल्पना यावर संवाद साधतात. विज्ञान शिक्षकांचं प्रशिक्षण करतात. जगातली विविध भाषांमधली सर्वोत्तम पुस्तकं त्यांच्या वेबसाइटवर वाचण्यासाठी उपलब्ध करून देतात. बाल साहित्य जास्तीत जास्त प्रमाणात ऑनलाइन उपलब्ध करून देतात. पण केवळ आजच नव्हे, तर वयाच्या २३व्या वर्षापासून हा माणूस विज्ञानाच्या क्षेत्रात स्वत:ला झोकून देऊन काम करतोय. नवनिर्माणाचा वैज्ञानिक आणि कलात्मक ध्यास घेऊन इतकी वर्ष शांतपणे काम करणाऱ्या माणसाचं नेमकं कार्यकर्तृत्व आहे तरी काय, हे अधोरेखित करणं मला गरजेचं वाटतंय. विशेषत: डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत काही मंडळी अविवेकीपणे उडवून लावण्याच्या काळात, तर खूपच तातडीचंही वाटतंय... 


अरविंद गुप्तांचा जन्म उत्तर प्रदेशातल्या रायबरेलीतला. कानपूर आयआयटीतलं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना ‘टेल्को’ कंपनीत नोकरी मिळाली. टेल्कोनं एक वर्षासाठी त्यांना ट्रेनिंगला पाठवलं, ते मध्य प्रदेशात. विज्ञान शिक्षणाबाबत विविध प्रयोग करण्याचं ते प्रशिक्षण होतं. तिथं, ते डॉ. यशपाल, डॉ. अनिल सद््गोपाल या दिग्गज शास्त्रज्ञांकडून शिकत होते, प्रयोग करत होते. विज्ञान शिक्षणाच्या दृष्टीनं चर्चा करत होते. प्रशिक्षणादरम्यान एक दिवस ते जवळच्याच एका गावातल्या आठवडी बाजारात गेले होते. बाजारातल्या एका दुकानाकडे नजर गेल्यावर ते भलतेच खुश झाले होते. सायकलमध्ये हवा भरण्याची काळी ट्यूब, वेगवेगळ्या प्रकारच्या ट्यूब्जचे तुकडे आणि बरंच काही ‘भंगार’ सामान त्यांना मिळालं होतं. ते सगळं विकत घेऊन ते गेले, आणि रबरी ट्यूब, माचीसच्या काड्या वापरून एक लहान मॉडेल तयार केलं. त्या मॉडेलचे विविध आकार तयार करून विद्यार्थ्यांना विज्ञानातल्या काही क्लिष्ट संकल्पना अगदी सोप्या पद्धतीने आणि प्रात्यक्षिक करून दाखवता येतील, हे  लक्षात आलं तेव्हा अरविंदजींना आनंद तर झालाच, पण ‘टेल्को’मध्ये आयुष्यभर ट्रक बनवण्यापेक्षा हे काम कितीतरी कलात्मक आहे, याची जाणीवही. हाच प्रयोग पुढे त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला... 


१९७७ मध्ये अरविंदजीनी ‘टेल्को’मधली नोकरी सोडली. या काळाबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘वह समयही कुछ अलग था... देश मे एक तरफ नक्सलबारी का आंदोलन चल रहा था... लोगों कि निजी जरुरतों के लिये संघर्ष जारी था... दुसरी तरफ गाव - गाव मे ंजो स्कूल्स थे, उनकी हालात बहुत खराब थी, बच्चो के लिये न क्लासरूम्स थे, न लॅब्स... संसाधनों कि कमी होने के कारण बच्चों का बहुत नुकसान हो रहा था, ऐसे माहोल मंे हम भी सामाजिक संघर्ष आंदोलन से प्रभावित थे... खास कर शिक्षा के क्षेत्र में, इतनी समस्याए देखने के बाद ‘टेल्को’ में ट्रक बनाते रहना मुनासिब नही लगा... 


अरविंदजी तेव्हापासून आजतागायत रोज काही तरी वैज्ञानिकदृष्ट्या नवं करत असतात. कचरा, रद्दी, भंगार यापासून वैद्यानिक खेळणी बनवणं हे तर त्यांचं लाइफ - टाइम मिशनच जणू. ही खेळणी वापरून प्रकाश, वायू, दाब, वस्तूमान, न्यूटनचे गतीविषयक नियम, गणितीय संकल्पना, जीवशास्त्रीय संकल्पना, विद्युतशास्त्र, चुंबकत्व आणि अशा अनेक संकल्पना अगदी सोप्या पद्धतीने ते समजावून सांगतात. इतकंच नाही, तर मुलांना मजा वाटावी, खेळता यावं म्हणून कागदाच्या तुकड्यांपासून पवनचक्की, प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांपासून विविध रंगांची आणि प्रकारची कारंजी, पंखेही त्यांनी बनवले आहेत आणि मुलांनाही ते बनवायला शिकवलंय. गरीब मुलांकडे, त्यांच्या पालकांकडे खेळणी घेण्यासाठी पैसे नसतात. खेळण्याअभावी मुलांचं बालपण कोरडं पडू नये, म्हणून त्यांनी कचऱ्यापासून अक्षरश: शेकडो खेळणी बनवली आहेत. ही खेळणी कशी बनवायची, याचे सगळे व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत. ९० च्या दशकात तर त्यांनी खेडोपाडी फिरून शाळामधल्या मुलांच्या कार्यशाळा घेणं, त्यांच्याशी संवाद साधणं, विविध उपक्रम घेणं याची सुरुवात केली. पुण्यातल्या ‘आयुका’संस्थेत काम करत असतानाही त्यांच्या मेहनतीत आणि प्रयोगशीलतेत खंड पडला नाही. विद्यार्थ्यांसाठी विविध पुस्तकं भाषांतरित करणं, ती वेबसाइटवर लोकांना सहज वाचता येतील, या स्वरूपात अपलोड करणं, अनेक दुर्मिळ पुस्तकं स्कॅन करून वाचण्यासाठी वेबसाइटवर उपलब्ध करून देणं, हे काम ते दिवसभर करत असत. आज त्यांच्या वेबसाइटवर अनेक भाषांमधली सुमारे साडेपाच हजार दुर्मिळ पुस्तकं उपलब्ध आहेत. ‘लर्नर्स लायब्ररी’ नावाचा एक अभिनव प्रयोगही त्यांनी केला आहे. खेड्यापाड्यातल्या अनेक शाळांमध्ये आजही नेटवर्कच्या समस्यांमुळे बऱ्याचदा इंटरनेट वापरायला अडचणी येतात. त्यामुळे त्यांनी एका डीव्हीडीत आठशे विविध प्रकारची पुस्तकं, वैज्ञानिक खेळणी बनवण्याच्या पद्धतीचे व्हिडिओ, महत्त्वाचे फोटो  असं सगळं संकलित केलं आहे. हे सगळं करत असताना शिक्षणाच्या क्षेत्रात जगभरात काय नवीन प्रयोग होत आहेत यावरही ते लक्ष ठेवून आहेत.न्यूझिलंडमध्ये आदिवासी विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षणावर काम करणाऱ्या एस्टन वॉर्नर या शिक्षकावर त्यांनी एक पुस्तक लिहिलंय. आपल्याकडच्या शिक्षणपद्धतीबद्दल काय तुम्हाला वाटतं? असं विचारल्यावर ते म्हणाले... हमारे यहाँ पर शिक्षा का क्षेत्र ‘मरूभूमी’ बन गया है... मिट्टी ही नही है, बीज बोने के लिये... बहुत सारे स्कूल्स उबाऊ हो गए है, स्कुलों के टीचर्स मरे हुये है, और वैसे ही काम कर रहे है... शिक्षा के लिये अच्छी पृष्ठभूमी बनानी होगी... 


तुम्हाला इतकं सगळ सुचतं कसं? असं विचारल्यावर ते म्हणाले... Ideas are more important than people... इन्सान मरता है, पर विचार जीवित रहते है... और यह काम मंै अकेला थोडे करता हुँ... कारवा हाथ बटाते जाता है... देखो मेरे एक साथी है, पी.के. नानावटी...जिन्होने मेरे एक हजार व्हिडिओज कन्नड मे डब किये है... स्वयंप्रेरणा से, बिना किसी अपेक्षा के... असं म्हणून त्यांनी अतिशय नम्रतेने आपल्या कामामागचे सामूहिक श्रम, विचार याचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. 


मला जसं बागडता आलं, मोडतोड करता आली, कचऱ्यातून नवनिर्माण  करता आलं, खूप निर्भेळ आनंद मिळाला, तसं प्रत्येक मुलाला असा अवकाश मिळावा, शिकणं आनंदाचं व्हावं ही जबाबदारी आपणा सर्वांची आहे. त्यासाठी मुलांना चुकू द्यावं.. मोडतोड करू द्यावी, ते तोडतील आणि ‘जोडतील’, असं अरविंदजी म्हणतात.. The best thing child can do to a toy is to break it.. अशा सोप्या वाक्यात ज्ञाननिर्मितीच्या संरचनेचं तत्वज्ञान सांगणाऱ्या अरविंद गुप्तांनी भारतातल्या उभरत्या पिढीला सर्जनाचा, कलात्मक विज्ञानाचा, नव्या प्रयोगांचा मोठा वारसा दिलाय. तो समृद्ध होणं गरजेचं आहे. 
अरविंद गुप्ता यांची वेबसाइट - www.arvindguptatoys.com/toys.html 


- प्रियांका तुपे  
tupriya2911@gmail.com 
संपर्कासाठी क्रमांक - ९५९४०३७९१९