आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री अंधार का पडतो?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रात्री अंधार का पडतो, या साध्या प्रश्नात आपलं विश्व अनादि आहे की अनंत आहे की मर्यादित आहे, या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. ते उत्तर जाणून घेण्यासाठी प्रश्नाची मांडणी जास्त चांगल्या पद्धतीने करावी लागते. सातवी-आठवीतल्या मुलांना समजण्यासारखा हा विचार आहे. त्यातून मुलांच्या आणि अनेक आईवडिलांच्या बुद्धीलाही चालना मिळेल, अशी खात्री आहे.


“बा बा, रात्री अंधार का पडतो?” असा प्रश्न अनेक लहान मुलं विचारतात. मूल लहान असेल, आणि आईबापांना अजिबात उत्साह नसेल तर “रात्री सूर्यदेव झोपायला जातो, म्हणून अंधार होतो,” असं उत्तर येऊ शकतं. जर समजण्याच्या वयातलं मूल असेल तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यामुळे आपण पृथ्वीवरचे लोक कधी सूर्यासमोर येतो, तर कधी पलीकडे जातो, त्यातून रात्रदिवसाचं चक्र निर्माण होतं, असं तांत्रिक उत्तर येऊ शकतं.


हे उत्तर अर्थातच बरोबर आहे. पण पुरेसं नाही. कारण त्यात गृहीत असं धरलेलं आहे की, आपल्याला प्रकाश मिळतो तो मुख्यत्वे एकाच ताऱ्याकडून - सूर्याकडून. हे अर्थातच रात्री आपल्याला दिसतं. आकाशात लाखो तारे दिसतात पण ते सगळेच खूप लांब असतात. त्यामुळे लुकलुकत्या प्रकाशापेक्षा जास्त प्रकाश आपल्यापर्यंत पोचत नाही. पण मग आपल्याला आपला मूळ प्रश्न बदलून विचारावा लागतो. “ताऱ्यांचा प्रकाश पुरेसा का नाही? तारे पुरेसे नाहीत का? का ते खूपच लांब आहेत?” या बदलामुळे आपल्याला लक्षात येतं की, आपण आता ताऱ्यांची संख्या किती, आणि अवकाशाची मर्यादा किती, यासारखे प्रश्न विचारायला लागलो आहोत. समजा हे विश्व अनंत आहे. म्हणजे अवकाशाला मर्यादा नाही. आणि सर्व अवकाशभर अधूनमधून कुठे ना कुठे आपल्या सूर्यासारखेच तारे आहेत. त्या सर्व ताऱ्यांचा प्रकाश सूर्याच्या प्रकाशाइतका होईल का? याचा विचार करण्यासाठी आपण एका मोठ्या चेंडूचा विचार करू. लाखो प्रकाशवर्षं त्रिज्येचा चेंडू, आणि आपण त्या चेंडूच्या केंद्रभागी आहोत. या चेंडूच्या आतमध्ये काही आकाशगंगा, स्वतंत्र तारकासमूह आहेत. त्यांचा काही ना काही प्रकाश आपल्यापर्यंत पोचतो. हा प्रकाश तुटपुंजा असू शकतो. कारण सूर्य आपल्या खूपच जवळ आहे, आणि हे कोट्यवधी तारे असले तरी ते लांब असल्यामुळे त्यांचा एकत्रित प्रकाश सूर्याकडून येणाऱ्या प्रकाशाचा अगदी छोटा हिस्सा असू शकतो.


आता या चेंडूची त्रिज्या दुप्पट करू. त्रिज्या दुप्पट झाली की घनफळ आठपट होतं. म्हणजे एकूण ताऱ्यांची संख्या आठपट होते. मोठ्या झालेल्या वर्तुळामुळे प्रत्येक ताऱ्यापासून आपल्यापर्यंत पोचणारा कमीकमी होतो हे खरं आहे. पण ताऱ्यांची संख्या त्या कमी होणाऱ्या प्रकाशाला भरून काढणारी असते. म्हणजे आपल्या चेंडूची, आपल्याभोवतीच्या अवकाशाची त्रिज्या आपण जसजशी वाढवत जाऊ, तसतसा आपल्यापर्यंत पोचणारा प्रकाश वाढत जातो. दहा लाख प्रकाशवर्षं, वीस लाख प्रकाशवर्षं असं करत काही अब्ज प्रकाशवर्षांपर्यंत जाऊ तसतसा ताऱ्यांपासून येणारा प्रकाश अधिकाधिक वाढतच जातो.


जर आपण हे अंतर त्यापेक्षाही दहा हजारपट केलं तर ताऱ्यांचा प्रकाश हा सूर्यापेक्षा जास्त होईल हे गणिताने सिद्ध करता येतं. आणि पन्नास हजार अब्ज प्रकाशवर्षं हे कितीही प्रचंड अंतर असलं तरीही ते अनंत नाही. जर अवकाशाला मर्यादा नसेल, आणि सर्व अवकाशभर तारे पसरलेले असतील, तर आपल्यापर्यंत पोचणारा प्रकाश हा सूर्याच्या कितीतरी पट - खरं तर अनंत पट असेल! आणि मग सूर्य असो किंवा नसो, दिवस-रात्र असा फरक असणारच नाही. तेव्हा अवकाश अनंत असू शकत नाही.


यावर एक तांत्रिक आणि महत्त्वाची शंका घेता येते. प्रकाशाचा वेग मर्यादित आहे. तेव्हा कदाचित असं असेल, की जे अब्जावधी प्रकाशवर्षांपूर्वी प्रकाशकिरण निघाले आहेत, ते अजून आपल्यापर्यंत पोचलेले नाहीत. तेव्हा अवकाश कदाचित अमर्याद असेल, पण सृष्टीच्या निर्मितीपासून ते किरण पोचायला पुरेसा वेळ मिळालेला नाही. हा युक्तिवाद मान्य करण्याजोगा आहे. पण त्याचा अर्थ असा होतो की, हे विश्व आकाराने अमर्याद असेल कदाचित, पण त्याचा जन्म काही अब्ज वर्षांपूर्वी झाला असणार. त्यामुळे एकतर हे विश्व मर्यादित आहे, किंवा अमर्याद असेल तरीही अनादि नाही - काही काळापूर्वी या विश्वाचा जन्म झालेला आहे.
रात्री अंधार का असतो? या साध्या प्रश्नाचा पाठपुरावा केला तर आपल्याला विश्वाची गहन सत्यं सापडतात. त्यासाठी कुतूहल जागृत ठेवावं लागतं. तुमच्या मुलांनी घोकंपट्टी करण्याऐवजी खरोखर काही शिकावं असं तुम्हाला मनापासून वाटत असेल तर हे कुतूहल जोपासा. तुमच्यातलं आणि तुमच्या मुलांमुलींमधलंही.


- राजेश घासकडवी,न्यूयॉर्क 
ghaski@gmail.com

बातम्या आणखी आहेत...